Monday, January 9, 2012

ड्रिमगर्ल.....!

सकाळ-सकाळी मस्त पेपर वाचत पडलो होतो. आजचे राशीभविष्य  "वाद संभवतात. वाहने सावकाश चालवा. आर्थिक लाभ संभवतो. एकतर्फी प्रेमात निराशा संभवते" आणि तेवढ्यात मोबाईल वाजयला लागला. आतल्या काचेच्या कपाटात ठेवला होता. कोणत्यातरी मित्राचाच असणार असे मानून तो उचलायला म्हणून उठलो. प्रोजेक्टचे काम सुरू आहे त्यामुळे त्यासंबंधीच काहितरी असणार असा डोक्यात काहिसा विचार येऊन गेला. मोबाईल बाहेर काढून कोणाचा आहे हे बघीतलं आणि दोन मिनिट बधीरच झालो. तो तीचा फोन होता! हो! खरच तीचा फोन होता. मी पुन्हा-पुन्हा स्पेलिंग चेक केलं, ते तिचच नाव होतं......

आपलं मन किती वेगात धावतं नाही? तो फोन वाजत असताना माझं मन तिच्या विचारातच बुडून गेलं. तिने आज पहिल्यांदाच स्वतःहुन फोन केला होता. तसा मीही थोडा लाजराच, त्यामुळे स्वतःहुन मीही कधी तिला फोन करत नाही पण एवढ्या सकाळी तिने फोन केला हा थोडा धक्काच होता. एकीकडे मन मस्त स्वप्नं बघत होतं आणि अचानक एका विचाराने सगळा काळ स्तब्ध झाल्यासारखा वाटला. मघाशी वाचलेलं भविष्य आठवलं!!  आजचे राशीभविष्य ;एकतर्फी प्रेमात निराशा संभवते. 

"माझ्या तिच्या विषयीच्या feelings तिला कळाल्यातरी नाहीत ना?" हाच प्रश्न डोक्यात अचानक पैदा झाला. काहीच कळत नव्हतं.  तसं झालं असेल तर हा कॉल तिने चिडून तरी केला नसेल ना? आणि सांगितलं तरी कोणी सांगितलं? कारण तिच्या बद्दलच्या माझ्या feelings मला आणि माझ्या बेस्टफ्रेंडसनाच माहितीयेत आणि त्यांच्याकडून तिला कळणं तसं अशक्यच. आणि ती जर खरच चिडली असेल तर ती आमची इतक्या वर्षांची मैत्री तरी तोडणार नाही ना? माझ्या एका बावळटपणामुळे  खरच माझी एक मैत्रीण मी गमावणार तरी नाही ना? अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात घरं करायला सुरूवात केली.

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद झाली. मी थोडासा बिथरलेलो. त्यामुळे फोन miss झाल्याचा किंचित आनंदच झाला. मनाची तयारी करत होतो. चिडली असेल तर कशी समजूत घालायची..... कशी माफी मागायची... वगैरे वगैरे! तेवढ्यात पुन्हा फोन वाजयला लागला. पुन्हा तिचाच होता. मनाशी ठरवलं की काहीही होऊदे फोन उचलायचाच.

थोडा घाबरत घाबरतच उचलला...

"हॅलो! अद्वैत?"
स्स्स्स्स्स्स!! तिचा तो मस्त नाजूक आवाज! वाटलं ऐकतच राहावं, बोलूच नये!
"हहह... हॅलो!"
"हॅलो! कायरे? कुठे गायब होतास? फोन का उचलला नाहीस?"
"ते मी, मी, ते, जरा बबब..बाहेर होतो."
"बरा आहेस ना? असा का अडखळतो आहेस?"
"नाही तसं काही नाही, मी मस्त आहे. बोल काय काम काढलस?"
"का रे? कामाशिवाय कॉल करू शकत नाही काय कोणी?"

आता मला काहीच सुचत नव्हतं. एक तर असा अचानक कॉल आणि त्यात ती चिडल्यासारखीही वाटत नव्हती. आणि आतातर अगदी जीवाभावाची मैत्री असल्यासारखी बोलत होती. का कोणास ठाऊक पण थोडं awkward वाटत होतं. कारण माझ्या फोनला आणि माझ्या कानांना असल्या नाजूक शब्दांची सवयच नाही! कारण मला कॉल करणारे माझे परम् मित्रलोक एखादी सणसणीत कोल्हापूरी शिवी घातल्याशिवाय पुढे बोलतच नाहीत. तशी स्टाईलच आहे इकडे. त्यामुळे हे असे शब्द जरा नविनच होते.

"अगं तसं नाही ग! आज पहिल्यांदाच कॉल केलास ना! म्हणून मला वाटलं काही काम काढलस काय माझ्याकडं"
"अरे नाही रे. कॉलेजचे जुने फोटो बघत होते. तु दिसलास. So आठवण झाली म्हणून केला कॉल. तु काय कधी करत नाहीस, मग म्हटलं मीच करावा!"

आतातर मी जाम खाली पडायचाच राहिलो होतो. हे काय घडतय माझ्यासोबत? आठवण? आणि तिला? आणि तीही माझी? अरे हे काय नेमकं चाललय तरी काय?

"माझी आठवण? काहीच्या काही! एवढं आमचं नशीब कुठे? बाय द वे कोणते फोटो?"
"तुम्हाला येत नसली तरी आम्हाला येते आमच्या फ्रेंड्सची आठवण. अरे ते फोटो आपल्या फर्स्ट इयरच्या कार्यक्रमाचे आहेत रे. काहीतरी समाजसेवा करायला गेलो होतो की आपण सगळे जवळच्या गावी. तिथले आहेत. सहज कपाट आवरताना दिसले. बोल, आणखी काय चालू आहे सुट्टीत?"
"अरे बापरे! ते फोटो आहेत होय तुझ्याकडं! ग्रेट! बाकी काही नाही बघ ! निवांत आहे. सध्या प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे. फुल्ल बिझी आहे त्यात. कदाचित या सेमिस्टरला कॉलेज करणारही नाही. बहुतेक तशी परवानगी मिळेल आम्हाला कॉलेजकडून कारण तसा प्रोजेक्ट आहेचे आमचा!"
"भारीये बुवा तुमचं"
"मग? वाटलो काय तुला आम्ही?"
"मी तरी एक दिवस सुद्धा कॉलेज बंक करणार नाही. आफ्टरऑल लास्ट सेमिस्टर आहे आपली. पुन्हा आयुष्यात कुठे कॉलेज करणारे? आणि कोण फ्रेंड कुठे भेटेल किंवा भेटेल की नाही हे काहीच सांगता येत नाही."
"हम्म्म.. खरय तुझ! आम्ही तरी सध्या फुल्ल एंजॉय करतोय बघ! बाकी ? बोल आणखी काय नविन?"
"काही नाही. भरपुर शॉपिंग केली या वेळी. बाबांच्या खिशाला मोठी कात्री लावली. भरपुर ड्रेस घेतले. ज्वेलरी घेतली. नुसती खरेदी केली."
वगैरे , वगैरे....
असे इकडचे-तिकडचे भरपुर बोलणे झाले. माझा मलाच विश्वास बसत नव्हता की मी एखाद्या मुलीशी बोलू शकतो आणि तेही अर्धा तास? सटर-फटर गप्पा झाल्यानंतर तिच्या एका वाक्याने मी सुन्न झालो...

"मग कधी भेटुयाल?"

मी खरच नीट ऐकलं ना? की माझे कान वाजले?

"काय म्हणालीस?"
"अरे मी म्हणाले कधी भेटुयात? बरेच दिवस झाले भेटलो नाहीत आपण."


आता मात्र माझी अवस्था बघण्यासारखी होती. माझ्या फिलिंग्स तिला नक्की कळाल्या आहेत आणि बहुतेक तिचाही होकार आहे असा काहिसा विचारही मनात येऊन गेला पण परत मनाला आवरलं! उगाच तिच्या मनात निर्मळ मैत्री असेल आणि माझ्या या बावळटपणामुळे त्यावर मला पाणी पडू द्यायच नव्हतं.

"भेटुयाल? बरी आहेस ना? असच एकदम काय सुचलं? "
"अरे काही नाही. असच वाटलं भेटावसं. म्हणून. आणि तुला काही हरकत असेल तर राहुदे"

हरकत? आणि मला? ती कशाला असेल?

"अगं नाही नाही. तसं नाही. मी कॉलेजला दररोज येतोचे प्रोजेक्टसाठी. भेटूयाल कॅंटिनमधे!" 
"ए.. नाही. कॅंटिनमधे नाही. तुझ्या त्या ग्रुपने आपल्याला पाहिलं तर गावभर करतील आणि काहीपण चिडवतील"
"ए! तसे नाहीयेत माझे मित्र. तशी चेष्टा चालायचीच की. असो! तुला नको असेल तर राहुदे. नको कॅंटिन. मग कुठे भेटायच?"
"उद्या संध्याकाळी ६ वाजता CCD ला"

Cafe Coffee Day? तेही आम्ही दोघं? म्हणजे थोडक्यात Date वर जायच? धक्यांवर धक्के! अरे काय चाललय काय?

"ठिके. मी येतो."
"ग्रेट. मग भेटु उद्या! chal bye Cya take care"

फोन बंद झाला होता!पण तो तसाच कानाला धरून ठेवावा वाटत होता. तिचा एकन एक शब्द कानात घुमत होता. हे माझ्याबाबत घडलयं याचं feeling काहीतरी वेगळच होतं.

दिवस कधी संपतोय आणि कधी एकदा उद्याची संध्याकाळ येते असं झालं. कसा बसा दिवस संपला. आणि बघता बघता ती संध्याकाळही आली. बरोबर ६ वाजता मी CCD मध्ये मस्त तयार होऊन आलो. अजुन ती यायची होती. येताना तिच्यासाठी एक मस्त फ्रेंडशीपवर आधारित ग्रिटिंग घेतलं. दोघांच्यासाठीचाच असलेला टेबल धरून तिची वाट पाहत बसलो.

तेवढ्यात हाक ऐकू आली,

"अद्वैत! अरे अद्वैत. राजा उठ"

आई???????????? इकडे????? तिला कोणी सांगितलं? मी तर गुपचुप आलोय निघुन? मग ती इकडे कशी? आणि उठ का म्हणतिये?

"अरे बघ साडेनऊ वाजले. कितीवेळ झोपशील"

आणि गदागदा मला तिने हलवल... मी ताडकन उठून बसलो. मला काहीच कळत नव्हतं. वर पंखा, शेजारी PC , बाजूला खिडकी आणि खाली...... खाली गादी??? बोंबला! म्हणजे मी स्वप्न बघत होतो. लगेच मोबाईल चेक केला. कॉल हिस्टरी चेक केली, त्यात तिचा कॉल आल्याची कोणतिही नोंद नव्हती. म्हणजे हे सगळ माझं स्वप्न होत? अरेरेरेरेरेरेरे!! भयानक वाईट वाटलं ! आई माझ्याकड शंकेने बघत म्हणाली,

"काय झालं रे? असा चेहरा का पडलाय? काय वाईट स्वप्न पडलं होतं का?"

वाईट??????? अगं आई काय स्वप्न पडलं होतं ते तुला कसं सांगू!! अंग जड झाल्यासारख वाटत होतं. कसाबसा बिछान्यावरून उठलो. तेवढ्यात शेजारच्या दुकानातल्या रेडिओवर गाण लागलं,

"छनसे जो टुटे कोई सपना.........
जग सुना सुना लागे... जग सुना सुना लागे रे................"

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

9 comments:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...