Saturday, April 4, 2015

मी आणि तु ....(भाग ३)

बघता बघता आमचे घरटे सोडून उडण्याचे दिवस आले. कॉलेज तसं बरच दूरच्या ठिकाणी होतं. आपापलं सामान घेऊन आम्ही निघालो. ८ तासांचा प्रवास करून शेवटी तेथे पोहोचलो. एक छोटिशी खोली भाड्याने घेतली आणि आमचा जणू संसारच थाटला. आम्ही तिघेही पहिल्यांदाच घरापासून दूर राहणार होतो पण एकत्र असल्यामुळे घरच्यांची जास्त कमी भासणार नाही हे मात्र नक्की होतं. आम्ही तिघेही कॉलेजला जायचं या विचारानेच खुप excited होतो. कधी एकदा कॉलेज सुरू होईल असं झालं होतं.
बघता बघता कॉलेजचा पहिला दिवस आला. तिघेही मस्त आवरून कॉलेजला निघालो. आमच्या खोली पासून साधारण दोन किलोमिटरवर कॉलेज होतं. आम्ही टमटम  केली आणि कॉलेजवर पोहोचलो. कॉलेजची भली मोठी कमान आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. कमानीपासून कॉलेज बरच आत होतं. दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता. एकदम झकास campus होता. जूलै चे दिवस होते. पावसामुळे वातावरणात चैतन्य होतं. वातावरण इतकं सुंदर होतं की त्याचा अस्वाद घेता घेता कधी कॉलेजच्या मुख्य इमारतीपाशी आलो तेच कळालं नाही. ब्रिटीश कालीन दगडी बांधकाम असलेली मुख्य इमारत आणि बाजूने नव्याने बांधलेल्या सिमेंट्च्या इमारती यात दोन पिढ्यांचा फरक लगेच समजत होता. मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला एक मोठ वडाच झाड होतं. कदाचित ते झाड या इमारती इतकच जुनं असेल. त्याभोवती एक कट्टा होता आणि त्यावर काही टाळकी बसून गप्पा मारत होती. इमारतीच्या डाव्या बाजूस भलं मोठ्ठ २ व्हिलर पार्किंग होतं. पार्किंगच्या समोर कॉलेजच कॅंटिन होतं. पार्किंग आणि कॅंटिन यांच्या मधे कॉलेजचं दुसरं गेट होतं जे खास गाडी वाल्यांसाठीच होतं.

कॅंटिन दिसताच आज्याची भूक खवळली.

"अरे चला ना कायतर खाऊयात"  आज्या म्हणाला.
"आत्ता तर आलोय. आधी कॉलेजला जाऊ. आपण शिकण्यासाठी आलोत की खाण्यासाठी?" इति रोह्या.
"अये टॉपर. तु आला अस्शील शिकायला. मी पहिले खानार मगच आत येनार. आनि विक्या पन माझ्या सोबत येनार आहे. तुला यायच असल तर ये नायतर बस!"

थोडक्यात मला आज्याने चॉइसच ठेवली नाही. मला हाताला धरलं आणि रेटत त्याने कॅंटिनकडं नेलं. दुसरा पर्याय नसल्याने रोह्यापण आमच्या मागं आला. पत्र्याच्या शेडमधे टेबल खुर्च्या टाकल्या होत्या. मी पार्किंगकडे तोंड करून बसलो आणि ही दोघं माझ्या समोर. ऑर्डर दिली आणि आम्ही कॉलेज campus बद्दल गप्पा मारत बसलो. तोच एक चेहर्‍याला रुमाल बांधलेली, पिवळा टॉप आणि काळी जिन्स घातलेली मुलगी गाडी घेऊन गेट मधून आत आली. का कोणास ठाऊक पण माझी नजर तिच्यावरच खिळली. तिचा सुंदर बांधा, गोरे हात बघितल्या नंतर त्या रूमाला मागचा चेहरा बघण्याची जणू उत्सुकता लागली होती. तीने गाडी पार्क केली, आणि नेमकी माझ्याकडं पाठ करून आपला रूमाल काढला. आता कधी एकदा ती वळते आणि मी तिचा चेहरा बघतो असं झालं होतं मला. माझं लक्ष तिच्यावर इतकं खिळलं होतं की समोर दोघं काय बोलत होते ते काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यात आज्याच्या धक्क्याने पाण्याचा ग्लास कलंडला आणि पाणी माझ्या पायावर पडलं. मी लगेच बजूला झालो, पायावरच पाणी झटकलं आणि पहिले तिच्याकडे पाहिलं. पण ती तिथे नव्हती. मग मात्र आज्याचा खुप राग आला. तिचा चेहरा बघण्याचा chance या आज्यामुळं miss झाला होता. मग मागवलेला वडापाव खाल्ला आणि आम्ही आमची classroom शोधण्यासाठी निघालो.त्याक्षणापासून माझी नजर ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी शोधू लागली. मी मुलींकडे काळजीपूर्वक बघतोय हे बहुदा आज्याच्या लक्षात आलं.

"आयला. काय आजकालची पोरं. आजून कॉलेजला आलं न्हाई की लागली पोरी भापायला"

आज्याने डायलॉग टाकला तसा मी त्याच्याकड रागाने पाहिलं आणि परत माझी शोध मोहिम सुरू केली. वर्ग सापडला पण ती काय सापडली नाही. आम्ही वर्गात प्रवेश केला आणि थोडे बिचकलो. प्रचंड मोठी classroom होती. अगदी समोरचे २-४ बाक सोडले तर बाकी सगळे बाक गच्च भरले होते. नाईलाजास्तव आम्हाला समोरच्या बाकावर बसावं लागलं. रोह्या खुष होता पण आम्ही दोघ जाम नाराज. शाळेत कधी आम्ही समोरच्या बाकांवर बसलो नव्हतो आणि आता तर कॉलेजला आलो होतो आम्ही. कॉलेजमधे जाऊन समोरच्या बाकावर बसणे म्हणजे जणू आम्हा दोघांना आमचा अपमान झाल्यासारखेच वाटत होते. बाक मोठे होते, आज्या माझ्या आणि रोह्याच्या मधे बसला. बसतो ना बसतो तोच आज्याने रोह्याला जवळ खेचला आणि धमकी दिली,

"हे आज फस्ट आनि लास्ट! जास्त खुश होऊ नको. मी आनि विक्या परत समोरच्या बाकावर बसनार नाही. तुला बसायच असल तर तु बस."

"ए आज्या तु गप बस. तु तर बोलूच नकोस. तुझ्या अत्रुप्त पोटामुळे आपल्याला इथे बसाव लागतय. मी म्हणालो होतो की कॅंटिनला न जाता पहिले वर्गात जाऊ पण तुम्ही दोघ कधी माझ ऐकाल तर ना! आता बसा समोरच्या बाकावर. भोगा कर्माची फळं."

बहुदा आज्याकड यावर बोलण्यासाठी काही नव्हतं. तो गप्प बसला आणि मी इकड दोघांच बोलण ऐकून हसत होतो. तेवढ्यात teacher वर्गात आले आणि आमच्या इंजिनिअरिंग लाईफला थोडक्यात खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. विषयाची ओळख, exam pattern वगैरे मधे पहिला तास संपला. त्यानंतर हजेरी झाली आणि teacher निघून गेले. तसाच दुसरा तासही झाला, त्याचीही हजेरी झाली. त्यानंतर मधली सुट्टी म्हणजेच लंच ब्रेक झाला तसा पुर्ण वर्ग बाहेर जाण्यासाठी उठला. वर्गाला एकच दार होतं त्यामुळे दारापाशी एकदमच खुप गर्दी झाली. आम्ही तिघं गर्दी ओसरायची वाट बघत बाकावरच बसलो होतो तोच त्या गर्दीत मला ती ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी दिसली पण पुन्हा पाठमोरी. तीचा चेहरा काही दिसला नाही त्यामुळं मी थोडा नाराज झालो पण ती माझ्याच वर्गात आहे आणि लंच ब्रेक संपल्यानंतर ती पुन्हा मला दिसू शकते हे लक्षात आल्यानंतर मात्र मी गालातल्या गालातच हसलो.

मी या दोघांनाही लंचसाठी घाई केली आणि आम्ही तिघे वेळेच्या आधीच पुन्हा वर्गात येऊन बसलो. आज्याने नेहमी प्रमाणे मला माझ्या या विचित्र वागण्याबद्द्ल शिव्या घातल्या पण सध्या मला त्याहुनही महत्वाच होत की त्या मुलिचा चेहरा बघणं. वर्गात आल्या आल्या मी सगळीकडे नजर टाकली आणि खात्री केली की ती अजून वर्गात आली आहे की नाही आणि ती आजून आली नव्हती. मग सुरू झाला तीचा "इंतजार".

प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता आणि शेवटी तो क्षण आलाच. ती माझ्यासमोर होती. गोरा रंग आणि अगदी सुंदर रेखिव चेहरा.  ती समोरून जात असताना मी तिच्या थेट डोळ्यात बघत होतो आणि तिही माझ्याकडच बघत होती. नकळत मी तिच्याकड बघून हसलो आणि तिही नकळत हसली आणि हसताना तिच्या गालावर सुरेख खळी पडली. इतका सुंदर चेहरा आणि त्यात खळी म्हणजे "सोनेपे सुहागा" कशाला म्हणत असतील त्याचं उदाहरण जणू माझ्या समोर होतं. मी जणू तंद्री लागल्यासारखा तिच्याकड बघत होतो.

"आयला काय item आहे. मला जाम आवडली. आता हिला मी कटावनार"

आज्याच्या या comment ने माझी तंद्री मोडली. तिला item म्हणालेलं तर मला मुळीच आवडलं नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या बाकावर बसे पर्यंत तिला बघत राहिलो. आता पुढचा प्रश्न होता की तिचं नाव काय? आणि त्याला solution पण होतच. पुढचा तास सुरू झाला पण माला उत्सुकता होती ती हजेरिची. कधी एकदा तास संपतोय आणि teacher हजेरी घेतात असं झालं होतं मला. शेवटी तास संपला आणि हजेरी सुरू झाली आणि तिचं नाव कळालं, सारिका रानडे.

मी जणू तिच्या प्रेमातच पडलो होतो. "लव्ह ऍट फ़र्स्ट साईट" म्हणतात अगदी तसं. त्या क्षणापासून मी फक्त तिचाच विचार करत होतो. डोळ्यासमोर फक्त मला तिच दिसत होती. बघता बघता पहिला दिवस संपला. तिची एखादी झलक दिसते का हे पाहण्यासाठी माझी नजर तिला त्या गर्दित शोधू लागली. ती दिसली तशी माझी धसधस शांत झाली. ती नजरेआड होई पर्यंत मी तिला बघत राहिलो. बहुतेक मी तिच्याकडच बघतोय हे आज्याच्या लक्षात आलं.

"ए नळकांड्या! माझ्या item कडं का बघायलायस?"
"item item काय लावलयस रे. सारिका नाव आहे तिचं"
"च्यामायला तुला तिच नाव पन कळलं?  तिच्यावर डोळा नको ठेऊस. ती माझी आहे. आपलं भांडन होईल."
"ए चल बे निघ. म्हणे ’माझी आहे’. अरे जा ना"

आमचा दोघांचा फालतूपणा बहुतेक रोह्याला नाही आवडला.
"तुम्ही दोघ गप बसा. आजुन पहिला दिवस संपतोयच की तुमचं सुरू झालं. आज्याचं समजु शकतो पण तु रे विक्या. तु कधी पासून बदललास? मुलींकडं कधी न बघणारा तु, कधी पासून मुलीबद्दल भांडायला लागलास? बर ते जाऊदे. तुम्ही दोघांनी एक गोष्ट नोटिस केली काय?"

"काय?" आम्ही दोघं एकदम म्हणालो.
"आज सगळे present होते पण फक्त एकजणच नव्हती"
"नव्हती? आयला आमाला शाहानपन शिकवतोय आनि स्वता पन पोरिंची काळजी करतोय. आं रे माझ्या वाघा! "

आज्याने बरोबर रोह्याला पकडलं.

"अरे तस नाही रे. कॉलेजचा पहिला दिवस कोण कसं काय miss करू शकते हे मला समजलं नाही. म्हणून तिचं नाव लक्षात राहिलं."
"हां रे! कुकुलं बाळ समजलास काय अमाला? म्हंजे मला tough fight आहे इथे पोरी भापायला" आज्या म्हणाला.
"ए अज्या गप रे. रोह्या तु बोल. कोण ती बिंडोक जीने हा पहिला दिवस miss केला?"

"मुग्धा परांजपे."
===================================================================================

 मी आणि तु ....(भाग १) आणि  मी आणि तु ....(भाग २) ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. मी आणि तु .... या दीर्घकथेतला हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा तिसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...