Saturday, May 2, 2015

मी आणि तु ....(भाग ४)

आता जवळ जवळ वीस-एक दिवस झाले होते कॉलेज सुरू होऊन. नव-नविन ओळखी होत होत्या. नवे मित्र आणि काही मोजक्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्या मोजक्या मैत्रिणींत सारिकाही होती. आम्हा दोघांना बोलताना कधी आज्याने पाहिलेच तर त्याचा चेहरा रागाने लालबुंद व्हायचा आणि मीही मुद्दामुन त्याला दिसेल अशा वेळीच तिच्याशी बोलायचो.

दिवस पावसाळ्याचे होते. रोज नचुकता पावसाची हजेरी असायचीच. त्यादिवशी मी थोडा उशीरा उठलो. त्यामुळे वेळेत तयार होता आले नाही. आज्या-रोह्याची इ्च्छा नसतानाही मी त्यांना पुढे जाण्यास सांगितलं. मी नेहमी प्रमाणे सगळं आवरलं आणि कॉलेजला जाण्यास निघालो. आज नेहमीपेक्षा अर्धातास उशीर झाला होता. पहिले लेक्चर चुकणार यात काही शंकाच नव्हती. त्यामुळे मी कोणतिही गडबड न करता वाटेला लागलो. टमटम केली आणि कॉलेजच्या दारात आलो. तिथुन मुख्य कॉलेज बरचं आत होतं. मुख्य कमानितुन आत प्रवेश करणार तोच प्रचंड पाऊस पडायला लागला. मी पटकन आडोसा घेतला आणि पावसाची सर कमी होण्याची वाट बघत उभारलो. पावसाची तीव्रता एवढी होती की १० फुटावरचं पण स्पष्ट दिसत नव्हतं. रस्त्यावर तसं कोणीच नव्हतं. चार चाकी गाड्या सोडल्यातर रस्ता पुर्ण मोकळा होता. तोच एक मोरपंखी चुडीदार घातलेली एक मुलगी छत्री सावरत कमानितुन आत जाताना दिसली. पावसामुळे तिचा चेहरा काही स्पष्ट दिसला नाही पण नाजुक बांध्याची ती, आडोशाला उभारलेल्या सर्वांच लक्ष मात्र वेधुन गेली.

थोड्यावेळाने पाऊस थांबला तसा मी कमानितुन आत कॉलेजकडे निघालो. आधीच झालेला उशीर अन त्यात पावसामुळे गेलेला वेळ मला महागात पडला. माझे दोन लेक्चर चुकले होते. स्वतःच्या आळशीपणाला शिव्या देत दुसरे लेक्चर संपण्याची वाट पाहात कँटिनमधे बसलो. दुसर्‍या लेक्चर नंतर १५ मिनिटाचा ब्रेक असतो तेव्हा कॅंटिनमधे आम्ही नेहमी चहा घ्यायचो, त्यामुळे आज्या-रोह्याची वाट बघत एक एक घोट चहा पित बसलो. दोघांनी आल्या आल्या माझ्यावर शिव्यांचा भडीमार केला. नवले सरांचं महत्वाचं लेक्चर चुकवल्याची शिक्षाच होती ती. दोघांना चहा पाजला आणि आम्ही तिघे वर्गात येऊन बसलो.

पुढचं लेक्चर झालं तसं हजेरी सुरू झाली. नेहमी प्रमाणे टिचरनी "मुग्धा परांजपे" पुकारलं. पण आज चक्क नवल घडलं. जवळ जवळ २० दिवसांत पहिल्यांदा मागुन "प्रेसेंट सर" असा छानसा नाजुक आवाज आला. अख्खा वर्ग मागेवळून तिच्याकडं बघु लागला. आज  २० दिवसांनी "मुग्धा परांजपे" या क्लासमधे पधारल्या होत्या. मी ही या "बाईंच" दर्शन घ्यावं म्हणून मागे वळून पाहिलं तर ती तीच होती. मोरपंखी चुडीदार वाली. थोडी सावळी पण रेखीव चेहरा, नाजूक बांधा पण सोज्वळ पेहराव. अख्खा वर्ग तिच्याकड बघत होता त्यामुळे ती थोडी बिथरली. तेवढ्यात टिचरचा आवाज आला, "मिस परांजपे. तुम्ही माझ्यासोबत प्रिंसिपलकडे चला. कारण तुम्हाला माहिती आहेच तरिसुद्धा सांगतो. तुम्ही गेले २० दिवस गैरहजर होता. युनिव्हरसिटीच्या नियमानुसार तुम्हाला कदाचित परिक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला. प्रिंसिपल मॅडमशी आपण बोलू आणि योग्य ती कारवाई करू." सरांच्या खणखणीत आवाजातल्या सुचनेवर "यस सर!" असा नाजूकसा आवाज अगदी विचित्र वाटला. राहिलेली हजेरी घेऊन सर वर्गाबाहेर पडले तशी मुग्धा परांजपे त्यांच्या मागे मागे निघाली. ती बाहेर जाताच अख्ख्या वर्गात कुजबुज सुरू झाली. खुद्द मुग्धा परांजपेला जेवढी काळजी नसेल तेवढी काळजी हे लोक करत होते. "आता तीच काय होणार" किंवा "बिचारी परिक्षेला नाई बसू शकणार" किंवा "बरोबरचे. आम्ही काय येडे आहे होय, पहिल्या दिवसापासून attend करायला" वगैरे वगैरे गोष्टी कानावर पडायला लागल्या. यासर्वांत कुठेतरी मी ही होतो. मलाही का कोणास ठाऊक पण "तीचं काय होणार?" या प्रश्नाने बैचेनी होत होती.

थोड्यावेळाने ती आली. चेहरा तसा normal वाटत होता, त्यामुळे नक्की काय झाले असावे याचा काही अंदाज लागत नव्हता. पुढच लेक्चर झालं तसा "लंच ब्रेक" झाला. आम्ही तिघं आणि नवे २ मित्र असे पाच लोक एकत्र कॅंटिनमधे जेवायला बसलो. आमच्या आजच्या "महाचर्चेचा" विषय "मुग्धा परांजपे"च होता. प्रत्येकजण तिच्याबद्दल स्वतःच मत मांडत होता. मी फक्त ऐकायच काम करत होतो. बोलता बोलता सगळे एकदम शांत झाले. मला काही कळायच्या आत मुग्धा परांजपे माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. नुसती बसली नाही तर आल्या आल्या आम्हा सगळ्यांना "हाय गाईज" सुद्धा म्हणाली. मला तर काय कराव कळालच नाही. माझा घास घेतानाचा हात तसाच तोंडात होता आणि तेही मला तेव्हा कळालं जेव्हा ती माझ्याकडं बघून हसून म्हणाली

"अरे तोंडातला हात बाहेर काढलास तरी चालेल. आता मोठा झाला आहेस. हा हा हा".

मी थोडा लाजलो आणि पटकन हात बाहेर काढला. तेवढ्यात ती पुन्हा बोलली,

"I hope you guys don't mind if I join you for lunch."

आधीच आमचे इंग्रजीचे वांदे. आणि त्यात ही बया फाड-फाड इंग्रजी झाडत होती. नेमकं ती काय म्हणाली हे कळायच्या आत आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

आम्ही चौघंही आज्याकडं आश्चर्याने बघायला लागलो. रोह्या बोल्ला असता तर एकवेळ ठिक आहे पण आज्या?

हे सगळ पचवतो तोच ती पुन्हा बोल्ली

"Actually I had Jaundice. So I was not there for almost a month. I hope I haven't missed a lot of syllabus."

त्यावर पुन्हा आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

हे उत्तर ऐकल्यावर आज्या सोडला तर आम्ही सगळे पोट धरून हसलो. 

"आयला आगोदर इंग्लिश काय झेपत नाय, त्यात ओळख ना पाळख या मॅडम येऊन इंग्लिश झाडाल्यात. मग म्हटलं आपन पन जरा ट्राय मारू", आज्या केविलवाणा चेहरा करून बोलला.

"हा हा हा. It's okay re. असो. मी मुग्धा परांजपे. नाशिकहून आले."

"हाय मुग्धा. मी विक्रम सगळे मला विकी म्हणतात. हा रोहीत, हा सौरभ, हा मिहीर आणि हे आमच्या मंडळाचे खंबीर कार्यकर्ते श्री आजित राव." मी आमच्या ग्रुपची ओळख करून दिली तसा पुढचा प्रश्न विचारला,

"तु नेमकी आमच्या ग्रुपकडे कशी आलिस? I mean वर्गात जवळ जवळ ७० लोक आहेत मग इकडे कशी?"

माझा प्रश्न संपतो ना संपतो तोच ती बोलली,

"अरे कॅंटिनला जेवायला म्हणून आले अन माझं नाव ऐकू आलं. म्हणून बघितलं तर तुम्ही माझ्यावर बोलताहात हे कळालं. कोणितरी आपली काळजी करतय असं कळाल्यावर थोडं छानं वाटलं. म्हणून लगेच तुम्हाला येऊन join झाले. आवडलं नाही का?"


"अगं तसं नाही. कृपया गैरसमज नको. आमच्या ग्रुप मधे तुझं स्वागत आहे! बोल काय घेणार. आज आमच्या सगळ्यांकडून तुला ट्रिट."

तर ही अशी आमची ओळख झाली मुग्धा परांजपेशी. थोडी "बिनधास्त" स्वभावाची पण समजुद्दर. अगदी पहिल्या भेटितच आम्हाला ती आमची एखादी खुप जुनी मैत्रिण असल्यासारखी वाटू लागली. काही लोकं खुप मोकळ्या स्वभावाचे असतात त्यातलीच एक ही मुग्धा परांजपे.

===============================================================================
मी आणि तु कथेचा हा चौथा भाग. पहिल्या तिन भागांना मिळालेला प्रतिसाद नक्कीच सुखद होता. बर्‍याच जणांचे कॉल आले, मेसेजेस आले. खरच तुमच्या सारखे वाचकच मला लिहिण्यास उत्स्फुर्त करतात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. आवडलाच तर "शेअर" किंवा "+१" नक्की करा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Saturday, April 4, 2015

मी आणि तु ....(भाग ३)

बघता बघता आमचे घरटे सोडून उडण्याचे दिवस आले. कॉलेज तसं बरच दूरच्या ठिकाणी होतं. आपापलं सामान घेऊन आम्ही निघालो. ८ तासांचा प्रवास करून शेवटी तेथे पोहोचलो. एक छोटिशी खोली भाड्याने घेतली आणि आमचा जणू संसारच थाटला. आम्ही तिघेही पहिल्यांदाच घरापासून दूर राहणार होतो पण एकत्र असल्यामुळे घरच्यांची जास्त कमी भासणार नाही हे मात्र नक्की होतं. आम्ही तिघेही कॉलेजला जायचं या विचारानेच खुप excited होतो. कधी एकदा कॉलेज सुरू होईल असं झालं होतं.
बघता बघता कॉलेजचा पहिला दिवस आला. तिघेही मस्त आवरून कॉलेजला निघालो. आमच्या खोली पासून साधारण दोन किलोमिटरवर कॉलेज होतं. आम्ही टमटम  केली आणि कॉलेजवर पोहोचलो. कॉलेजची भली मोठी कमान आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. कमानीपासून कॉलेज बरच आत होतं. दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता. एकदम झकास campus होता. जूलै चे दिवस होते. पावसामुळे वातावरणात चैतन्य होतं. वातावरण इतकं सुंदर होतं की त्याचा अस्वाद घेता घेता कधी कॉलेजच्या मुख्य इमारतीपाशी आलो तेच कळालं नाही. ब्रिटीश कालीन दगडी बांधकाम असलेली मुख्य इमारत आणि बाजूने नव्याने बांधलेल्या सिमेंट्च्या इमारती यात दोन पिढ्यांचा फरक लगेच समजत होता. मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला एक मोठ वडाच झाड होतं. कदाचित ते झाड या इमारती इतकच जुनं असेल. त्याभोवती एक कट्टा होता आणि त्यावर काही टाळकी बसून गप्पा मारत होती. इमारतीच्या डाव्या बाजूस भलं मोठ्ठ २ व्हिलर पार्किंग होतं. पार्किंगच्या समोर कॉलेजच कॅंटिन होतं. पार्किंग आणि कॅंटिन यांच्या मधे कॉलेजचं दुसरं गेट होतं जे खास गाडी वाल्यांसाठीच होतं.

कॅंटिन दिसताच आज्याची भूक खवळली.

"अरे चला ना कायतर खाऊयात"  आज्या म्हणाला.
"आत्ता तर आलोय. आधी कॉलेजला जाऊ. आपण शिकण्यासाठी आलोत की खाण्यासाठी?" इति रोह्या.
"अये टॉपर. तु आला अस्शील शिकायला. मी पहिले खानार मगच आत येनार. आनि विक्या पन माझ्या सोबत येनार आहे. तुला यायच असल तर ये नायतर बस!"

थोडक्यात मला आज्याने चॉइसच ठेवली नाही. मला हाताला धरलं आणि रेटत त्याने कॅंटिनकडं नेलं. दुसरा पर्याय नसल्याने रोह्यापण आमच्या मागं आला. पत्र्याच्या शेडमधे टेबल खुर्च्या टाकल्या होत्या. मी पार्किंगकडे तोंड करून बसलो आणि ही दोघं माझ्या समोर. ऑर्डर दिली आणि आम्ही कॉलेज campus बद्दल गप्पा मारत बसलो. तोच एक चेहर्‍याला रुमाल बांधलेली, पिवळा टॉप आणि काळी जिन्स घातलेली मुलगी गाडी घेऊन गेट मधून आत आली. का कोणास ठाऊक पण माझी नजर तिच्यावरच खिळली. तिचा सुंदर बांधा, गोरे हात बघितल्या नंतर त्या रूमाला मागचा चेहरा बघण्याची जणू उत्सुकता लागली होती. तीने गाडी पार्क केली, आणि नेमकी माझ्याकडं पाठ करून आपला रूमाल काढला. आता कधी एकदा ती वळते आणि मी तिचा चेहरा बघतो असं झालं होतं मला. माझं लक्ष तिच्यावर इतकं खिळलं होतं की समोर दोघं काय बोलत होते ते काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यात आज्याच्या धक्क्याने पाण्याचा ग्लास कलंडला आणि पाणी माझ्या पायावर पडलं. मी लगेच बजूला झालो, पायावरच पाणी झटकलं आणि पहिले तिच्याकडे पाहिलं. पण ती तिथे नव्हती. मग मात्र आज्याचा खुप राग आला. तिचा चेहरा बघण्याचा chance या आज्यामुळं miss झाला होता. मग मागवलेला वडापाव खाल्ला आणि आम्ही आमची classroom शोधण्यासाठी निघालो.त्याक्षणापासून माझी नजर ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी शोधू लागली. मी मुलींकडे काळजीपूर्वक बघतोय हे बहुदा आज्याच्या लक्षात आलं.

"आयला. काय आजकालची पोरं. आजून कॉलेजला आलं न्हाई की लागली पोरी भापायला"

आज्याने डायलॉग टाकला तसा मी त्याच्याकड रागाने पाहिलं आणि परत माझी शोध मोहिम सुरू केली. वर्ग सापडला पण ती काय सापडली नाही. आम्ही वर्गात प्रवेश केला आणि थोडे बिचकलो. प्रचंड मोठी classroom होती. अगदी समोरचे २-४ बाक सोडले तर बाकी सगळे बाक गच्च भरले होते. नाईलाजास्तव आम्हाला समोरच्या बाकावर बसावं लागलं. रोह्या खुष होता पण आम्ही दोघ जाम नाराज. शाळेत कधी आम्ही समोरच्या बाकांवर बसलो नव्हतो आणि आता तर कॉलेजला आलो होतो आम्ही. कॉलेजमधे जाऊन समोरच्या बाकावर बसणे म्हणजे जणू आम्हा दोघांना आमचा अपमान झाल्यासारखेच वाटत होते. बाक मोठे होते, आज्या माझ्या आणि रोह्याच्या मधे बसला. बसतो ना बसतो तोच आज्याने रोह्याला जवळ खेचला आणि धमकी दिली,

"हे आज फस्ट आनि लास्ट! जास्त खुश होऊ नको. मी आनि विक्या परत समोरच्या बाकावर बसनार नाही. तुला बसायच असल तर तु बस."

"ए आज्या तु गप बस. तु तर बोलूच नकोस. तुझ्या अत्रुप्त पोटामुळे आपल्याला इथे बसाव लागतय. मी म्हणालो होतो की कॅंटिनला न जाता पहिले वर्गात जाऊ पण तुम्ही दोघ कधी माझ ऐकाल तर ना! आता बसा समोरच्या बाकावर. भोगा कर्माची फळं."

बहुदा आज्याकड यावर बोलण्यासाठी काही नव्हतं. तो गप्प बसला आणि मी इकड दोघांच बोलण ऐकून हसत होतो. तेवढ्यात teacher वर्गात आले आणि आमच्या इंजिनिअरिंग लाईफला थोडक्यात खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. विषयाची ओळख, exam pattern वगैरे मधे पहिला तास संपला. त्यानंतर हजेरी झाली आणि teacher निघून गेले. तसाच दुसरा तासही झाला, त्याचीही हजेरी झाली. त्यानंतर मधली सुट्टी म्हणजेच लंच ब्रेक झाला तसा पुर्ण वर्ग बाहेर जाण्यासाठी उठला. वर्गाला एकच दार होतं त्यामुळे दारापाशी एकदमच खुप गर्दी झाली. आम्ही तिघं गर्दी ओसरायची वाट बघत बाकावरच बसलो होतो तोच त्या गर्दीत मला ती ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी दिसली पण पुन्हा पाठमोरी. तीचा चेहरा काही दिसला नाही त्यामुळं मी थोडा नाराज झालो पण ती माझ्याच वर्गात आहे आणि लंच ब्रेक संपल्यानंतर ती पुन्हा मला दिसू शकते हे लक्षात आल्यानंतर मात्र मी गालातल्या गालातच हसलो.

मी या दोघांनाही लंचसाठी घाई केली आणि आम्ही तिघे वेळेच्या आधीच पुन्हा वर्गात येऊन बसलो. आज्याने नेहमी प्रमाणे मला माझ्या या विचित्र वागण्याबद्द्ल शिव्या घातल्या पण सध्या मला त्याहुनही महत्वाच होत की त्या मुलिचा चेहरा बघणं. वर्गात आल्या आल्या मी सगळीकडे नजर टाकली आणि खात्री केली की ती अजून वर्गात आली आहे की नाही आणि ती आजून आली नव्हती. मग सुरू झाला तीचा "इंतजार".

प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता आणि शेवटी तो क्षण आलाच. ती माझ्यासमोर होती. गोरा रंग आणि अगदी सुंदर रेखिव चेहरा.  ती समोरून जात असताना मी तिच्या थेट डोळ्यात बघत होतो आणि तिही माझ्याकडच बघत होती. नकळत मी तिच्याकड बघून हसलो आणि तिही नकळत हसली आणि हसताना तिच्या गालावर सुरेख खळी पडली. इतका सुंदर चेहरा आणि त्यात खळी म्हणजे "सोनेपे सुहागा" कशाला म्हणत असतील त्याचं उदाहरण जणू माझ्या समोर होतं. मी जणू तंद्री लागल्यासारखा तिच्याकड बघत होतो.

"आयला काय item आहे. मला जाम आवडली. आता हिला मी कटावनार"

आज्याच्या या comment ने माझी तंद्री मोडली. तिला item म्हणालेलं तर मला मुळीच आवडलं नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या बाकावर बसे पर्यंत तिला बघत राहिलो. आता पुढचा प्रश्न होता की तिचं नाव काय? आणि त्याला solution पण होतच. पुढचा तास सुरू झाला पण माला उत्सुकता होती ती हजेरिची. कधी एकदा तास संपतोय आणि teacher हजेरी घेतात असं झालं होतं मला. शेवटी तास संपला आणि हजेरी सुरू झाली आणि तिचं नाव कळालं, सारिका रानडे.

मी जणू तिच्या प्रेमातच पडलो होतो. "लव्ह ऍट फ़र्स्ट साईट" म्हणतात अगदी तसं. त्या क्षणापासून मी फक्त तिचाच विचार करत होतो. डोळ्यासमोर फक्त मला तिच दिसत होती. बघता बघता पहिला दिवस संपला. तिची एखादी झलक दिसते का हे पाहण्यासाठी माझी नजर तिला त्या गर्दित शोधू लागली. ती दिसली तशी माझी धसधस शांत झाली. ती नजरेआड होई पर्यंत मी तिला बघत राहिलो. बहुतेक मी तिच्याकडच बघतोय हे आज्याच्या लक्षात आलं.

"ए नळकांड्या! माझ्या item कडं का बघायलायस?"
"item item काय लावलयस रे. सारिका नाव आहे तिचं"
"च्यामायला तुला तिच नाव पन कळलं?  तिच्यावर डोळा नको ठेऊस. ती माझी आहे. आपलं भांडन होईल."
"ए चल बे निघ. म्हणे ’माझी आहे’. अरे जा ना"

आमचा दोघांचा फालतूपणा बहुतेक रोह्याला नाही आवडला.
"तुम्ही दोघ गप बसा. आजुन पहिला दिवस संपतोयच की तुमचं सुरू झालं. आज्याचं समजु शकतो पण तु रे विक्या. तु कधी पासून बदललास? मुलींकडं कधी न बघणारा तु, कधी पासून मुलीबद्दल भांडायला लागलास? बर ते जाऊदे. तुम्ही दोघांनी एक गोष्ट नोटिस केली काय?"

"काय?" आम्ही दोघं एकदम म्हणालो.
"आज सगळे present होते पण फक्त एकजणच नव्हती"
"नव्हती? आयला आमाला शाहानपन शिकवतोय आनि स्वता पन पोरिंची काळजी करतोय. आं रे माझ्या वाघा! "

आज्याने बरोबर रोह्याला पकडलं.

"अरे तस नाही रे. कॉलेजचा पहिला दिवस कोण कसं काय miss करू शकते हे मला समजलं नाही. म्हणून तिचं नाव लक्षात राहिलं."
"हां रे! कुकुलं बाळ समजलास काय अमाला? म्हंजे मला tough fight आहे इथे पोरी भापायला" आज्या म्हणाला.
"ए अज्या गप रे. रोह्या तु बोल. कोण ती बिंडोक जीने हा पहिला दिवस miss केला?"

"मुग्धा परांजपे."
===================================================================================

 मी आणि तु ....(भाग १) आणि  मी आणि तु ....(भाग २) ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. मी आणि तु .... या दीर्घकथेतला हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा तिसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Friday, March 20, 2015

मी आणि तु ....(भाग २)



आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............


"विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??"
"अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!"
"अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?"
"हो हो. पाठव!"

रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला.

"अरे विक्या!! चल आवर लवकर!!"
"का रे? काय झालं? सगळ ठिक ना?"

"कसलं आलय ठिक? आपले मजनू पुन्हा जीव द्यायला निघालेत. चल लवकर. मला काय आवरेना तो. तुच चल लवकर"
"आयला! काय रे याच रोज रोजच नाटक? उडी मारायच्या विचारानं ओली होते याची आणि हा म्हणे जीव देणार!"
"अरे विक्या चेष्टा नको रे करू. Please चल लवकर."
"अरे चेष्टा नायतर काय करू! दिसली पोरगी की पडला प्रेमात! अरे शेजारचा तो दिड वर्षाचा बबलू चालायला शिकताना जेवढा पडला नसेल तेवढा हा गृहस्थ प्रेमात पडला असेल!"
"विक्या जोक मारू नको. तु येणारेस की मी जाऊ?"
"आयला! तुम्ही दोघंपण ना एकदम ऍंटिक पीस आहात. चल हो पुढ, मी येतो तोंड धुवुन."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------


"विक्या अरे किती वेळ लावलास?"
"हम्म्म! बर कुठयेत साहेब?"
"कुठ असणार? तो बघ तिकडं. कड्यावर बसलाय"
"हम्म्म! ठिक आहे! यावेळी मीच ढकलतो त्याला! म्हणजे रोज रोज माझी झोप मोड नको"
"अरे ए विक्या! अरे येडा झालायेस काय?’
"मग काय तर! वैताग आलाय मला याचा"

मी तसा एकदम बारीक शरिरयष्टीचा होतो. त्यामुळे त्या कड्यावर चढायला जास्त वेळ नाही लागला. पण प्रश्न हा होता की हा जाडा आज्या कसा काय तिथं पोहचला असेल. मी त्याच्या जागी असतो तर एकतर जीव द्यायची जागा बदलली असती नाहीतर सरळ प्लॅनच कॅंसल केला असता. असो. मी धापा टाकत शेवटी कड्यावर पोहचलो. रूमाल काढला, बसायची जागा झाडली आणि आज्याच्या शेजारी बसलो. नेहमी प्रमाणे महाराज शुन्यात नजर लावून बसले होते.

"काय मस्त हवा आहे नाही आज्या?"
"हम्म्म्म !"
"अरे ते बघ ते तुझ घर! केवढस दिसतय नाही इथुन?"
"हम्म्म्म!"
"अरे ते बघ......"
"विक्या! नळकांड्या! उगाच नेहमी सारखं फालतू बडबडू नको. आधीच मुड नाय माझा!"

माझ्या "सुद्रुढ" शरिरयष्टीमुळे "नळकांड्या" हे माझं नामकरण आज्यानेच केलं होतं.

"बर बाबा! sorry! बोल काय मॅटर यावेळी?"
"काय नाय सोड ना!"
"बर ठिक आहे. बर मला सांग तु उडी मारतोयेस की मी ढकलू? एकदाच काय ते करून टाक."
"अरे ए भुसनाळ्या! इथ तुज्या जिगरी दोस्ताच्या लाईफ़चा सवाल हाय आनि तु हे बोलतोयेस? हिच काय तुझी यारी?"
"आता मग काय करू सांग? विचारलं तर भाव खातोयेस!"
"मग प्रेमानं विचारायच! आगोदरच प्रेमभंग झालाय आनि तु त्यात......"
"कितीवेळा प्रेमभंग होतो रे तुझा? बर यावेळी कोण होती ती कमनशिबी जिनं आमच्या वाघाला नाकारलं?"

एक हलकं स्मितहास्य अज्याच्या चेहर्‍यावर मला दिसलं. बहुतेक "वाघा"ची उपमा एकदम योग्य जागेवर बसली! Bull's eye का कायतर म्हणतात ना, तसं!!

"अरे ती मानेंची रेश्मा आहे ना..."
"ती? ती आवडली तुला ? ती बरोबर मुलगी नाही. तुझ्यासाठीतर मुळीच नाही"  आज्या बोलायच्या आतच माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं.
"ए नळकांड्या! माझी लाईन आहे ती! काय बोललास तर बघ तिला!"
"अरे माझ्या राजा! ती आगोदरच एंगेज आहे! पानपट्टीवाला बबन आहे तिचा छावा"
"म्हणजे? तुला पण माहित होत? कधी बोल्ला नाईस मला? आणि तिनं त्या बबन्यासाठी मला नाकारलं? मला?"
"आता मला काय माहित यावेळी तुझा नेम तिकड लागणार आहे? आणि ’तुला पण’ म्हणजे? आणखी कोणाला माहित आहे?"
"अरे तस नाय! ती पण हेच म्हणाली की मी एंगेज आहे. माझा नाद सोड!"
"चायला आज्या तुझं डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाल्लय की? तिला विचारून मोकळा पण झालास?"
"अरे मंग काय? रेशनच्या लाइनमधे समोरच उभी होती. दुकान उघडायला वेळ होता म्हणून विचारून टाकलं?"
"वाह! बर हे तुझ प्रेमप्रकरण कधीपासून सुरू होतं?"
"सकाळी ७ ला मी लाईनमधे तिच्यामागं उभारलो. साडे ७ वाजले असतिल, ती मला आवडली. ८ वाजता प्रेमात पडलो. साडे आठला प्रपोज केलं आणि ९ वाजता ब्रेकप झालं"
"आता मी एक काम करतो. मीच उडी मारतो इथुन. घरी माझ्या आईला सांग मला या जीवनाचा साक्षातकार झाला आणि मी स्वेच्छेने देहदान केलं"
"ए विक्या! कानपाड फोडेन असलं काय बोल्लास तर! अपला जिगरी आहेस तु! अरे अशा ५६ मुली येतिल परत लाईफमधे पन तुझ्यासारखा जिगरी नाय मिळनार मला!"

आज्याच्या डोळ्यातलं आलेलं टुचुकभर पाणी सगळं काही सांगून गेलं. आज्याच्याच भाषेत बोलायच झालं तर "जिगरी" या शब्दाचा खरा अर्थच जणू मला  समजला.

"बर बाबा! चुकलं माझं. पण काय हा तुझा फालतुपणा? कोणपण दिसली की कसाकाय प्रेमात पडतोस? आणि नाही यश आलं की चाल्लास जीव द्यायला."
"काय करू सांग! frustration आलय. कोणच होकार देत नाय!"

"अरे जरा धिरानं करायच्या असतात या गोष्टी. घाई गडबड करून काही मिळणार नाही."

"ऐका कोन सांगालय!"

"तुला काय समजायचय ते समज! पण एक promise कर की परत हे ’प्रेमात पडायच, मग प्रेमभंग की लगेच जीव देण्याची धमकी’ बंद करायच!"

"प्रेमात नपडायच promise काय करनार नाही पन ते जीव वगैरे काय देनार नाही. आईची शप्पत. सुटल्या म्हन"
"सुटल्या"

आज्या आणि मी तिथुन उठलो. हळू हळू कडा उतरला. खाली रोह्या हाताची बोटं मोडत चिंतेत उभा होता. आम्हाला दोघांना ’जिवंत” खाली येताना बघून त्यानं उसासा टाकला आणि पळत येऊन आम्हाला मिठी मारली. आज्याच्या पोटात दोन बुक्क्या घातल्या आणि आम्ही तिघे परत घरी निघालो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे असं आमचं त्रिकुट. उभ्या पंचक्रोषीत परिचित होतं. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायची आमची तयारी होती. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही एकत्र होतो. रोह्या अभ्यासात खुप हुषार होता. चांगले मार्क्स मिळाले असतानाही त्याने त्याच्या वडलांचे नऐकता मला आणि आज्याला ज्या कॉलेजमधे admission मिळाली तेथेच admission घेतली. तिघही लवकरच आपापली घरटी सोडून दुरच्या ठिकाणी जाणार होतो. Engineering हे आम्हा तिघांनाही घ्यायचं होतं आणि नशिबाने आता आम्ही तिघही एकाच college मधे, एकाच वर्गात शिकणार होतो. तिघांच्याही मनात खुप स्वप्न होती आणि एकमेकांची साथ असताना बाहेरच्या जगाची तर चिंताच नव्हती..... !

================================================================================


मी आणि  तु  ....(भाग १) ला मिळालेला प्रतिसाद खरच अनपेक्षित होता. आता या मी आणि  तु  ....(भाग २) पासून कथेला गुंफण्याचा अवघड प्रयत्न सुरू होत आहे. हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा दुसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Monday, March 16, 2015

मी आणि तु ....(भाग १)

“Good Morning Pune! सकाळचे ८ वाजले आहेत आणि मी विकी आपल्या सर्वांच आपल्या लाडक्या Talk With Vikcy कार्यक्रमात स्वागत करतो. वाह! आज काय मस्त वातावरण आहे नाही? मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मी मस्त गरमा गरम चहा पित तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त गाण्यांचा नजराणा....! आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , एखादे  गाणे ऐकायचे असेल किंवा तुमच्या some one special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चलातर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडत्या गाण्याने, “चिंब भिजलेले...From movie बंध प्रेमाचे”.

गाणं सुरू झालं तसा मी off Air गेलो. आज खरच खुपच सुंदर वातावरण होतं . बाहेर मस्त रिमझीम पाऊस सुरू होता  पण रेडिओ स्टुडिओच्या या बंद रूममधे तेही AC मधे बसून तो feel आणणं जरा कठिणच जातं होतं . चहा नेहमी प्रमाणे माझ्या आवडीचा म्हणजेच फक्त दुधाचा बनवला होता . एकदम फक्कड!

“विकी SSS!!! कॉल यायला सुरू झाले आहेत. कुठयं लक्ष?” ,राजू सरांच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यांना एक स्माईल दिली अणि पुन्हा On Air गेलो.

“मग मंडळी! कशी झाली दिवसाची सुरूवात. I hope या गाण्याने तुम्हाला नक्कीच फ्रेश केलं असेल. काय म्हणताय? अजून गाणी ऐकायची आहेत? मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चला तर बघू आज आपला पहिला caller कोण आहे!

“Hello, मी विकी, तुमच Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. आपलं नाव कळू शकेल का?”

“Hi विकी. मी पुनम”

“Hi पुनम. कशी आहेस?”

“मी मस्त. तु कसा आहेस?”

“मी पण एकदम बेस्ट! बर मला सांग तु काय करतेस?”

“मी सध्या इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात आहे. CoEP ला कंप्युटर सायन्सला”

“अरे बापरे! तो आज सुभह सुभह इंजिनिअरसे पाला पडा हे! बचके रेहना पडेगा रे बाबा...! हा हा हा! मग बोल कोणत गाण ऐकायच आहे तुला?”

“Actually मला हे गाण डेडिकेट करायच आहे. Some one special ला.”

“oh! Awesome. याला म्हणतात दिवसाची perfect सुरूवात. बोल कोणतं गाणं ऐकवू?”

“मला “यंदा कर्तव्य आहे” मधिल “आभास हा” ऐकवायच आहे”

“ओह ग्रेट पुनम. मस्त चॉईस. I hope तुझा some one special हा कार्यक्रम ऐकत असेल. Thank you for your call. Now playing “आभास हा !!” from movie यंदा कर्तव्य आहे.”

गाणं पुन्हा सुरू झालं. तसा मी offline झालो. आज पहिलाच caller आपल्या someone special साठी फर्माईश घेऊन आलेला बघुन खुप छान वाटलं. चहाचा घोट घेत घेत या कपलचं एक काल्पनिक चित्र रेखाटत बसलो. चहा झाला म्हणून कप टेबलावर ठेवायला गेलो आणि नकळत अंदाज चुकला आणि कप खाली पडला. माझ्या व्हिलचेअर वरून मला खाली पडलेले तुकडे गोळा करता येत नव्हते. माझी वायफळ धडपढ बघून राजू सरांनी काचेपलिकडूनच “Let it be. Programकडे लक्ष दे ” असा इशारा केला. तसा मी माझी व्हिलचेअर पुन्हा निट सेट करून गाण संपायची वाट बघत बसलो.

आज खुपच call येत होते. ते बघून एक सुखद हास्य नकळत गालावर खुललेलं. आपला show बराच लोकप्रिय आहे हिच जणू त्याची एक पावती असते. तेवढ्यात गाणं संपलं. आता पुन्हा माझी on air जायची वेळ झालेली.

“काय मग पुणेकर! कशी वाटली पुनमची फर्माईश. तिच्या Someone special. अरे बाबा हा कर्यक्रम ऐकत असशील तर बघ पटकन पुनमला call कर! अशी special सगळ्यांच्याच नशिबी नसते रे बाबा! हा हा! चला आता next caller कडे वळू. त्या आधी एक reminder; आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , कोणते गाणे ऐकायचे असेल, पुनम सारखं तुम्हालाही तुमच्या someone special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. बर बघु आपला next caller कोण आहे ते.

“Hello. मी विकी, तुमचं Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. बोला काय म्हणताय?”

“Hi Vicky. Thank God you finally picked my call”

“oh! माझं नशिब खुप छान आहे मग आज”

“Naah! Actually I was trying to reach you since last many years”

“हाहाहा! काहीही काय राव! हा कार्यक्रम सुरू होऊन तर अजून वर्षही झालं नाही.”

“Nope dear. I know you personally”

“काय राव सकाळ सकाळी थट्टा! मी काही एवढाही famous नाही की माझे fan followers असतिल”

“नाही. I am serious. I know you better than anyone in this world”

“oh! आईला तर English येत नाही माझ्या. आणि तिचा आवाज एवढा यंगही नाही. त्यामुळे तु माझी आई तरी नक्कीच नाहीस. आणि तिच्याशिवाय मला कोणी ओळखत असेल असं मला नाही वाटत. तरीही चला बघूच. चल, माझा आवडता रंग सांग”

“लाल.”

“Oh! Correct! Wild guess han!!!, चल आता सांग आवडतं फुल”

“सोनचाफा”

“Unbelievable! पुन्हा बरोबर. बरं आवडत ठिकाण?”

“मनाली”

“आवडता लेखक?”

“पु.ल. देशपांडे”

“आवडता अभिनेता?”

“आमिर खान”

मी प्रश्न विचारत होतो अन ती  एका पाठोपाठ एक अचुक उत्तरं देत होती. प्रत्येक अचुक उत्तरासोबत माझी बैचेनी वाढतचं होती. माझ्या अपघातानंतर गेले ४ वर्ष मी आणि माझी आई पुण्यात राहायला आलो होतो. ना कोणी जवळचा मित्र ना मैत्रिण. तरिही ही माझ्याबद्दल एवढ कसं जाणत होती? शेवटी मला राहावल नाही.

“बाई मी हारलो! कोण आहेस तु?”

“मी बोल्ले होते की I know you better than anyone. पण तु अजूनही सुधारला नाहीस! तसाच आहेस!”

“पण तु आहेस तरी कोण?” आता तर मी पुर्णतः बैचेन झालो होतो. तेवढ्यात तिकडून आवाज आला

“मुग्धा. मुग्धा परांजपे.”

एक जबरदस्त धक्का! स्टुडिओ मध्ये स्मशान शांतता! विकी पुर्ण  shock मधे.................!

==========================================================================

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहितोय. डोक्यात बऱ्याच दिवसांपासून एखादी दीर्घकथा लिहायची इच्छा होती ती इच्छा  या  "मी अणि तु"  दीर्घकथेद्वारे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. हा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा.

-अद्वैत कुलकर्णी

Friday, April 18, 2014

सावर रे मना


ना सांज ना पहाट,
मनी विचार तुझे मोकाट
किती घालू मना मी आवर,
हे हृदया तुच मज सावर.

सांग तुझ्या यातना त्या वेड्या मना,
ज्या त्याने ना कधी भोगिलेल्या
नको देऊस पुन्हा त्यास रमू,
आठवणिंत तिच्या उरलेल्या.

असतिल जरी शब्द तिचे मधूर,
आता नको मनी नव अंकूर
लागे जरी तो चेहरा हवासा,
नाही उरला तेथे तुला दिलासा.

विसर रे मना,विसर तिला आता
नाही जागा तुला तिच्या हृदयी आता
नाही उरली आता कसलिच आशा
ना कळली कधीच तिला तुझ्या प्रेमाची भाषा.

-अद्वैत कुलकर्णी

Monday, January 20, 2014

चार शब्द...!

आज जवळजवळ १ वर्ष झालं मला माझ्या ब्लॉगपासून दूर राहून. आजपासून पुन्हा ब्लॉगिंगला वेळ द्यायचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने हे चार शब्द....!

तसं बघितलं तर बरच काही बदलल या वर्षभरात. काही आपले दुरावले तरी काही नवे जवळ आले. जे आपल्या अगदी जवळ हवे हवे असणारे, नजाणे का पण नजरेआड झाले. प्रत्येकाला आपली "स्पेस" हवी असतेच म्हणा. आसो! आशा आहे जे जवळ आहेत ते जवळच राहोत.

या वर्षाच्या सुरूवातीस मनात "संकल्पा"ची कल्पना आलेली पण दरवर्षी "न-होणारे" संकल्प करण्यापेक्षा ते न केलेलेच बरे अशी समजूत काढून त्यांपासून दुरच राहयचे ठरवले आहे (संकल्पच म्हणा ह्याला हवं तर). गेलं वर्ष तसं बघितलं तर फार काही चांगलं गेलं नाही पण का कोणास ठाऊक फारच लवकर गेल्यासारखं वाटतय. अजून २०१४ लिहायला हात वळतच नाहीये. होईल सवय हळू हळू. येणार्‍या वर्षात बरच काही अनुभवायला मिळणार याची खात्री आहे आणि मीही त्यासाठी तयार आहे.

असो..! भाषणातले नसंपणारे चार शब्द न बनवता ही पोस्ट इथेच उरकती घेतो. लवकरच भेटू नव्या पोस्टस सोबत! उशीरा का होईना पण तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

Friday, April 19, 2013

( मराठी चित्रपट ) प्रेमाची गोष्ट : मला नाही भावला!

आज जवळ जवळ १० महिन्यांनंतर ब्लॉग लिहितोय. बरच काही घडलं या कालावधित. त्यातिल काही किस्से नक्कीच शेअर करेन. पण आज ब्लॉग लिहायला घेतलाय तो नुकताच बघितलेल्या मराठी चित्रपटावर. सध्या मराठी चित्रपटांना सुगिचे दिवस आलेले दिसताहेत. "हिरवं कुंकु(?), माहेरचा शालू" वगैरे टिपिकल चित्रपटांना बाजूला सारून नविन धाटणिचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहून नक्कीच चांगलं वाटतयं. काहींनी तर राष्ट्रिय पातळीवरिल पुरस्कार देखिल पटकवले आहेत. जिथे क्वचितच एखादा मराठी चित्रपट दिसायचा असा वर्तमानपत्राचा चित्रपट विभाग आजकाल मराठी चित्रपटांनी गच्च भरलेला दिसतो. खरच या गोष्टी सुखावणार्‍या आहेत.

मध्यंतरी फ़ेसबुकवर अतुल कुलकर्णी असल्याचे समजले. तसा मला आवडणार्‍या अभिनेत्यांपैकी एक. लागलीच त्यांना सब्स्क्राईब झालो. काही दिवसातच त्यांच्या अकाऊंटवर सतत " प्रेमाची गोष्ट" या शब्दाचा वापर वाढलेला दिसू लागला. पहिल्यांदा मला ते एखादं नाटक असावं किंवा टिपिकल मराठी सिरियल असेल असे वाटले पण जेव्हा अतुलजींनी हा फोटो अपलोड केला तेव्हा कल्पना आली की हा मराठी चित्रपट दिसतोय. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवर केवळ याच चित्रपटाची पब्लिसिटी होती. लवकरच प्रदर्शितही झाला. पहिल्यांदा जेव्हा हा पोस्टर पाहिला तेव्हा ती नायिका कोणीतरी नविन वाटली पण जेव्हा समजलं की ती घाटगे कन्या आहे तेव्हा पहिले तर विश्वासच बसला नाही. कारण "चक दे" मधला तिचा चेहरा आणि या चेहर्‍यात खुप फरक वाटला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायलाच नको इतक्या लोकांच्या कमेंट्स अतुलजींच्या अकाऊंटवर बरसू लागल्या. इतक्या छान छान कमेंट्स वाचून लवकरच चित्रपट सहपरिवार पाहायच निश्चित केलं. त्यात राजवाडेंचे दिग्दर्शन म्हणजे "सोनेपे सुहागा"च असणार असा एक विश्वास वाटू लागला. एवढ कौतुक ऐकल्यानंतर आपोआपच माझ्या आपेक्षा खुपच वाढल्या. "मुंबई-पुणे-मुंबई" ने माझं मन जिंकलेलं त्यामुळे राजवाडेंचा हा चित्रपटही तसाच हिट असणार अशी एक आशा वाटू लागली. नेहमीप्रमाणे "घरगुती" कारणांमुळे चित्रपट पहायला सवड मिळालीच नाही. शेवटी "TV वर येइल तेव्हा पाहू" अशी स्वतःची समजुत काढून घेतली आणि खरच खुपच लवकर हा चित्रपट TV वर दाखवला गेला. गेल्याच आठवड्यात स्टार प्रवाहवर दाखवला गेला. (तो स्टार प्रवाहवर दाखवला जाणारे हे देखिल मला अतुलजींच्या अकाऊंटवरूनच कळालं :D ). मॉंसाहेबांच्या  डेली सोपच्या टाईट शेड्युलमधून कसा बसा वेळ काढला आणि सहपरिवार चित्रपट पाहायला बसलो.

आधीच आपेक्षा एवढ्या उंचावल्यामुळे सुरुवातीपासूनच नाविन्य शोधत होतो. कदाचित नविन कहितरी बघायला मिळणार हिच मानसिकता तयार झालेली. राजवाडेंच्या बाबतीतली एक गोष्ट मला खुप आवडली ती म्हणजे "सिंप्लीसिटी". कोणताही भव्यदिव्य सेट नाही, विनाकारण न पेलणारे खर्च नाहीत. फक्त पुर्ण फोकस चित्रपटातील पात्रांवर! सुरूवात बरी वाटत असतानाच घाटगे बाईंची एंट्री झाली. पोस्टर नक्कीच फोटोशॉप एडिट केले असणार याची क्षणात खात्री पटली कारण मुळात मला या बाईंचा चेहरा कधी "नायिका" म्हणून आवडला नाही. आसतिल या दिसायला सुंदर पण मला कधीच सुंदर वाटल्या नाहीत. तेवढ्यात या बाईंचा पहिला डायलॉग कानावर पडला. अरररर..........! चेहरा ठिक आहे पण कसला आवाज आणि कसलं मराठी. पुर्ण निराशा झाली. या बाईंना साधं नीट मराठीही बोलता येत नाही आणि आवाजात काही चढ-उतारही नाही. एखाद्या नाटकात काम करत असल्यासारखा यांचा अभिनय. एकिकडे अतुलजी. एक परफ़ेक्ट अभिनेता. सुरुवातीपासूनच ते त्यांच्या "कॅरेक्टर"मधे इन्हाल्व्ह झालेले दिसले. आवाजात योग्य चढ-उतार, अचुक क्रिया-प्रतिक्रिया या त्यांच्या अभिनयाने समाधान वाटले.

अनपेक्षितपणे राजवाडेंची एंट्री देखिल छान वाटली. असंभव मधिल त्यांचा अभिनय पाहिला होता त्यामुळे चांगल्या अभिनयाची आपेक्षा होती  आणि सपोर्टिंग रोल असुनही त्यांनी ती योग्य पद्धतीने पुर्ण केली. चित्रपट जसजसा पुढ जात होता तस तशा मला घाटगे बाई जास्तच खुपु लागल्या. सारखे मनात विचार यायला लागले की याच मिळालेल्या काय राजवाडेंना? त्यांच्या जागी कितीतरी चांगल्या नायिका मराठी फिल्म इंडस्ट्रिमधे आहेत. कदाचित मुक्ता बर्वे देखिल चालल्या असत्या किंवा गिरिजा ओक देखिल नक्कीच घाटगे बाईंपेक्षा त्यांच्या रोलला जास्त न्याय मिळवून देऊ शकल्या असत्या. असो. तसच सहन करत मी चित्रपट पाहात होतो. एकदोन गाणी कानाला श्रवणिय वाटली पण मेंदूपर्यंत गेली नाहीत. "कधी तु, का कळेना" इत्यादी गाणी थेट मेंदूपर्यंत गेली तशी ही गाणी खास वाटली नाहीत.

चित्रपटात अतुल कुलकर्णी हे कथालेखक दाखविले आहेत. त्यात त्यांचा एक डायलॉग काहीसा या आशयाचा आहे की "चित्रपट असा असावा की प्रेक्षक त्यात गुंतुन जाईल. पुढे काय होणार याची उत्सुकता राहिल" पण हिच मला या चित्रपटात असलेली कमतरता वाटली. मुळात ते लिहित असलेली कथाच या चित्रपटाची कथा असल्याने लागलीच पुढे काय होणार याचा सहज अंदाज बांधता येत होता. तरी कथेला "ट्विस्ट" द्यायचे प्रयत्न चांगले वाटले. संपुर्ण चित्रपटात झालेले कॅमेरावर्क, एडिटींग, दिग्दर्शन नक्कीच आवडले. चित्रपटाची "पिक्चर कॉलिटी" देखिल उत्कृष्ट आहे. चित्रपटातील इतर सहाय्यक कलाकारांचे अभिनयही उत्कृष्ट वाटले आणि त्यांच्या त्या सुंदर अभिनयामुळे घाटगे बाईंचा अभिनय मला जास्तच साधारण वाटू लागला.

ओव्हर ऑल पाहता चित्रपट ठिक वाटला. जेवढं कौतुक मी चित्रपट पाहायच्या आधी ऐकलेलं, वाचलेलं त्यामानाने तर अजिबातच हा चित्रपट मला भावला नाही. मला कल्पना आहे की अगदी क्वचितच लोक माझ्या मताशी सहमत असतिल  पण राजवाडेंच्याकडून मला कदाचित जरा जास्तच आपेक्षा असतात.

असो! मी या चित्रपटाला रेटिंग देईन: ३/५

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...