Saturday, September 23, 2017

मी आणि तु ....(भाग १०)

"अरे विकी तु? आज अचानक ? सांगितल नाहीस काही ? अहो SS!! बघितलत का, विकी आला आहे. ये बाळा! दमला असशिल ना. ये बस. मी पाणी आणते" मी घरी पोहोचताच आईला काय करू काय नको असं झालं होतं. मी नकळवताच घरी पोहोचलो होतो. आईला समोर बघितल्यावर मला नेहमीच बरं वाटतं पण आज ज्या कारणासाठी मी घरी आलो होतो याची आठवण झाल्यावर एकदम पोटात गोळा आला. तशी आई थोडी तापट स्वभावाची तर या उलट बाबा एकदम शांत, मिश्किल. या दोघांची भांडणं बघायला खुप मजा यायची. आईचा थयथयाट चालायचा तर बाबा मस्तपैकी आईच्या फिरक्याघेत भांडणाची मजा लुटायचे.
घरी पोहचायला रात्र झाली होती. आईने मस्त गरमा गरम स्वयंपाक केला. माझी आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. हॉस्टेलचे खाऊन खाऊन इतका वैतागलो होतो. कधी एकदा घरी जाऊन आईच्या हातचे खाईन असं झालं होतं. मी तसा शांतपणे जेवत होतो. नेहमी सारखा उत्साही नाही हे आईच्या लक्षात आलं होतं.
"काय रे विकी? सगळं ठिक आहे ना?" आईने शंकेच्या स्वरात विचारलं.
"हो गं. सगळं व्यवस्थित आहे." मी तिची नजर चुकवत बोललो ते बाबांनी हेरलं. जशी आई भाकरी भाजायला पाठमोरी झाली तसं बाबांनी भुवया उचलुन न काही बोलता "काय झालयं?" विचारलं. मीही मान डोलावून "काही नाही" चा इशारा केला. पण शेवटी आई-बाबाच ते! त्यांच्यापासून काहीही लपवणं खुपच मुश्किल.
जेवणं आटोपली तसे आम्ही परसात गप्पा मारत बसलो. थोड्यावेळात परत आईने विचारले,
"विकी. अरे काय झालयं? नेहमीसारखा वाटत नाहियेस. काय झालयं नेमकं? तु काहीतरी नक्की लपवतोयेस. अहो! तुम्ही तरी बोला काहितरी."
"हो हो. अरे राजा. काय झालयं? कॉलेजात सगळ ठिक आहे ना? आज अचानक नकळवता आला आहेस. नेहमीसारखा उत्साही देखिल दिसत नाहियेस. आम्हाला काळजी वाटतेय रे. बोल काय झालय?" बाबा केविलवाण्या आवाजात बोलले.
"आई, बाबा. तुम्हाला प्रिंसिपल मॅडमनी भेटायला बोलावलय!", मी एका दमात बोलून गेलो तसे आई बाबांनी एकमेकाकडे भुवया उंचावत पाहिलं.
"का रे? काय झालं? अख्ख्या शालेय जिवनात कधी आम्हाला शाळेत यावं लागलं नाही आणि आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलावलय? काय रे विकी? मुलीचा वगैरे प्रकार नाही ना?", आईने एकदम बॉंबच टाकला. मी काय बोलावं कळत नव्हतं. मी शांतपणे माझा मोबाईल बाहेर काढला. आमचा एक ग्रुप फोटो उघडला आणि एक-एकचे नाव सांगू लागलो,
"हा आज्या,ही सारिका, हा रोह्या, हा मी, ही मुग्धा, हा मिहीर, हा सौरभ"
"हे काय दाखवतोयेस? मी प्रश्न काय विचारलाय? तु बोलतोयेस काय?", आईने त्रासिक स्वर धरला.
"आई- बाबा........ मला ............ माझं.............. नको............." , मी धाडस करू शकत नव्हतो. माझं हृदय अंदाजे सेकंदाला एक लाख तरी ठोके देत होतं. असं वाटत होतं की जणू ते माझ्या शरिराच्या बाहेर पडेल की काय.
"अरे बोलशिल तरी? काय प्रकार आहे हा विकी?" , पुन्हा आईने त्रासिक आवाजात विचारले.
"आई-बाबा. मी मुग्धाच्या प्रेमात पडलोयं ", मी एक मोठा श्वास घेतला आणि बोलून गेलो! आईला एक दोन सेकंद लागले मी काय बोललोय हे कळायला. बाबांनीपण एकदम भुवया उंचावल्या.
"अरे विकी तु काय बोलतोयेस कळतयं का तुला? " आई थोड्या रागिट आवाजत बोलली. तिकडे बाबांनी हाताने खुण करून माझा मोबाईल मागून घेतला आणि मी दाखवलेला आमचा ग्रुप फोटो बघू लागले. आईचा इकडे प्रचंड थयथयाट सुरू होता आणि बाबा शांतपणे आमचे फोटो बघत होते. 
तुला अक्कल आहे का?, तुझं हे वय आहे का? , तुला हे करायला मोठ्या कॉलेजात घातलयं का? वगैरे वगैरे भरपूर प्रश्न आई एकामागोमाग एक माझ्यावर मारत होती पण बाबा शांतपणे एक एक फोटो बघत होते. साधारण पाचएक मिनिटांच्या थयथयाटानंतर आईच्या लक्षात आलं की ती एकटीच hyper झालिये.
"अहो मीच बडबडतीये. तुम्ही पण काहितरी बोला." आई रागाने बाबांना म्हणाली.
"मला मुलगी पसंत आहे" बाबा  मोबाईलमध्ये बघत बोलले. मला फुदुकन हसू आलं.
"अहो तुम्हाला काही कळतयं का? काय बोलताय तुम्ही. ह्या धगोर्ड्याला रागवायचं सोडून हे काय बोलताय?"
"आहं असं होय? काय रे विक्या? कधिपासून सुरू आहे हे सगळं?", आईची नजर चुकवतं बाबांनी मला डोळा मारला. ही आमची खुप जुनी sign language. मी समजायचं ते समजलो.
"साधारण एक वर्ष झालं", मी हसू दाबत बोललो.
"एक वर्ष?आणि तु हे आज सांगतोयेस?", बाबा उगाच अश्चर्य झाल्यासारखे म्हणाले.
"Sorry बाबा. मी हे आधिच सांगायला पाहिजे होतं."
"बरं. हे एकतर्फी आहे की तिला माहितिये?", बाबांनी विचारलं.
"तिनेच मला propose केलं", मी उत्तरलो तसे बाबा खरच आश्चर्यचकित झाले.
"कर्म माझं! काय दिवस आलेत आजकाल. मला खात्री होती माझा राजा असं काही करणार नाही. तिनेच राजबंडा देखणा मुलगा बघुन तुझ्यावर काहितरी जादू केली असणार". आईने मला "राजबंडा, देखणा" वगैरे म्हटल्यावर अजुनच हसू येऊ लागलं. तिची नजर चुकवत मी हसू दाबण्याचा पुर्ण प्रयत्न करित होतो.
"मग तु काय म्हणालास?", बाबांनी परत प्रश्न केला
"मी हो म्हणालो", मी जसा बोललो तसा बाबांच्या चेहर्‍यावर "that's my boy" वाले expressions झळकले. त्यांची छाती अभिमानाने फुलली.
"असं कसं हो म्हणालास? तीचं background काय? तिची घरची परिस्थिती काय? हे न बघताच हो म्हणालास?" आई थोडी नाराजिच्या स्वरात बोलली.
"अगं आई या सगळ्या गोष्टीला काही अर्थ आहे का? प्रेम होण्यासाठी थोडीच एखाद्याची background बघावी लागते?" मी थोडा चिडक्या आवाजात बोललो.
"अगं स्मिता, खरच बोलतोय तो. आपला काळ वेगळा होता. ही नवी पिढी आहे. मला नाही जमलं ते यानं केलं" बाबा ओघात बोलून गेले तसा मी डोळे मोठ्ठे करून त्यांना signal  दिला की ते चुकीचं बोलून गेले.
"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचय? चुकलच माझं तुम्हाला होकार कळवला. म्हणे प्रेमविवाह करणार होते! मी नसता होकार दिला तर तुमच लग्न तरी झालं असतं का देव जाणे. आई म्हणत होती गडबड करू नको पण तुम्ही इतक्यांदा घरी आलात की आप्पांनी तुम्हालाच निवडलं. चाल्ले प्रेमविवाह करायला...", आधिच तापलेल्या आईच्या चपाट्यात आता बाबाही आले.
"अगं स्मिता तसं नाही गं", बाबा तिला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.
"राहुद्या. यावर आपण नंतर बोलू. आधी बघू या महाशयांनी अजून काय काय कारनामे केलेत. विकी, बोल प्रिंसिपल मॅडमनी का बोलावलय?", आई आता मुळ मुद्दावर आली.
मी घडला प्रकार तंतोतंत सांगितला. आई आता थोडी शांत झाली होती.
"हे बघ विकी. जे झालं ते चुकीचं आहे. तु असं बोलायला नको होतस. काहिही झालं तरी ते शिक्षक आहेत. भर वर्गात त्यांचा अपमान करणे चुकिचेच आहे. त्यांचिही चुक आहे पण ते त्यांच्या जागी योग्य आहेत. कॉलेजमध्ये तुम्ही शिकायला जाता. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत", आई मला समजावत म्हणाली.
"हो आई पण त्यांनीही विनाकारण माझ्या खाजगी गोष्टींवर सार्वजनिक टिका करणं मला मान्य नाही. त्यांना तो अधिकार नाही जरी ते शिक्षक असले तरी!", मी माझी बाजू ठामपणे मांडली.
"मला विकीचं म्हणण पटतयं स्मिता. आता ही मुलंही मोठ्ठी झाली आहेत. मानापमान यांनाही आहे. जे घडलयं ते नक्कीच चुकिचं आहे पण पुर्ण दोष विकिचा बिल्कुल नाही. मला वाटतं आपण दोन्ही बाजू लक्षात घेऊन प्रिंसिपल सोबत बोललं पाहिजे", बाबा म्हणाले.
"ठिके. कधी बोलावलय त्यांनी?", आईने विचारल.
"आपण सोमवारी जाऊ. मी मुग्धाशी पण बोलून घेतो", मी म्हणालो.
"हे बघ विकी. हा प्रकार सोडवूच आपण. पण यापुढं गोष्टी खुप जपुन आणि सांभाळून करायच्या. तुम्ही ज्याला प्रेम म्हणत आहात ते खरच प्रेम आहे की शारीरिक आकर्षण हे समजावून घ्या. हे तुमचं वय असं आहे जिथे शारीरिक आकर्षण असणं नैसर्गिक आहे. थोडा वेळ गेला तरी चालेल. आई बाबा दोनशे मैलावर राहतात, त्यामुळे त्यांना काय कळतयं म्हणत कसलिही गडबड करू नकोस. मी कशा बद्दल बोलते आहे हे तुला कळालच असेल. तेवढा समजुतदार तु आहेस. त्यामुळे थोडं धिराने. आम्हाला हे तुमचं प्रकरण अशा प्रकारे समजणं चुकिचं आहे. पण असो. आता जे झालं ते झालं. माझा आणि तुझ्या बाबांचा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. त्याला कधिही तडा जाऊ देऊ नकोस.", आई गंभिरपणे बोलली.
"आई , बाबा मी तुम्हाला सांगणार होतोचं पण unfortunately हे असे सांगावे लागले. पण मी शब्द देतो की आजवर आम्ही मर्यादा ओलाडल्या नाहित आणि पुढेही ओलांडणार नाही. मुग्धा खरच समजुद्दार मुलगी आहे. तुम्हा दोघांनाही ती नक्की आवडेल".
"चला. रात्रिचे १२ वाजत आलेत. झोपू आता शांतपणे. स्मिता, आता मुलगा मोठा झाला आपला. आणि समजुतद्दारही. आपली जबाबदारी वाढली आता."
"हो ना. माझा राजा आहेच गुणी. बाळा झोप आता. दमला असशिल. उद्या बोलू सविस्तर तुझ्या त्या मुग्धा बद्दल", आई माझी खेचत बोलली.
"हो हो नक्कीच! मी खुप lucky आहे मला तुमच्या सारखे आई बाबा मिळाले. I love you both so much! चला good night!".

======================================================================================
-अद्वैत कुलकर्णी
 

Saturday, July 8, 2017

मी आणि तु ....(भाग ९)

"Excuse me Ma'am, May I come in?" , मी प्रिंसिपल मॅडमच्या केबिनमध्ये डोकाऊन विचारलं, तसं वठारे सरांनी माझ्याकडे कुत्सितपणे नजर टाकली.
"Mr. Vikram?" , प्रिंसिपल मॅडमनी विचारलं.
"Yes Ma'am"
"Come in and take a seat"
मी वठारे सरांच्या शेजरच्या खुर्चीत जाऊन बसलो. प्रिंसिपल मॅडम काहीतरी कंप्युटरवर टाईप करित होत्या. तोपर्यंत मी केबिन न्याहाळत होतो. Admission नंतर आज जवळ जवळ ३ वर्षांनी प्रिंसिपल मॅडमच्या केबिन मध्ये जाण्याचा योग आला होता. उजव्या बाजूला एक भलं मोठ्ठ कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या trophies नी गच्च भरलं होतं. ही असली कामं करायला कोणाकडं वेळ असतो या शंकेने माझं मलाच हसू आलं. पण परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आल्यावर मी स्वतःला सावरलं. तेवढ्यात माझ्यासमोरच्या printer मधून एका पाठोपाठ एक असे २ कागद print होऊन बाहेर आले. आता थोडा मी घाबरलो. Rustication letter तरी नसेल ना? या विचाराने पोटात गोळा आला. पण मी काही एवढाही मोठ्ठा गुन्हा केला नाही की मला काढून टाकतील याची मला खात्री होती.

"Mr. Vikram, this is a warning letter which you have to show to your parents and take their signatures. I know your home town is far from here. So I am giving you 2 weeks time. I will be speaking with them once you hand over letter signed by them to me to confirm if they have anything to say".
आता हे मात्र अतिच झालं. वठारे सरांनी एकदम आनंदी सुस्कार सोडला.
"But Ma'am I haven't done anything" मी अजुन माझं वाक्य पुर्ण करायच्या आतच वठारे सर बोलले,
"बघितलत मॅडम. हेच! हेच मी तुम्हाला सांगत होतो. अतिशय उद्दट झाली आहेत मुलं आजकाल. शिक्षकांना उलट उत्तर देणे, त्यांच्याशी हुज्जत घालणे ही जणू त्यांची फॅशनच झाली आहे."
त्याक्षणी वठारे सरांचा एवढा राग आला होता. असं वाटलं की शेजारच्या कपाटातली ती मधोमध ठेवलेली सर्वात मोठी ट्रॉफी यांच्या डोक्यात घालावी.
"I can understand sir. You can leave if you don't have to add anything. I want to speak with Mr. Vikram in person." आता मात्र माझी आजूनच टरकली. वठारे सरांनी जाता जाता माझ्याकडे अशी नजर टाकली जणू एखाद्या लढाईत मला हरवून पुढे निघाले आहेत. मी त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष केलं. वठारे सर बाहेर जाताच प्रिंसिपल मॅडम म्हणाल्या,
"Mr. Vikram. This kind of behaviour is not expected from you. तुम्ही कॉलेजमधे शिकायला येता की असले चाळे करायला येता?"
"Excuse me ma'am. मला माहित नाही सरांनी तुम्हाला काय सांगितले आहे. पण जर तुम्ही मला माझी बाजू मांडू दिलीत तर, I will be obliged".
"बोला!"
"मी सर्वप्रथम मान्य करतो की मी सरांना उलटं बोललो, जे चुकीचे आहे. हेही मान्य करतो की माझे आणि मुग्धाचे एकमेकांवर प्रेम आहे. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही चाळे करत फिरतो. तुम्ही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. या उलट वठारे सरांकडून भर वर्गात आमच्यावर कित्येकदा अपमानास्पद comments pass केल्या गेल्या आहेत ज्या आमच्या सहनशिलतेच्या बाहेर जात होत्या. कदाचित आजचा तोच दिवस निघाला जेव्हा मला ते सहन झाले नाही आणि मी सरांवर आक्षेप घेतला. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो आणि आज जवळ जवळ एक वर्ष होत आलं आहे या गोष्टीला पण याचा आम्ही आमच्या अभ्यासावर कधिही परिणाम होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. मला एवढच बोलायचं आहे."
"Mr. Vikram, I am glad that you put your side so bravely. I have gone through your history in college and you both are good at grades. पण याचा अर्थ हा नाही की तुमच्यासाठी नियम वेगळे असतिल. कॉलेजचे पावित्र्य आणि शिस्त ही माझ्यासाठी महत्वाची आहे. मी तुम्हा दोघांच्या पालकांना भेटायला बोलावत आहे. मी त्यांना personally call करेनच पण तुम्ही देखिल त्यांना तशी कल्पना देऊन ठेवा! हे letter सांगितल्या प्रमाणे sign करून माझ्याकडे २ आठवड्यात जमा करावे. तुम्ही जाऊ शकता".

ज्याची भिती होती तेच झालं. नेहमी गदारोळ चालण्यार्‍या वर्गात आज स्मशान शांतता होती. सर्वांना एकच चिंता, "आम्हा दोघांच काय होणार?".मी वर्गात जाताच सर्वजण माझ्या भोवती गोळा झाले. मी घडलेला प्रकार सर्वांना सांगितला. कारण लपवण्यासारखे काहीच नव्हते आणि वठारे सरांबद्दल सर्वांची काहीना काही तक्रार होतीच. त्यामुळे मी जे केलं ते योग्यच केलं अस किंबहुना सर्वांचच म्हणणं होतं. पण रोह्या जरा जास्तच गंभीर दिसत होता. मला जितकं टेंशन आलं नसेल तितकं त्याच्या चेहर्‍यावर दिसत होतं.

"काय रे रोह्या? तुला काय झालं तोंड पाडून बसायला?" मी विचारलं.
"अरे मुर्खा! तुला थोडीतरी अक्कल आहे का? जे नको होतं तेच घडलं ना? गेलं ना प्रकरण घरी? तेही "warning letter" च्या मार्गाने? "
"अये स्कॉलर. एवढं काय टेंशन घ्यायलायेस. मी करतो विक्याच्या लेटरवर sign. कुनाला कलणारे कुनाची sign आहे ते!" आज्याने आपले ज्ञान पाजळले!
"आज्या जरा गप्प बसशिल का? ही जोक्स करायची वेळ नाही. विकी तु काका- काकूंना कसं समजवणार आहेस याचा विचार केला आहेस का? ते सगळं सोड! आधी मला सांग मुग्धाला काय सांगणार आहेस? ती तर आज इथे नाहिये त्यामुळे घडलेला प्रकार तिला माहित नाही. त्यात ज्या अर्थी तुझ्या पालकांना बोलावलय त्या अर्थी तिच्याही पालकांना बोलावणार! तु आत्ता एक काम कर. पटकन मुग्धाला कॉल कर. प्रिंसिपल ऑफिसमधून कॉल जाण्या आधी तिला घडला प्रकार समजावून सांग!" 
रोह्याने सांगताच मी लगेचच मुग्धाला कॉल केला. झाला प्रकार तिला सविस्तर सांगितला तसा तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला! आता मात्र विषयाच्या गांभिर्य़ाची मला जास्तच जाणिव झाली. 

"विकी! You have no idea how strict my dad is! मला त्यांच खुप टेंशन आलय रे! ते खरच खुप रागिट आहेत. मी त्यांना काय सांगू? माझ्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिकमधला बिजनेस सोडून इथे येऊन साधी नोकरी स्विकारली आहे आणि आता त्यांना हे मी कसं सांगू? विकी खरच खुप टेंशन आलयं रे!" म्हणत तिने भोकाड पसरलं.
"ए मुग्धे! अगं रडू नको ना! आपण काहितरी मार्ग काढूना! तु फक्त रडू नको. ए रोह्या. सांगकी काहीतरी! आज्या,मिहीर, सौर्‍या, अरे तुम्हीपण काहितरी सुचवा रे!" मी पुर्ण पॅनिक मोडवर गेलो होतो. मुग्धाला जरा जरी दुःखी पाहिलं की मी नकळत पॅनिक मोडवर जातो. आजतर ती ढसा-ढसा रडत होती. मला काहिच सुचत नव्हतं!

"विकी फोन स्पिकरवर टाक!" रोह्या सांगताच मी स्पिकरफोन सुरू केला,
"मुग्धा, रोहित बोलतोय. हे बघ टेंशन घेऊ नकोस. विकी आणि मुग्धा! मला तरी दुसरा कोणताही पर्य़ाय दिसत नाही. हे अश्याप्रकारे नक्कीच तुमच्या घरच्यांना कळायला नको होते पण तुम्हाला स्वतःहुन घरी सांगावेच लागेल. प्रकरण जास्त चिघळण्या आधी तुम्ही आपापल्या घरी सर्व प्रकार सांगा", रोह्या गंभिरपणे बोलला.

खरच आमच्याकडे दुसरा काहीच पर्य़ाय नव्हता. मी लगेचच घरी जाण्याचा निर्णय घेतला. मुग्धाला देखिल धीर दिला. तिची समजुत काढली की आपण काहिही गुन्हा नाही केला किंवा कोणतिही मर्य़ादा ओलांडली नाही. एकमेकांवर नित्तांत प्रेम केलय जे नक्कीच आम्हाला या कठिण प्रसंगातुन बाहेर काढेल अशी आम्हा दोघांना आशा होती.

 ======================================================================================
-अद्वैत कुलकर्णी

Saturday, March 4, 2017

मी आणि तु ....(भाग ८)

"विकी राव ! कसे आहात आज?" , आज्याने मिश्किलपणे विचारले.
"मी बरा आहे. तुला काय झालय आज?"
"मी शुद्ध बोलन्याची तयारी करतोय."
"बोलन्याची नाही, बो ल ण्या ची! न आणि ण मधला फरक समजतो का? आलाय शुद्ध बोलायला", रोह्याने आपले ज्ञान पाजळले!
"असुंदे. तरीपण मी शुद्ध बोलनारच. sorry बोलणारच! "
"असुंदे नव्हे! असुदेत!" मीही आज्याची खेचायला थांबलो नाही.
"करा चेष्टा गरिबाची. हितं तुमचा भाऊ प्रयत्न करायलाय आनि तुम्हाला चेष्टा सुचालिये", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला.
"हो का? मग आम्हाला कळेल का? की हे प्रयत्न का सुरू आहेत?" , रोह्याने विचारले.
"हे बघ! ह्या नळकांड्यात काय आहे?" , आज्याने माझ्याकडे हात करत रोह्याला प्रश्न केला.
"माझा काय संबंध आता?", मी रागाने विचारले.
"आता तुझ्यासारख्याला जर एखादी पोरगी स्वतःहुन प्रपोज करत्या मग मला का नाही?", आज्याने मला विचारले.
"आता हे मला काय माहित? विचार मुग्धाला"
"इथेच तु चुकलास मित्रा. पन मी शोधुन काढलं reason.", आज्या म्हणाला.
"आणि ते काय आहे?" मी आणि रोह्याने एकदम विचारले.
"शुद्ध भाषा! तु एकदम शुद्ध बोलतोस. मुलिंना शुद्ध बोलणारी लोकं आवडत असावित!", आज्या अभिमानाने बोलला.
"हम्म्म्म्म...! राहुद्या! तुझ्याच्याने होणार नाही!" , मी आज्याला taunt हाणला!
"अरे मग सारिकाला कसा विचारू? ना मी रोह्यासारखा स्कॉलर आहे, ना मिहीर सारखा handsome!", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला!
"हे बघं. तिला तु आवडत असशिल तर ती स्वतःहुन तुला विचारेल!", मी आपला expert advise दिला.
"ह्यो बघा! लय तारे तोडून आल्यागत शानपन शिकवालाय! नशिब आहे तुझ! मुग्धासारख्या चांगल्या मुलिने स्वतःहुन विचारलं. नायतर मला पुर्ण guarantee आहे, तु शेवटपर्यंत single च मेला असतास! ", आज्या एका दमात बोलून गेला.
"खरचं यार नशिब तर आहेच!", मीही स्वतःला आरश्यात बघत बोललो.

आज जवळ जवळ वर्ष होत आलं होतं, आम्ही दोघे एकत्र येऊन. आता तर अख्ख कॉलेज आम्हाला couple म्हणून ओळखत होतं. काही teachers ना देखिल माहिती झालं होतं. आम्ही कदिही एका मर्यादेच्या बाहेर गेलो नाही. कधी चाळे केले नाहीत. आमच एकमेकांवरचं प्रेम अगदी निर्मळ होतं. पण का कोणास ठाऊक पण काही लोकांना ते कुठतरी खुपत होतं. त्यातल्या त्यात वठारे सरांना. ते एकही संधी सोडत नव्हते comment करण्याची. पहिले काही वेळा मजेत घेतलं पण नंतर नंतर अति होऊ लागलं. एक दिवस attendance सुरू होता. मुग्धा आजारी असल्याने कॉलेजला आली नव्हती,
"मुग्धा परांजपे", वठारे सरांनी तिचे नाव घेतले तसा मी "आजारी आहे. आज आली नाही" म्हणालो.
"अच्छा! मग तु कसा काय आलास आज? कसं करमणार रे तुला?", वठारे सरांनी comment केली. हे नेहमीचेच झाले होते पण आज जरा अतिच झाले! माझाही स्वतःवरचा ताबा सुटला.
"Excuse me Sir! This is none of your business!", मी क्षणात बोलून गेलो.
रोह्याने माझ्याकडे बघितलं आणि पटकन मला बसण्यासाठी हाताला धरून ओढू लागला.
"ओह! बिजनेस! एक पोरगी काय मिळाली, तुझी भाषाच बदलली की", वठारे सर रागाने मला बोलत होते.
"I am sorry sir. पण तुम्हाला यावर बोलण्याचा काहिही अधिकार नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.", इतक्या दिवसांचा राग आपोआप वाट काढत आज तोंडावाटे बाहेर पडत होता.
"Sorry sir. मी विकिच्या वतीने माफी मागतो. सर please जाऊद्या ना. ए विकी. please खाली बस. सर. sorry! please जाऊद्या", रोह्या केविलवाण्या आवाजात विनवणी करत होता. पण आज माझा राग अनावर झाला होता.
"रोह्या तु नको मधे पडूस. कित्येक दिवस झाले मी यांच्या comments ऐकुन घेतोय. खुप ऐकुन घेतलं. आता बास!" , मी रागात बोललो.
"ओह! आता तु मला माझ्या वर्गात कसं वागयचं शिकवणार? मिस्टर विक्रम, आता मला direct प्रिंसिपलच्या केबिन मधे भेटा. मीही बघतोच माझा बिजनेस काय आहे आणि काय नाही.", वठारे सर रागात निघून गेले. 
"विक्या. तु बरोबर केलास. या फुकन्याला कोनतर बोलायलाच पाहिजे होतं.", आज्या माझ्या खांद्यावर हात टाकून बोलला.
"मुर्ख आहेस काय आज्या? आणि तुला कसला माज आलाय रे विक्या? काय गरज होती बोलायची?", रोह्या रागाने मला आणि आज्याला झापत होता.
"रोह्या तु गप बस. त्या वठारेचा काय संबंद नव्हता बोलायचा विकी आनि मुग्धा बद्दल. विक्या, तु नको घाबरू. मी येतो तुज्यासोबत प्रिंसिपलकडं. मी सांगतो त्या वठार्‍याची तक्रार प्रिंसिपलला", आज्या मला धीर देत बोलला.
"अरे मुर्खांनो! तुम्हाला जरातरी अक्कल आहे का? तुम्हाला हे प्रकरण इतक साधं वाटतय का? विकी तुला अंदाज आहे का, की हे प्रकरण तुझ्या आणि मुग्धाच्या घरापर्यंत जाऊ शकतं? आणि तुमच्या दोघांचे नाते तुमच्या घरच्यांना याप्रकारे समजावे हे मला तरी धोकादायक वाटतय!", रोह्या बोलला तसा माझ्या पोटात गोळा आला. खरच मी याचा विचार केला नव्हता!
"आयला. स्कॉलर खर बोलतोयसकी! मला हे ध्यानातच नाइ! आता काय करायच?" , आज्याला घाबरलेला पहिल्यांदाच बघितला.
"मला नाही माहित!", रोह्या खांदे पाडून आमच्याकडे बघत होता. तेवढ्यात कॉलेजचा शिपाई वर्गात आला,
"विक्रम कोण आहे इथे? प्रिंसिपल नी बोलावलय. लवकर चला!"

======================================================================================

आज जवळ जवळ एक वर्षानंतर पुन्हा ब्लॉग लिहितो आहे. आशा करतो हा भागही तुम्हाला आवडेल. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Monday, February 15, 2016

मी आणि तु ....(भाग ७)

"रोह्या! आजकाल लोक लय शानी झालेत नै?" , आज्याने मला taunt मारला आहे हे मला समजलं. पण तरिही दुर्लक्ष करून मी submission खरडत बसलो!
"कारे आज्या? काय झालं? कोणबद्दल बोलतोयेस?" , रोह्याने हातातलं पुस्तक बाजुला ठेऊन आज्याकडे नजर टाकली.
"अरे असचं रे. काही लोकं वेगळी वागायला लागल्यात आजकाल!", पुन्हा एकदा आज्याने taunt  मारला!
"ए आज्या! सांगयच असेल तर नीट सांग! फालतु कोडी सोडवायला मला वेळ नाही. Exam जवळ आलिये!"
"अरे दुसरं कोण असनार? हा नळकांड्या!!! लय शाना झालाय!!" आज्या पुढं बोलायच्या आत मी ओरडलो,
"मी काय केलयं रे आज्या?"
"काय केलय? अरे तुज़्या वागन्यातला बदल मला कळत नाई होय?"
"मी काय चुकिचं वागलोय? रोह्या तु सांग!"
"तसं आज्या बोलतोय ते बरोबरच आहे. मलाही तुझ्या वागण्यात फरक जाणवतोय आजकाल."
"काय फरक? जरा मलापण कळूदे!", मी थोड्या रागानेच बोल्लो!
"अरे नळकांड्या किती फरक सांगू बोल! कधी आरसा म्हंजे काय माहित नसलेला तू आजकाल तासतासभर आरश्यासमोर उभा असतोस! कधी फॉर्मल शिवायही काही कपडे असतात याची माहितीही नसलेला तू आजकाल लो जिन्स आनि टीशर्टशिवाय दुसरं घालत नाईस! २-४ दिवस आंघोळ नै केल्यासारखं बाटलीभर सेंट मारून येतोस कॉलेजला आणि मला विचारतोस होय काय फरक पडलाय तुझ्यात? आता सांगनारेस काय झालय की अजुन सांगू तुज्यातले बदल?"
आज्याला एवढा तावातावात बोलताना पाहून मी थोडा बिचकलो. इकडं रोह्या तोंडावर मोठ्ठ हासू घेऊन एकदा मला आणि एकदा आज्याला बघत होता. मी त्याच्याकड डोळे मोठ्ठे करून बघितल्यावर त्याची तंद्री मोडली,
"बरोबर आज्या! मी पण हेच observe केलयं!", रोह्यानेही आज्याच्या बाजूने री ओढली.
माझ्या मनात मात्र चलबिचल सुरू होती. बर्‍याच दिवसांपासून मला हे secret शेअर करायच होतं. शेवटी ते दोघे माझे best friends होते. यांना सांगाव की इतक्यात नको? नाही सांगितलं आणि बाहेरून कळालं तर गैरसमज वाढतील आणि मी सांगितलं तर कदाचित त्यांना आनंदही होईल असे विचार मनात येऊ लागले.  शेवटी मनाशी ठरवलं की यांना आज सांगायचच.

"हे बघा! मी सगळं खरं सांगतो! पण ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय कोणालाही कळता कामा नये!" , मी थोड्या gossiping च्या टोन मधे हळू आवाजात बोललो, तसे ते दोघेही हाततली कामं सोडून माझ्या बोलण्याकडे मन लावून लक्ष देऊ लागले.
"हे बघा मला कळत नाहिये कुठुन सुरूवात करू!" , मी थोडा गोंधळलेलो!
"ए नळकांड्या! उगा भाव खाऊ नको! जे काये ते लवकर सांग. मला अभ्यास करायचाय!" आज्याच्या या वाक्यावर रोह्याने कुत्सित नजर टाकली.

"बरं. विषय असा आहे की मी...! नाई मला.... नाई माझ्या....!", मला कसं सांगाव कळत नव्हतं. त्या दोघांची काय reaction असेल ह्या विचारानेच माझं तत-पप होत होतं. पण शेवटी मी धाडस केलं!
"मी आणि मुग्धा are couple now!", मी एका क्षणात बोलून गेलो! आता मला अपेक्षा होती की भरपूर शिव्या बसणार, कदाचित मी मार सुद्धा खाईन. पण घडलं वेगळच. आज्याने रोह्यासमोर हात पुढ केला. तसा रोह्याने माझ्याकड रागाने बघत खुटिवर टांगलेल्या त्याच्या पॅंटमधून स्वतःच पाकिट काढून त्यातले ५० रुपये घेऊन आज्याच्या हातात आपटले.
"तु पुढ बोल!", आज्या हातातल्या ५० रुपयांच्या नोटेचा वास घेत अगदी मवाल्यासारखा नोट कानाच्या आणि डोक्याच्या फटित ठेऊन बोलला!
"Actually तीने मला propose केलं" , मी पुढ बोललो तसा आज्याने पुन्हा रोह्याकडे हात पुढ केला. तसा रोह्या पुन्हा माझ्याकडे रागाने बघत आणखी एक ५० ची नोट काढून आज्याच्या हातात ठेवत मला शिव्या देत समोर येऊन बसला.

"हम्म...! पुढ! जाऊंद्यात तुमची गाडी पुढ!", आज्या पुन्हा माजात बोलला. माझ्या या खुलास्याला इतका नरम प्रतिसाद मला अपेक्षित नव्हता. आणि हे ५०-५० रुपयांच कोडं मला काही कळत नव्हत!
"अरे तु बोल रे. नको लाजू. आपलीच मानसं समज आमाना!", आज्या मिश्किलपणे रोह्याकडे हसत बोलला.
"अरे काही नाही मग. तीने मला भळाभळा सगळं मनातलं सांगितलं आणि माझ्याकडून उत्तर मागितल. थोडक्यात माझं मत विचारल".
"मग? पुढ काय झालं? तु काय बोललास?", रोह्याने कुतुहलतेने विचारले.
"मी काय बोलतोय. कळायचच बंद झालं राव मला. काहीच सुचलं नाही. पळून आलो रूमवर. आणि नंतर आजारी पडलो. आठवतयं का तेव्हा तापाने फणफणलेलो मी ? ते हेच कारण!" , मी अभिमानाने सागितलं!
तसा आज्याने पुन्हा हात पुढं केला आणि रोह्याने पुन्हा ५० ची नोट त्याच्या हातात ठेवली. आता मात्र मला सहन झालं नाही,

"काय रे? काय चाल्लय तुमचं? मी इथे इतका सिरियस विषय बोलतोय आणि तुम्ही पैसे-पैसे काय करताय?"
"पैसे नाई म्हनायच बाळा याला! नोटा म्हणायच! आजची कष्टाची स्वकमाई!" आज्या पुन्हा मस्तीत बोलला.
"तुला विचारण्यात काही point नाही. रोह्या! तु सांग. नेमकं काय चाल्लय तुमच?"
"अरे गडबड नको. फक्त एक शेवटचा प्रश्न! तुझ्या मनात तिच्या विषयी feelings आधिपासून होत्या की तीने propose केल्यानंतर तयार झाल्या?", रोह्याने कुतुहलाने विचारले!
"तिने propose केल्यानंतर!" मी जसं उत्तर दिलं तसं रोह्याच्या चेहर्‍यावर हासू ऊमटलं आणि तिकडे आज्याचा चेहरा पडला. यावेळी रोह्याने हात पुढं केला आणि आज्याने ५० ची नोट त्याच्या हातात आपटली.
"बरं आता मला कळेल का की हे तुमचं दोघांच काय चाल्लय?", मी थोडा त्रासिक होऊन बोललो.
"कस आहे ना नळकांड्या! तुला मी लय जवळून ओळखतो. या रोह्याला मी गेल्या आठवड्यातच बोल्लो होतो की तुज़ आनि मुग्धाचं चक्कर चालू आहे. पण या स्कॉलरला माजं बोलन काय पटलं नाही. मग मी बोल्लो लाव ५० ची पैज. अता तु जे सांगितलं त्यातल शेवटच सोडलं तर बाकी सगळे अंदाज बरोबर लागले किनी माझे!"

खरच आम्ही तिघंही एवढे जवळ असलो तरी आमच्यात आज्याची observation skill खुप जबरदस्त आहे.
"पण कायपण म्हण विक्या! आपल्याला आवडली तुमची लव स्टोरी. पहिल्यांदाच माझ्यामते मुलीने propose केलेला किस्सा अनुभवायला मिळाला! नायतर या आज्यासारखे रोमिओंचेच किस्से ऐकुन वैताग आलेला." रोह्याने माझ्या पाठीवर एक जोरात बुक्की घालून माझे अभिनंदन केले. तेवढ्यात माझं लक्ष आज्याकडे गेलं. तो डोक्याला हात लावून बसला होता.
"कारे काय झालं? तुला नाई काय झाला आनंद?"
"झाला की. पण एक प्रश्न काय सुटेना!"
"का रे? बोल तर"
"हेच की तुझ्या सारख्या नळकांड्यात नेमक हिने बघितलं तरी काय?" एवढ बोलून प्रश्नार्थक नजरेनं त्यानं मला बघितल. आणि क्षणात परत बोलला, "हान! आता एक लक्षात ठेवायच! आता माझ्या आणि माझ्या सारिकाच्या मदी आलास तर लय मार खाशिल!"
"नाही बाबा! अजिबात नाही! तुझ्यासाठी हृदयावर दगड ठेवून मी तिला विसरून जाईन" मी अगदी खुप दुःख झाल्याचा आव आणत आज्याला शब्द दिला. त्यानंतर तिघेही पोट धरून हसलो. तेवढ्यात रोह्या ओरडला,
"आज पार्टी झालीच पाहिजे!"

======================================================================================

मी आणि तु कथेचा हा भाग खुप दिवसानंतर प्रकाशित करत आहे त्याबद्दल क्षमस्व. आशा करतो हा भागही तुम्हाला आवडेल. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Wednesday, October 14, 2015

मी आणि तु ....(भाग ६)

"विक्या! बरं आहे का? येणारेस का आज कॉलेजला?" , रोह्याने मला विचारलं.
"हो. पण थोडं उशिरा येईन. तुम्ही व्हा पुढं."
"ए नळकांड्या! आजुन सांगितला नाईस मला. काय झालेलं तुला नेमकं? एकदम असा आजारी कसा पडलास? खरं सांग काय लपवालायस आमच्या पासनं??" आज्याने दम देत मला विचारलं.
"अरे खरच काही नाही. आता मी ठिक आहे. तुम्ही व्हा पुढं, मी आलोच आवरून."

रोह्या अन आज्या जाताच मी दार लावून घेतलं आणि आमच्या रुमच्या आरश्यासमोर जाऊन उभा राहिलो. स्वतःकडं एकदा निट बघितलं आणि विचार करू लागलो की, " या अशा माझ्यासारख्या काडीपैलवानावर प्रेम करण्यासारखं काय दिसलं असेल मुग्धाला? ती seriously बोलली असेल की माझी चेष्टा करत असेल? चेष्टा करत असेल तर ठिके पण जर खरच ती serious असेल तर? तर मी काय करू? रोह्या - आज्याला सांगू? की स्वतःच handle करू? "

कसतरी धाडस करून मी कॉलेजला निघालो. आज मुद्दामुन उशिरा पोहोचलो. Lecture सुरू होतं. खिडकीतुन आत नजर टाकली तशी मुग्धा दिसली. ती थेट माझ्याकडेच बघत होती. जशी आमची नजरा नजर झाली तशी ती सुरेख हसली. का कोणास ठाऊक पण याआधी मी तिच्या हसण्यावर कधीच एवढं लक्ष दिलं नव्हतं. खरच किती सुंदर आहे तिचं हसण याची आज जाणिव झाली. पण लगेच स्वतःला सावरलं. तिला दुर्लक्ष करून खिडकितूनच बसायची जागा शोधली अन गुपचुप वर्गात जाऊन बसलो. Teacher नी एक नजर टाकली अन त्यांनी शिकवण सुरू ठेवलं. मला वर्गात येऊन २ मिनिटं होतात न होतात तोच मागून मला एक चिठ्ठी मिळाली. मी ती उघडून बघितली,

"कसा आहेस? बरं वाटतयं का आता? औषध-गोळ्या सुरू आहेत ना?"
अक्षरांवरून मी ओळखलं की ती चिठ्ठी मुग्धाने पाठवली होती. ती साधारण ८ बेंच माग बसली होती आणि तिथुन ती चिठ्ठी माझ्यापर्यंत "पास" होत आली होती. माझ्यापर्यंत येताना कोणी कोणी वाचली असेल अन ते लोक काय काय अर्थ काढतिल या विचारानेच पोटात गोळा आला. मी ती चिठ्ठी तशीच खिशात ठेऊन दिली. तोच परत ५ मिनिटात खांद्यावर तिचकी पडली अन आणि एक चिठ्ठी मिळाली,
"काय झालं? At least माणसाने उत्तर तरी द्यावं."

मी रागाने मागं मुग्धाकडे बघितलं. मी चिडलेलो आहे हे तीच्या लक्षात येताच तिने कान पकडले अन sorry म्हणाली. त्यानंतर मात्र परत तास संपेपर्यंत काही चिठ्ठी आली नाही पण का कोणासठाऊक माझं मन उगाचच तेवढावेळ तिच्या चिठ्ठीची वाट बघत होतं. असं वाटत होतं की आत्ता खांद्यावर टिचकी पडेल अन मुग्धाची चिठ्ठी मिळेल. पण तस झालं नाही. Lecture संपलं अन lunch break झाला.

मी बॅग आवरतो-न-आवरतो तेवढ्यात मुग्धा माझ्यासमोर आली. परत एकदा माझ्याकडं बघुन सुंदर हसली. मी पुन्हा दुर्लक्ष केलं अन माझी बॅग घेऊन दुसर्‍या बाजूने निघून गेलो. तसा मी चिडलो नव्हतो पण तिच्याशी कसं बोलू हेच कळत नव्हतं. मी कोणाशिही न बोलता एकटाच कॅंटिनकडे निघून गेलो. रोह्या आणि आज्या मुग्धासोबत गप्पा मारत येताना मी पाहिलं. रोह्या आणि आज्या काहितरी बोलत होते पण मुग्धा एक टक माझ्याकडेच बघत होती. मी पुन्हा दुर्लक्ष केलं आणि आजूबाजूला बघत बसलो. तिघेही माझ्या टेबल जवळ आले. रोह्या माझ्या शेजारी बसला, आज्या बरोबर रोह्याच्या समोर बसला आणि मुग्धा माझ्या समोर.

"अरे विकी मी तुला कधीपासून विचारतिये, कसा आहेस? बरं आहे का?", मुग्धाने समोर बसताक्षणी विचारलं.
"हो.", मी तुटकच उत्तर दिलं.
"काय झालेल? डॉक्टरनी काही सांगितलं का?", मुग्धाने मिश्किलपणे हसत मला विचारलं.
"हा काय जातोय डॉक्टरकडं? तंगड्या वर करून पडलेला नुस्ता. सांगुन दमलो. तुच सांग. बघु तुझं तर ऐकतोय काय.", आज्या म्हणाला.
"विकी, आजच्या आज डॉक्टरकडे जारे. आणि सगळ सांग त्यांना. काय झालं, काय होतय, वगैरे वगैरे. ते तुला बरोबर सांगतिल तुला नेमक काय झालय ते.", पुन्हा एकदा मुग्धा मिश्किलपणे हसत बोलली.

मी दुर्लक्ष करत "ठीक आहे" म्हणून विषय बदलला. जेवण करत करत सकाळी चुकलेल्या lecture ची माहिती रोह्याकडून घेतली. जेवण झाल्यावर पुन्हा classroom कडे जाताना रोह्या आणि आज्या पुढे निघाले आणि मी अन मुग्धा मागे राहिलो. मिळालेल्या संधिचा फायदा घेत मुग्धा माझ्याजवळ आली आणि म्हणाली,

"मला माहितिये तुला काय झालय."
"काय?" मी विचारलं.
"तुला ’लवेरिय’ झालाय." एवढ म्हणून तीने हसत हसत तेथुन पळ काढला.

का कोणासठाऊक पण नकळत माझ्याही ओठांवर हसू होतं. घडलेला प्रसंग सतत डोळ्यासमोर येत होता. किती सहजतेने मुग्धाने माझ्याबद्दलच्या स्वतःच्या भावना मला बोलून दाखवल्या याच खरच कौतुक वाटत होतं. या प्रकारावरून एक गोष्ट तरी स्पष्ट झाली की ती serious  आहे.

असेच दोन-चार दिवस निघुन गेले. मी घडलेल्या आणि घडत असलेल्या प्रकारावर पुर्ण विचार करून माझा निर्णय मनाशी ठरवून टाकला. मला एकट्याला गाठून मुग्धा परत माझ्या समोर आली.
"मग?" तिने प्रश्न केला.
"मग? काय मग?" मीही थोडा घाबरूनच होतो.
"अरे मंदा! काय ठरवलस?" तीने तिच्या नेहमीच्या style मधे कपाळाला शंभर आठ्या देऊन विचारलं.
"कशाच?" मीही आता थोडा भाव खात होतो.
"उगाच भाव खाऊ नकोस. नीट उत्तर दे. तुझा काय reply आहे?", आता ती थोडी चिडली होती.
"कशाचा reply? मला काही कळत नाहिये तु नेमकं काय बोलतियेस?" मी मुद्दामुन काही कळत नसल्याचा आव आणत होतो.
"ठिक आहे. तुला मी आवडत नाही असं मी समजते. And yes. Sorry for that day. मी माझ्या मनात जे होतं ते बोलून गेले. मला तु आवडतोस आणि तुला मी कितीही आवडत नसले तरी तु मला कायम आवडणार. I will love you till I die".

ती धडाधड बोलतच सुटली. आजूबाजूचे लोक ऐकतील वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती. मलाही समजत नव्हते की मी हसू, की तिला शांत करू की अजून "innocent" असल्याचा आव आणू. सगळ बोलून झाल्यावर उत्तराच्या अपेक्षेने ती माझ्याकडे बघत होती. मी "innocent" असल्याचाच आव आणून तिच्याकडे बघत उभारलो.

"अरे मंदा बोल. हो किंवा नाही. सरळ सांग!" थोड्या वरच्या आवाजातच ती बोलली.
"अगं पण कशाबद्दल हो कि नाही? ते तरी सांग" मी पुन्हा तिची कळ काढली.
"हेच की मी तुला आवडते की नाही. Tell me, Do you love me or not? Yes or no. लवकर सांग."
मी दीर्घ श्वास घेतला, तिच्या डोळ्यात डोळे मिळवले, एक छोटसं smile दिलं आणि माझं उत्तर दिल,

"हो. Yes! I love you too!"

माझे हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. आजूबाजूची कसलिही चिंता नकरता तिने मला गच्च मिठी मारली. अचानक घडलेल्या या अनपेक्षित प्रतिक्रियेने मी थोडा बिथरलो पण तिला झालेला आनंद मला इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचा होता.

======================================================================================

मी आणि तु कथेचा हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Wednesday, June 24, 2015

मी आणि तु ....(भाग ५)

"आज्या आज तुझी वहिनी आली नाही वाटतं?", मी हळूच आज्याला डिवचलं. त्याला थोडावेळ लागला समजायला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की मी "सारिका" बद्दल विचारतोय. 

"नाही", त्यानं डोळे वटारून मला उत्तर दिलं.

मुग्धाही होतीच आमच्यासोबत. आता बरेच दिवस झाले होते आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे अशा गमती-जमती आमच्यात चालायच्या. पण ही चेष्टा बहुदा मुग्धाला आवडली नाही. तिनेही माझ्याकडे रागाने एक नजर टाकली.

तेवढ्यात मिहीरने नोटिस बोर्डवर exam schedule लागल्याची बातमी सांगितली. Engineering मधली पहिली exam असल्याने आम्ही सगळे excited पण होतो आणि nervousही.

बघता-बघता PL सुरू झाली. PL म्हणजे जरी Preparation Leave असली तरी ती Engineering मधला सुवर्णकाळ मानली जाते. या दिवसांत "Preparation" कमी "Leave" जास्त असते. निवांत झोपणे, सिनेमे बघणे, क्रिकेट खेळणे आणि कधी कंटाळ आलाच तर अभ्यास. असा हा आमचा दिनक्रम सुरू होता. PL असल्यामुळे कॉलेजला जाऊन जवळ जवळ २० दिवस झाले होते. आम्ही मुलं जवळ जवळ राहायचो त्यामुळे मुग्धा सोडली तर आम्ही सगळे रोज भेटायचो. पण तिला भेटुन बरेच दिवस झाले होते आणि तिला आम्ही कोणी भेटलो नव्हतो, त्यामुळे तिला कसे वाटत असेल याची कल्पना आम्हा कोणालाही नव्हती. किंबहुना आम्ही तर जणू तिला विसरलोच होतो.

Exam च्या ४ दिवस आधी Hall Ticket घेण्यासाठी कॉलेजला जायचा योग आला. कमानितुन आत जातो तोच मुग्धा आम्हाला दिसली. बहुदा बराचवेळ आमचीच वाट पाहात होती. आम्हाला बघुन झालेला आनंद तिच्या चेहर्‍यावर साफ दिसत होता. Hi-fi झाल्यानंतर तिने एक जोरदार फटका माझ्या हातावर मारला. मला काही समजायच्या आत रोह्या अन आज्यालाही प्रसाद मिळाला.

"तुम्ही मला विसरलात किनी?" तिने बॉम्ब टाकला.

"खर सांगा. १५-२० दिवस झाले भेटुन. कोणालाच आठवण नाही ना झाली माझी?" तिने पुन्हा जाब विचारला.

"अग तसं नाही. खरतर विसरलेलो तसे, पण तुला आत्ता बघितल्यावर परत आठवण झाली", मी हळूच तिची खोड काढली.

चेहर्‍यावर आलेलं हसू दाबत, "अजून मी चिडले आहे"चा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करत तिने पुन्हा मला एक जोरात फटका लावला. Hall ticket घेतल्यानंतर आम्ही कॅंटिनला चहा घ्यायला गेलो.

"ए यार कोणितरी मला Basic Mechanical Engineering शिकवारे. मला काहिच झेपत नाहिये", मुग्धा तोंडाचा चंबु करून बोलली.

"अगं खुप सोप्प आहे. Physics च्या पेपरवेळी मी तुला माझ्या नोट्स देतो.", रोह्या बोल्ला.

"रोह्या ही गद्दारी? तु कधी नोट्स काढल्यास?" मी रागाने रोह्याला विचारलं आणि सोबत आज्याचीही साथ मिळाली.

"तुम्ही तो कुठला डब्बा ’ओम शांती ओम’ बघायला गेला होतात ना, तेव्हा.", रोह्यानं जोरदार उत्तर दिलं.

"ए वॉव. कसा आहे रे सिनेमा. मलाही बघायचा आहे.", मुग्धा बोलली.

"घ्या. तुम्ही सगळे एकसारखेच. अरे ४ दिवसावर exam आली आहे आणि सिनेमांवर काय बोलताय? बोलायचय तर First Law of Thermodynamics वर बोला किंवा Stress-strain वर बोला.", रोह्या त्रासिक आवाजात बोलला.

"ए रोह्या. एबग. माज्या फुडं तुज़ा नंबर आहे. कायपन झालं तर मला exam मदे दाखवायचं" आज्यानं रोह्याला तंबी दिली.चहा-नष्टा घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो.

रोह्यासारखा "शिक्षक" असताना आम्हाला exam मधे काहीच अडचणी आल्या नाहीत. पेपरच्या आदल्या रात्री रोह्या आम्हाला आमच्या आग्रहास्तव "Passing" पुरतं सांगायचा. आणि मग आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावर तिखट-मीठ, मिर्चमसाला टाकून उत्तर लिहून यायचो. Seniors नी सांगितलेला एकच गुरूमंत्र आम्ही लक्षात ठेवलेला, "भावांनो. आपल्या युनिव्हर्सिटीत मार्क मजकुराच्या 'लांबी X रूंदी ’ वर मिळतात. जेवढ लिहिता येइल तेवढ लिहा. नसेल माहित उत्तर तरी जे माहितिये ते लिहा. Be creative!".

बघता बघता exam संपली अन results ही लागले. अपेक्षेप्रमाणे रोह्याने टॉप केले आणि आमचा सगळा ग्रुप चांगल्या गुणांनी पास झाला. आम्ही TTMM म्हणजेच "तुझं तु, माझं मी" तत्वावर एक छोटिशी पार्टीही केली.दिवस मस्त सुरू होते. चेष्टा मस्करीही सुरू होती. या सगळ्यात मुग्धा मात्र विचित्र वागू लगली होती. बाकी कोणी एखाद्या मुली बद्दल काही छान बोललं, comment केली तर ती हसत घ्यायची, पण तेच मी बोललो तर माझ्याकडं रागाने बघायची आणि कधी कधीतर जोरात मारायचिही.

हा तिच्यातला बदल बहुतेक आज्या अन रोह्याच्या लक्षात आला असावा. असकाही घडलं की ते दोघे माझ्याकडं बघुन "खट्याळ" हसायचे. मलाही थोडं विचित्र वाटायच पण कारण काही कळत नव्हतं. असं बर्‍याचदा घडल्यानंतर एकदा मात्र माझं डोकं सटकलं.

"आई शप्पत. आज्या बघं तुझी वहिनी आज कसली मस्त दिसतिये", मी नेहमीच्याच पद्धतिने त्याची खोड काढली. आणि अपेक्षेप्रमाणे मुग्धाने मला जोरात फटका मारला. आज मात्र मी चिडलो.

"काय ग तुझ दरवेळी? माझ्यावरच का कायम चिडतेस? हे बाकिचे बोलतात, comment करतात तेव्हा तु काही बोलत नाहीस. उलट हसतं घेतेस आणि मी कधी काही बोललो तर चिडतेस अन मारतेसही. काय आहे हा प्रकार?", रागाच्या भरात माझा आवाज कधी चढला माझं मलाच समजलं नाही. माझ्या या अनपेक्षित reaction मुळे मुग्धाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं अन ती तिथुन निघुन गेली.

मिहीर तिला थांबवायला, तिची समजुत काढायला तिच्या मागं धावला. बाकी आज्या, रोह्या आणि सौर्‍या माझ्याकडे रागाने बघत होते.

"माझ्याकडं काय बघताय. माझं काय चुकलं सांगा यात. चायला दरवेळेचं आहे. हे" मी आजुन माझं बोलण संपवायच्या आत आज्या बोल्ला,

"ए नळकांड्या. पहिले गप बस. तु तिला सगळयांसमोर चिडून बोल्लास हे तुज चुकलं. शांतपने पन सांगु शकला असतास. आनि तुझ्या नसलेल्या बुद्धीला जरा चालव आनि स्वतःलाच विचार की ती तुलाच का असं करत असेल ते.", एवढं बोलुन तिघेही निघून गेले. मी मात्र कारणं शोधत तिथेच बसलो.

दुसर्‍या दिवशी मी थोडा उशीरा कॉलेजला गेलो. लांबुनच मी ग्रुपमधे मुग्धाला पाहिलं. नेहमी सारखी ती हसत खेळत नव्हती. माझं मलाच वाईट वाटल. मी धाडस केलं अन सगळ्यांसमोर तिची कान धरून माफी मागितली. प्रसंगी कान धरून दोन उठा-बशा पण काढल्या आणि ती हळूच हसली.

मी तिला बाजूला बोलावलं,

"मुग्धे सॉरीकी गं. खरच मला तुला दुखवायच नव्हत"

"It's okay रे. होतं कधी कधी"

"पहिले सांग मला माफ केलस की नाही"

"जा बाळा. मी तुला माफ केलं. जी ले अपनी जिंदगी" असा डायलॉग टाकून ती नेहमीसारखी हसू लागली. तिला परत हसताना पाहून मलाही बरं वाटलं.

"बर आता मला सांग की तु अशी का वागत होतीस. I mean की माझ्या बोलण्यावरच तु चिडायचीस. असं का?"

"तुला खरच नाही कळालं आजुन की तु तसा बनाव करतोयेस?"

"खरचं नाही कळालं मला. काल स्वतःला प्रश्न विचारून विचारून वेडा झालो पण तु माझ्या बाबतीत एवढी possessive का आहेस हेच कळेना"

"आता तुला कसं सांगू. खरच मंद आहेस तु."

"अगं बोल ना. नाहितर आजपण झोप नाही येणार मला"

"अरे मंदा. मला तु आवडतोस. I Love You".

--------------------------------------------------------------------------------
(दुसर्‍या दिवशी)
"अरे रोहित. विकी कुठय?" मुग्धाने विचारलं.

"अग काय झालय त्याला काय माहित. काल तुझ्याशी बोलल्यानंतर जो गायब झाला तो सरळ रूमवर जाऊन झोपला. काल पासून तापाने फणफणलाय. डॉक्टरकडे पण जायला तयार नाही. खुपच ताप होता काल. त्याला एक क्रोसिन देऊन झोपवलाय. दुपारी जाऊन बघुन येइन परत बर आहे का ते. नाहीतर डॉक्टरकडे घेऊन जाईन. बर ते सोड, मला सांग काल काही बोलला का तो तुला? म्हणजे बरं नाही वाटत वगैरे?"

"नाही रे. आमच बोलणं झाल्यानंतर तो निघून गेला"

"मी पाहिलयं त्याला तुमच बोलनं झाल्यावर फास्टात जाताना. काय बोल्लीस त्याला?" आज्याने रागाने मुग्धाला जाब विचारला.

"अरे काही नाही. माफी मागितली त्याने. मी माफ केलं. बस्स एवढच बोलण झालं "

======================================================================================

मी आणि तु कथेचा हा पाचवा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Saturday, May 2, 2015

मी आणि तु ....(भाग ४)

आता जवळ जवळ वीस-एक दिवस झाले होते कॉलेज सुरू होऊन. नव-नविन ओळखी होत होत्या. नवे मित्र आणि काही मोजक्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्या मोजक्या मैत्रिणींत सारिकाही होती. आम्हा दोघांना बोलताना कधी आज्याने पाहिलेच तर त्याचा चेहरा रागाने लालबुंद व्हायचा आणि मीही मुद्दामुन त्याला दिसेल अशा वेळीच तिच्याशी बोलायचो.

दिवस पावसाळ्याचे होते. रोज नचुकता पावसाची हजेरी असायचीच. त्यादिवशी मी थोडा उशीरा उठलो. त्यामुळे वेळेत तयार होता आले नाही. आज्या-रोह्याची इ्च्छा नसतानाही मी त्यांना पुढे जाण्यास सांगितलं. मी नेहमी प्रमाणे सगळं आवरलं आणि कॉलेजला जाण्यास निघालो. आज नेहमीपेक्षा अर्धातास उशीर झाला होता. पहिले लेक्चर चुकणार यात काही शंकाच नव्हती. त्यामुळे मी कोणतिही गडबड न करता वाटेला लागलो. टमटम केली आणि कॉलेजच्या दारात आलो. तिथुन मुख्य कॉलेज बरचं आत होतं. मुख्य कमानितुन आत प्रवेश करणार तोच प्रचंड पाऊस पडायला लागला. मी पटकन आडोसा घेतला आणि पावसाची सर कमी होण्याची वाट बघत उभारलो. पावसाची तीव्रता एवढी होती की १० फुटावरचं पण स्पष्ट दिसत नव्हतं. रस्त्यावर तसं कोणीच नव्हतं. चार चाकी गाड्या सोडल्यातर रस्ता पुर्ण मोकळा होता. तोच एक मोरपंखी चुडीदार घातलेली एक मुलगी छत्री सावरत कमानितुन आत जाताना दिसली. पावसामुळे तिचा चेहरा काही स्पष्ट दिसला नाही पण नाजुक बांध्याची ती, आडोशाला उभारलेल्या सर्वांच लक्ष मात्र वेधुन गेली.

थोड्यावेळाने पाऊस थांबला तसा मी कमानितुन आत कॉलेजकडे निघालो. आधीच झालेला उशीर अन त्यात पावसामुळे गेलेला वेळ मला महागात पडला. माझे दोन लेक्चर चुकले होते. स्वतःच्या आळशीपणाला शिव्या देत दुसरे लेक्चर संपण्याची वाट पाहात कँटिनमधे बसलो. दुसर्‍या लेक्चर नंतर १५ मिनिटाचा ब्रेक असतो तेव्हा कॅंटिनमधे आम्ही नेहमी चहा घ्यायचो, त्यामुळे आज्या-रोह्याची वाट बघत एक एक घोट चहा पित बसलो. दोघांनी आल्या आल्या माझ्यावर शिव्यांचा भडीमार केला. नवले सरांचं महत्वाचं लेक्चर चुकवल्याची शिक्षाच होती ती. दोघांना चहा पाजला आणि आम्ही तिघे वर्गात येऊन बसलो.

पुढचं लेक्चर झालं तसं हजेरी सुरू झाली. नेहमी प्रमाणे टिचरनी "मुग्धा परांजपे" पुकारलं. पण आज चक्क नवल घडलं. जवळ जवळ २० दिवसांत पहिल्यांदा मागुन "प्रेसेंट सर" असा छानसा नाजुक आवाज आला. अख्खा वर्ग मागेवळून तिच्याकडं बघु लागला. आज  २० दिवसांनी "मुग्धा परांजपे" या क्लासमधे पधारल्या होत्या. मी ही या "बाईंच" दर्शन घ्यावं म्हणून मागे वळून पाहिलं तर ती तीच होती. मोरपंखी चुडीदार वाली. थोडी सावळी पण रेखीव चेहरा, नाजूक बांधा पण सोज्वळ पेहराव. अख्खा वर्ग तिच्याकड बघत होता त्यामुळे ती थोडी बिथरली. तेवढ्यात टिचरचा आवाज आला, "मिस परांजपे. तुम्ही माझ्यासोबत प्रिंसिपलकडे चला. कारण तुम्हाला माहिती आहेच तरिसुद्धा सांगतो. तुम्ही गेले २० दिवस गैरहजर होता. युनिव्हरसिटीच्या नियमानुसार तुम्हाला कदाचित परिक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला. प्रिंसिपल मॅडमशी आपण बोलू आणि योग्य ती कारवाई करू." सरांच्या खणखणीत आवाजातल्या सुचनेवर "यस सर!" असा नाजूकसा आवाज अगदी विचित्र वाटला. राहिलेली हजेरी घेऊन सर वर्गाबाहेर पडले तशी मुग्धा परांजपे त्यांच्या मागे मागे निघाली. ती बाहेर जाताच अख्ख्या वर्गात कुजबुज सुरू झाली. खुद्द मुग्धा परांजपेला जेवढी काळजी नसेल तेवढी काळजी हे लोक करत होते. "आता तीच काय होणार" किंवा "बिचारी परिक्षेला नाई बसू शकणार" किंवा "बरोबरचे. आम्ही काय येडे आहे होय, पहिल्या दिवसापासून attend करायला" वगैरे वगैरे गोष्टी कानावर पडायला लागल्या. यासर्वांत कुठेतरी मी ही होतो. मलाही का कोणास ठाऊक पण "तीचं काय होणार?" या प्रश्नाने बैचेनी होत होती.

थोड्यावेळाने ती आली. चेहरा तसा normal वाटत होता, त्यामुळे नक्की काय झाले असावे याचा काही अंदाज लागत नव्हता. पुढच लेक्चर झालं तसा "लंच ब्रेक" झाला. आम्ही तिघं आणि नवे २ मित्र असे पाच लोक एकत्र कॅंटिनमधे जेवायला बसलो. आमच्या आजच्या "महाचर्चेचा" विषय "मुग्धा परांजपे"च होता. प्रत्येकजण तिच्याबद्दल स्वतःच मत मांडत होता. मी फक्त ऐकायच काम करत होतो. बोलता बोलता सगळे एकदम शांत झाले. मला काही कळायच्या आत मुग्धा परांजपे माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. नुसती बसली नाही तर आल्या आल्या आम्हा सगळ्यांना "हाय गाईज" सुद्धा म्हणाली. मला तर काय कराव कळालच नाही. माझा घास घेतानाचा हात तसाच तोंडात होता आणि तेही मला तेव्हा कळालं जेव्हा ती माझ्याकडं बघून हसून म्हणाली

"अरे तोंडातला हात बाहेर काढलास तरी चालेल. आता मोठा झाला आहेस. हा हा हा".

मी थोडा लाजलो आणि पटकन हात बाहेर काढला. तेवढ्यात ती पुन्हा बोलली,

"I hope you guys don't mind if I join you for lunch."

आधीच आमचे इंग्रजीचे वांदे. आणि त्यात ही बया फाड-फाड इंग्रजी झाडत होती. नेमकं ती काय म्हणाली हे कळायच्या आत आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

आम्ही चौघंही आज्याकडं आश्चर्याने बघायला लागलो. रोह्या बोल्ला असता तर एकवेळ ठिक आहे पण आज्या?

हे सगळ पचवतो तोच ती पुन्हा बोल्ली

"Actually I had Jaundice. So I was not there for almost a month. I hope I haven't missed a lot of syllabus."

त्यावर पुन्हा आज्या बोल्ला,

"येस येस. शुअर शुअर"

हे उत्तर ऐकल्यावर आज्या सोडला तर आम्ही सगळे पोट धरून हसलो. 

"आयला आगोदर इंग्लिश काय झेपत नाय, त्यात ओळख ना पाळख या मॅडम येऊन इंग्लिश झाडाल्यात. मग म्हटलं आपन पन जरा ट्राय मारू", आज्या केविलवाणा चेहरा करून बोलला.

"हा हा हा. It's okay re. असो. मी मुग्धा परांजपे. नाशिकहून आले."

"हाय मुग्धा. मी विक्रम सगळे मला विकी म्हणतात. हा रोहीत, हा सौरभ, हा मिहीर आणि हे आमच्या मंडळाचे खंबीर कार्यकर्ते श्री आजित राव." मी आमच्या ग्रुपची ओळख करून दिली तसा पुढचा प्रश्न विचारला,

"तु नेमकी आमच्या ग्रुपकडे कशी आलिस? I mean वर्गात जवळ जवळ ७० लोक आहेत मग इकडे कशी?"

माझा प्रश्न संपतो ना संपतो तोच ती बोलली,

"अरे कॅंटिनला जेवायला म्हणून आले अन माझं नाव ऐकू आलं. म्हणून बघितलं तर तुम्ही माझ्यावर बोलताहात हे कळालं. कोणितरी आपली काळजी करतय असं कळाल्यावर थोडं छानं वाटलं. म्हणून लगेच तुम्हाला येऊन join झाले. आवडलं नाही का?"


"अगं तसं नाही. कृपया गैरसमज नको. आमच्या ग्रुप मधे तुझं स्वागत आहे! बोल काय घेणार. आज आमच्या सगळ्यांकडून तुला ट्रिट."

तर ही अशी आमची ओळख झाली मुग्धा परांजपेशी. थोडी "बिनधास्त" स्वभावाची पण समजुद्दर. अगदी पहिल्या भेटितच आम्हाला ती आमची एखादी खुप जुनी मैत्रिण असल्यासारखी वाटू लागली. काही लोकं खुप मोकळ्या स्वभावाचे असतात त्यातलीच एक ही मुग्धा परांजपे.

===============================================================================
मी आणि तु कथेचा हा चौथा भाग. पहिल्या तिन भागांना मिळालेला प्रतिसाद नक्कीच सुखद होता. बर्‍याच जणांचे कॉल आले, मेसेजेस आले. खरच तुमच्या सारखे वाचकच मला लिहिण्यास उत्स्फुर्त करतात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. आवडलाच तर "शेअर" किंवा "+१" नक्की करा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

Saturday, April 4, 2015

मी आणि तु ....(भाग ३)

बघता बघता आमचे घरटे सोडून उडण्याचे दिवस आले. कॉलेज तसं बरच दूरच्या ठिकाणी होतं. आपापलं सामान घेऊन आम्ही निघालो. ८ तासांचा प्रवास करून शेवटी तेथे पोहोचलो. एक छोटिशी खोली भाड्याने घेतली आणि आमचा जणू संसारच थाटला. आम्ही तिघेही पहिल्यांदाच घरापासून दूर राहणार होतो पण एकत्र असल्यामुळे घरच्यांची जास्त कमी भासणार नाही हे मात्र नक्की होतं. आम्ही तिघेही कॉलेजला जायचं या विचारानेच खुप excited होतो. कधी एकदा कॉलेज सुरू होईल असं झालं होतं.
बघता बघता कॉलेजचा पहिला दिवस आला. तिघेही मस्त आवरून कॉलेजला निघालो. आमच्या खोली पासून साधारण दोन किलोमिटरवर कॉलेज होतं. आम्ही टमटम  केली आणि कॉलेजवर पोहोचलो. कॉलेजची भली मोठी कमान आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. कमानीपासून कॉलेज बरच आत होतं. दुतर्फा झाडं आणि मधुन रस्ता. एकदम झकास campus होता. जूलै चे दिवस होते. पावसामुळे वातावरणात चैतन्य होतं. वातावरण इतकं सुंदर होतं की त्याचा अस्वाद घेता घेता कधी कॉलेजच्या मुख्य इमारतीपाशी आलो तेच कळालं नाही. ब्रिटीश कालीन दगडी बांधकाम असलेली मुख्य इमारत आणि बाजूने नव्याने बांधलेल्या सिमेंट्च्या इमारती यात दोन पिढ्यांचा फरक लगेच समजत होता. मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला एक मोठ वडाच झाड होतं. कदाचित ते झाड या इमारती इतकच जुनं असेल. त्याभोवती एक कट्टा होता आणि त्यावर काही टाळकी बसून गप्पा मारत होती. इमारतीच्या डाव्या बाजूस भलं मोठ्ठ २ व्हिलर पार्किंग होतं. पार्किंगच्या समोर कॉलेजच कॅंटिन होतं. पार्किंग आणि कॅंटिन यांच्या मधे कॉलेजचं दुसरं गेट होतं जे खास गाडी वाल्यांसाठीच होतं.

कॅंटिन दिसताच आज्याची भूक खवळली.

"अरे चला ना कायतर खाऊयात"  आज्या म्हणाला.
"आत्ता तर आलोय. आधी कॉलेजला जाऊ. आपण शिकण्यासाठी आलोत की खाण्यासाठी?" इति रोह्या.
"अये टॉपर. तु आला अस्शील शिकायला. मी पहिले खानार मगच आत येनार. आनि विक्या पन माझ्या सोबत येनार आहे. तुला यायच असल तर ये नायतर बस!"

थोडक्यात मला आज्याने चॉइसच ठेवली नाही. मला हाताला धरलं आणि रेटत त्याने कॅंटिनकडं नेलं. दुसरा पर्याय नसल्याने रोह्यापण आमच्या मागं आला. पत्र्याच्या शेडमधे टेबल खुर्च्या टाकल्या होत्या. मी पार्किंगकडे तोंड करून बसलो आणि ही दोघं माझ्या समोर. ऑर्डर दिली आणि आम्ही कॉलेज campus बद्दल गप्पा मारत बसलो. तोच एक चेहर्‍याला रुमाल बांधलेली, पिवळा टॉप आणि काळी जिन्स घातलेली मुलगी गाडी घेऊन गेट मधून आत आली. का कोणास ठाऊक पण माझी नजर तिच्यावरच खिळली. तिचा सुंदर बांधा, गोरे हात बघितल्या नंतर त्या रूमाला मागचा चेहरा बघण्याची जणू उत्सुकता लागली होती. तीने गाडी पार्क केली, आणि नेमकी माझ्याकडं पाठ करून आपला रूमाल काढला. आता कधी एकदा ती वळते आणि मी तिचा चेहरा बघतो असं झालं होतं मला. माझं लक्ष तिच्यावर इतकं खिळलं होतं की समोर दोघं काय बोलत होते ते काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यात आज्याच्या धक्क्याने पाण्याचा ग्लास कलंडला आणि पाणी माझ्या पायावर पडलं. मी लगेच बजूला झालो, पायावरच पाणी झटकलं आणि पहिले तिच्याकडे पाहिलं. पण ती तिथे नव्हती. मग मात्र आज्याचा खुप राग आला. तिचा चेहरा बघण्याचा chance या आज्यामुळं miss झाला होता. मग मागवलेला वडापाव खाल्ला आणि आम्ही आमची classroom शोधण्यासाठी निघालो.त्याक्षणापासून माझी नजर ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी शोधू लागली. मी मुलींकडे काळजीपूर्वक बघतोय हे बहुदा आज्याच्या लक्षात आलं.

"आयला. काय आजकालची पोरं. आजून कॉलेजला आलं न्हाई की लागली पोरी भापायला"

आज्याने डायलॉग टाकला तसा मी त्याच्याकड रागाने पाहिलं आणि परत माझी शोध मोहिम सुरू केली. वर्ग सापडला पण ती काय सापडली नाही. आम्ही वर्गात प्रवेश केला आणि थोडे बिचकलो. प्रचंड मोठी classroom होती. अगदी समोरचे २-४ बाक सोडले तर बाकी सगळे बाक गच्च भरले होते. नाईलाजास्तव आम्हाला समोरच्या बाकावर बसावं लागलं. रोह्या खुष होता पण आम्ही दोघ जाम नाराज. शाळेत कधी आम्ही समोरच्या बाकांवर बसलो नव्हतो आणि आता तर कॉलेजला आलो होतो आम्ही. कॉलेजमधे जाऊन समोरच्या बाकावर बसणे म्हणजे जणू आम्हा दोघांना आमचा अपमान झाल्यासारखेच वाटत होते. बाक मोठे होते, आज्या माझ्या आणि रोह्याच्या मधे बसला. बसतो ना बसतो तोच आज्याने रोह्याला जवळ खेचला आणि धमकी दिली,

"हे आज फस्ट आनि लास्ट! जास्त खुश होऊ नको. मी आनि विक्या परत समोरच्या बाकावर बसनार नाही. तुला बसायच असल तर तु बस."

"ए आज्या तु गप बस. तु तर बोलूच नकोस. तुझ्या अत्रुप्त पोटामुळे आपल्याला इथे बसाव लागतय. मी म्हणालो होतो की कॅंटिनला न जाता पहिले वर्गात जाऊ पण तुम्ही दोघ कधी माझ ऐकाल तर ना! आता बसा समोरच्या बाकावर. भोगा कर्माची फळं."

बहुदा आज्याकड यावर बोलण्यासाठी काही नव्हतं. तो गप्प बसला आणि मी इकड दोघांच बोलण ऐकून हसत होतो. तेवढ्यात teacher वर्गात आले आणि आमच्या इंजिनिअरिंग लाईफला थोडक्यात खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. विषयाची ओळख, exam pattern वगैरे मधे पहिला तास संपला. त्यानंतर हजेरी झाली आणि teacher निघून गेले. तसाच दुसरा तासही झाला, त्याचीही हजेरी झाली. त्यानंतर मधली सुट्टी म्हणजेच लंच ब्रेक झाला तसा पुर्ण वर्ग बाहेर जाण्यासाठी उठला. वर्गाला एकच दार होतं त्यामुळे दारापाशी एकदमच खुप गर्दी झाली. आम्ही तिघं गर्दी ओसरायची वाट बघत बाकावरच बसलो होतो तोच त्या गर्दीत मला ती ’पिवळा टॉप-काळी जिन्स’ घातलेली मुलगी दिसली पण पुन्हा पाठमोरी. तीचा चेहरा काही दिसला नाही त्यामुळं मी थोडा नाराज झालो पण ती माझ्याच वर्गात आहे आणि लंच ब्रेक संपल्यानंतर ती पुन्हा मला दिसू शकते हे लक्षात आल्यानंतर मात्र मी गालातल्या गालातच हसलो.

मी या दोघांनाही लंचसाठी घाई केली आणि आम्ही तिघे वेळेच्या आधीच पुन्हा वर्गात येऊन बसलो. आज्याने नेहमी प्रमाणे मला माझ्या या विचित्र वागण्याबद्द्ल शिव्या घातल्या पण सध्या मला त्याहुनही महत्वाच होत की त्या मुलिचा चेहरा बघणं. वर्गात आल्या आल्या मी सगळीकडे नजर टाकली आणि खात्री केली की ती अजून वर्गात आली आहे की नाही आणि ती आजून आली नव्हती. मग सुरू झाला तीचा "इंतजार".

प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता आणि शेवटी तो क्षण आलाच. ती माझ्यासमोर होती. गोरा रंग आणि अगदी सुंदर रेखिव चेहरा.  ती समोरून जात असताना मी तिच्या थेट डोळ्यात बघत होतो आणि तिही माझ्याकडच बघत होती. नकळत मी तिच्याकड बघून हसलो आणि तिही नकळत हसली आणि हसताना तिच्या गालावर सुरेख खळी पडली. इतका सुंदर चेहरा आणि त्यात खळी म्हणजे "सोनेपे सुहागा" कशाला म्हणत असतील त्याचं उदाहरण जणू माझ्या समोर होतं. मी जणू तंद्री लागल्यासारखा तिच्याकड बघत होतो.

"आयला काय item आहे. मला जाम आवडली. आता हिला मी कटावनार"

आज्याच्या या comment ने माझी तंद्री मोडली. तिला item म्हणालेलं तर मला मुळीच आवडलं नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या बाकावर बसे पर्यंत तिला बघत राहिलो. आता पुढचा प्रश्न होता की तिचं नाव काय? आणि त्याला solution पण होतच. पुढचा तास सुरू झाला पण माला उत्सुकता होती ती हजेरिची. कधी एकदा तास संपतोय आणि teacher हजेरी घेतात असं झालं होतं मला. शेवटी तास संपला आणि हजेरी सुरू झाली आणि तिचं नाव कळालं, सारिका रानडे.

मी जणू तिच्या प्रेमातच पडलो होतो. "लव्ह ऍट फ़र्स्ट साईट" म्हणतात अगदी तसं. त्या क्षणापासून मी फक्त तिचाच विचार करत होतो. डोळ्यासमोर फक्त मला तिच दिसत होती. बघता बघता पहिला दिवस संपला. तिची एखादी झलक दिसते का हे पाहण्यासाठी माझी नजर तिला त्या गर्दित शोधू लागली. ती दिसली तशी माझी धसधस शांत झाली. ती नजरेआड होई पर्यंत मी तिला बघत राहिलो. बहुतेक मी तिच्याकडच बघतोय हे आज्याच्या लक्षात आलं.

"ए नळकांड्या! माझ्या item कडं का बघायलायस?"
"item item काय लावलयस रे. सारिका नाव आहे तिचं"
"च्यामायला तुला तिच नाव पन कळलं?  तिच्यावर डोळा नको ठेऊस. ती माझी आहे. आपलं भांडन होईल."
"ए चल बे निघ. म्हणे ’माझी आहे’. अरे जा ना"

आमचा दोघांचा फालतूपणा बहुतेक रोह्याला नाही आवडला.
"तुम्ही दोघ गप बसा. आजुन पहिला दिवस संपतोयच की तुमचं सुरू झालं. आज्याचं समजु शकतो पण तु रे विक्या. तु कधी पासून बदललास? मुलींकडं कधी न बघणारा तु, कधी पासून मुलीबद्दल भांडायला लागलास? बर ते जाऊदे. तुम्ही दोघांनी एक गोष्ट नोटिस केली काय?"

"काय?" आम्ही दोघं एकदम म्हणालो.
"आज सगळे present होते पण फक्त एकजणच नव्हती"
"नव्हती? आयला आमाला शाहानपन शिकवतोय आनि स्वता पन पोरिंची काळजी करतोय. आं रे माझ्या वाघा! "

आज्याने बरोबर रोह्याला पकडलं.

"अरे तस नाही रे. कॉलेजचा पहिला दिवस कोण कसं काय miss करू शकते हे मला समजलं नाही. म्हणून तिचं नाव लक्षात राहिलं."
"हां रे! कुकुलं बाळ समजलास काय अमाला? म्हंजे मला tough fight आहे इथे पोरी भापायला" आज्या म्हणाला.
"ए अज्या गप रे. रोह्या तु बोल. कोण ती बिंडोक जीने हा पहिला दिवस miss केला?"

"मुग्धा परांजपे."
===================================================================================

 मी आणि तु ....(भाग १) आणि  मी आणि तु ....(भाग २) ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. मी आणि तु .... या दीर्घकथेतला हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा तिसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Friday, March 20, 2015

मी आणि तु ....(भाग २)



आजपासून साधारण ८ वर्षांपूर्वी............


"विक्या !!!! अरे ए विक्या!! उठलास का ??"
"अगं झोपू दे ना ग आई. काय रोज रोज लवकर उठवतेस!"
"अरे रोहीत आलाय. टेंशनमधे दिसतोय. पाठवू का वर त्याला?"
"हो हो. पाठव!"

रोहीत धावत माझ्या खोलीमधे आला.

"अरे विक्या!! चल आवर लवकर!!"
"का रे? काय झालं? सगळ ठिक ना?"

"कसलं आलय ठिक? आपले मजनू पुन्हा जीव द्यायला निघालेत. चल लवकर. मला काय आवरेना तो. तुच चल लवकर"
"आयला! काय रे याच रोज रोजच नाटक? उडी मारायच्या विचारानं ओली होते याची आणि हा म्हणे जीव देणार!"
"अरे विक्या चेष्टा नको रे करू. Please चल लवकर."
"अरे चेष्टा नायतर काय करू! दिसली पोरगी की पडला प्रेमात! अरे शेजारचा तो दिड वर्षाचा बबलू चालायला शिकताना जेवढा पडला नसेल तेवढा हा गृहस्थ प्रेमात पडला असेल!"
"विक्या जोक मारू नको. तु येणारेस की मी जाऊ?"
"आयला! तुम्ही दोघंपण ना एकदम ऍंटिक पीस आहात. चल हो पुढ, मी येतो तोंड धुवुन."
------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------


"विक्या अरे किती वेळ लावलास?"
"हम्म्म! बर कुठयेत साहेब?"
"कुठ असणार? तो बघ तिकडं. कड्यावर बसलाय"
"हम्म्म! ठिक आहे! यावेळी मीच ढकलतो त्याला! म्हणजे रोज रोज माझी झोप मोड नको"
"अरे ए विक्या! अरे येडा झालायेस काय?’
"मग काय तर! वैताग आलाय मला याचा"

मी तसा एकदम बारीक शरिरयष्टीचा होतो. त्यामुळे त्या कड्यावर चढायला जास्त वेळ नाही लागला. पण प्रश्न हा होता की हा जाडा आज्या कसा काय तिथं पोहचला असेल. मी त्याच्या जागी असतो तर एकतर जीव द्यायची जागा बदलली असती नाहीतर सरळ प्लॅनच कॅंसल केला असता. असो. मी धापा टाकत शेवटी कड्यावर पोहचलो. रूमाल काढला, बसायची जागा झाडली आणि आज्याच्या शेजारी बसलो. नेहमी प्रमाणे महाराज शुन्यात नजर लावून बसले होते.

"काय मस्त हवा आहे नाही आज्या?"
"हम्म्म्म !"
"अरे ते बघ ते तुझ घर! केवढस दिसतय नाही इथुन?"
"हम्म्म्म!"
"अरे ते बघ......"
"विक्या! नळकांड्या! उगाच नेहमी सारखं फालतू बडबडू नको. आधीच मुड नाय माझा!"

माझ्या "सुद्रुढ" शरिरयष्टीमुळे "नळकांड्या" हे माझं नामकरण आज्यानेच केलं होतं.

"बर बाबा! sorry! बोल काय मॅटर यावेळी?"
"काय नाय सोड ना!"
"बर ठिक आहे. बर मला सांग तु उडी मारतोयेस की मी ढकलू? एकदाच काय ते करून टाक."
"अरे ए भुसनाळ्या! इथ तुज्या जिगरी दोस्ताच्या लाईफ़चा सवाल हाय आनि तु हे बोलतोयेस? हिच काय तुझी यारी?"
"आता मग काय करू सांग? विचारलं तर भाव खातोयेस!"
"मग प्रेमानं विचारायच! आगोदरच प्रेमभंग झालाय आनि तु त्यात......"
"कितीवेळा प्रेमभंग होतो रे तुझा? बर यावेळी कोण होती ती कमनशिबी जिनं आमच्या वाघाला नाकारलं?"

एक हलकं स्मितहास्य अज्याच्या चेहर्‍यावर मला दिसलं. बहुतेक "वाघा"ची उपमा एकदम योग्य जागेवर बसली! Bull's eye का कायतर म्हणतात ना, तसं!!

"अरे ती मानेंची रेश्मा आहे ना..."
"ती? ती आवडली तुला ? ती बरोबर मुलगी नाही. तुझ्यासाठीतर मुळीच नाही"  आज्या बोलायच्या आतच माझ्या तोंडून नकळत बाहेर पडलं.
"ए नळकांड्या! माझी लाईन आहे ती! काय बोललास तर बघ तिला!"
"अरे माझ्या राजा! ती आगोदरच एंगेज आहे! पानपट्टीवाला बबन आहे तिचा छावा"
"म्हणजे? तुला पण माहित होत? कधी बोल्ला नाईस मला? आणि तिनं त्या बबन्यासाठी मला नाकारलं? मला?"
"आता मला काय माहित यावेळी तुझा नेम तिकड लागणार आहे? आणि ’तुला पण’ म्हणजे? आणखी कोणाला माहित आहे?"
"अरे तस नाय! ती पण हेच म्हणाली की मी एंगेज आहे. माझा नाद सोड!"
"चायला आज्या तुझं डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाल्लय की? तिला विचारून मोकळा पण झालास?"
"अरे मंग काय? रेशनच्या लाइनमधे समोरच उभी होती. दुकान उघडायला वेळ होता म्हणून विचारून टाकलं?"
"वाह! बर हे तुझ प्रेमप्रकरण कधीपासून सुरू होतं?"
"सकाळी ७ ला मी लाईनमधे तिच्यामागं उभारलो. साडे ७ वाजले असतिल, ती मला आवडली. ८ वाजता प्रेमात पडलो. साडे आठला प्रपोज केलं आणि ९ वाजता ब्रेकप झालं"
"आता मी एक काम करतो. मीच उडी मारतो इथुन. घरी माझ्या आईला सांग मला या जीवनाचा साक्षातकार झाला आणि मी स्वेच्छेने देहदान केलं"
"ए विक्या! कानपाड फोडेन असलं काय बोल्लास तर! अपला जिगरी आहेस तु! अरे अशा ५६ मुली येतिल परत लाईफमधे पन तुझ्यासारखा जिगरी नाय मिळनार मला!"

आज्याच्या डोळ्यातलं आलेलं टुचुकभर पाणी सगळं काही सांगून गेलं. आज्याच्याच भाषेत बोलायच झालं तर "जिगरी" या शब्दाचा खरा अर्थच जणू मला  समजला.

"बर बाबा! चुकलं माझं. पण काय हा तुझा फालतुपणा? कोणपण दिसली की कसाकाय प्रेमात पडतोस? आणि नाही यश आलं की चाल्लास जीव द्यायला."
"काय करू सांग! frustration आलय. कोणच होकार देत नाय!"

"अरे जरा धिरानं करायच्या असतात या गोष्टी. घाई गडबड करून काही मिळणार नाही."

"ऐका कोन सांगालय!"

"तुला काय समजायचय ते समज! पण एक promise कर की परत हे ’प्रेमात पडायच, मग प्रेमभंग की लगेच जीव देण्याची धमकी’ बंद करायच!"

"प्रेमात नपडायच promise काय करनार नाही पन ते जीव वगैरे काय देनार नाही. आईची शप्पत. सुटल्या म्हन"
"सुटल्या"

आज्या आणि मी तिथुन उठलो. हळू हळू कडा उतरला. खाली रोह्या हाताची बोटं मोडत चिंतेत उभा होता. आम्हाला दोघांना ’जिवंत” खाली येताना बघून त्यानं उसासा टाकला आणि पळत येऊन आम्हाला मिठी मारली. आज्याच्या पोटात दोन बुक्क्या घातल्या आणि आम्ही तिघे परत घरी निघालो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

हे असं आमचं त्रिकुट. उभ्या पंचक्रोषीत परिचित होतं. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायची आमची तयारी होती. अगदी प्राथमिक शाळेपासून आम्ही एकत्र होतो. रोह्या अभ्यासात खुप हुषार होता. चांगले मार्क्स मिळाले असतानाही त्याने त्याच्या वडलांचे नऐकता मला आणि आज्याला ज्या कॉलेजमधे admission मिळाली तेथेच admission घेतली. तिघही लवकरच आपापली घरटी सोडून दुरच्या ठिकाणी जाणार होतो. Engineering हे आम्हा तिघांनाही घ्यायचं होतं आणि नशिबाने आता आम्ही तिघही एकाच college मधे, एकाच वर्गात शिकणार होतो. तिघांच्याही मनात खुप स्वप्न होती आणि एकमेकांची साथ असताना बाहेरच्या जगाची तर चिंताच नव्हती..... !

================================================================================


मी आणि  तु  ....(भाग १) ला मिळालेला प्रतिसाद खरच अनपेक्षित होता. आता या मी आणि  तु  ....(भाग २) पासून कथेला गुंफण्याचा अवघड प्रयत्न सुरू होत आहे. हा भागही आपल्याला आवडेल अशी आपेक्षा करतो. हा दुसरा भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा. :)


-अद्वैत कुलकर्णी

Monday, March 16, 2015

मी आणि तु ....(भाग १)

“Good Morning Pune! सकाळचे ८ वाजले आहेत आणि मी विकी आपल्या सर्वांच आपल्या लाडक्या Talk With Vikcy कार्यक्रमात स्वागत करतो. वाह! आज काय मस्त वातावरण आहे नाही? मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मी मस्त गरमा गरम चहा पित तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त गाण्यांचा नजराणा....! आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , एखादे  गाणे ऐकायचे असेल किंवा तुमच्या some one special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चलातर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडत्या गाण्याने, “चिंब भिजलेले...From movie बंध प्रेमाचे”.

गाणं सुरू झालं तसा मी off Air गेलो. आज खरच खुपच सुंदर वातावरण होतं . बाहेर मस्त रिमझीम पाऊस सुरू होता  पण रेडिओ स्टुडिओच्या या बंद रूममधे तेही AC मधे बसून तो feel आणणं जरा कठिणच जातं होतं . चहा नेहमी प्रमाणे माझ्या आवडीचा म्हणजेच फक्त दुधाचा बनवला होता . एकदम फक्कड!

“विकी SSS!!! कॉल यायला सुरू झाले आहेत. कुठयं लक्ष?” ,राजू सरांच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यांना एक स्माईल दिली अणि पुन्हा On Air गेलो.

“मग मंडळी! कशी झाली दिवसाची सुरूवात. I hope या गाण्याने तुम्हाला नक्कीच फ्रेश केलं असेल. काय म्हणताय? अजून गाणी ऐकायची आहेत? मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. चला तर बघू आज आपला पहिला caller कोण आहे!

“Hello, मी विकी, तुमच Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. आपलं नाव कळू शकेल का?”

“Hi विकी. मी पुनम”

“Hi पुनम. कशी आहेस?”

“मी मस्त. तु कसा आहेस?”

“मी पण एकदम बेस्ट! बर मला सांग तु काय करतेस?”

“मी सध्या इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात आहे. CoEP ला कंप्युटर सायन्सला”

“अरे बापरे! तो आज सुभह सुभह इंजिनिअरसे पाला पडा हे! बचके रेहना पडेगा रे बाबा...! हा हा हा! मग बोल कोणत गाण ऐकायच आहे तुला?”

“Actually मला हे गाण डेडिकेट करायच आहे. Some one special ला.”

“oh! Awesome. याला म्हणतात दिवसाची perfect सुरूवात. बोल कोणतं गाणं ऐकवू?”

“मला “यंदा कर्तव्य आहे” मधिल “आभास हा” ऐकवायच आहे”

“ओह ग्रेट पुनम. मस्त चॉईस. I hope तुझा some one special हा कार्यक्रम ऐकत असेल. Thank you for your call. Now playing “आभास हा !!” from movie यंदा कर्तव्य आहे.”

गाणं पुन्हा सुरू झालं. तसा मी offline झालो. आज पहिलाच caller आपल्या someone special साठी फर्माईश घेऊन आलेला बघुन खुप छान वाटलं. चहाचा घोट घेत घेत या कपलचं एक काल्पनिक चित्र रेखाटत बसलो. चहा झाला म्हणून कप टेबलावर ठेवायला गेलो आणि नकळत अंदाज चुकला आणि कप खाली पडला. माझ्या व्हिलचेअर वरून मला खाली पडलेले तुकडे गोळा करता येत नव्हते. माझी वायफळ धडपढ बघून राजू सरांनी काचेपलिकडूनच “Let it be. Programकडे लक्ष दे ” असा इशारा केला. तसा मी माझी व्हिलचेअर पुन्हा निट सेट करून गाण संपायची वाट बघत बसलो.

आज खुपच call येत होते. ते बघून एक सुखद हास्य नकळत गालावर खुललेलं. आपला show बराच लोकप्रिय आहे हिच जणू त्याची एक पावती असते. तेवढ्यात गाणं संपलं. आता पुन्हा माझी on air जायची वेळ झालेली.

“काय मग पुणेकर! कशी वाटली पुनमची फर्माईश. तिच्या Someone special. अरे बाबा हा कर्यक्रम ऐकत असशील तर बघ पटकन पुनमला call कर! अशी special सगळ्यांच्याच नशिबी नसते रे बाबा! हा हा! चला आता next caller कडे वळू. त्या आधी एक reminder; आपल्याला जर माझ्याशी मस्त गप्पा मारायच्या असतिल , कोणते गाणे ऐकायचे असेल, पुनम सारखं तुम्हालाही तुमच्या someone special ला डेडिकेट करायचे असेल तर लगेच फोने उचला आणि डायल करा ९८४५६५५०५०. बर बघु आपला next caller कोण आहे ते.

“Hello. मी विकी, तुमचं Talk With Vicky कार्यक्रमात स्वागत आहे. बोला काय म्हणताय?”

“Hi Vicky. Thank God you finally picked my call”

“oh! माझं नशिब खुप छान आहे मग आज”

“Naah! Actually I was trying to reach you since last many years”

“हाहाहा! काहीही काय राव! हा कार्यक्रम सुरू होऊन तर अजून वर्षही झालं नाही.”

“Nope dear. I know you personally”

“काय राव सकाळ सकाळी थट्टा! मी काही एवढाही famous नाही की माझे fan followers असतिल”

“नाही. I am serious. I know you better than anyone in this world”

“oh! आईला तर English येत नाही माझ्या. आणि तिचा आवाज एवढा यंगही नाही. त्यामुळे तु माझी आई तरी नक्कीच नाहीस. आणि तिच्याशिवाय मला कोणी ओळखत असेल असं मला नाही वाटत. तरीही चला बघूच. चल, माझा आवडता रंग सांग”

“लाल.”

“Oh! Correct! Wild guess han!!!, चल आता सांग आवडतं फुल”

“सोनचाफा”

“Unbelievable! पुन्हा बरोबर. बरं आवडत ठिकाण?”

“मनाली”

“आवडता लेखक?”

“पु.ल. देशपांडे”

“आवडता अभिनेता?”

“आमिर खान”

मी प्रश्न विचारत होतो अन ती  एका पाठोपाठ एक अचुक उत्तरं देत होती. प्रत्येक अचुक उत्तरासोबत माझी बैचेनी वाढतचं होती. माझ्या अपघातानंतर गेले ४ वर्ष मी आणि माझी आई पुण्यात राहायला आलो होतो. ना कोणी जवळचा मित्र ना मैत्रिण. तरिही ही माझ्याबद्दल एवढ कसं जाणत होती? शेवटी मला राहावल नाही.

“बाई मी हारलो! कोण आहेस तु?”

“मी बोल्ले होते की I know you better than anyone. पण तु अजूनही सुधारला नाहीस! तसाच आहेस!”

“पण तु आहेस तरी कोण?” आता तर मी पुर्णतः बैचेन झालो होतो. तेवढ्यात तिकडून आवाज आला

“मुग्धा. मुग्धा परांजपे.”

एक जबरदस्त धक्का! स्टुडिओ मध्ये स्मशान शांतता! विकी पुर्ण  shock मधे.................!

==========================================================================

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहितोय. डोक्यात बऱ्याच दिवसांपासून एखादी दीर्घकथा लिहायची इच्छा होती ती इच्छा  या  "मी अणि तु"  दीर्घकथेद्वारे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. हा पहिला भाग कसा वाटला ते मला नक्की कळवा.

-अद्वैत कुलकर्णी

Friday, April 18, 2014

सावर रे मना


ना सांज ना पहाट,
मनी विचार तुझे मोकाट
किती घालू मना मी आवर,
हे हृदया तुच मज सावर.

सांग तुझ्या यातना त्या वेड्या मना,
ज्या त्याने ना कधी भोगिलेल्या
नको देऊस पुन्हा त्यास रमू,
आठवणिंत तिच्या उरलेल्या.

असतिल जरी शब्द तिचे मधूर,
आता नको मनी नव अंकूर
लागे जरी तो चेहरा हवासा,
नाही उरला तेथे तुला दिलासा.

विसर रे मना,विसर तिला आता
नाही जागा तुला तिच्या हृदयी आता
नाही उरली आता कसलिच आशा
ना कळली कधीच तिला तुझ्या प्रेमाची भाषा.

-अद्वैत कुलकर्णी

Monday, January 20, 2014

चार शब्द...!

आज जवळजवळ १ वर्ष झालं मला माझ्या ब्लॉगपासून दूर राहून. आजपासून पुन्हा ब्लॉगिंगला वेळ द्यायचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने हे चार शब्द....!

तसं बघितलं तर बरच काही बदलल या वर्षभरात. काही आपले दुरावले तरी काही नवे जवळ आले. जे आपल्या अगदी जवळ हवे हवे असणारे, नजाणे का पण नजरेआड झाले. प्रत्येकाला आपली "स्पेस" हवी असतेच म्हणा. आसो! आशा आहे जे जवळ आहेत ते जवळच राहोत.

या वर्षाच्या सुरूवातीस मनात "संकल्पा"ची कल्पना आलेली पण दरवर्षी "न-होणारे" संकल्प करण्यापेक्षा ते न केलेलेच बरे अशी समजूत काढून त्यांपासून दुरच राहयचे ठरवले आहे (संकल्पच म्हणा ह्याला हवं तर). गेलं वर्ष तसं बघितलं तर फार काही चांगलं गेलं नाही पण का कोणास ठाऊक फारच लवकर गेल्यासारखं वाटतय. अजून २०१४ लिहायला हात वळतच नाहीये. होईल सवय हळू हळू. येणार्‍या वर्षात बरच काही अनुभवायला मिळणार याची खात्री आहे आणि मीही त्यासाठी तयार आहे.

असो..! भाषणातले नसंपणारे चार शब्द न बनवता ही पोस्ट इथेच उरकती घेतो. लवकरच भेटू नव्या पोस्टस सोबत! उशीरा का होईना पण तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

Friday, April 19, 2013

( मराठी चित्रपट ) प्रेमाची गोष्ट : मला नाही भावला!

आज जवळ जवळ १० महिन्यांनंतर ब्लॉग लिहितोय. बरच काही घडलं या कालावधित. त्यातिल काही किस्से नक्कीच शेअर करेन. पण आज ब्लॉग लिहायला घेतलाय तो नुकताच बघितलेल्या मराठी चित्रपटावर. सध्या मराठी चित्रपटांना सुगिचे दिवस आलेले दिसताहेत. "हिरवं कुंकु(?), माहेरचा शालू" वगैरे टिपिकल चित्रपटांना बाजूला सारून नविन धाटणिचे चित्रपट प्रदर्शित होताना पाहून नक्कीच चांगलं वाटतयं. काहींनी तर राष्ट्रिय पातळीवरिल पुरस्कार देखिल पटकवले आहेत. जिथे क्वचितच एखादा मराठी चित्रपट दिसायचा असा वर्तमानपत्राचा चित्रपट विभाग आजकाल मराठी चित्रपटांनी गच्च भरलेला दिसतो. खरच या गोष्टी सुखावणार्‍या आहेत.

मध्यंतरी फ़ेसबुकवर अतुल कुलकर्णी असल्याचे समजले. तसा मला आवडणार्‍या अभिनेत्यांपैकी एक. लागलीच त्यांना सब्स्क्राईब झालो. काही दिवसातच त्यांच्या अकाऊंटवर सतत " प्रेमाची गोष्ट" या शब्दाचा वापर वाढलेला दिसू लागला. पहिल्यांदा मला ते एखादं नाटक असावं किंवा टिपिकल मराठी सिरियल असेल असे वाटले पण जेव्हा अतुलजींनी हा फोटो अपलोड केला तेव्हा कल्पना आली की हा मराठी चित्रपट दिसतोय. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवर केवळ याच चित्रपटाची पब्लिसिटी होती. लवकरच प्रदर्शितही झाला. पहिल्यांदा जेव्हा हा पोस्टर पाहिला तेव्हा ती नायिका कोणीतरी नविन वाटली पण जेव्हा समजलं की ती घाटगे कन्या आहे तेव्हा पहिले तर विश्वासच बसला नाही. कारण "चक दे" मधला तिचा चेहरा आणि या चेहर्‍यात खुप फरक वाटला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर विचारायलाच नको इतक्या लोकांच्या कमेंट्स अतुलजींच्या अकाऊंटवर बरसू लागल्या. इतक्या छान छान कमेंट्स वाचून लवकरच चित्रपट सहपरिवार पाहायच निश्चित केलं. त्यात राजवाडेंचे दिग्दर्शन म्हणजे "सोनेपे सुहागा"च असणार असा एक विश्वास वाटू लागला. एवढ कौतुक ऐकल्यानंतर आपोआपच माझ्या आपेक्षा खुपच वाढल्या. "मुंबई-पुणे-मुंबई" ने माझं मन जिंकलेलं त्यामुळे राजवाडेंचा हा चित्रपटही तसाच हिट असणार अशी एक आशा वाटू लागली. नेहमीप्रमाणे "घरगुती" कारणांमुळे चित्रपट पहायला सवड मिळालीच नाही. शेवटी "TV वर येइल तेव्हा पाहू" अशी स्वतःची समजुत काढून घेतली आणि खरच खुपच लवकर हा चित्रपट TV वर दाखवला गेला. गेल्याच आठवड्यात स्टार प्रवाहवर दाखवला गेला. (तो स्टार प्रवाहवर दाखवला जाणारे हे देखिल मला अतुलजींच्या अकाऊंटवरूनच कळालं :D ). मॉंसाहेबांच्या  डेली सोपच्या टाईट शेड्युलमधून कसा बसा वेळ काढला आणि सहपरिवार चित्रपट पाहायला बसलो.

आधीच आपेक्षा एवढ्या उंचावल्यामुळे सुरुवातीपासूनच नाविन्य शोधत होतो. कदाचित नविन कहितरी बघायला मिळणार हिच मानसिकता तयार झालेली. राजवाडेंच्या बाबतीतली एक गोष्ट मला खुप आवडली ती म्हणजे "सिंप्लीसिटी". कोणताही भव्यदिव्य सेट नाही, विनाकारण न पेलणारे खर्च नाहीत. फक्त पुर्ण फोकस चित्रपटातील पात्रांवर! सुरूवात बरी वाटत असतानाच घाटगे बाईंची एंट्री झाली. पोस्टर नक्कीच फोटोशॉप एडिट केले असणार याची क्षणात खात्री पटली कारण मुळात मला या बाईंचा चेहरा कधी "नायिका" म्हणून आवडला नाही. आसतिल या दिसायला सुंदर पण मला कधीच सुंदर वाटल्या नाहीत. तेवढ्यात या बाईंचा पहिला डायलॉग कानावर पडला. अरररर..........! चेहरा ठिक आहे पण कसला आवाज आणि कसलं मराठी. पुर्ण निराशा झाली. या बाईंना साधं नीट मराठीही बोलता येत नाही आणि आवाजात काही चढ-उतारही नाही. एखाद्या नाटकात काम करत असल्यासारखा यांचा अभिनय. एकिकडे अतुलजी. एक परफ़ेक्ट अभिनेता. सुरुवातीपासूनच ते त्यांच्या "कॅरेक्टर"मधे इन्हाल्व्ह झालेले दिसले. आवाजात योग्य चढ-उतार, अचुक क्रिया-प्रतिक्रिया या त्यांच्या अभिनयाने समाधान वाटले.

अनपेक्षितपणे राजवाडेंची एंट्री देखिल छान वाटली. असंभव मधिल त्यांचा अभिनय पाहिला होता त्यामुळे चांगल्या अभिनयाची आपेक्षा होती  आणि सपोर्टिंग रोल असुनही त्यांनी ती योग्य पद्धतीने पुर्ण केली. चित्रपट जसजसा पुढ जात होता तस तशा मला घाटगे बाई जास्तच खुपु लागल्या. सारखे मनात विचार यायला लागले की याच मिळालेल्या काय राजवाडेंना? त्यांच्या जागी कितीतरी चांगल्या नायिका मराठी फिल्म इंडस्ट्रिमधे आहेत. कदाचित मुक्ता बर्वे देखिल चालल्या असत्या किंवा गिरिजा ओक देखिल नक्कीच घाटगे बाईंपेक्षा त्यांच्या रोलला जास्त न्याय मिळवून देऊ शकल्या असत्या. असो. तसच सहन करत मी चित्रपट पाहात होतो. एकदोन गाणी कानाला श्रवणिय वाटली पण मेंदूपर्यंत गेली नाहीत. "कधी तु, का कळेना" इत्यादी गाणी थेट मेंदूपर्यंत गेली तशी ही गाणी खास वाटली नाहीत.

चित्रपटात अतुल कुलकर्णी हे कथालेखक दाखविले आहेत. त्यात त्यांचा एक डायलॉग काहीसा या आशयाचा आहे की "चित्रपट असा असावा की प्रेक्षक त्यात गुंतुन जाईल. पुढे काय होणार याची उत्सुकता राहिल" पण हिच मला या चित्रपटात असलेली कमतरता वाटली. मुळात ते लिहित असलेली कथाच या चित्रपटाची कथा असल्याने लागलीच पुढे काय होणार याचा सहज अंदाज बांधता येत होता. तरी कथेला "ट्विस्ट" द्यायचे प्रयत्न चांगले वाटले. संपुर्ण चित्रपटात झालेले कॅमेरावर्क, एडिटींग, दिग्दर्शन नक्कीच आवडले. चित्रपटाची "पिक्चर कॉलिटी" देखिल उत्कृष्ट आहे. चित्रपटातील इतर सहाय्यक कलाकारांचे अभिनयही उत्कृष्ट वाटले आणि त्यांच्या त्या सुंदर अभिनयामुळे घाटगे बाईंचा अभिनय मला जास्तच साधारण वाटू लागला.

ओव्हर ऑल पाहता चित्रपट ठिक वाटला. जेवढं कौतुक मी चित्रपट पाहायच्या आधी ऐकलेलं, वाचलेलं त्यामानाने तर अजिबातच हा चित्रपट मला भावला नाही. मला कल्पना आहे की अगदी क्वचितच लोक माझ्या मताशी सहमत असतिल  पण राजवाडेंच्याकडून मला कदाचित जरा जास्तच आपेक्षा असतात.

असो! मी या चित्रपटाला रेटिंग देईन: ३/५

Saturday, July 7, 2012

मास्टरपिस: I Too Had a Love Story


लेखक: रविंदर सिंग
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Srishti Publishers & Distributors


मध्यंतरी परिक्षेच्या नादात वाचन पुर्णपणे बंद होतं. महिना-दोन महिने वाचन नसल्यामुळे आपोआपच काहितरी वाचावस वाटू लागलं. घरची आई-आजोबांनी वाचुन संग्रहित केलेल्या पुस्तकांची अतुल्य लायब्ररी जरी असली तरी जास्तीत जास्त पुस्तकं ही एकतर अध्यात्म ज्याचा माझ्याशी दुर-दुर चा संबंध नाही :D आणि ती सोडली तर राहिलेली थोडी फार जुनी-नवी पुस्तकं. पण वयाचा परिणाम म्हणा किंवा अचानक आलेली हुक्की पण "Love Story" वाचाविशी वाटू लागली. मित्रांकडेही काही पुस्तकं होती पण ती काय रुचली नाहीत. मग सहज फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि "I Too Had a Love Story" हे National Best Selling Book च्या यादित दिसलं. पुस्तक खरेदी करणार्‍यांचे रिव्ह्यु वाचले तर सर्वांनी ४/५ स्टार दिलेले. मग कोणताही विचार न करता घेतलं विकत.

२ दिवसांत पुस्तक माझ्या हातात होतं. लगेच घेतलं वाचायला. प्रस्तावना वगैरे गाळून डायरेक्ट कथेलाच हात घातला. ४ इंजिनिअरिंगचे मित्र, बर्‍याच दिवसांनी एकत्र येतात. जवळ-जवळ ४ वर्षांनी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल झालेला असतो. मग इकड-तिकडच्या गप्पा. वगैरे- वगैरे. सुरवात वाचल्यावर वाटू लागलं "च्यायला, अजुन एक " 5 point Someone" दिसतयं." थोडासा निराष झालो. पण आता घेतलयं एवढ्या हौसेने तर वाचलं तरी पाहिजेच! मग परत घेतलं वाचायला आणि तोच माझा सगळ्यात योग्य निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. I Too Had a Love Story या पुस्तकाला मी "एक मास्टरपिस" असं म्हणेन.

कथेचा नायक रविन म्हणजेच स्वतः लेखक रविंदर सिंग. एक पंजाबी इंजिनिअर. वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड पण अजुनही बॅचलर. मित्रांच्यात पैज लागते की कोण पहिले लग्न करणार! साधारण नायक हा लग्नाच्या विचारातही नसलेला पण मित्रांना त्याच्यावरच खात्री असते की "आमच्यात पहिले लग्न तुझेच होणार!". मग मित्रांच्यात इंटरनेट विश्वात घडणार्‍या नव्या क्रांती विषयी चर्चा होते आणि विषय निघतो "मॅट्रीमोनिअल साईट" म्हणजेच "विवाहसंस्था संकेतस्थळ" www.Shadi.com बद्दल. चौघांपैकी फक्त एकच मित्र या नव्या पद्धतिच्या बाजूने असतो तर नायकासह उरलेले तिघे त्याच्या विरोधात. पण तो मित्र या तिघांना पटवून देतो की आपण आपल्यासाठी कशी साथिदार हवी आहे हे दिलेल्या categories मधून अगदी एका click सरशी बघू शकतो वगैरे वगैरे. पण तरिही हे लोक काही त्याच बोलण ऐकून घेत नाहीत.

नंतर थोड्या दिवसांनी नायक सहज मजा म्हणून त्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल बनवतो. नंबर वगैरे देतो, त्याला कशी मुलगी पाहिजे वगैरे माहिती भरतो. सगळ व्यवस्थित झाल्यावर ते संकेतस्थळ त्याला क्षणात त्याच्या अपेक्षा पुर्ण करणार्‍या मुलिंची यादी दाखवते. हा प्रकार पाहून तोही हदरतो की इतक्या झटक्यात माझी "ड्रिमगर्ल" तेही इतक्या "ऑपशन्समधे" ? मग त्यातल्या बर्‍याच जणिंशी संपर्क साधतो. काही उत्तर देतात. काहिना तो आवडतो तर त्याला त्यातली कोणिच नाही आणि एके दिवशी त्याची "परफेक्ट मॅच" त्याला भेटतेच.

त्या दोघांच्यात पहिले मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होते. एकमेकांना प्रत्यक्षात कधिही न पाहता देखिल ते एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. थकवणारे दोघांचे शेड्युल असले तरी रात्र-रात्र फोनवर गप्पा मारण्यात घालवू लागतात. त्यांचा रोमांस वा़चताना खरोखरच मजा येते. माझ्या नशिबी अजुनतरी असलं काही नाही आलं (लवकर येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ;) )पण तरिही वाचताना खुप मजा आली. एक विशेष म्हणजे कोठेही "वासना" दिसली नाही आणि हिच या लेखकाबद्दलची आवडलेली गोष्ट. अगदी सरळ साधं निर्मळ प्रेम. आणि तेही इतकं की एकमेकांना न बघताही एकमेकांना साताजन्माचे जिवनसाथी मानू लागलेले.

पुस्तक खुप सुंदर सुरू होतं. ते दोघे एकमेकांसाठीच जणू बनले असतिल, कोणाची द्रुष्टच लागावी असं त्यांच प्रेम. पण काय कोणास ठाऊक त्यादिवशी मला कोणती विपरित बुद्धी झाली. अचानक बसल्या बसल्या प्रस्तावना वाचली. आणि त्यात लिहिलेलं "प्रत्येक प्रेमकहाणी ही पुर्ण होतेच असं नाही!" ..... बस्स......! माझ्या काळजाचा ठेका चुकला. हा काय प्रकार आहे? नेमकं काय झालं असेल त्यांच्या प्रेमाला? कोणाची नजर लागली असेल? नायिका नायकाशी "टाईमपास" तर करत नसेल? किंवा तिची ती प्रोफ़ाईल ज्यावर नायकाने विश्वास ठेवला ती खोटी तरी नसेल? की आणखी काही.....? सतराशेसाठ शंका मनात आल्या. एकेक पान वाचताना ह्रदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. परिक्षा जवळ आल्यावर जशी भिती वाटते तशी काहिशी भिती वाटू लागली. आणि खरच सांगतो अशी प्रेमकथा कोण्या दुष्मनावरही येऊ नये. ;(

एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्‍यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, स्वतःचं आयुष्य जीच्यावर ओवाळून टाकते तिच व्यत्की जेव्हा मिळत नाही तेव्हा होणारे ते दुःख खरच अंगावर काटा आणते. माझ्यासारखा कठोर मनाचा (माझ्या आईच्या भाषेत "दगड" :)) ) असलेलाही वाचताना कित्येकवेळा डोळ्यात अश्रू काढतो यावरच या लेखकाची ही लेखणी किती प्रभावशाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचा शेवट नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.

मला पुस्तक इतकं आवडलं की मी नेटवर आणखी माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा समजलं की ही त्या लेखकाची "सत्यकथा" आहे. मी त्या नायिकेचाही शोध घेतला. मजा म्हणजे त्या नायिकेचा फेसबुकवर "फॅनपेज" आहे आणि मी ही त्याला "Like" केलय! तेवढ्यात मला या कथेचा पुढचा भाग फ्लिपकार्टवर दिसला. आता तोही मागवला आहे. लवकरच वाचून त्याचाही रिव्ह्यु ब्लॉगवर प्रसिद्ध करतो.


का वाचावे
एक निर्मळ प्रेमकथा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे "सत्यकथा". माझ्या वयाच्याच काय पण अगदी प्रौढांनाही वाचताना मजा येईल. कदाचित त्यांच्या पर्सनल Love Stories ज्या पुर्ण झाल्या - नझाल्या त्या ताज्या होतिल. ;) खरच म्हणतात ना "Life never stops" . वाचताना आपणच नायक आहोत असा काहिवेळा मला भास झाला इतकं प्रभावी लेखन! माझ्यामते हे एक "Must Read" पुस्तक आहे.

का वाचू नये

तसे काहीच कारण नाही. आणि द्यायचेच झाले तर तुम्ही "ब्रम्हचारी" असाल तरच वाचू नका असे म्हणावे लागेल! :D :))
ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. "Must Read" पुस्तक.  मी या पुस्तकाला रेटिंग देईन:


-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, July 2, 2012

असच काहितरी....!

                          आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, April 2, 2012

हे दिवस परत कधी येणार???


अंड्याची हुशारी पुन्हा कधी अनुभवणार?
अन राजाची दादागिरी कोण विसरणार?
बंड्याचा "इमोशनल" झटका कोण सहन करणार?
अज्याचा वैचारिक फटका कोण विसरणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

राहुल्याटी सारखे "इ-अपडेट्स" कोण पुरवणार?
टंग्याच्या टंग्या कोण पचवणार?
पोप्या चॅटिंग कधी सोडणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

श्यागीच्या भन्नाट जोक्सवर पुन्हा कधी हसणार?
शितल्याचे "वन साईडेड फोटो" कोण काढणार?
धन्याच्या लॉजिकला चॅलेंज कोण देणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

किर्ल्याला कोणती आयटम मिळणार?
दिप्याला सर्टिफिकेट्स कशाचे मिळणार??
सेनाला ड्रायविंग कोण शिकवणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

आश्याच्या शिव्या कोण खाणार?
पशाला कोणता "डाव" आवडणार?
म्हैशाचं भविष्य कोण ऐकणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

अमल्याच "सचिन प्रेम" कोण सहन करणार?
मैर्‍याचं भन्नाट हास्य पुन्हा कधी ऐकणार?
अमर्‍या सबमिशन गुरु पुन्हा कधी होणार?
अन रंज्याच्या "स्किमा" कोणाला कळणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

सद्या नेमका कोणासोबत सेटल होणार?
बिल्डरला टिप्स कोण विचारणार?
विशल्याला खरं प्रेम कधी भेटणार
अन तेज्याचा जुना आवाज कधी ऐकणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

खुंख्याचे पॉईंट कोणाला कळणार??
राहुल्याएनला कॅज्युल मधे कधी बघणार?
वर्ध्यासारखी शांत व्यक्ती कधी भेटणार?
अन निर्‍याला कोण सांभाळणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???


बघता बघता दिवस हे असे सरले,
न कळत अश्रू डोळ्यांत उरले.
दुःख म्हणू की काय मलाच कळत नाही,
पण तुम्हांसारखे "यार" सर्वांनाच मिळत नाहीत!



-अद्वैत उमेश कुलकर्णी

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...