Monday, July 2, 2012

असच काहितरी....!

                          आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

8 comments:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...