Saturday, May 2, 2015

मी आणि तु ....(भाग ४)

आता जवळ जवळ वीस-एक दिवस झाले होते कॉलेज सुरू होऊन. नव-नविन ओळखी होत होत्या. नवे मित्र आणि काही मोजक्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्या मोजक्या मैत्रिणींत सारिकाही होती. आम्हा दोघांना बोलताना कधी आज्याने पाहिलेच तर त्याचा चेहरा रागाने लालबुंद व्हायचा आणि मीही मुद्दामुन त्याला दिसेल अशा वेळीच तिच्याशी बोलायचो.

दिवस पावसाळ्याचे होते. रोज नचुकता पावसाची हजेरी असायचीच. त्यादिवशी मी थोडा उशीरा उठलो. त्यामुळे वेळेत तयार होता आले नाही. आज्या-रोह्याची इ्च्छा नसतानाही मी त्यांना पुढे जाण्यास सांगितलं. मी नेहमी प्रमाणे सगळं आवरलं आणि कॉलेजला जाण्यास निघालो. आज नेहमीपेक्षा अर्धातास उशीर झाला होता. पहिले लेक्चर चुकणार यात काही शंकाच नव्हती. त्यामुळे मी कोणतिही गडबड न करता वाटेला लागलो. टमटम केली आणि कॉलेजच्या दारात आलो. तिथुन मुख्य कॉलेज बरचं आत होतं. मुख्य कमानितुन आत प्रवेश करणार तोच प्रचंड पाऊस पडायला लागला. मी पटकन आडोसा घेतला आणि पावसाची सर कमी होण्याची वाट बघत उभारलो. पावसाची तीव्रता एवढी होती की १० फुटावरचं पण स्पष्ट दिसत नव्हतं. रस्त्यावर तसं कोणीच नव्हतं. चार चाकी गाड्या सोडल्यातर रस्ता पुर्ण मोकळा होता. तोच एक मोरपंखी चुडीदार घातलेली एक मुलगी छत्री सावरत कमानितुन आत जाताना दिसली. पावसामुळे तिचा चेहरा काही स्पष्ट दिसला नाही पण नाजुक बांध्याची ती, आडोशाला उभारलेल्या सर्वांच लक्ष मात्र वेधुन गेली.

थोड्यावेळाने पाऊस थांबला तसा मी कमानितुन आत कॉलेजकडे निघालो. आधीच झालेला उशीर अन त्यात पावसामुळे गेलेला वेळ मला महागात पडला. माझे दोन लेक्चर चुकले होते. स्वतःच्या आळशीपणाला शिव्या देत दुसरे लेक्चर संपण्याची वाट पाहात कँटिनमधे बसलो. दुसर्‍या लेक्चर नंतर १५ मिनिटाचा ब्रेक असतो तेव्हा कॅंटिनमधे आम्ही नेहमी चहा घ्यायचो, त्यामुळे आज्या-रोह्याची वाट बघत एक एक घोट चहा पित बसलो. दोघांनी आल्या आल्या माझ्यावर शिव्यांचा भडीमार केला. नवले सरांचं महत्वाचं लेक्चर चुकवल्याची शिक्षाच होती ती. दोघांना चहा पाजला आणि आम्ही तिघे वर्गात येऊन बसलो.

पुढचं लेक्चर झालं तसं हजेरी सुरू झाली. नेहमी प्रमाणे टिचरनी "मुग्धा परांजपे" पुकारलं. पण आज चक्क नवल घडलं. जवळ जवळ २० दिवसांत पहिल्यांदा मागुन "प्रेसेंट सर" असा छानसा नाजुक आवाज आला. अख्खा वर्ग मागेवळून तिच्याकडं बघु लागला. आज  २० दिवसांनी "मुग्धा परांजपे" या क्लासमधे पधारल्या होत्या. मी ही या "बाईंच" दर्शन घ्यावं म्हणून मागे वळून पाहिलं तर ती तीच होती. मोरपंखी चुडीदार वाली. थोडी सावळी पण रेखीव चेहरा, नाजूक बांधा पण सोज्वळ पेहराव. अख्खा वर्ग तिच्याकड बघत होता त्यामुळे ती थोडी बिथरली. तेवढ्यात टिचरचा आवाज आला, "मिस परांजपे. तुम्ही माझ्यासोबत प्रिंसिपलकडे चला. कारण तुम्हाला माहिती आहेच तरिसुद्धा सांगतो. तुम्ही गेले २० दिवस गैरहजर होता. युनिव्हरसिटीच्या नियमानुसार तुम्हाला कदाचित परिक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला. प्रिंसिपल मॅडमशी आपण बोलू आणि योग्य ती कारवाई करू." सरांच्या खणखणीत आवाजातल्या सुचनेवर "यस सर!" असा नाजूकसा आवाज अगदी विचित्र वाटला. राहिलेली हजेरी घेऊन सर वर्गाबाहेर पडले तशी मुग्धा परांजपे त्यांच्या मागे मागे निघाली. ती बाहेर जाताच अख्ख्या वर्गात कुजबुज सुरू झाली. खुद्द मुग्धा परांजपेला जेवढी काळजी नसेल तेवढी काळजी हे लोक करत होते. "आता तीच काय होणार" किंवा "बिचारी परिक्षेला नाई बसू शकणार" किंवा "बरोबरचे. आम्ही काय येडे आहे होय, पहिल्या दिवसापासून attend करायला" वगैरे वगैरे गोष्टी कानावर पडायला लागल्या. यासर्वांत कुठेतरी मी ही होतो. मलाही का कोणास ठाऊक पण "तीचं काय होणार?" या प्रश्नाने बैचेनी होत होती.

थोड्यावेळाने ती आली. चेहरा तसा normal वाटत होता, त्यामुळे नक्की काय झाले असावे याचा काही अंदाज लागत नव्हता. पुढच लेक्चर झालं तसा "लंच ब्रेक" झाला. आम्ही तिघं आणि नवे २ मित्र असे पाच लोक एकत्र कॅंटिनमधे जेवायला बसलो. आमच्या आजच्या "महाचर्चेचा" विषय "मुग्धा परांजपे"च होता. प्रत्येकजण तिच्याबद्दल स्वतःच मत मांडत होता. मी फक्त ऐकायच काम करत होतो. बोलता बोलता सगळे एकदम शांत झाले. मला काही कळायच्या आत मुग्धा परांजपे माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. नुसती बसली नाही तर आल्या आल्या आम्हा सगळ्यांना "हाय गाईज" सुद्धा म्हणाली. मला तर काय कराव कळालच नाही. माझा घास घेतानाचा हात तसाच तोंडात होता आणि तेही मला तेव्हा कळालं जेव्हा ती माझ्याकडं बघून हसून म्हणाली

"अरे तोंडातला हात बाहेर काढलास तरी चालेल. आता मोठा झाला आहेस. हा हा हा".

मी थोडा लाजलो आणि पटकन हात बाहेर काढला. तेवढ्यात ती पुन्हा बोलली,

"I hope you guys don't mind if I join you for lunch."

आधीच आमचे इंग्रजीचे वांदे. आणि त्यात ही बया फाड-फाड इंग्रजी झाडत होती. नेमकं ती काय म्हणाली हे कळायच्या आत आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

आम्ही चौघंही आज्याकडं आश्चर्याने बघायला लागलो. रोह्या बोल्ला असता तर एकवेळ ठिक आहे पण आज्या?

हे सगळ पचवतो तोच ती पुन्हा बोल्ली

"Actually I had Jaundice. So I was not there for almost a month. I hope I haven't missed a lot of syllabus."

त्यावर पुन्हा आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

हे उत्तर ऐकल्यावर आज्या सोडला तर आम्ही सगळे पोट धरून हसलो. 

"आयला आगोदर इंग्लिश काय झेपत नाय, त्यात ओळख ना पाळख या मॅडम येऊन इंग्लिश झाडाल्यात. मग म्हटलं आपन पन जरा ट्राय मारू", आज्या केविलवाणा चेहरा करून बोलला.

"हा हा हा. It's okay re. असो. मी मुग्धा परांजपे. नाशिकहून आले."

"हाय मुग्धा. मी विक्रम सगळे मला विकी म्हणतात. हा रोहीत, हा सौरभ, हा मिहीर आणि हे आमच्या मंडळाचे खंबीर कार्यकर्ते श्री आजित राव." मी आमच्या ग्रुपची ओळख करून दिली तसा पुढचा प्रश्न विचारला,

"तु नेमकी आमच्या ग्रुपकडे कशी आलिस? I mean वर्गात जवळ जवळ ७० लोक आहेत मग इकडे कशी?"

माझा प्रश्न संपतो ना संपतो तोच ती बोलली,

"अरे कॅंटिनला जेवायला म्हणून आले अन माझं नाव ऐकू आलं. म्हणून बघितलं तर तुम्ही माझ्यावर बोलताहात हे कळालं. कोणितरी आपली काळजी करतय असं कळाल्यावर थोडं छानं वाटलं. म्हणून लगेच तुम्हाला येऊन join झाले. आवडलं नाही का?"


"अगं तसं नाही. कृपया गैरसमज नको. आमच्या ग्रुप मधे तुझं स्वागत आहे! बोल काय घेणार. आज आमच्या सगळ्यांकडून तुला ट्रिट."

तर ही अशी आमची ओळख झाली मुग्धा परांजपेशी. थोडी "बिनधास्त" स्वभावाची पण समजुद्दर. अगदी पहिल्या भेटितच आम्हाला ती आमची एखादी खुप जुनी मैत्रिण असल्यासारखी वाटू लागली. काही लोकं खुप मोकळ्या स्वभावाचे असतात त्यातलीच एक ही मुग्धा परांजपे.

===============================================================================
मी आणि तु कथेचा हा चौथा भाग. पहिल्या तिन भागांना मिळालेला प्रतिसाद नक्कीच सुखद होता. बर्‍याच जणांचे कॉल आले, मेसेजेस आले. खरच तुमच्या सारखे वाचकच मला लिहिण्यास उत्स्फुर्त करतात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. आवडलाच तर "शेअर" किंवा "+१" नक्की करा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

1 comment:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...