Saturday, September 23, 2017

मी आणि तु ....(भाग १०)

"अरे विकी तु? आज अचानक ? सांगितल नाहीस काही ? अहो SS!! बघितलत का, विकी आला आहे. ये बाळा! दमला असशिल ना. ये बस. मी पाणी आणते" मी घरी पोहोचताच आईला काय करू काय नको असं झालं होतं. मी नकळवताच घरी पोहोचलो होतो. आईला समोर बघितल्यावर मला नेहमीच बरं वाटतं पण आज ज्या कारणासाठी मी घरी आलो होतो याची आठवण झाल्यावर एकदम पोटात गोळा आला. तशी आई थोडी तापट स्वभावाची तर या उलट बाबा एकदम शांत, मिश्किल. या दोघांची भांडणं बघायला खुप मजा यायची. आईचा थयथयाट चालायचा तर बाबा मस्तपैकी आईच्या फिरक्याघेत भांडणाची मजा लुटायचे.
घरी पोहचायला रात्र झाली होती. आईने मस्त गरमा गरम स्वयंपाक केला. माझी आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. हॉस्टेलचे खाऊन खाऊन इतका वैतागलो होतो. कधी एकदा घरी जाऊन आईच्या हातचे खाईन असं झालं होतं. मी तसा शांतपणे जेवत होतो. नेहमी सारखा उत्साही नाही हे आईच्या लक्षात आलं होतं.
"काय रे विकी? सगळं ठिक आहे ना?" आईने शंकेच्या स्वरात विचारलं.
"हो गं. सगळं व्यवस्थित आहे." मी तिची नजर चुकवत बोललो ते बाबांनी हेरलं. जशी आई भाकरी भाजायला पाठमोरी झाली तसं बाबांनी भुवया उचलुन न काही बोलता "काय झालयं?" विचारलं. मीही मान डोलावून "काही नाही" चा इशारा केला. पण शेवटी आई-बाबाच ते! त्यांच्यापासून काहीही लपवणं खुपच मुश्किल.
जेवणं आटोपली तसे आम्ही परसात गप्पा मारत बसलो. थोड्यावेळात परत आईने विचारले,
"विकी. अरे काय झालयं? नेहमीसारखा वाटत नाहियेस. काय झालयं नेमकं? तु काहीतरी नक्की लपवतोयेस. अहो! तुम्ही तरी बोला काहितरी."
"हो हो. अरे राजा. काय झालयं? कॉलेजात सगळ ठिक आहे ना? आज अचानक नकळवता आला आहेस. नेहमीसारखा उत्साही देखिल दिसत नाहियेस. आम्हाला काळजी वाटतेय रे. बोल काय झालय?" बाबा केविलवाण्या आवाजात बोलले.
"आई, बाबा. तुम्हाला प्रिंसिपल मॅडमनी भेटायला बोलावलय!", मी एका दमात बोलून गेलो तसे आई बाबांनी एकमेकाकडे भुवया उंचावत पाहिलं.
"का रे? काय झालं? अख्ख्या शालेय जिवनात कधी आम्हाला शाळेत यावं लागलं नाही आणि आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलावलय? काय रे विकी? मुलीचा वगैरे प्रकार नाही ना?", आईने एकदम बॉंबच टाकला. मी काय बोलावं कळत नव्हतं. मी शांतपणे माझा मोबाईल बाहेर काढला. आमचा एक ग्रुप फोटो उघडला आणि एक-एकचे नाव सांगू लागलो,
"हा आज्या,ही सारिका, हा रोह्या, हा मी, ही मुग्धा, हा मिहीर, हा सौरभ"
"हे काय दाखवतोयेस? मी प्रश्न काय विचारलाय? तु बोलतोयेस काय?", आईने त्रासिक स्वर धरला.
"आई- बाबा........ मला ............ माझं.............. नको............." , मी धाडस करू शकत नव्हतो. माझं हृदय अंदाजे सेकंदाला एक लाख तरी ठोके देत होतं. असं वाटत होतं की जणू ते माझ्या शरिराच्या बाहेर पडेल की काय.
"अरे बोलशिल तरी? काय प्रकार आहे हा विकी?" , पुन्हा आईने त्रासिक आवाजात विचारले.
"आई-बाबा. मी मुग्धाच्या प्रेमात पडलोयं ", मी एक मोठा श्वास घेतला आणि बोलून गेलो! आईला एक दोन सेकंद लागले मी काय बोललोय हे कळायला. बाबांनीपण एकदम भुवया उंचावल्या.
"अरे विकी तु काय बोलतोयेस कळतयं का तुला? " आई थोड्या रागिट आवाजत बोलली. तिकडे बाबांनी हाताने खुण करून माझा मोबाईल मागून घेतला आणि मी दाखवलेला आमचा ग्रुप फोटो बघू लागले. आईचा इकडे प्रचंड थयथयाट सुरू होता आणि बाबा शांतपणे आमचे फोटो बघत होते. 
तुला अक्कल आहे का?, तुझं हे वय आहे का? , तुला हे करायला मोठ्या कॉलेजात घातलयं का? वगैरे वगैरे भरपूर प्रश्न आई एकामागोमाग एक माझ्यावर मारत होती पण बाबा शांतपणे एक एक फोटो बघत होते. साधारण पाचएक मिनिटांच्या थयथयाटानंतर आईच्या लक्षात आलं की ती एकटीच hyper झालिये.
"अहो मीच बडबडतीये. तुम्ही पण काहितरी बोला." आई रागाने बाबांना म्हणाली.
"मला मुलगी पसंत आहे" बाबा  मोबाईलमध्ये बघत बोलले. मला फुदुकन हसू आलं.
"अहो तुम्हाला काही कळतयं का? काय बोलताय तुम्ही. ह्या धगोर्ड्याला रागवायचं सोडून हे काय बोलताय?"
"आहं असं होय? काय रे विक्या? कधिपासून सुरू आहे हे सगळं?", आईची नजर चुकवतं बाबांनी मला डोळा मारला. ही आमची खुप जुनी sign language. मी समजायचं ते समजलो.
"साधारण एक वर्ष झालं", मी हसू दाबत बोललो.
"एक वर्ष?आणि तु हे आज सांगतोयेस?", बाबा उगाच अश्चर्य झाल्यासारखे म्हणाले.
"Sorry बाबा. मी हे आधिच सांगायला पाहिजे होतं."
"बरं. हे एकतर्फी आहे की तिला माहितिये?", बाबांनी विचारलं.
"तिनेच मला propose केलं", मी उत्तरलो तसे बाबा खरच आश्चर्यचकित झाले.
"कर्म माझं! काय दिवस आलेत आजकाल. मला खात्री होती माझा राजा असं काही करणार नाही. तिनेच राजबंडा देखणा मुलगा बघुन तुझ्यावर काहितरी जादू केली असणार". आईने मला "राजबंडा, देखणा" वगैरे म्हटल्यावर अजुनच हसू येऊ लागलं. तिची नजर चुकवत मी हसू दाबण्याचा पुर्ण प्रयत्न करित होतो.
"मग तु काय म्हणालास?", बाबांनी परत प्रश्न केला
"मी हो म्हणालो", मी जसा बोललो तसा बाबांच्या चेहर्‍यावर "that's my boy" वाले expressions झळकले. त्यांची छाती अभिमानाने फुलली.
"असं कसं हो म्हणालास? तीचं background काय? तिची घरची परिस्थिती काय? हे न बघताच हो म्हणालास?" आई थोडी नाराजिच्या स्वरात बोलली.
"अगं आई या सगळ्या गोष्टीला काही अर्थ आहे का? प्रेम होण्यासाठी थोडीच एखाद्याची background बघावी लागते?" मी थोडा चिडक्या आवाजात बोललो.
"अगं स्मिता, खरच बोलतोय तो. आपला काळ वेगळा होता. ही नवी पिढी आहे. मला नाही जमलं ते यानं केलं" बाबा ओघात बोलून गेले तसा मी डोळे मोठ्ठे करून त्यांना signal  दिला की ते चुकीचं बोलून गेले.
"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचय? चुकलच माझं तुम्हाला होकार कळवला. म्हणे प्रेमविवाह करणार होते! मी नसता होकार दिला तर तुमच लग्न तरी झालं असतं का देव जाणे. आई म्हणत होती गडबड करू नको पण तुम्ही इतक्यांदा घरी आलात की आप्पांनी तुम्हालाच निवडलं. चाल्ले प्रेमविवाह करायला...", आधिच तापलेल्या आईच्या चपाट्यात आता बाबाही आले.
"अगं स्मिता तसं नाही गं", बाबा तिला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.
"राहुद्या. यावर आपण नंतर बोलू. आधी बघू या महाशयांनी अजून काय काय कारनामे केलेत. विकी, बोल प्रिंसिपल मॅडमनी का बोलावलय?", आई आता मुळ मुद्दावर आली.
मी घडला प्रकार तंतोतंत सांगितला. आई आता थोडी शांत झाली होती.
"हे बघ विकी. जे झालं ते चुकीचं आहे. तु असं बोलायला नको होतस. काहिही झालं तरी ते शिक्षक आहेत. भर वर्गात त्यांचा अपमान करणे चुकिचेच आहे. त्यांचिही चुक आहे पण ते त्यांच्या जागी योग्य आहेत. कॉलेजमध्ये तुम्ही शिकायला जाता. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत", आई मला समजावत म्हणाली.
"हो आई पण त्यांनीही विनाकारण माझ्या खाजगी गोष्टींवर सार्वजनिक टिका करणं मला मान्य नाही. त्यांना तो अधिकार नाही जरी ते शिक्षक असले तरी!", मी माझी बाजू ठामपणे मांडली.
"मला विकीचं म्हणण पटतयं स्मिता. आता ही मुलंही मोठ्ठी झाली आहेत. मानापमान यांनाही आहे. जे घडलयं ते नक्कीच चुकिचं आहे पण पुर्ण दोष विकिचा बिल्कुल नाही. मला वाटतं आपण दोन्ही बाजू लक्षात घेऊन प्रिंसिपल सोबत बोललं पाहिजे", बाबा म्हणाले.
"ठिके. कधी बोलावलय त्यांनी?", आईने विचारल.
"आपण सोमवारी जाऊ. मी मुग्धाशी पण बोलून घेतो", मी म्हणालो.
"हे बघ विकी. हा प्रकार सोडवूच आपण. पण यापुढं गोष्टी खुप जपुन आणि सांभाळून करायच्या. तुम्ही ज्याला प्रेम म्हणत आहात ते खरच प्रेम आहे की शारीरिक आकर्षण हे समजावून घ्या. हे तुमचं वय असं आहे जिथे शारीरिक आकर्षण असणं नैसर्गिक आहे. थोडा वेळ गेला तरी चालेल. आई बाबा दोनशे मैलावर राहतात, त्यामुळे त्यांना काय कळतयं म्हणत कसलिही गडबड करू नकोस. मी कशा बद्दल बोलते आहे हे तुला कळालच असेल. तेवढा समजुतदार तु आहेस. त्यामुळे थोडं धिराने. आम्हाला हे तुमचं प्रकरण अशा प्रकारे समजणं चुकिचं आहे. पण असो. आता जे झालं ते झालं. माझा आणि तुझ्या बाबांचा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. त्याला कधिही तडा जाऊ देऊ नकोस.", आई गंभिरपणे बोलली.
"आई , बाबा मी तुम्हाला सांगणार होतोचं पण unfortunately हे असे सांगावे लागले. पण मी शब्द देतो की आजवर आम्ही मर्यादा ओलाडल्या नाहित आणि पुढेही ओलांडणार नाही. मुग्धा खरच समजुद्दार मुलगी आहे. तुम्हा दोघांनाही ती नक्की आवडेल".
"चला. रात्रिचे १२ वाजत आलेत. झोपू आता शांतपणे. स्मिता, आता मुलगा मोठा झाला आपला. आणि समजुतद्दारही. आपली जबाबदारी वाढली आता."
"हो ना. माझा राजा आहेच गुणी. बाळा झोप आता. दमला असशिल. उद्या बोलू सविस्तर तुझ्या त्या मुग्धा बद्दल", आई माझी खेचत बोलली.
"हो हो नक्कीच! मी खुप lucky आहे मला तुमच्या सारखे आई बाबा मिळाले. I love you both so much! चला good night!".

======================================================================================
-अद्वैत कुलकर्णी
 

Saturday, July 8, 2017

मी आणि तु ....(भाग ९)

"Excuse me Ma'am, May I come in?" , मी प्रिंसिपल मॅडमच्या केबिनमध्ये डोकाऊन विचारलं, तसं वठारे सरांनी माझ्याकडे कुत्सितपणे नजर टाकली.
"Mr. Vikram?" , प्रिंसिपल मॅडमनी विचारलं.
"Yes Ma'am"
"Come in and take a seat"
मी वठारे सरांच्या शेजरच्या खुर्चीत जाऊन बसलो. प्रिंसिपल मॅडम काहीतरी कंप्युटरवर टाईप करित होत्या. तोपर्यंत मी केबिन न्याहाळत होतो. Admission नंतर आज जवळ जवळ ३ वर्षांनी प्रिंसिपल मॅडमच्या केबिन मध्ये जाण्याचा योग आला होता. उजव्या बाजूला एक भलं मोठ्ठ कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या trophies नी गच्च भरलं होतं. ही असली कामं करायला कोणाकडं वेळ असतो या शंकेने माझं मलाच हसू आलं. पण परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आल्यावर मी स्वतःला सावरलं. तेवढ्यात माझ्यासमोरच्या printer मधून एका पाठोपाठ एक असे २ कागद print होऊन बाहेर आले. आता थोडा मी घाबरलो. Rustication letter तरी नसेल ना? या विचाराने पोटात गोळा आला. पण मी काही एवढाही मोठ्ठा गुन्हा केला नाही की मला काढून टाकतील याची मला खात्री होती.

"Mr. Vikram, this is a warning letter which you have to show to your parents and take their signatures. I know your home town is far from here. So I am giving you 2 weeks time. I will be speaking with them once you hand over letter signed by them to me to confirm if they have anything to say".
आता हे मात्र अतिच झालं. वठारे सरांनी एकदम आनंदी सुस्कार सोडला.
"But Ma'am I haven't done anything" मी अजुन माझं वाक्य पुर्ण करायच्या आतच वठारे सर बोलले,
"बघितलत मॅडम. हेच! हेच मी तुम्हाला सांगत होतो. अतिशय उद्दट झाली आहेत मुलं आजकाल. शिक्षकांना उलट उत्तर देणे, त्यांच्याशी हुज्जत घालणे ही जणू त्यांची फॅशनच झाली आहे."
त्याक्षणी वठारे सरांचा एवढा राग आला होता. असं वाटलं की शेजारच्या कपाटातली ती मधोमध ठेवलेली सर्वात मोठी ट्रॉफी यांच्या डोक्यात घालावी.
"I can understand sir. You can leave if you don't have to add anything. I want to speak with Mr. Vikram in person." आता मात्र माझी आजूनच टरकली. वठारे सरांनी जाता जाता माझ्याकडे अशी नजर टाकली जणू एखाद्या लढाईत मला हरवून पुढे निघाले आहेत. मी त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष केलं. वठारे सर बाहेर जाताच प्रिंसिपल मॅडम म्हणाल्या,
"Mr. Vikram. This kind of behaviour is not expected from you. तुम्ही कॉलेजमधे शिकायला येता की असले चाळे करायला येता?"
"Excuse me ma'am. मला माहित नाही सरांनी तुम्हाला काय सांगितले आहे. पण जर तुम्ही मला माझी बाजू मांडू दिलीत तर, I will be obliged".
"बोला!"
"मी सर्वप्रथम मान्य करतो की मी सरांना उलटं बोललो, जे चुकीचे आहे. हेही मान्य करतो की माझे आणि मुग्धाचे एकमेकांवर प्रेम आहे. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही चाळे करत फिरतो. तुम्ही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. या उलट वठारे सरांकडून भर वर्गात आमच्यावर कित्येकदा अपमानास्पद comments pass केल्या गेल्या आहेत ज्या आमच्या सहनशिलतेच्या बाहेर जात होत्या. कदाचित आजचा तोच दिवस निघाला जेव्हा मला ते सहन झाले नाही आणि मी सरांवर आक्षेप घेतला. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो आणि आज जवळ जवळ एक वर्ष होत आलं आहे या गोष्टीला पण याचा आम्ही आमच्या अभ्यासावर कधिही परिणाम होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. मला एवढच बोलायचं आहे."
"Mr. Vikram, I am glad that you put your side so bravely. I have gone through your history in college and you both are good at grades. पण याचा अर्थ हा नाही की तुमच्यासाठी नियम वेगळे असतिल. कॉलेजचे पावित्र्य आणि शिस्त ही माझ्यासाठी महत्वाची आहे. मी तुम्हा दोघांच्या पालकांना भेटायला बोलावत आहे. मी त्यांना personally call करेनच पण तुम्ही देखिल त्यांना तशी कल्पना देऊन ठेवा! हे letter सांगितल्या प्रमाणे sign करून माझ्याकडे २ आठवड्यात जमा करावे. तुम्ही जाऊ शकता".

ज्याची भिती होती तेच झालं. नेहमी गदारोळ चालण्यार्‍या वर्गात आज स्मशान शांतता होती. सर्वांना एकच चिंता, "आम्हा दोघांच काय होणार?".मी वर्गात जाताच सर्वजण माझ्या भोवती गोळा झाले. मी घडलेला प्रकार सर्वांना सांगितला. कारण लपवण्यासारखे काहीच नव्हते आणि वठारे सरांबद्दल सर्वांची काहीना काही तक्रार होतीच. त्यामुळे मी जे केलं ते योग्यच केलं अस किंबहुना सर्वांचच म्हणणं होतं. पण रोह्या जरा जास्तच गंभीर दिसत होता. मला जितकं टेंशन आलं नसेल तितकं त्याच्या चेहर्‍यावर दिसत होतं.

"काय रे रोह्या? तुला काय झालं तोंड पाडून बसायला?" मी विचारलं.
"अरे मुर्खा! तुला थोडीतरी अक्कल आहे का? जे नको होतं तेच घडलं ना? गेलं ना प्रकरण घरी? तेही "warning letter" च्या मार्गाने? "
"अये स्कॉलर. एवढं काय टेंशन घ्यायलायेस. मी करतो विक्याच्या लेटरवर sign. कुनाला कलणारे कुनाची sign आहे ते!" आज्याने आपले ज्ञान पाजळले!
"आज्या जरा गप्प बसशिल का? ही जोक्स करायची वेळ नाही. विकी तु काका- काकूंना कसं समजवणार आहेस याचा विचार केला आहेस का? ते सगळं सोड! आधी मला सांग मुग्धाला काय सांगणार आहेस? ती तर आज इथे नाहिये त्यामुळे घडलेला प्रकार तिला माहित नाही. त्यात ज्या अर्थी तुझ्या पालकांना बोलावलय त्या अर्थी तिच्याही पालकांना बोलावणार! तु आत्ता एक काम कर. पटकन मुग्धाला कॉल कर. प्रिंसिपल ऑफिसमधून कॉल जाण्या आधी तिला घडला प्रकार समजावून सांग!" 
रोह्याने सांगताच मी लगेचच मुग्धाला कॉल केला. झाला प्रकार तिला सविस्तर सांगितला तसा तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला! आता मात्र विषयाच्या गांभिर्य़ाची मला जास्तच जाणिव झाली. 

"विकी! You have no idea how strict my dad is! मला त्यांच खुप टेंशन आलय रे! ते खरच खुप रागिट आहेत. मी त्यांना काय सांगू? माझ्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिकमधला बिजनेस सोडून इथे येऊन साधी नोकरी स्विकारली आहे आणि आता त्यांना हे मी कसं सांगू? विकी खरच खुप टेंशन आलयं रे!" म्हणत तिने भोकाड पसरलं.
"ए मुग्धे! अगं रडू नको ना! आपण काहितरी मार्ग काढूना! तु फक्त रडू नको. ए रोह्या. सांगकी काहीतरी! आज्या,मिहीर, सौर्‍या, अरे तुम्हीपण काहितरी सुचवा रे!" मी पुर्ण पॅनिक मोडवर गेलो होतो. मुग्धाला जरा जरी दुःखी पाहिलं की मी नकळत पॅनिक मोडवर जातो. आजतर ती ढसा-ढसा रडत होती. मला काहिच सुचत नव्हतं!

"विकी फोन स्पिकरवर टाक!" रोह्या सांगताच मी स्पिकरफोन सुरू केला,
"मुग्धा, रोहित बोलतोय. हे बघ टेंशन घेऊ नकोस. विकी आणि मुग्धा! मला तरी दुसरा कोणताही पर्य़ाय दिसत नाही. हे अश्याप्रकारे नक्कीच तुमच्या घरच्यांना कळायला नको होते पण तुम्हाला स्वतःहुन घरी सांगावेच लागेल. प्रकरण जास्त चिघळण्या आधी तुम्ही आपापल्या घरी सर्व प्रकार सांगा", रोह्या गंभिरपणे बोलला.

खरच आमच्याकडे दुसरा काहीच पर्य़ाय नव्हता. मी लगेचच घरी जाण्याचा निर्णय घेतला. मुग्धाला देखिल धीर दिला. तिची समजुत काढली की आपण काहिही गुन्हा नाही केला किंवा कोणतिही मर्य़ादा ओलांडली नाही. एकमेकांवर नित्तांत प्रेम केलय जे नक्कीच आम्हाला या कठिण प्रसंगातुन बाहेर काढेल अशी आम्हा दोघांना आशा होती.

 ======================================================================================
-अद्वैत कुलकर्णी

Saturday, March 4, 2017

मी आणि तु ....(भाग ८)

"विकी राव ! कसे आहात आज?" , आज्याने मिश्किलपणे विचारले.
"मी बरा आहे. तुला काय झालय आज?"
"मी शुद्ध बोलन्याची तयारी करतोय."
"बोलन्याची नाही, बो ल ण्या ची! न आणि ण मधला फरक समजतो का? आलाय शुद्ध बोलायला", रोह्याने आपले ज्ञान पाजळले!
"असुंदे. तरीपण मी शुद्ध बोलनारच. sorry बोलणारच! "
"असुंदे नव्हे! असुदेत!" मीही आज्याची खेचायला थांबलो नाही.
"करा चेष्टा गरिबाची. हितं तुमचा भाऊ प्रयत्न करायलाय आनि तुम्हाला चेष्टा सुचालिये", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला.
"हो का? मग आम्हाला कळेल का? की हे प्रयत्न का सुरू आहेत?" , रोह्याने विचारले.
"हे बघ! ह्या नळकांड्यात काय आहे?" , आज्याने माझ्याकडे हात करत रोह्याला प्रश्न केला.
"माझा काय संबंध आता?", मी रागाने विचारले.
"आता तुझ्यासारख्याला जर एखादी पोरगी स्वतःहुन प्रपोज करत्या मग मला का नाही?", आज्याने मला विचारले.
"आता हे मला काय माहित? विचार मुग्धाला"
"इथेच तु चुकलास मित्रा. पन मी शोधुन काढलं reason.", आज्या म्हणाला.
"आणि ते काय आहे?" मी आणि रोह्याने एकदम विचारले.
"शुद्ध भाषा! तु एकदम शुद्ध बोलतोस. मुलिंना शुद्ध बोलणारी लोकं आवडत असावित!", आज्या अभिमानाने बोलला.
"हम्म्म्म्म...! राहुद्या! तुझ्याच्याने होणार नाही!" , मी आज्याला taunt हाणला!
"अरे मग सारिकाला कसा विचारू? ना मी रोह्यासारखा स्कॉलर आहे, ना मिहीर सारखा handsome!", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला!
"हे बघं. तिला तु आवडत असशिल तर ती स्वतःहुन तुला विचारेल!", मी आपला expert advise दिला.
"ह्यो बघा! लय तारे तोडून आल्यागत शानपन शिकवालाय! नशिब आहे तुझ! मुग्धासारख्या चांगल्या मुलिने स्वतःहुन विचारलं. नायतर मला पुर्ण guarantee आहे, तु शेवटपर्यंत single च मेला असतास! ", आज्या एका दमात बोलून गेला.
"खरचं यार नशिब तर आहेच!", मीही स्वतःला आरश्यात बघत बोललो.

आज जवळ जवळ वर्ष होत आलं होतं, आम्ही दोघे एकत्र येऊन. आता तर अख्ख कॉलेज आम्हाला couple म्हणून ओळखत होतं. काही teachers ना देखिल माहिती झालं होतं. आम्ही कदिही एका मर्यादेच्या बाहेर गेलो नाही. कधी चाळे केले नाहीत. आमच एकमेकांवरचं प्रेम अगदी निर्मळ होतं. पण का कोणास ठाऊक पण काही लोकांना ते कुठतरी खुपत होतं. त्यातल्या त्यात वठारे सरांना. ते एकही संधी सोडत नव्हते comment करण्याची. पहिले काही वेळा मजेत घेतलं पण नंतर नंतर अति होऊ लागलं. एक दिवस attendance सुरू होता. मुग्धा आजारी असल्याने कॉलेजला आली नव्हती,
"मुग्धा परांजपे", वठारे सरांनी तिचे नाव घेतले तसा मी "आजारी आहे. आज आली नाही" म्हणालो.
"अच्छा! मग तु कसा काय आलास आज? कसं करमणार रे तुला?", वठारे सरांनी comment केली. हे नेहमीचेच झाले होते पण आज जरा अतिच झाले! माझाही स्वतःवरचा ताबा सुटला.
"Excuse me Sir! This is none of your business!", मी क्षणात बोलून गेलो.
रोह्याने माझ्याकडे बघितलं आणि पटकन मला बसण्यासाठी हाताला धरून ओढू लागला.
"ओह! बिजनेस! एक पोरगी काय मिळाली, तुझी भाषाच बदलली की", वठारे सर रागाने मला बोलत होते.
"I am sorry sir. पण तुम्हाला यावर बोलण्याचा काहिही अधिकार नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.", इतक्या दिवसांचा राग आपोआप वाट काढत आज तोंडावाटे बाहेर पडत होता.
"Sorry sir. मी विकिच्या वतीने माफी मागतो. सर please जाऊद्या ना. ए विकी. please खाली बस. सर. sorry! please जाऊद्या", रोह्या केविलवाण्या आवाजात विनवणी करत होता. पण आज माझा राग अनावर झाला होता.
"रोह्या तु नको मधे पडूस. कित्येक दिवस झाले मी यांच्या comments ऐकुन घेतोय. खुप ऐकुन घेतलं. आता बास!" , मी रागात बोललो.
"ओह! आता तु मला माझ्या वर्गात कसं वागयचं शिकवणार? मिस्टर विक्रम, आता मला direct प्रिंसिपलच्या केबिन मधे भेटा. मीही बघतोच माझा बिजनेस काय आहे आणि काय नाही.", वठारे सर रागात निघून गेले. 
"विक्या. तु बरोबर केलास. या फुकन्याला कोनतर बोलायलाच पाहिजे होतं.", आज्या माझ्या खांद्यावर हात टाकून बोलला.
"मुर्ख आहेस काय आज्या? आणि तुला कसला माज आलाय रे विक्या? काय गरज होती बोलायची?", रोह्या रागाने मला आणि आज्याला झापत होता.
"रोह्या तु गप बस. त्या वठारेचा काय संबंद नव्हता बोलायचा विकी आनि मुग्धा बद्दल. विक्या, तु नको घाबरू. मी येतो तुज्यासोबत प्रिंसिपलकडं. मी सांगतो त्या वठार्‍याची तक्रार प्रिंसिपलला", आज्या मला धीर देत बोलला.
"अरे मुर्खांनो! तुम्हाला जरातरी अक्कल आहे का? तुम्हाला हे प्रकरण इतक साधं वाटतय का? विकी तुला अंदाज आहे का, की हे प्रकरण तुझ्या आणि मुग्धाच्या घरापर्यंत जाऊ शकतं? आणि तुमच्या दोघांचे नाते तुमच्या घरच्यांना याप्रकारे समजावे हे मला तरी धोकादायक वाटतय!", रोह्या बोलला तसा माझ्या पोटात गोळा आला. खरच मी याचा विचार केला नव्हता!
"आयला. स्कॉलर खर बोलतोयसकी! मला हे ध्यानातच नाइ! आता काय करायच?" , आज्याला घाबरलेला पहिल्यांदाच बघितला.
"मला नाही माहित!", रोह्या खांदे पाडून आमच्याकडे बघत होता. तेवढ्यात कॉलेजचा शिपाई वर्गात आला,
"विक्रम कोण आहे इथे? प्रिंसिपल नी बोलावलय. लवकर चला!"

======================================================================================

आज जवळ जवळ एक वर्षानंतर पुन्हा ब्लॉग लिहितो आहे. आशा करतो हा भागही तुम्हाला आवडेल. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...