Showing posts with label पासपोर्ट ऑफिस. Show all posts
Showing posts with label पासपोर्ट ऑफिस. Show all posts

Sunday, March 6, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 3)

फक्त ८च काउंटर असताना हे १०वे आले कोठून? म्हणून परत गर्दितून वाट काढत तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारले. तो मला बाहेर घेऊन आला आणि त्याने एका रांगेकडे बोट केले. त्याला पुढे विचारणार तोच तो पुन्हा गर्दित कोठेतरी निघून गेला. मग माझी बाहेर ठेवलेली बॅग घेऊन ऑफिस बाहेर पडलो. तिथे एक हवालदार होते. नाव वाचले तर "महाराष्ट्रीयन" होते. म्हणलं चला कोणी तरी मराठी आहे इथे! त्यांना विचारलं तर त्यांनी त्या मघाशच्या इंक्वायरी रांगेकडे बोट केले. मला काहिच कळेना. मी म्हणालो "आहो अत्ता तर तिथेच उभा होतो. तुमच्याच माणसाने मला बाहेर काढून आत नेले. आता आतले साहब म्हणताहेत पुन्हा रांगेत राहू? " आणि तोपर्यंत मी जिथे पहिले उभा होतो त्याच्या मागे पुन्हा ५० लोक उभे होते! आणि रांग अतिशय संथ सरकत होती. त्याक्रमाने माझा नंबर येणे अशक्यच होत. तरिही मी त्या हवलदारांना समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो तेवढ्यात ते म्हणाले "तुम्ही घरी जा किंवा काहिपण करा! तुमची मर्जी जी ते करा!"  आणि चक्क त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले! !

मग मात्र डोकं सटकलं. अरे ही काय भाषा झाली काय बोलायची? इथे काय मजा म्हणून आलो आहे का एवढ्या लांबून? मान्य आहे की हजार लोकं इथे येतात पण म्हणून काय हे असे बोलायचे आणि असा अपमान करायचा? ज्या परभाषिक गार्डना मनात शिव्या घालत होतो ते मात्र सगळ्यांना आदबिने बोलत होते. भांडकोर माणसांना देखिल व्यवस्थित हाताळत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अपमान न करता! मग हे महाशय कोण? असतिल पोलिस म्हणून काय झालं?

हा अपमान पचेना! तात्पुरता रांगेत जाऊन जाग धरून उभा राहिलो. लगेच बाबांना फोन केला, घडला प्रकार सांगितला. बाबांनी फक्त एकच विचारलं , "तु ऑफिसमध्ये आहेस की बाहेर पडला आहेस?" ;मी म्हणालो "रांगेत उभा आहे!". झालं!! त्यानंतर बाबांनी जे मला झाडलय ते मी सांगू शकत नाही! त्यांच एकच वाक्य सांगतो "तु भांडायला कधी शिकणार?" झालं! एवढच पुरे होतं! डोकं आधिच भडकलेलं त्यात बाबांनी झाडलेल. काही नाही, मागच्या माणसाला माझी रांगेतली जागा धरायला सांगितलं आणि थेट त्या मिश्यावाल्या गार्डवर सगळा राग काढला! आणि हो! शुद्ध मराठीत! माझा दंगा ऐकून तिथल्या रांगेतल्या काही सदगृहस्थांनी देखिल माझी बाजू घेतली. ही गोष्ट मात्र नवल वाटली. कारण जे काही "पुणेकरांबद्दल" ऐकले होते त्याला साफ तडा दिला या लोकांनी. त्यावेळी अभिमान वाटला पुणेकरांचा.

मग काय तो "बिचारा" गार्ड मागे सरकला आणि त्याने दुसर्‍या गार्डला बोलावून मला आतून १० नंबर काऊंटरकडे नेले. माझा मलाच आतून अभिमान वाटत होता! काय भांडलो सॉलिड आपण!  :D , तिथल्या साहेबांनी फक्त १० मिनिटांत माझी कागदपत्रे तपासली, "रिसिव्हड" असा शेरा मला आलेल्या पत्रावर दिला आणि मला जाण्याची परवानगी दिली. तरी मी पुन्हा पुन्हा २-४ वेळा "मला परत यावे लागणार नाही ना?" विचारून खुंटा बळकट केला! मग काय मस्त छाती पुढे काढून ऐटित अगदी एखादा किल्ला जिंकल्यासारखा ऑफिसमधून बाहेर पडलो. पहिले बाबांना फोन करून काम झाल्याचे सांगितले आणि स्पेसिफिकली "भांडलो" या शब्दावर जोर दिला! :) मग लगेच मिळेल ती गाडी धरून स्वारगेट आणि नंतर घर!

अशी झाली माझी "Tour-de-passport office" . एक वेगळाच अनुभव देऊन गेली. एका दृष्टीने खुप काही शिकवूनही गेली; "जर तुम्ही सत्य असाल तर बिनधास्त असत्याचा विरोध करा;आपल्या हक्कासाठी लढा". हा अनुभव नक्किच मला माझ्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार यात काही शंकाच नाही.

तर हा झाला माझा अनुभव! कदाचित तुम्हाला याहुनही वेगळा; चांगला किंवा कदाचित याहुनही वाईट अनुभव आला असेल. तर तुमचे अनुभव नक्की इथे कमेंटस मध्ये शेअर करा!
-अद्वैत
marathi

Friday, March 4, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 2)

ठरवल्याप्रमाणे वेळ काढून १ तारखेला जायचे निंश्चित केले. सकाळी १० ते १२ अशीच वेळ असल्याने पुण्यात मुक्काम करावा लागणार हे फिक्स होते. म्हणून आदल्या दिवशी म्हणजेच २८ फेब. ला मिळेल ती गाडी धरून जायचे पक्के केले. एक प्रकारचा उत्साह होता. कारण अशी वन डे ट्रिप या आधी एकट्याने पुण्याला कधीच केली नव्हती. थोडी मजापण वाटत होती. कारण पुण्याचे पासपोर्ट ऑफिस पाहणार होतो ना! खुप अपेक्षा होत्या. ऑफिस असे असेल, एवढे असेल वगैरे वगैरे!

२८ ला रात्री १० ला मामाकडे पोहोचलो. रिक्षावाल्याने गंडवण्याचा प्रयत्न केला पण आधिच सावध असल्याने त्याचा इरादा मी हाणून पाडला! :D  जेवण वगैरे आटोपल्यावर मामा म्हणाला "तुला ९:३०लाच जावे लागेल. खुप गर्दी असते! नंबर लवकर मिळाला तरच काम होईल. नाहितर पुन्हा दुसर्‍या दिवशी जावे लागेल." दुसर्‍या दिवशी "महाशिवरात्री" होती. त्यामुळे ऑफिसला सुट्टी. आणि ३ तारखेपर्य़ंत थांबणे मला शक्य नव्हते! त्यामुळे १ तारखेला सकाळी ९:३० ला रिक्षाने पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. जाताना वाटेत पुण्याची सकाळ पाहिली. सगळीकडे गडबड, कलकलाट, गाड्या, चिल्ली-पिल्ली कोंबून भरलेल्या रिक्षा, नोकरदार वर्गांचे त्रासलेले चेहरे, बापरे! इथे राहणे माझ्यासारख्या गावातून आलेल्याला पटतच नाही. आपण बरे नि आपले गाव बरे! :)

रिक्षातून उतरल्यावर ती पासपोर्ट ऑफिसची बिल्डिंगबघून एक गाणे आठवले, "खन से जो टुटे कोई सपना, जग सुना सुना लागे..." :D काय राव! काय ती अवस्था! इतक्यात आत डोकाउन पाहिले! अबबब...! मारुतीच्या शेपटा एवढी ती रांग. अंदाजे ३००-४०० लोक होते तिथे. ९:३० ला ही अवस्था तर १० नंतर काय होत असेल याची कल्पना करून अंगावर काटा आला. आत गेल्यावर दिसले किती ते दारिद्र्य. तोपर्य़ंत मी जी काही "पासपोर्ट ऑफिस"ची कल्पना केली होती ती पार चिंध्या झाली! २-४ रांगांत लोक उभे होते. कोठे उभाराहावे ते कळेना म्हणून तिथल्या एका भारदार मिश्याच्या सेक्युरिटी ऑफिसरला विचारले तर तो हिंदीतुनच बोलू लागला. मी तरिपण मराठीच बोलत होतो कारण आमचं हिंदी म्हणजे "वो समुद्रमे पड्या और पोहके काठपर आया" या लेवलचे. पण गडी हिंदी काही सोडेना. म्हणून दुसर्‍या गार्डला विचारले तर तो पण हिंदीच. झालं! डोक्यात "मनसे"पणा संचारला पण मला गरज होती म्हणून मोडकं तोडक हिंदी बोलून रांग विचारली. जे नको होते तेच झाले. त्याने तिथल्या सगळ्यात मोठ्या "इंक्वायरी" रांगेकडे बोट केले.

नशिबाला दोष देत गप उभा राहिलो तिथे. अंदाजे माझ्यापुढे ६०-७० लोक असतिल. एक अर्धा तास उभा राहिलो; तेवढ्यात काही पुणेरी लोकांचे "सुसंवाद" सुरू झाले. विषय होता रांगेतली त्यांची जागा. मी सरळ दुर्लक्ष करत मोबाईल खेळत बसलो. तेवढ्यात एक गार्ड लाईन सरळ करायला आला. मी तोपर्य़ंत आणलेली कागदपत्रे आणि पत्रात सांगितलेली कागदपत्रे यांची वारंवार तपासणी करत होतो. तेवढ्यात त्याने माझ्या हातातले पत्र पाहिले आणि म्हणाला "आप इधर क्यो खडे हो? वाहासे डाइरेक्ट अंदर जाओ". आणि एक आनंदाचा धक्का! झपकन सगळी कागदपत्रे बॅगेत कोंबली आणि ते पत्र तिथल्या गार्डला दाखवून सरळ आत गेलो. छान वाटत होतं. कारण नंबर येऊ पर्यंत निदान ११ तरी वाजलेच असते.

जेवढी लोकं बाहेर होती तेवढीच किंबहुना जास्तच लोकं आत होती. सगळीकडे गरम होत होते. आतल्या गार्डने मला एका रांगेत क्रमाने बसायला सांगितले. जवळ जवळ अर्धातास झाला तरी ते साहेब आले नव्हते. साधारण ११च्या सुमारास साहेब आले. मग एक-एक करत करत ११:३० वाजता मी आत केबिनमध्ये गेलो. त्यांना ते मला आलेले पत्र दिले आणि सांगितलेली कागदपत्रे काढूपर्यंत त्यांनी ते पत्र मला परत दिले आणि म्हणाले "१० नंबर काउंटरवर कागदपत्रे सबमिट करा". मला थोडे नवलच वाटले. त्यांनी ते पत्र पाहिले तरी का? याची शंका होती पण कदाचित त्यांना सवय असेल असे मानून मी केबिनच्या बाहेर पडलो. आणि ते बरोबरच असणार. कारण दररोज माझ्यासारखे पत्र आलेले ढिग लोक निःश्चितच येत असणार.ते ऑफिस म्हणजे अक्षरश: खुळ्यांचा बाजार वाटत होता! काय ती गर्दी, ते "सुसंवादा"चे आवाज. त्यातुन वाट काढत १० नंबर काउंटर शोधत पुढे जात होतो. पण तिथे तर फक्त ८च काउंटरस होती.
क्रमश:

Tuesday, March 1, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 1)

एप्रिल २०१० दरम्यान गावातल्याच एका एजंटला धरून "मिशन पासपोर्ट" सुरू केले. आई,बाबा आणि माझा अश्या तिघांचे पासपोर्ट काढण्याची जबाबदारी त्याला दिली. शेवटी एजंटच तो, थोडे खिसे गरम करावे लागले पण आशा होती काम सुखाने पार पडेल. त्यानेही अगदी उत्साहात कामाचा श्रीगणेशा केला. लागलीच फॉर्म भरून घेतला, हवी असलेली डॉक्युमेंट्सची लिस्ट दिली, आम्हीही तातडीने सर्व कागदपत्रे त्याच्याकडे सुपुर्त केली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळ-जवळ १ महिना गेला. पण खुष होतो कारण पासपोर्ट येणार होता.एजंटने सांगितले, " काहिनाही बगा सायेब, जास्तीत जास्त दोन महिनं लागतिल बगा पुलिस इंक्वायरी यायला आनि त्यानंतर १ मइन्यात पासपोर्ट तुमच्या हातात!". चला म्हटलं एकदाची काम झाले.

२ महिने झाले,३ महिने झाले आजुन काही पत्ता नाही पोलिस इंक्वायरीचा. शेवटी ४ महिन्यांनी बाबांनी त्याला फोन केला तर माहाशयांचे उत्तर, "अवो काय करनार सायेब, ते नवं आपिसर आलय आन त्यानं सगळी डोक्योमेन्टस परत पाठवलियेत. आता मी त्यी परत पाठवालोय". त्यावेळी थोडी भिती वाटली कारण सगळी ओरिजिनल डॉक्युमेंटस त्याच्याकडे होती, पण त्याने सांगितल्याप्रमाणे त्यानंतर २ महिन्यांनी पोलिस इंक्वायरी झाली, सगळे कागद तपासून साहेबांनी केस "क्लिअर" केली आणि सांगितले की २ महिन्यांत पासपोर्ट मिळेल.

त्यादिवसानंतर पासपोर्ट स्टेटस रोज बघायचा जणू नादच लागलेला. साहेबांनी सांगितल्यानुसार एक-दिड महिन्यांनी आई आणि बाबा दोघांचे स्टेटस बदलून "Passport is dispatched" असे झाले पण आजून माझा स्टेटस "Police inquiry is pending" असाच होता. २ आठवड्यात दोघांचे पासपोर्ट आलेपण, पण माझ्या स्टेटसमध्ये काहिच बदल नाही. थोडी चिंता वाटली म्हणून पोलिस ठाण्यात जाऊन साहेबांची गाठ घेतली तर कळाले की माझी कागदपत्रे फेरपडताळणीसाठी आली आहेत! आणखी एक धक्का! पण साहेबांनी काही त्रास दिला नाही, लगेच पुन्हा क्लिअर करून पाठवली.

गेल्या महिन्यात म्हणजे साधारण २२-२३ जानेवरी २०११ दरम्यान स्टेटस बदलून "Passport will dispatched on 28th January 2011" असा आला! खूप आनंद झाला! नंतर २८ तारिख गेली, २९ गेली, असे करत करत २० फेब्रुअरी आली पण स्टेटस आजून तसाच. पोस्टात जाउन आलो तर तिथेही पासपोर्ट आला नव्हता. पण २१ तारखेला एक पत्र आले. पासपोर्ट ऑफिसकडून होते ते! आणि त्यात लिहिले होते की "तुमच्या राहत्या पत्त्याची पडताळणी पुणे पासपोर्ट ऑफिसमध्ये सोम-शुक्रवार सकाळी १० ते १२ या दरम्यानच येऊन पूर्ण करावी. ही पुर्तता तीस दिवसांच्या आत न झाल्यास तुमची फाईल बंद केली जाईल!". लागलीच मी पत्रावरची तारिख बघितली तर ती १७/१/२०११ अशी होती! आणखी एक धक्का! कारण ते पत्रच मला ३४ दिवसानंतर मिळालेलं! म्हणले ३० दिवसाची मुदत मला ते पत्र मिळण्याआधीच उलटून गेली होती!  मला कळायचेच बंद झाले! हा काय प्रकार! २०-२५ डॉक्युमेंटस देऊन देखिल पुन्हा पत्त्याच्या पडताळणीसाठी तिच डॉक्युमेंटस घेऊन जायची? तेही अडिचशे किलोमिटरचा प्रवास करून? आणि फाईल चालू ठेवली आहे याची शाश्वती नाहीच! पण काहीही झाले तरी पासपोर्टचे काम होते म्हणून जायचे निश्चित केले!

क्रमश:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...