Friday, March 20, 2015

मी आणि तु ....(भाग २)आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............


"विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??"
"अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!"
"अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?"
"हो हो. पाठव!"

रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला.

"अरे विक्या!! चल आवर लवकर!!"
"का रे? काय झालं? सगळ ठिक ना?"

"कसलं आलय ठिक? आपले मजनू पुन्हा जीव द्यायला निघालेत. चल लवकर. मला काय आवरेना तो. तुच चल लवकर"
"आयला! काय रे याच रोज रोजच नाटक? उडी मारायच्या विचारानं ओली होते याची आणि हा म्हणे जीव देणार!"
"अरे विक्या चेष्टा नको रे करू. Please चल लवकर."
"अरे चेष्टा नायतर काय करू! दिसली पोरगी की पडला प्रेमात! अरे शेजारचा तो दिड वर्षाचा बबलू चालायला शिकताना जेवढा पडला नसेल तेवढा हा गृहस्थ प्रेमात पडला असेल!"
"विक्या जोक मारू नको. तु येणारेस की मी जाऊ?"
"आयला! तुम्ही दोघंपण ना एकदम ऍंटिक पीस आहात. चल हो पुढ, मी येतो तोंड धुवुन."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------


"विक्या अरे किती वेळ लावलास?"
"हम्म्म! बर कुठयेत साहेब?"
"कुठ असणार? तो बघ तिकडं. कड्यावर बसलाय"
"हम्म्म! ठिक आहे! यावेळी मीच ढकलतो त्याला! म्हणजे रोज रोज माझी झोप मोड नको"
"अरे ए विक्या! अरे येडा झालायेस काय?’
"मग काय तर! वैताग आलाय मला याचा"

मी तसा एकदम बारीक शरिरयष्टीचा होतो. त्यामुळे त्या कड्यावर चढायला जास्त वेळ नाही लागला. पण प्रश्न हा होता की हा जाडा आज्या कसा काय तिथं पोहचला असेल. मी त्याच्या जागी असतो तर एकतर जीव द्यायची जागा बदलली असती नाहीतर सरळ प्लॅनच कॅंसल केला असता. असो. मी धापा टाकत शेवटी कड्यावर पोहचलो. रूमाल काढला, बसायची जागा झाडली आणि आज्याच्या शेजारी बसलो. नेहमी प्रमाणे महाराज शुन्यात नजर लावून बसले होते.

"काय मस्त हवा आहे नाही आज्या?"
"हम्म्म्म !"
"अरे ते बघ ते तुझ घर! केवढस दिसतय नाही इथुन?"
"हम्म्म्म!"
"अरे ते बघ......"
"विक्या! नळकांड्या! उगाच नेहमी सारखं फालतू बडबडू नको. आधीच मुड नाय माझा!"

माझ्या "सुद्रुढ" शरिरयष्टीमुळे "नळकांड्या" हे माझं नामकरण आज्यानेच केलं होतं.

"बर बाबा! sorry! बोल काय मॅटर यावेळी?"
"काय नाय सोड ना!"
"बर ठिक आहे. बर मला सांग तु उडी मारतोयेस की मी ढकलू? एकदाच काय ते करून टाक."
"अरे ए भुसनाळ्या! इथ तुज्या जिगरी दोस्ताच्या लाईफ़चा सवाल हाय आनि तु हे बोलतोयेस? हिच काय तुझी यारी?"
"आता मग काय करू सांग? विचारलं तर भाव खातोयेस!"
"मग प्रेमानं विचारायच! आगोदरच प्रेमभंग झालाय आनि तु त्यात......"
"कितीवेळा प्रेमभंग होतो रे तुझा? बर यावेळी कोण होती ती कमनशिबी जिनं आमच्या वाघाला नाकारलं?"

एक हलकं स्मितहास्य अज्याच्या चेहर्‍यावर मला दिसलं. बहुतेक "वाघा"ची उपमा एकदम योग्य जागेवर बसली! Bull's eye का कायतर म्हणतात ना, तसं!!

"अरे ती मानेंची रेश्मा आहे ना..."
"ती? ती आवडली तुला ? ती बरोबर मुलगी नाही. तुझ्यासाठीतर मुळीच नाही"  आज्या बोलायच्या आतच माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं.
"ए नळकांड्या! माझी लाईन आहे ती! काय बोललास तर बघ तिला!"
"अरे माझ्या राजा! ती आगोदरच एंगेज आहे! पानपट्टीवाला बबन आहे तिचा छावा"
"म्हणजे? तुला पण माहित होत? कधी बोल्ला नाईस मला? आणि तिनं त्या बबन्यासाठी मला नाकारलं? मला?"
"आता मला काय माहित यावेळी तुझा नेम तिकड लागणार आहे? आणि ’तुला पण’ म्हणजे? आणखी कोणाला माहित आहे?"
"अरे तस नाय! ती पण हेच म्हणाली की मी एंगेज आहे. माझा नाद सोड!"
"चायला आज्या तुझं डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाल्लय की? तिला विचारून मोकळा पण झालास?"
"अरे मंग काय? रेशनच्या लाइनमधे समोरच उभी होती. दुकान उघडायला वेळ होता म्हणून विचारून टाकलं?"
"वाह! बर हे तुझ प्रेमप्रकरण कधीपासून सुरू होतं?"
"सकाळी ७ ला मी लाईनमधे तिच्यामागं उभारलो. साडे ७ वाजले असतिल, ती मला आवडली. ८ वाजता प्रेमात पडलो. साडे आठला प्रपोज केलं आणि ९ वाजता ब्रेकप झालं"
"आता मी एक काम करतो. मीच उडी मारतो इथुन. घरी माझ्या आईला सांग मला या जीवनाचा साक्षातकार झाला आणि मी स्वेच्छेने देहदान केलं"
"ए विक्या! कानपाड फोडेन असलं काय बोल्लास तर! अपला जिगरी आहेस तु! अरे अशा ५६ मुली येतिल परत लाईफमधे पन तुझ्यासारखा जिगरी नाय मिळनार मला!"

आज्याच्या डोळ्यातलं आलेलं टुचुकभर पाणी सगळं काही सांगून गेलं. आज्याच्याच भाषेत बोलायच झालं तर "जिगरी" या शब्दाचा खरा अर्थच जणू मला  समजला.

"बर बाबा! चुकलं माझं. पण काय हा तुझा फालतुपणा? कोणपण दिसली की कसाकाय प्रेमात पडतोस? आणि नाही यश आलं की चाल्लास जीव द्यायला."
"काय करू सांग! frustration आलय. कोणच होकार देत नाय!"

"अरे जरा धिरानं करायच्या असतात या गोष्टी. घाई गडबड करून काही मिळणार नाही."

"ऐका कोन सांगालय!"

"तुला काय समजायचय ते समज! पण एक promise कर की परत हे ’प्रेमात पडायच, मग प्रेमभंग की लगेच जीव देण्याची धमकी’ बंद करायच!"

"प्रेमात नपडायच promise काय करनार नाही पन ते जीव वगैरे काय देनार नाही. आईची शप्पत. सुटल्या म्हन"
"सुटल्या"

आज्या आणि मी तिथुन उठलो. हळू हळू कडा उतरला. खाली रोह्या हाताची बोटं मोडत चिंतेत उभा होता. आम्हाला दोघांना ’जिवंत” खाली येताना बघून त्यानं उसासा टाकला आणि पळत येऊन आम्हाला मिठी मारली. आज्याच्या पोटात दोन बुक्क्या घातल्या आणि आम्ही तिघे परत घरी निघालो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे असं आमचं त्रिकुट. उभ्या पंचक्रोषीत परिचित होतं. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायची आमची तयारी होती. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही एकत्र होतो. रोह्या अभ्यासात खुप हुषार होता. चांगले मार्क्स मिळाले असतानाही त्याने त्याच्या वडलांचे नऐकता मला आणि आज्याला ज्या कॉलेजमधे admission मिळाली तेथेच admission घेतली. तिघही लवकरच आपापली घरटी सोडून दुरच्या ठिकाणी जाणार होतो. Engineering हे आम्हा तिघांनाही घ्यायचं होतं आणि नशिबाने आता आम्ही तिघही एकाच college मधे, एकाच वर्गात शिकणार होतो. तिघांच्याही मनात खुप स्वप्न होती आणि एकमेकांची साथ असताना बाहेरच्या जगाची तर चिंताच नव्हती..... !

================================================================================


मी आणि  तु  ....(भाग १) ला मिळालेला प्रतिसाद खरच अनपेक्षित होता. आता या मी आणि  तु  ....(भाग २) पासून कथेला गुंफण्याचा अवघड प्रयत्न सुरू होत आहे. हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा दुसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Monday, March 16, 2015

मी आणि तु ....(भाग १)

“Good Morning Pune! सकाळचे ८ वाजले आहेत आणि मी विकी आपल्या सर्वांच आपल्या लाडक्या Talk With Vikcy कार्यक्रमात स्वागत करतो. वाह! आज काय मस्त वातावरण आहे नाही? मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मी मस्त गरमा गरम चहा पित तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त गाण्यांचा नजराणा....! आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , एखादे  गाणे ऐकायचे असेल किंवा तुमच्या some one special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चलातर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडत्या गाण्याने, “चिंब भिजलेले...From movie बंध प्रेमाचे”.

गाणं सुरू झालं तसा मी off Air गेलो. आज खरच खुपच सुंदर वातावरण होतं . बाहेर मस्त रिमझीम पाऊस सुरू होता  पण रेडिओ स्टुडिओच्या या बंद रूममधे तेही AC मधे बसून तो feel आणणं जरा कठिणच जातं होतं . चहा नेहमी प्रमाणे माझ्या आवडीचा म्हणजेच फक्त दुधाचा बनवला होता . एकदम फक्कड!

“विकी SSS!!! कॉल यायला सुरू झाले आहेत. कुठयं लक्ष?” ,राजू सरांच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यांना एक स्माईल दिली अणि पुन्हा On Air गेलो.

“मग मंडळी! कशी झाली दिवसाची सुरूवात. I hope या गाण्याने तुम्हाला नक्कीच फ्रेश केलं असेल. काय म्हणताय? अजून गाणी ऐकायची आहेत? मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चला तर बघू आज आपला पहिला caller कोण आहे!

“Hello, मी विकी, तुमच Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. आपलं नाव कळू शकेल का?”

“Hi विकी. मी पुनम”

“Hi पुनम. कशी आहेस?”

“मी मस्त. तु कसा आहेस?”

“मी पण एकदम बेस्ट! बर मला सांग तु काय करतेस?”

“मी सध्या इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात आहे. CoEP ला कंप्युटर सायन्सला”

“अरे बापरे! तो आज सुभह सुभह इंजिनिअरसे पाला पडा हे! बचके रेहना पडेगा रे बाबा...! हा हा हा! मग बोल कोणत गाण ऐकायच आहे तुला?”

“Actually मला हे गाण डेडिकेट करायच आहे. Some one special ला.”

“oh! Awesome. याला म्हणतात दिवसाची perfect सुरूवात. बोल कोणतं गाणं ऐकवू?”

“मला “यंदा कर्तव्य आहे” मधिल “आभास हा” ऐकवायच आहे”

“ओह ग्रेट पुनम. मस्त चॉईस. I hope तुझा some one special हा कार्यक्रम ऐकत असेल. Thank you for your call. Now playing “आभास हा !!” from movie यंदा कर्तव्य आहे.”

गाणं पुन्हा सुरू झालं. तसा मी offline झालो. आज पहिलाच caller आपल्या someone special साठी फर्माईश घेऊन आलेला बघुन खुप छान वाटलं. चहाचा घोट घेत घेत या कपलचं एक काल्पनिक चित्र रेखाटत बसलो. चहा झाला म्हणून कप टेबलावर ठेवायला गेलो आणि नकळत अंदाज चुकला आणि कप खाली पडला. माझ्या व्हिलचेअर वरून मला खाली पडलेले तुकडे गोळा करता येत नव्हते. माझी वायफळ धडपढ बघून राजू सरांनी काचेपलिकडूनच “Let it be. Programकडे लक्ष दे ” असा इशारा केला. तसा मी माझी व्हिलचेअर पुन्हा निट सेट करून गाण संपायची वाट बघत बसलो.

आज खुपच call येत होते. ते बघून एक सुखद हास्य नकळत गालावर खुललेलं. आपला show बराच लोकप्रिय आहे हिच जणू त्याची एक पावती असते. तेवढ्यात गाणं संपलं. आता पुन्हा माझी on air जायची वेळ झालेली.

“काय मग पुणेकर! कशी वाटली पुनमची फर्माईश. तिच्या Someone special. अरे बाबा हा कर्यक्रम ऐकत असशील तर बघ पटकन पुनमला call कर! अशी special सगळ्यांच्याच नशिबी नसते रे बाबा! हा हा! चला आता next caller कडे वळू. त्या आधी एक reminder; आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , कोणते गाणे ऐकायचे असेल, पुनम सारखं तुम्हालाही तुमच्या someone special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. बर बघु आपला next caller कोण आहे ते.

“Hello. मी विकी, तुमचं Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. बोला काय म्हणताय?”

“Hi Vicky. Thank God you finally picked my call”

“oh! माझं नशिब खुप छान आहे मग आज”

“Naah! Actually I was trying to reach you since last many years”

“हाहाहा! काहीही काय राव! हा कार्यक्रम सुरू होऊन तर अजून वर्षही झालं नाही.”

“Nope dear. I know you personally”

“काय राव सकाळ सकाळी थट्टा! मी काही एवढाही famous नाही की माझे fan followers असतिल”

“नाही. I am serious. I know you better than anyone in this world”

“oh! आईला तर English येत नाही माझ्या. आणि तिचा आवाज एवढा यंगही नाही. त्यामुळे तु माझी आई तरी नक्कीच नाहीस. आणि तिच्याशिवाय मला कोणी ओळखत असेल असं मला नाही वाटत. तरीही चला बघूच. चल, माझा आवडता रंग सांग”

“लाल.”

“Oh! Correct! Wild guess han!!!, चल आता सांग आवडतं फुल”

“सोनचाफा”

“Unbelievable! पुन्हा बरोबर. बरं आवडत ठिकाण?”

“मनाली”

“आवडता लेखक?”

“पु.ल. देशपांडे”

“आवडता अभिनेता?”

“आमिर खान”

मी प्रश्न विचारत होतो अन ती  एका पाठोपाठ एक अचुक उत्तरं देत होती. प्रत्येक अचुक उत्तरासोबत माझी बैचेनी वाढतचं होती. माझ्या अपघातानंतर गेले ४ वर्ष मी आणि माझी आई पुण्यात राहायला आलो होतो. ना कोणी जवळचा मित्र ना मैत्रिण. तरिही ही माझ्याबद्दल एवढ कसं जाणत होती? शेवटी मला राहावल नाही.

“बाई मी हारलो! कोण आहेस तु?”

“मी बोल्ले होते की I know you better than anyone. पण तु अजूनही सुधारला नाहीस! तसाच आहेस!”

“पण तु आहेस तरी कोण?” आता तर मी पुर्णतः बैचेन झालो होतो. तेवढ्यात तिकडून आवाज आला

“मुग्धा. मुग्धा परांजपे.”

एक जबरदस्त धक्का! स्टुडिओ मध्ये स्मशान शांतता! विकी पुर्ण  shock मधे.................!

==========================================================================

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहितोय. डोक्यात बऱ्याच दिवसांपासून एखादी दीर्घकथा लिहायची इच्छा होती ती इच्छा  या  "मी अणि तु"  दीर्घकथेद्वारे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. हा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा.

-अद्वैत कुलकर्णी

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...