Showing posts with label मराठी कॉर्नर. Show all posts
Showing posts with label मराठी कॉर्नर. Show all posts

Friday, September 16, 2011

काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर......

"अद्व्या मर्दा भूक लागलिये"
"होय रे. आज या प्रोजेक्टच्या नादात वेळ एकदम फास्ट निघून गेला"
"अरे भावांन्नो आणि कोणाला भूक लागलिये काय?"
एकदम सगळे जोरात ओरडले "हो!!!"
"चला मग डबे काढा"
"मी नाय आणला","मी पण नाही","च्यामारी म्या भी नाय आणला आता काय करायचं?"
"अरे मग ३ डब्यात आपण ८ जण कसे भूक भागवणार?"
"चला मग काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर ला जाऊयात"
"हे आणि काय नविन"
"ते नविन नाय, तू नविन आहेस"
"पण ही भानगड नेमकी आहे तरी काय?"
"अरे त्ये एक मिसळपावचं नवं हॉटेल निघालय हायवेवर"
"हायवे??? अबे किती वाजलेत बघ! आज सकाळचा सगळा वेळ या प्रोजेक्टमधे घालवलाय. जरा लेक्चर-बिक्चर पण करूयात की"
"होय! लय सिंसियर डोक्याचा तू. चल लई शाना हाईस. पुढचं लेक्चर त्या धोंडेच हाय. त्यो गडी कवा पण आत घेतोय. लेट ये, अगदी प्रेसेंटी घ्यायच्यावेळी आलासतरी कायपण म्हणत नाही."
"हम्म्म्म. तेपण खरच आहे म्हणा. जाऊयात पण अर्ध्यातासात काहीपण करून परतायचं"
"ए तू गपरे. गाडीची किल्ली मला दे आणि गप माज्यामागं बस"
झालं, एकूण ३ गाड्यांवरून आमची ८ जणांची गॅंग नविन निघालेल्या मिसळपावच्या हॉटेलाकडं मार्गस्थ झाली. 

 --------------------------------------------------------------------------------


"काकी, ८ मिसळपाव द्या. ए कोण कोण तिखट घेणारे ?"
"मी ट्राय करेन"
"ए बामणा! तुला हे खाऊन माहित नाही. उगाच तिखट घेचिल आनि नंतर बोंब मारत सुटशील"
"ए लई शाना आहेस. गप मला तिखट ऑर्डर कर. तुला दाखवतोच ब्राह्मणांत पण किती दम असतो ते!"
"बर बाबा. मानलं तुला. उगाच शापबिप देचिल. यापर्षी कधी नव ते ऑल क्लियर झालोय, उगाच तुझ्या शापानं काय झालं-बिलं तर माझा बाबा मला पायतानानं मारंल"

काऊंटरवरच्या काकूंसकट हॉटेलातली सगळी लोकं खदखदून हसली. असली टारगट पोरं कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या हॉटेलात अवतरली होती. फायनल इयर असल्याने कदाचित आम्ही आणखीनच टारगट बनलो आहोत.

 थोड्या वेळातच गरमा गरम मिसळपाव समोर आली. आधीच भूक लागलेली आणि त्यात हॉटेलात सुटलेल्या खमंग वासाने तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं. मी पहिला घास खाणार तोच माझ लक्ष सगळ्यांकडं गेलं. सगळे लेकाचे मला एकटक पाहात होते.

"काय रे! काय बघताय?"
"काय नाय, तुजी गमजा बघायचिये"

मग लक्षात आलं, च्यामारी आपण तिखट ऑर्डर दिलिये. झालं! आता इज्जत का सवाल था! :) हळूच एक चमचा मिसळ उचलली आणि तोंडात टाकली. तोंडात आगीची पेटती काडी टाकल्यासारखा जळजळीत  चटकाच जणू बसल्यासारखं वाटलं जीभेला. कसतरी करून तोंडावर हसू ठेवून घास गिळला. 

"काय काय सायेब? कशी काय वाटली मिसळ?"
"एक ख्ख्ख!ख्ह!ख्हौओ........ पाणी...... द ह्ह्ह्ह्ह!"
जबरी ठसका लागला! सगळे लोळलोळ लोळले हसून. गटागट पाणी प्यालो आणि कसाबसा ठसका शांत केला. आता चॅलेंज स्वीकारलेलं, ते कसं मोडणार? त्यामुळं ती झणझणीत मिसळ एका दमात मटकावली. पहिलेच जीभ भाजल्याने पुन्हा त्रास नाही झाला!

"आयला. ह्यानं संपवली की रे"
"मग! बोललेलो! माझ्याशी पंगा नाय घ्यायचा!"
"बर बाबा! तु जिकलास!"

जवळ जवळ अर्धा-पाऊण तास निघून गेला. दंगा मस्तीत वेळ कधी निघून गेला कळालच नाही. सहज घड्याळाकडं लक्ष गेलं तेव्हा वेळेच भान आलं.

"अरे मुर्खांनो अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळ झालाय. चला आवरा लवकर. संपवा मिसळ आणि चला कॉलेजकडं"
"ए टेन्या! तुझं झालं म्हंजे सगळ्यांच झालं होय? थांब जरा. आणि धोंडे सराची जास्त काळजी नको करू. मी बरोबर सेटिंग करून ठेवलय. काय बोलनार नाही त्यो"
"ते कायपण असो! मी निघालो, यायच असेल तर या."
"ए थांब की मर्दा. आलो आम्हीपण. झालच थांब"
----------------------------------------------------------------------------------------

साधारण धोंडे सरांचा तास संपायला १५ मिनिट बाकी असताना आम्ही कॉलेजवर पोहोचलो. वर्ग शोधण्यापासून सुरवात. दोन-तीन व्यवस्थित सुरू असलेले वर्ग डिस्टर्ब करून फायनली आमचा वर्ग सापडला.

"मे आय कम ईन सर?"
"येस .प्लीज कम इन"
"बग. बोललेलो किनी? आपला मानूस हाय. काय त्रास देनार नाय. निवांत आत घेईल"
"ए! गप चला आत. ऐकले तर आत घेणार नाहीत."

पटकन मागच्या मोकळ्या बेंचवर जाऊन बसलो. बॅक बेंचरच आम्ही. नेहमीचे बेंच ठरलेले. 

"आत्ता आलेले सगळे जण उभारा!"
झालं! सगळ्यांची टरकली. काहीतरी लोचा झालाय! सगळे उभारलो.

"कोठे गेला होतात?"
पायात सुतळी बॉंब फोडावा तसा सरांचा हा प्रश्न थाडकनं आमच्यावर आपटला. आमच्या सगळ्यांच्या माना खाली.

"अरे बाळांनो मी तुम्हाला विचारतोय...... कुठे गेला होतात? टेल मी फ्रॅंकली"
परत सगळ्यांच्या माना खाली. काय बोलणार म्हणा!

"कुलकर्णी, कोठे गेला होतात इतका वेळ? मास्तर आपलाच आहे, कधीपण आत घेईल असा जर समज झाला असेल तर तो काढून टाका मनातून. काय कुलकर्णी बरोबर आहे ना? असच वाटलेलं ना?"

"नाही सर! तसं नाही."

"मग कसं? कुठे गेला होतात?टेल मी फ्रॅंकली"

"सर ते आम्ही.......! सर ते प्रोजेक्ट...."

"टेल मी द ट्रुथ. टेल मी फ्रॅंकली"

माझी मान खाली. काय सांगणार? खोट बोलणं सुचेना, खरं बोलण जमेना! आणि आमचे विद्वान मित्र लोक मागून प्रॉंप्टिंग करत होते.

"अद्व्या सांग पोरिंच्या मागं गेलेलो. ख्या ख्या ख्या"
"अरे नाही, ऑफिसात बोलवलेलं म्हणून सांग" 
"नायतर सरळ सांग काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला गेल्तो म्हनून"

"ए */?*# न्नो गप बसा. इकडे माझी वाट लागलिये आणि तुम्ही मागून मजा करताय??" 
(मी हळूच पुटपुटलो)

"हम्म! बोला कुलकर्णी."
"तो तुझ्यामागे कदम आहे काय? काय तरी बोलतोय तो. हानं कदम तुम्ही सांगा कुठे गेलेलात?"

"सर ते... आमी....."

"बोला पटकन. माझ्याकडं वेळ नाही. असं कोणतं काम तुम्हाला पडलेलं की माझं लेक्चर चुकवून ते पुर्ण करण्यात तुम्ही गुंतला होतात. चला लवकर लवकर बोला. कदम बोला पटकन टेल मी फ्रॅंकली"

"सर आमी सगळे  काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला मिसळपाव खायला गेल्तो"

कदमाच्या या "फ्रॅंकली" उत्तराने आता सरांच्या पायात सुतळी बॉंब फुटल्यासारखी सरांची अवस्था झाली. आपण खुपच सज्जन आहोत अशा इनोसंट चेहर्‍याने कदमाने झटकन उत्तर दिले. सगळा वर्ग खदादा हसायला लागला! मास्तरचं डोकं जाम भडकलं! त्यांनी सरळ डस्टर, पुस्तक घेतलं आणि वर्ग सोडून तावातावाने निघाले. दरवाज्यापाशी गेल्यावर आमच्याकडे बघून म्हणाले,

"पुन्हा जर तुम्ही लोक माझ्या लेक्चरला दिसलात तर मी लेक्चर घेणार नाही"
आणि सर निघून गेले. त्यानंतर जो काय आम्ही दंगा केलाय तो शब्दात सांगणं खरच कठीण आहे. "टेल मी फ्रॅंकली" चा इतका फ्रॅंकली कोणी अर्थ घेईल याची कदाचित सरांनाही अपेक्षा नव्हती.

ते काहीही असो, पण हा दिवस खरच आमच्या कॉलेज लाईफमधला काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर..... दिवस ठरला! :)

-अद्वैत कुलकर्णी
marathi corner team

Tuesday, March 29, 2011

"सकाळ"नेही घेतली मराठी कॉर्नरची दखल

दिनांक २५ मार्च २०११ च्या सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये मराठी कॉर्नरवर आधारित श्री. प्रफुल्ल सुतार यांचा एक सुंदर रिव्ह्यू छापून आला आहे.

त्याचा दुवा: http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


कात्रण:



श्री. प्रफुल्ल सुतार यांचे मनापासून आभार. छोट्या पण सुटसुटीत शब्दात त्यांनी खुप सुंदर परिक्षण केले आहे!

-अद्वैत
मराठी कॉर्नर

Sunday, March 20, 2011

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल!

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. आमोल देशमुख यांनी मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा भरवावी असा आग्रह धरला. प्रथम थोडी चिंता वाटली की खरच कितपत यशस्वी ठरेल मराठी कॉर्नरवर एखादी स्पर्धा ? तरिही त्यावर विचार करून, मराठी कॉर्नर टिमशी चर्चा करून "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चे आयोजन करण्यात आले. आणि गर्वाने सांगावेसे वाटते की आपल्या सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे.

मराठी कॉर्नरवरिल ही पहिलीच स्पर्धा होती पण तरिही जसा उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्यावरून आम्ही आपल्याला खात्री देतो कि यापुढे वरचेवर अशा स्पर्धा नक्की आयोजित करू.आपला उत्स्फुर्त प्रतिसाद असाच मिळो ही देवा चरणी प्रार्थना.

सर्वप्रथम निकाल जाहिर करण्याआधी आपल्या मान्यवर परिक्षकांचे आम्ही आभार मानतो. या स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी आम्हाला श्री.श्रीकृष्ण सामंतजी, श्री. उल्हास भिडेजी व सौ. पल्लवी कुलकर्णीजी यांनी त्यांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढला त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू.

सर्व सभासदांनी खुपच छान लेख लिहुन पाठवले आहेत.विषयाची विविधता बघुन खुप छान वाटले.आपल्यातुन फ़क्त एकच लेख निवडणे तसे परिक्षकांची ही खरी परिक्षा होती असे म्हणावे लागेल.दिलेला पहिला नंबर जरी एकाला दिला गेला असला तरी खरे तर सारेच विजयी आहेत.कारण आपण यात सहभाग घेतलात आणि आपल्या मराठी कॉर्नरची शान वाढवलीत.तिला योग्य तो सन्मान दिलात,ह्यातच सर्व सभासदांचे यश सामावले आहेत.आम्हालाही खुप विचार वाचायला मिळाले.आपण सर्वांनीही सर्वांचे लेख वाचुन त्यावर प्रतिक्रीया लिहावी,कारण आपल्या लेखाला काय प्रतिक्रीया आली हे बघणे लेखकाला नक्कीच प्रोत्साहित करते.



"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा थोडक्यात सारांश
एकूण सहभागी झालेले लेख : २०
सर्व लेख येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36

1. संजयचा खून आणि… (कमलेश कुलकर्णी)
2 महिमा अंगठीचा (चेतन सुभाष गुगळे)
3 पिंपातले जगणे आहे आपले (शैलेंद्र शिरके)
4 तुझ्यामुळे .........तुझ्यामुळे (सौ. निवेदिता वाळिंबे.)
5 आमचा बैल भरल्या जाणार आहे (विश्वास भागवत )
6 एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा .......दही भाता साठी.(मा. ना . बासरकर. )
7 मराठीसाठी कोपरा ( अरविंद खानोलकर)
8 शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल (प्रकाश पोळ)
9 पूर्वी आणि आता (Kedar Dipak Lasane)
10 द लास्ट किस ! (दीपक परुळेकर)
11 गंधवार्ता.....! (गंगाधर मुटे)
12 २६/११ च्या निमित्ताने.................................. (Nivedita Patil)
13 ओळख --- ' स्व ' ची जाणीव (सौ.बागेश्री प्रशांत येवारे)
14 स्त्री जन्मा.... (प्रमोद सावंत)
15 मानपान (Jayant Aloni)
16 "आपली मराठी (Shraddha Hegiste)
17 लेखमाला स्पर्धा - "असेल रंभा घायाळकर...... पण नाद नाय करायचा (धुंद रवी)
18 विकेट (सागर कोकणे)
19 वसुधालय... माझे साहस! (वसुधा चिवटे)
20 "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत" कमलेश वसंत गायकवाड

आणि विजेता लेख आहे


श्री.चेतन सुभाष गुगळे यांचा महिमा अंगठीचा

पुन्हा लवकरच नवीन उपक्रमा बद्दल नक्की कळवु.आपल्याही सुचनांचे http://www.marathicorner.com/viewforum.php?f=7 इथे स्वागत आहे.
श्री.चेतन गुगळे यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! त्यांना त्यांचे बक्षिस लवकरच पोच होइल.


पुन:श्च एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!!!

कळावे,
मराठी कॉर्नर टिम.

Monday, March 7, 2011

शेवटचे ३ दिवस उरले!‏

नमस्कार,
"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" सध्या मस्त सुरू आहे.ज्या सभासदांनी सहभाग घेतला आहे त्यांचे अभिनंदन. जे सभासद आजुनही ईच्छुक आहेत त्यांच्यासाठी शेवटचे ३ दिवस. या स्पर्धेत दिनांक "१० मार्च २०११" पर्यंत समाविष्ट होणारेच लेख ग्राह्य धरले जातिल. त्यामुळे जे कोणी उत्सुक असतिल त्यांनी त्वरित लेख "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36" येथे पोस्ट करावेत.

शेवटी ही एक स्पर्धा आहे. छोटी असो वा मोठी, बक्षिस असो वा नसो पण सहभाग नोंदवणे नक्कीच उपयुक्त असते. त्यामुळे कदाचित तेच विषय देखिल आपण नव्या दृष्टीकोनातुन पाहू लागतो. त्यामुळे खरच या स्पर्धेत सहभाग नोंदवा.  अजुनही वेळ गेली नाही. ३ दिवसांचा वेळ शिल्लक आहे. जर आधिच तुमच्या ब्लॉगवर तुम्ही लेख लिहिला असेल तरी तो इथे चालेल किंवा या ३ दिवसांत तुम्ही सहज एखादा विषय देखिल हाती घेऊ शकता! आणि हो, प्रत्येक सहभागी सदस्याला ई-प्रशस्तिपत्र मिळणारच आहे! :)

 मग सहभागी होताय ना? आणि आजुनही काही शंका असतिल किंवा स्पर्धेबद्दल काही खुपत असेल तर निःसंकोचपणे या marathicorner@gmail.com वर मेल करा. आपल्या शंकेची नक्कीच दखल घेऊ!

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...