फक्त ८च काउंटर असताना हे १०वे आले कोठून? म्हणून परत गर्दितून वाट काढत तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारले. तो मला बाहेर घेऊन आला आणि त्याने एका रांगेकडे बोट केले. त्याला पुढे विचारणार तोच तो पुन्हा गर्दित कोठेतरी निघून गेला. मग माझी बाहेर ठेवलेली बॅग घेऊन ऑफिस बाहेर पडलो. तिथे एक हवालदार होते. नाव वाचले तर "महाराष्ट्रीयन" होते. म्हणलं चला कोणी तरी मराठी आहे इथे! त्यांना विचारलं तर त्यांनी त्या मघाशच्या इंक्वायरी रांगेकडे बोट केले. मला काहिच कळेना. मी म्हणालो "आहो अत्ता तर तिथेच उभा होतो. तुमच्याच माणसाने मला बाहेर काढून आत नेले. आता आतले साहब म्हणताहेत पुन्हा रांगेत राहू? " आणि तोपर्यंत मी जिथे पहिले उभा होतो त्याच्या मागे पुन्हा ५० लोक उभे होते! आणि रांग अतिशय संथ सरकत होती. त्याक्रमाने माझा नंबर येणे अशक्यच होत. तरिही मी त्या हवलदारांना समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो तेवढ्यात ते म्हणाले "तुम्ही घरी जा किंवा काहिपण करा! तुमची मर्जी जी ते करा!" आणि चक्क त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले! !
मग मात्र डोकं सटकलं. अरे ही काय भाषा झाली काय बोलायची? इथे काय मजा म्हणून आलो आहे का एवढ्या लांबून? मान्य आहे की हजार लोकं इथे येतात पण म्हणून काय हे असे बोलायचे आणि असा अपमान करायचा? ज्या परभाषिक गार्डना मनात शिव्या घालत होतो ते मात्र सगळ्यांना आदबिने बोलत होते. भांडकोर माणसांना देखिल व्यवस्थित हाताळत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अपमान न करता! मग हे महाशय कोण? असतिल पोलिस म्हणून काय झालं?
हा अपमान पचेना! तात्पुरता रांगेत जाऊन जाग धरून उभा राहिलो. लगेच बाबांना फोन केला, घडला प्रकार सांगितला. बाबांनी फक्त एकच विचारलं , "तु ऑफिसमध्ये आहेस की बाहेर पडला आहेस?" ;मी म्हणालो "रांगेत उभा आहे!". झालं!! त्यानंतर बाबांनी जे मला झाडलय ते मी सांगू शकत नाही! त्यांच एकच वाक्य सांगतो "तु भांडायला कधी शिकणार?" झालं! एवढच पुरे होतं! डोकं आधिच भडकलेलं त्यात बाबांनी झाडलेल. काही नाही, मागच्या माणसाला माझी रांगेतली जागा धरायला सांगितलं आणि थेट त्या मिश्यावाल्या गार्डवर सगळा राग काढला! आणि हो! शुद्ध मराठीत! माझा दंगा ऐकून तिथल्या रांगेतल्या काही सदगृहस्थांनी देखिल माझी बाजू घेतली. ही गोष्ट मात्र नवल वाटली. कारण जे काही "पुणेकरांबद्दल" ऐकले होते त्याला साफ तडा दिला या लोकांनी. त्यावेळी अभिमान वाटला पुणेकरांचा.
मग काय तो "बिचारा" गार्ड मागे सरकला आणि त्याने दुसर्या गार्डला बोलावून मला आतून १० नंबर काऊंटरकडे नेले. माझा मलाच आतून अभिमान वाटत होता! काय भांडलो सॉलिड आपण! :D , तिथल्या साहेबांनी फक्त १० मिनिटांत माझी कागदपत्रे तपासली, "रिसिव्हड" असा शेरा मला आलेल्या पत्रावर दिला आणि मला जाण्याची परवानगी दिली. तरी मी पुन्हा पुन्हा २-४ वेळा "मला परत यावे लागणार नाही ना?" विचारून खुंटा बळकट केला! मग काय मस्त छाती पुढे काढून ऐटित अगदी एखादा किल्ला जिंकल्यासारखा ऑफिसमधून बाहेर पडलो. पहिले बाबांना फोन करून काम झाल्याचे सांगितले आणि स्पेसिफिकली "भांडलो" या शब्दावर जोर दिला! :) मग लगेच मिळेल ती गाडी धरून स्वारगेट आणि नंतर घर!
अशी झाली माझी "Tour-de-passport office" . एक वेगळाच अनुभव देऊन गेली. एका दृष्टीने खुप काही शिकवूनही गेली; "जर तुम्ही सत्य असाल तर बिनधास्त असत्याचा विरोध करा;आपल्या हक्कासाठी लढा". हा अनुभव नक्किच मला माझ्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार यात काही शंकाच नाही.
तर हा झाला माझा अनुभव! कदाचित तुम्हाला याहुनही वेगळा; चांगला किंवा कदाचित याहुनही वाईट अनुभव आला असेल. तर तुमचे अनुभव नक्की इथे कमेंटस मध्ये शेअर करा!
-अद्वैत
marathi
No comments:
Post a Comment