Monday, February 15, 2016

मी आणि तु ....(भाग ७)

"रोह्या! आजकाल लोक लय शानी झालेत नै?" , आज्याने मला taunt मारला आहे हे मला समजलं. पण तरिही दुर्लक्ष करून मी submission खरडत बसलो!
"कारे आज्या? काय झालं? कोणबद्दल बोलतोयेस?" , रोह्याने हातातलं पुस्तक बाजुला ठेऊन आज्याकडे नजर टाकली.
"अरे असचं रे. काही लोकं वेगळी वागायला लागल्यात आजकाल!", पुन्हा एकदा आज्याने taunt  मारला!
"ए आज्या! सांगयच असेल तर नीट सांग! फालतु कोडी सोडवायला मला वेळ नाही. Exam जवळ आलिये!"
"अरे दुसरं कोण असनार? हा नळकांड्या!!! लय शाना झालाय!!" आज्या पुढं बोलायच्या आत मी ओरडलो,
"मी काय केलयं रे आज्या?"
"काय केलय? अरे तुज़्या वागन्यातला बदल मला कळत नाई होय?"
"मी काय चुकिचं वागलोय? रोह्या तु सांग!"
"तसं आज्या बोलतोय ते बरोबरच आहे. मलाही तुझ्या वागण्यात फरक जाणवतोय आजकाल."
"काय फरक? जरा मलापण कळूदे!", मी थोड्या रागानेच बोल्लो!
"अरे नळकांड्या किती फरक सांगू बोल! कधी आरसा म्हंजे काय माहित नसलेला तू आजकाल तासतासभर आरश्यासमोर उभा असतोस! कधी फॉर्मल शिवायही काही कपडे असतात याची माहितीही नसलेला तू आजकाल लो जिन्स आनि टीशर्टशिवाय दुसरं घालत नाईस! २-४ दिवस आंघोळ नै केल्यासारखं बाटलीभर सेंट मारून येतोस कॉलेजला आणि मला विचारतोस होय काय फरक पडलाय तुझ्यात? आता सांगनारेस काय झालय की अजुन सांगू तुज्यातले बदल?"
आज्याला एवढा तावातावात बोलताना पाहून मी थोडा बिचकलो. इकडं रोह्या तोंडावर मोठ्ठ हासू घेऊन एकदा मला आणि एकदा आज्याला बघत होता. मी त्याच्याकड डोळे मोठ्ठे करून बघितल्यावर त्याची तंद्री मोडली,
"बरोबर आज्या! मी पण हेच observe केलयं!", रोह्यानेही आज्याच्या बाजूने री ओढली.
माझ्या मनात मात्र चलबिचल सुरू होती. बर्‍याच दिवसांपासून मला हे secret शेअर करायच होतं. शेवटी ते दोघे माझे best friends होते. यांना सांगाव की इतक्यात नको? नाही सांगितलं आणि बाहेरून कळालं तर गैरसमज वाढतील आणि मी सांगितलं तर कदाचित त्यांना आनंदही होईल असे विचार मनात येऊ लागले.  शेवटी मनाशी ठरवलं की यांना आज सांगायचच.

"हे बघा! मी सगळं खरं सांगतो! पण ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय कोणालाही कळता कामा नये!" , मी थोड्या gossiping च्या टोन मधे हळू आवाजात बोललो, तसे ते दोघेही हाततली कामं सोडून माझ्या बोलण्याकडे मन लावून लक्ष देऊ लागले.
"हे बघा मला कळत नाहिये कुठुन सुरूवात करू!" , मी थोडा गोंधळलेलो!
"ए नळकांड्या! उगा भाव खाऊ नको! जे काये ते लवकर सांग. मला अभ्यास करायचाय!" आज्याच्या या वाक्यावर रोह्याने कुत्सित नजर टाकली.

"बरं. विषय असा आहे की मी...! नाई मला.... नाई माझ्या....!", मला कसं सांगाव कळत नव्हतं. त्या दोघांची काय reaction असेल ह्या विचारानेच माझं तत-पप होत होतं. पण शेवटी मी धाडस केलं!
"मी आणि मुग्धा are couple now!", मी एका क्षणात बोलून गेलो! आता मला अपेक्षा होती की भरपूर शिव्या बसणार, कदाचित मी मार सुद्धा खाईन. पण घडलं वेगळच. आज्याने रोह्यासमोर हात पुढ केला. तसा रोह्याने माझ्याकड रागाने बघत खुटिवर टांगलेल्या त्याच्या पॅंटमधून स्वतःच पाकिट काढून त्यातले ५० रुपये घेऊन आज्याच्या हातात आपटले.
"तु पुढ बोल!", आज्या हातातल्या ५० रुपयांच्या नोटेचा वास घेत अगदी मवाल्यासारखा नोट कानाच्या आणि डोक्याच्या फटित ठेऊन बोलला!
"Actually तीने मला propose केलं" , मी पुढ बोललो तसा आज्याने पुन्हा रोह्याकडे हात पुढ केला. तसा रोह्या पुन्हा माझ्याकडे रागाने बघत आणखी एक ५० ची नोट काढून आज्याच्या हातात ठेवत मला शिव्या देत समोर येऊन बसला.

"हम्म...! पुढ! जाऊंद्यात तुमची गाडी पुढ!", आज्या पुन्हा माजात बोलला. माझ्या या खुलास्याला इतका नरम प्रतिसाद मला अपेक्षित नव्हता. आणि हे ५०-५० रुपयांच कोडं मला काही कळत नव्हत!
"अरे तु बोल रे. नको लाजू. आपलीच मानसं समज आमाना!", आज्या मिश्किलपणे रोह्याकडे हसत बोलला.
"अरे काही नाही मग. तीने मला भळाभळा सगळं मनातलं सांगितलं आणि माझ्याकडून उत्तर मागितल. थोडक्यात माझं मत विचारल".
"मग? पुढ काय झालं? तु काय बोललास?", रोह्याने कुतुहलतेने विचारले.
"मी काय बोलतोय. कळायचच बंद झालं राव मला. काहीच सुचलं नाही. पळून आलो रूमवर. आणि नंतर आजारी पडलो. आठवतयं का तेव्हा तापाने फणफणलेलो मी ? ते हेच कारण!" , मी अभिमानाने सागितलं!
तसा आज्याने पुन्हा हात पुढं केला आणि रोह्याने पुन्हा ५० ची नोट त्याच्या हातात ठेवली. आता मात्र मला सहन झालं नाही,

"काय रे? काय चाल्लय तुमचं? मी इथे इतका सिरियस विषय बोलतोय आणि तुम्ही पैसे-पैसे काय करताय?"
"पैसे नाई म्हनायच बाळा याला! नोटा म्हणायच! आजची कष्टाची स्वकमाई!" आज्या पुन्हा मस्तीत बोलला.
"तुला विचारण्यात काही point नाही. रोह्या! तु सांग. नेमकं काय चाल्लय तुमच?"
"अरे गडबड नको. फक्त एक शेवटचा प्रश्न! तुझ्या मनात तिच्या विषयी feelings आधिपासून होत्या की तीने propose केल्यानंतर तयार झाल्या?", रोह्याने कुतुहलाने विचारले!
"तिने propose केल्यानंतर!" मी जसं उत्तर दिलं तसं रोह्याच्या चेहर्‍यावर हासू ऊमटलं आणि तिकडे आज्याचा चेहरा पडला. यावेळी रोह्याने हात पुढं केला आणि आज्याने ५० ची नोट त्याच्या हातात आपटली.
"बरं आता मला कळेल का की हे तुमचं दोघांच काय चाल्लय?", मी थोडा त्रासिक होऊन बोललो.
"कस आहे ना नळकांड्या! तुला मी लय जवळून ओळखतो. या रोह्याला मी गेल्या आठवड्यातच बोल्लो होतो की तुज़ आनि मुग्धाचं चक्कर चालू आहे. पण या स्कॉलरला माजं बोलन काय पटलं नाही. मग मी बोल्लो लाव ५० ची पैज. अता तु जे सांगितलं त्यातल शेवटच सोडलं तर बाकी सगळे अंदाज बरोबर लागले किनी माझे!"

खरच आम्ही तिघंही एवढे जवळ असलो तरी आमच्यात आज्याची observation skill खुप जबरदस्त आहे.
"पण कायपण म्हण विक्या! आपल्याला आवडली तुमची लव स्टोरी. पहिल्यांदाच माझ्यामते मुलीने propose केलेला किस्सा अनुभवायला मिळाला! नायतर या आज्यासारखे रोमिओंचेच किस्से ऐकुन वैताग आलेला." रोह्याने माझ्या पाठीवर एक जोरात बुक्की घालून माझे अभिनंदन केले. तेवढ्यात माझं लक्ष आज्याकडे गेलं. तो डोक्याला हात लावून बसला होता.
"कारे काय झालं? तुला नाई काय झाला आनंद?"
"झाला की. पण एक प्रश्न काय सुटेना!"
"का रे? बोल तर"
"हेच की तुझ्या सारख्या नळकांड्यात नेमक हिने बघितलं तरी काय?" एवढ बोलून प्रश्नार्थक नजरेनं त्यानं मला बघितल. आणि क्षणात परत बोलला, "हान! आता एक लक्षात ठेवायच! आता माझ्या आणि माझ्या सारिकाच्या मदी आलास तर लय मार खाशिल!"
"नाही बाबा! अजिबात नाही! तुझ्यासाठी हृदयावर दगड ठेवून मी तिला विसरून जाईन" मी अगदी खुप दुःख झाल्याचा आव आणत आज्याला शब्द दिला. त्यानंतर तिघेही पोट धरून हसलो. तेवढ्यात रोह्या ओरडला,
"आज पार्टी झालीच पाहिजे!"

======================================================================================

मी आणि तु कथेचा हा भाग खुप दिवसानंतर प्रकाशित करत आहे त्याबद्दल क्षमस्व. आशा करतो हा भागही तुम्हाला आवडेल. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

2 comments:

  1. जास्त वेळ ताठकळत ठेवु नकोस यार​......

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...