Friday, March 20, 2015

मी आणि तु ....(भाग २)आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............


"विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??"
"अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!"
"अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?"
"हो हो. पाठव!"

रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला.

"अरे विक्या!! चल आवर लवकर!!"
"का रे? काय झालं? सगळ ठिक ना?"

"कसलं आलय ठिक? आपले मजनू पुन्हा जीव द्यायला निघालेत. चल लवकर. मला काय आवरेना तो. तुच चल लवकर"
"आयला! काय रे याच रोज रोजच नाटक? उडी मारायच्या विचारानं ओली होते याची आणि हा म्हणे जीव देणार!"
"अरे विक्या चेष्टा नको रे करू. Please चल लवकर."
"अरे चेष्टा नायतर काय करू! दिसली पोरगी की पडला प्रेमात! अरे शेजारचा तो दिड वर्षाचा बबलू चालायला शिकताना जेवढा पडला नसेल तेवढा हा गृहस्थ प्रेमात पडला असेल!"
"विक्या जोक मारू नको. तु येणारेस की मी जाऊ?"
"आयला! तुम्ही दोघंपण ना एकदम ऍंटिक पीस आहात. चल हो पुढ, मी येतो तोंड धुवुन."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------


"विक्या अरे किती वेळ लावलास?"
"हम्म्म! बर कुठयेत साहेब?"
"कुठ असणार? तो बघ तिकडं. कड्यावर बसलाय"
"हम्म्म! ठिक आहे! यावेळी मीच ढकलतो त्याला! म्हणजे रोज रोज माझी झोप मोड नको"
"अरे ए विक्या! अरे येडा झालायेस काय?’
"मग काय तर! वैताग आलाय मला याचा"

मी तसा एकदम बारीक शरिरयष्टीचा होतो. त्यामुळे त्या कड्यावर चढायला जास्त वेळ नाही लागला. पण प्रश्न हा होता की हा जाडा आज्या कसा काय तिथं पोहचला असेल. मी त्याच्या जागी असतो तर एकतर जीव द्यायची जागा बदलली असती नाहीतर सरळ प्लॅनच कॅंसल केला असता. असो. मी धापा टाकत शेवटी कड्यावर पोहचलो. रूमाल काढला, बसायची जागा झाडली आणि आज्याच्या शेजारी बसलो. नेहमी प्रमाणे महाराज शुन्यात नजर लावून बसले होते.

"काय मस्त हवा आहे नाही आज्या?"
"हम्म्म्म !"
"अरे ते बघ ते तुझ घर! केवढस दिसतय नाही इथुन?"
"हम्म्म्म!"
"अरे ते बघ......"
"विक्या! नळकांड्या! उगाच नेहमी सारखं फालतू बडबडू नको. आधीच मुड नाय माझा!"

माझ्या "सुद्रुढ" शरिरयष्टीमुळे "नळकांड्या" हे माझं नामकरण आज्यानेच केलं होतं.

"बर बाबा! sorry! बोल काय मॅटर यावेळी?"
"काय नाय सोड ना!"
"बर ठिक आहे. बर मला सांग तु उडी मारतोयेस की मी ढकलू? एकदाच काय ते करून टाक."
"अरे ए भुसनाळ्या! इथ तुज्या जिगरी दोस्ताच्या लाईफ़चा सवाल हाय आनि तु हे बोलतोयेस? हिच काय तुझी यारी?"
"आता मग काय करू सांग? विचारलं तर भाव खातोयेस!"
"मग प्रेमानं विचारायच! आगोदरच प्रेमभंग झालाय आनि तु त्यात......"
"कितीवेळा प्रेमभंग होतो रे तुझा? बर यावेळी कोण होती ती कमनशिबी जिनं आमच्या वाघाला नाकारलं?"

एक हलकं स्मितहास्य अज्याच्या चेहर्‍यावर मला दिसलं. बहुतेक "वाघा"ची उपमा एकदम योग्य जागेवर बसली! Bull's eye का कायतर म्हणतात ना, तसं!!

"अरे ती मानेंची रेश्मा आहे ना..."
"ती? ती आवडली तुला ? ती बरोबर मुलगी नाही. तुझ्यासाठीतर मुळीच नाही"  आज्या बोलायच्या आतच माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं.
"ए नळकांड्या! माझी लाईन आहे ती! काय बोललास तर बघ तिला!"
"अरे माझ्या राजा! ती आगोदरच एंगेज आहे! पानपट्टीवाला बबन आहे तिचा छावा"
"म्हणजे? तुला पण माहित होत? कधी बोल्ला नाईस मला? आणि तिनं त्या बबन्यासाठी मला नाकारलं? मला?"
"आता मला काय माहित यावेळी तुझा नेम तिकड लागणार आहे? आणि ’तुला पण’ म्हणजे? आणखी कोणाला माहित आहे?"
"अरे तस नाय! ती पण हेच म्हणाली की मी एंगेज आहे. माझा नाद सोड!"
"चायला आज्या तुझं डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाल्लय की? तिला विचारून मोकळा पण झालास?"
"अरे मंग काय? रेशनच्या लाइनमधे समोरच उभी होती. दुकान उघडायला वेळ होता म्हणून विचारून टाकलं?"
"वाह! बर हे तुझ प्रेमप्रकरण कधीपासून सुरू होतं?"
"सकाळी ७ ला मी लाईनमधे तिच्यामागं उभारलो. साडे ७ वाजले असतिल, ती मला आवडली. ८ वाजता प्रेमात पडलो. साडे आठला प्रपोज केलं आणि ९ वाजता ब्रेकप झालं"
"आता मी एक काम करतो. मीच उडी मारतो इथुन. घरी माझ्या आईला सांग मला या जीवनाचा साक्षातकार झाला आणि मी स्वेच्छेने देहदान केलं"
"ए विक्या! कानपाड फोडेन असलं काय बोल्लास तर! अपला जिगरी आहेस तु! अरे अशा ५६ मुली येतिल परत लाईफमधे पन तुझ्यासारखा जिगरी नाय मिळनार मला!"

आज्याच्या डोळ्यातलं आलेलं टुचुकभर पाणी सगळं काही सांगून गेलं. आज्याच्याच भाषेत बोलायच झालं तर "जिगरी" या शब्दाचा खरा अर्थच जणू मला  समजला.

"बर बाबा! चुकलं माझं. पण काय हा तुझा फालतुपणा? कोणपण दिसली की कसाकाय प्रेमात पडतोस? आणि नाही यश आलं की चाल्लास जीव द्यायला."
"काय करू सांग! frustration आलय. कोणच होकार देत नाय!"

"अरे जरा धिरानं करायच्या असतात या गोष्टी. घाई गडबड करून काही मिळणार नाही."

"ऐका कोन सांगालय!"

"तुला काय समजायचय ते समज! पण एक promise कर की परत हे ’प्रेमात पडायच, मग प्रेमभंग की लगेच जीव देण्याची धमकी’ बंद करायच!"

"प्रेमात नपडायच promise काय करनार नाही पन ते जीव वगैरे काय देनार नाही. आईची शप्पत. सुटल्या म्हन"
"सुटल्या"

आज्या आणि मी तिथुन उठलो. हळू हळू कडा उतरला. खाली रोह्या हाताची बोटं मोडत चिंतेत उभा होता. आम्हाला दोघांना ’जिवंत” खाली येताना बघून त्यानं उसासा टाकला आणि पळत येऊन आम्हाला मिठी मारली. आज्याच्या पोटात दोन बुक्क्या घातल्या आणि आम्ही तिघे परत घरी निघालो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे असं आमचं त्रिकुट. उभ्या पंचक्रोषीत परिचित होतं. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायची आमची तयारी होती. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही एकत्र होतो. रोह्या अभ्यासात खुप हुषार होता. चांगले मार्क्स मिळाले असतानाही त्याने त्याच्या वडलांचे नऐकता मला आणि आज्याला ज्या कॉलेजमधे admission मिळाली तेथेच admission घेतली. तिघही लवकरच आपापली घरटी सोडून दुरच्या ठिकाणी जाणार होतो. Engineering हे आम्हा तिघांनाही घ्यायचं होतं आणि नशिबाने आता आम्ही तिघही एकाच college मधे, एकाच वर्गात शिकणार होतो. तिघांच्याही मनात खुप स्वप्न होती आणि एकमेकांची साथ असताना बाहेरच्या जगाची तर चिंताच नव्हती..... !

================================================================================


मी आणि  तु  ....(भाग १) ला मिळालेला प्रतिसाद खरच अनपेक्षित होता. आता या मी आणि  तु  ....(भाग २) पासून कथेला गुंफण्याचा अवघड प्रयत्न सुरू होत आहे. हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा दुसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

2 comments:

  1. छान आहे गोष्ट, पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...