Monday, July 2, 2012

असच काहितरी....!

                          आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Monday, April 2, 2012

हे दिवस परत कधी येणार???


अंड्याची हुशारी पुन्हा कधी अनुभवणार?
अन राजाची दादागिरी कोण विसरणार?
बंड्याचा "इमोशनल" झटका कोण सहन करणार?
अज्याचा वैचारिक फटका कोण विसरणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

राहुल्याटी सारखे "इ-अपडेट्स" कोण पुरवणार?
टंग्याच्या टंग्या कोण पचवणार?
पोप्या चॅटिंग कधी सोडणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

श्यागीच्या भन्नाट जोक्सवर पुन्हा कधी हसणार?
शितल्याचे "वन साईडेड फोटो" कोण काढणार?
धन्याच्या लॉजिकला चॅलेंज कोण देणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

किर्ल्याला कोणती आयटम मिळणार?
दिप्याला सर्टिफिकेट्स कशाचे मिळणार??
सेनाला ड्रायविंग कोण शिकवणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???

आश्याच्या शिव्या कोण खाणार?
पशाला कोणता "डाव" आवडणार?
म्हैशाचं भविष्य कोण ऐकणार?

खरच हे दिवस परत कधी येणार???

अमल्याच "सचिन प्रेम" कोण सहन करणार?
मैर्‍याचं भन्नाट हास्य पुन्हा कधी ऐकणार?
अमर्‍या सबमिशन गुरु पुन्हा कधी होणार?
अन रंज्याच्या "स्किमा" कोणाला कळणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

सद्या नेमका कोणासोबत सेटल होणार?
बिल्डरला टिप्स कोण विचारणार?
विशल्याला खरं प्रेम कधी भेटणार
अन तेज्याचा जुना आवाज कधी ऐकणार?
खरच हे दिवस परत कधी येणार???

खुंख्याचे पॉईंट कोणाला कळणार??
राहुल्याएनला कॅज्युल मधे कधी बघणार?
वर्ध्यासारखी शांत व्यक्ती कधी भेटणार?
अन निर्‍याला कोण सांभाळणार??
खरच हे दिवस परत कधी येणार???


बघता बघता दिवस हे असे सरले,
न कळत अश्रू डोळ्यांत उरले.
दुःख म्हणू की काय मलाच कळत नाही,
पण तुम्हांसारखे "यार" सर्वांनाच मिळत नाहीत!



-अद्वैत उमेश कुलकर्णी

Monday, January 9, 2012

ड्रिमगर्ल.....!

सकाळ-सकाळी मस्त पेपर वाचत पडलो होतो. आजचे राशीभविष्य  "वाद संभवतात. वाहने सावकाश चालवा. आर्थिक लाभ संभवतो. एकतर्फी प्रेमात निराशा संभवते" आणि तेवढ्यात मोबाईल वाजयला लागला. आतल्या काचेच्या कपाटात ठेवला होता. कोणत्यातरी मित्राचाच असणार असे मानून तो उचलायला म्हणून उठलो. प्रोजेक्टचे काम सुरू आहे त्यामुळे त्यासंबंधीच काहितरी असणार असा डोक्यात काहिसा विचार येऊन गेला. मोबाईल बाहेर काढून कोणाचा आहे हे बघीतलं आणि दोन मिनिट बधीरच झालो. तो तीचा फोन होता! हो! खरच तीचा फोन होता. मी पुन्हा-पुन्हा स्पेलिंग चेक केलं, ते तिचच नाव होतं......

आपलं मन किती वेगात धावतं नाही? तो फोन वाजत असताना माझं मन तिच्या विचारातच बुडून गेलं. तिने आज पहिल्यांदाच स्वतःहुन फोन केला होता. तसा मीही थोडा लाजराच, त्यामुळे स्वतःहुन मीही कधी तिला फोन करत नाही पण एवढ्या सकाळी तिने फोन केला हा थोडा धक्काच होता. एकीकडे मन मस्त स्वप्नं बघत होतं आणि अचानक एका विचाराने सगळा काळ स्तब्ध झाल्यासारखा वाटला. मघाशी वाचलेलं भविष्य आठवलं!!  आजचे राशीभविष्य ;एकतर्फी प्रेमात निराशा संभवते. 

"माझ्या तिच्या विषयीच्या feelings तिला कळाल्यातरी नाहीत ना?" हाच प्रश्न डोक्यात अचानक पैदा झाला. काहीच कळत नव्हतं.  तसं झालं असेल तर हा कॉल तिने चिडून तरी केला नसेल ना? आणि सांगितलं तरी कोणी सांगितलं? कारण तिच्या बद्दलच्या माझ्या feelings मला आणि माझ्या बेस्टफ्रेंडसनाच माहितीयेत आणि त्यांच्याकडून तिला कळणं तसं अशक्यच. आणि ती जर खरच चिडली असेल तर ती आमची इतक्या वर्षांची मैत्री तरी तोडणार नाही ना? माझ्या एका बावळटपणामुळे  खरच माझी एक मैत्रीण मी गमावणार तरी नाही ना? अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात घरं करायला सुरूवात केली.

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद झाली. मी थोडासा बिथरलेलो. त्यामुळे फोन miss झाल्याचा किंचित आनंदच झाला. मनाची तयारी करत होतो. चिडली असेल तर कशी समजूत घालायची..... कशी माफी मागायची... वगैरे वगैरे! तेवढ्यात पुन्हा फोन वाजयला लागला. पुन्हा तिचाच होता. मनाशी ठरवलं की काहीही होऊदे फोन उचलायचाच.

थोडा घाबरत घाबरतच उचलला...

"हॅलो! अद्वैत?"
स्स्स्स्स्स्स!! तिचा तो मस्त नाजूक आवाज! वाटलं ऐकतच राहावं, बोलूच नये!
"हहह... हॅलो!"
"हॅलो! कायरे? कुठे गायब होतास? फोन का उचलला नाहीस?"
"ते मी, मी, ते, जरा बबब..बाहेर होतो."
"बरा आहेस ना? असा का अडखळतो आहेस?"
"नाही तसं काही नाही, मी मस्त आहे. बोल काय काम काढलस?"
"का रे? कामाशिवाय कॉल करू शकत नाही काय कोणी?"

आता मला काहीच सुचत नव्हतं. एक तर असा अचानक कॉल आणि त्यात ती चिडल्यासारखीही वाटत नव्हती. आणि आतातर अगदी जीवाभावाची मैत्री असल्यासारखी बोलत होती. का कोणास ठाऊक पण थोडं awkward वाटत होतं. कारण माझ्या फोनला आणि माझ्या कानांना असल्या नाजूक शब्दांची सवयच नाही! कारण मला कॉल करणारे माझे परम् मित्रलोक एखादी सणसणीत कोल्हापूरी शिवी घातल्याशिवाय पुढे बोलतच नाहीत. तशी स्टाईलच आहे इकडे. त्यामुळे हे असे शब्द जरा नविनच होते.

"अगं तसं नाही ग! आज पहिल्यांदाच कॉल केलास ना! म्हणून मला वाटलं काही काम काढलस काय माझ्याकडं"
"अरे नाही रे. कॉलेजचे जुने फोटो बघत होते. तु दिसलास. So आठवण झाली म्हणून केला कॉल. तु काय कधी करत नाहीस, मग म्हटलं मीच करावा!"

आतातर मी जाम खाली पडायचाच राहिलो होतो. हे काय घडतय माझ्यासोबत? आठवण? आणि तिला? आणि तीही माझी? अरे हे काय नेमकं चाललय तरी काय?

"माझी आठवण? काहीच्या काही! एवढं आमचं नशीब कुठे? बाय द वे कोणते फोटो?"
"तुम्हाला येत नसली तरी आम्हाला येते आमच्या फ्रेंड्सची आठवण. अरे ते फोटो आपल्या फर्स्ट इयरच्या कार्यक्रमाचे आहेत रे. काहीतरी समाजसेवा करायला गेलो होतो की आपण सगळे जवळच्या गावी. तिथले आहेत. सहज कपाट आवरताना दिसले. बोल, आणखी काय चालू आहे सुट्टीत?"
"अरे बापरे! ते फोटो आहेत होय तुझ्याकडं! ग्रेट! बाकी काही नाही बघ ! निवांत आहे. सध्या प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे. फुल्ल बिझी आहे त्यात. कदाचित या सेमिस्टरला कॉलेज करणारही नाही. बहुतेक तशी परवानगी मिळेल आम्हाला कॉलेजकडून कारण तसा प्रोजेक्ट आहेचे आमचा!"
"भारीये बुवा तुमचं"
"मग? वाटलो काय तुला आम्ही?"
"मी तरी एक दिवस सुद्धा कॉलेज बंक करणार नाही. आफ्टरऑल लास्ट सेमिस्टर आहे आपली. पुन्हा आयुष्यात कुठे कॉलेज करणारे? आणि कोण फ्रेंड कुठे भेटेल किंवा भेटेल की नाही हे काहीच सांगता येत नाही."
"हम्म्म.. खरय तुझ! आम्ही तरी सध्या फुल्ल एंजॉय करतोय बघ! बाकी ? बोल आणखी काय नविन?"
"काही नाही. भरपुर शॉपिंग केली या वेळी. बाबांच्या खिशाला मोठी कात्री लावली. भरपुर ड्रेस घेतले. ज्वेलरी घेतली. नुसती खरेदी केली."
वगैरे , वगैरे....
असे इकडचे-तिकडचे भरपुर बोलणे झाले. माझा मलाच विश्वास बसत नव्हता की मी एखाद्या मुलीशी बोलू शकतो आणि तेही अर्धा तास? सटर-फटर गप्पा झाल्यानंतर तिच्या एका वाक्याने मी सुन्न झालो...

"मग कधी भेटुयाल?"

मी खरच नीट ऐकलं ना? की माझे कान वाजले?

"काय म्हणालीस?"
"अरे मी म्हणाले कधी भेटुयात? बरेच दिवस झाले भेटलो नाहीत आपण."


आता मात्र माझी अवस्था बघण्यासारखी होती. माझ्या फिलिंग्स तिला नक्की कळाल्या आहेत आणि बहुतेक तिचाही होकार आहे असा काहिसा विचारही मनात येऊन गेला पण परत मनाला आवरलं! उगाच तिच्या मनात निर्मळ मैत्री असेल आणि माझ्या या बावळटपणामुळे त्यावर मला पाणी पडू द्यायच नव्हतं.

"भेटुयाल? बरी आहेस ना? असच एकदम काय सुचलं? "
"अरे काही नाही. असच वाटलं भेटावसं. म्हणून. आणि तुला काही हरकत असेल तर राहुदे"

हरकत? आणि मला? ती कशाला असेल?

"अगं नाही नाही. तसं नाही. मी कॉलेजला दररोज येतोचे प्रोजेक्टसाठी. भेटूयाल कॅंटिनमधे!" 
"ए.. नाही. कॅंटिनमधे नाही. तुझ्या त्या ग्रुपने आपल्याला पाहिलं तर गावभर करतील आणि काहीपण चिडवतील"
"ए! तसे नाहीयेत माझे मित्र. तशी चेष्टा चालायचीच की. असो! तुला नको असेल तर राहुदे. नको कॅंटिन. मग कुठे भेटायच?"
"उद्या संध्याकाळी ६ वाजता CCD ला"

Cafe Coffee Day? तेही आम्ही दोघं? म्हणजे थोडक्यात Date वर जायच? धक्यांवर धक्के! अरे काय चाललय काय?

"ठिके. मी येतो."
"ग्रेट. मग भेटु उद्या! chal bye Cya take care"

फोन बंद झाला होता!पण तो तसाच कानाला धरून ठेवावा वाटत होता. तिचा एकन एक शब्द कानात घुमत होता. हे माझ्याबाबत घडलयं याचं feeling काहीतरी वेगळच होतं.

दिवस कधी संपतोय आणि कधी एकदा उद्याची संध्याकाळ येते असं झालं. कसा बसा दिवस संपला. आणि बघता बघता ती संध्याकाळही आली. बरोबर ६ वाजता मी CCD मध्ये मस्त तयार होऊन आलो. अजुन ती यायची होती. येताना तिच्यासाठी एक मस्त फ्रेंडशीपवर आधारित ग्रिटिंग घेतलं. दोघांच्यासाठीचाच असलेला टेबल धरून तिची वाट पाहत बसलो.

तेवढ्यात हाक ऐकू आली,

"अद्वैत! अरे अद्वैत. राजा उठ"

आई???????????? इकडे????? तिला कोणी सांगितलं? मी तर गुपचुप आलोय निघुन? मग ती इकडे कशी? आणि उठ का म्हणतिये?

"अरे बघ साडेनऊ वाजले. कितीवेळ झोपशील"

आणि गदागदा मला तिने हलवल... मी ताडकन उठून बसलो. मला काहीच कळत नव्हतं. वर पंखा, शेजारी PC , बाजूला खिडकी आणि खाली...... खाली गादी??? बोंबला! म्हणजे मी स्वप्न बघत होतो. लगेच मोबाईल चेक केला. कॉल हिस्टरी चेक केली, त्यात तिचा कॉल आल्याची कोणतिही नोंद नव्हती. म्हणजे हे सगळ माझं स्वप्न होत? अरेरेरेरेरेरेरे!! भयानक वाईट वाटलं ! आई माझ्याकड शंकेने बघत म्हणाली,

"काय झालं रे? असा चेहरा का पडलाय? काय वाईट स्वप्न पडलं होतं का?"

वाईट??????? अगं आई काय स्वप्न पडलं होतं ते तुला कसं सांगू!! अंग जड झाल्यासारख वाटत होतं. कसाबसा बिछान्यावरून उठलो. तेवढ्यात शेजारच्या दुकानातल्या रेडिओवर गाण लागलं,

"छनसे जो टुटे कोई सपना.........
जग सुना सुना लागे... जग सुना सुना लागे रे................"

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

Sunday, October 30, 2011

पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन

नमस्कार मंडळी, मध्यंतरी प्रोजेक्ट प्रेसेंटेशनसाठी बेंगलोरला आम्ही गेलो होतो तेव्हा माझा मित्र अजित उपाध्येने हे पुस्तक खरेदी केले. त्यादिवशी महाराष्ट्र मंडळात बसुन पुस्तक सहज चाळलं. प्रोलॉग जरा प्रॉमिसिंग वाटला म्हणून अजितला पुस्तक "वाचून देतो" अशी रिक्वेस्ट केली आणि ती त्याने अगदी झटक्यात मान्य केली. त्यामुळे सर्वप्रथम अजितला धन्यवाद! :) या पोस्टपासून मी या ब्लॉगवर, वाचलेल्या पुस्तकांची परिक्षणे देखिल लिहिणार आहे. हा नवा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा

पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन

लेखक: करण/न बजाज
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Harper Collins



"किप ऑफ द ग्रास" या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणजेच करण/न बजाजचे हे दुसरे पुस्तक. वर म्हटल्या प्रमाणे प्रोलॉग अगदी प्रॉमिसिंग आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमा असल्यासारखं पुस्तक कथेच्या मध्यातुन सुरू होतं. एक हात गमावलेला, अंगावर अगदी मळके कपडे असलेला कथेचा नायक भारतीय रेल्वेतुन प्रवास करत असतो. सहजच रेल्वेतील सहप्रवाशांशी गप्पा होतात. कथेचा नायक अगदी शांत, कदाचित "जीवनाच्या परम सत्यापर्यंत" पोहचल्यासारखा गंभीर असा वर्णीला आहे. रेल्वेतील संभाषणात तो "फ़ॉरेन रिटर्न" आहे हे सहप्रवाशांना पटत नाही. इतकी दयनीय अवस्था पाहता हे शक्यच नाही असा काहींचा समज होतो तर एक गृहस्थ, "बघा, परदेशात जाऊन ही अवस्था होत असेल तर त्यापेक्षा भारतच बरा" असा टोमणाही मारून जातात. पण नायकाला त्याची फिकिर नसते. तो अलिप्त असतो. त्याच्या क्वचितच बोलण्यात तो स्वतः "MIT" या जगविख्यात इंजिनिअरिंग कॉलेजचा ग्रॅज्युएट असल्याचे सांगतो आणि तेथुन पुढे कथा सुरुवातिला येते.

कथेची सुरुवात आणि प्रोलॉगची स्टाईल नकळतच चेतन भगतच्या "फाईव्ह पॉईंट समवन"ची आठवण करून देते. साधारण त्याच धाटणीची लेखन शैली, त्याच पद्धतीचे "कॉलेज लाईफ" संवाद, वाचायला मिळतात. फरक एवढाच आहे की या पुस्तकात "फ"काराने सुरू होणार्‍या शिव्या आणि नंतर ब्राझीलमध्ये नायक वास्तव्याला असताना टिपिकल माफ़िया स्टाईलच्या लेखनामुळे आलेले भरपुर "सेंसॉर्ड" शब्द मुक्त हस्ताने वापरले आहेत. त्यामुळे  "जेंटलमन" वाचक वर्गाला कदाचित ते पचणार नाही. ;)

तर कथेची सुरुवात MIT च्या कॉन्व्होकेशन सेरेमोनीत होते. कथेचा नायक निखिल आणि लंगोटीयार सॅम यांचे भन्नाट संवाद खरोखर मजा आणतात.या दरम्यान ते कंबोडियाला सुट्टी एंजॉय करायचा प्लॅन करतात. कंबोडिया का तर स्वस्त आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे तेथे व्हिसा लागत नाही म्हणून. दरम्यान निखिल NASA मध्ये सिलेक्ट झालेला असतो तर सॅम GE (General Electric)मध्ये. थोडक्यात दोघेही मोठ्या कंपनीत सिलेक्ट झालेले असतात.

आणि कथेला कलाटणी मिळते जेव्हा ते कंबोडियात येतात. कंबोडियाची सध्याची राजकीय परिस्थिती न पाहता ते तेथे दाखल होतात आणि मग सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. कंबोडियात राजकिय अस्थिरता असते आणि ज्यामुळे नव्याने हुकुमशाहा उदयास आलेला असतो. जो त्याच्या वाटेत येईल ते सर्व उध्वस्त करत सुटलेला असतो. आणि अशा बिकट स्थितीत हे दोघे तेथे जातात. लवकरच स्थितीचे गांभीर्य़ त्यांच्या लक्षात येते. केवळ सॅमच्या हट्टापायी ते येथे आलेले असतात ज्यामुळे सॅमला प्रचंड मनस्ताप होतो. बर्‍याच गोष्टी घडतात. मग ते मदतीसाठी अमेरिकन एंबसीत जातात आणि तिथे लक्षात येते की निखिलचाच पासपोर्ट NASA ने अमेरिकी नागरिक म्हणून केलेला असतो तर GE ने अजुन सॅमला तसा पासपोर्ट दिलेला नसतो. आणि भारतीय एंबसीच तेथे नसते.  तेव्हा निखिल मनाचा मोठेपणा दाखवून आणि उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत सॅमला स्वतःचा पासपोर्ट देतो आणि त्याला अमेरिकेला परत पाठवतो आणि स्वतः  इतर नॉन अमेरिका पासपोर्ट धारकांबरोबर जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.

तो कंबोडियन हुकुमशाही सैनीकांकडे पकडला जातो. १० वर्ष त्याचे भयानक हाल केले जातात. केले गेलेले हाल वाचताना अंगावर काटा येतो. तरिही तो त्यातुन पळ काढण्यात यशस्वी होतो. दरम्यान त्या छळात तो स्वतःचा एक  हातही गमावतो. नंतर तो रात्रंदिवस पळत-पळत थायलंडला पोहोचतो. तेथे तो बुद्ध धर्मगुरू होतो. ७-८ वर्ष धर्माची शिकवण घेतली तरी त्याचे मन त्यात रमत नाही. ते सर्व सोडून तो ब्राझील मधे जातो. तेथे त्याची भेट ड्रग माफिया मार्कोशी होते. एका कठीण प्रसंगी तो मार्कोचा जीव वाचवतो आणि लवकरच त्याचा पक्का मीत्र बनतो. बुद्धीच्या जोरावर तो मॉर्कोला नवा बिजनेस तयार करून देतो ज्यामुळे मॉर्को श्रीमंतीची शिखरे सर करतो. हळू हळू तो नकळत ब्राझीलमध्ये एक डॉन/माफिया म्हणून ओळखला जाऊ लागतो. माफिया बनल्यामुळे साहजीकच सतत जीवाशी खेळ. बर्‍याच गोष्टी घडतात ज्यामुळे त्याला ब्राझील सोडावे लागते व अमेरिकेत पुन्हा पळ काढावा लागतो. दरम्यान त्याला त्याचे प्रेम मिळते, मुल होते पण त्यांना सोडून त्याला अमेरिका गाठावी लागते.

मनावर सतत झालेला छळ, मिळालेली धर्मगुरूंची शिकवण आणि मनुष्यप्राण्याची पाहिलेली नवी रुपे त्याला गंभीर, घाबरट बनवतात. अमेरिकेत तो एका कंप्युटर गीक/किडयाला भेटतो. हळू हळू प्रोग्रामिंग शिकतो.पुन्हा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर करोडो रुपये मिळवता येतिल अशी वेबसाईट बनवतो पण पुन्हा स्वतः कही प्रॉफिट न घेता ती साईट त्या कंप्युटर गीकला सोपवून तो भारतात "मरण्याच्या" उद्देशाने येतो. बर्‍याच गोष्टी घडतात, आणि एक दिवस तो पुन्हा सॅमला भेटतो......

नंतर काय होते ते मी सांगत नाही. कारण बरच मी आधीच सांगितलं आहे. पण ओव्हरऑल एक छान पुस्तक आहे.

का वाचावे
-पुस्तक स्टार्ट-टु-एंड वाचकाला खिळवुन ठेवते. "पुढे काय" असा सतत प्रश्न वाचकाला पाडण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
-एका भारतिय लेखकाने लिहिलेले माझ्या वाचनात आलेले हे सर्वोत्तम इंग्रजी पुस्तक आहे. वापरलेल्या वाक्यरचना, शब्द खरोखरच जेफ्री आर्चर वगैरे दिग्गज इंग्रजी लेखकांची आठवण करून देतात. तितकेही मुरलेले लेखन नाही पण मी तरी या लेखनावर इंप्रेस झालो.

का वाचू नये
-कथेत नायकाच्या जिवनाला मिळणार्‍या कलाटण्या, भरपूर योगायोग, जेम्सबॉंड स्टाईलने अशक्य अशा संकटांवर होणारा विजय, इत्यादी गोष्टी पटत नाहीत. एक कथा म्हणून ठीक आहे पण "इमॅजनरी" लेखन असल्याने ह्या उणीवा राहिल्या आहेत.
-वर म्हटल्याप्रमाणे "फ"कारार्थी आणि सेंसॉर्ड शब्दांचा मुक्त हस्ताने वापर काही क्षणी विनाकारण केल्यासारखा वाटतो.


ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. एकवेळ आवश्य वाचण्यासारखे आहे. माझ्या मते मी या पुस्तकाला रेटिंग देईन:
 



Friday, September 16, 2011

काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर......

"अद्व्या मर्दा भूक लागलिये"
"होय रे. आज या प्रोजेक्टच्या नादात वेळ एकदम फास्ट निघून गेला"
"अरे भावांन्नो आणि कोणाला भूक लागलिये काय?"
एकदम सगळे जोरात ओरडले "हो!!!"
"चला मग डबे काढा"
"मी नाय आणला","मी पण नाही","च्यामारी म्या भी नाय आणला आता काय करायचं?"
"अरे मग ३ डब्यात आपण ८ जण कसे भूक भागवणार?"
"चला मग काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर ला जाऊयात"
"हे आणि काय नविन"
"ते नविन नाय, तू नविन आहेस"
"पण ही भानगड नेमकी आहे तरी काय?"
"अरे त्ये एक मिसळपावचं नवं हॉटेल निघालय हायवेवर"
"हायवे??? अबे किती वाजलेत बघ! आज सकाळचा सगळा वेळ या प्रोजेक्टमधे घालवलाय. जरा लेक्चर-बिक्चर पण करूयात की"
"होय! लय सिंसियर डोक्याचा तू. चल लई शाना हाईस. पुढचं लेक्चर त्या धोंडेच हाय. त्यो गडी कवा पण आत घेतोय. लेट ये, अगदी प्रेसेंटी घ्यायच्यावेळी आलासतरी कायपण म्हणत नाही."
"हम्म्म्म. तेपण खरच आहे म्हणा. जाऊयात पण अर्ध्यातासात काहीपण करून परतायचं"
"ए तू गपरे. गाडीची किल्ली मला दे आणि गप माज्यामागं बस"
झालं, एकूण ३ गाड्यांवरून आमची ८ जणांची गॅंग नविन निघालेल्या मिसळपावच्या हॉटेलाकडं मार्गस्थ झाली. 

 --------------------------------------------------------------------------------


"काकी, ८ मिसळपाव द्या. ए कोण कोण तिखट घेणारे ?"
"मी ट्राय करेन"
"ए बामणा! तुला हे खाऊन माहित नाही. उगाच तिखट घेचिल आनि नंतर बोंब मारत सुटशील"
"ए लई शाना आहेस. गप मला तिखट ऑर्डर कर. तुला दाखवतोच ब्राह्मणांत पण किती दम असतो ते!"
"बर बाबा. मानलं तुला. उगाच शापबिप देचिल. यापर्षी कधी नव ते ऑल क्लियर झालोय, उगाच तुझ्या शापानं काय झालं-बिलं तर माझा बाबा मला पायतानानं मारंल"

काऊंटरवरच्या काकूंसकट हॉटेलातली सगळी लोकं खदखदून हसली. असली टारगट पोरं कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या हॉटेलात अवतरली होती. फायनल इयर असल्याने कदाचित आम्ही आणखीनच टारगट बनलो आहोत.

 थोड्या वेळातच गरमा गरम मिसळपाव समोर आली. आधीच भूक लागलेली आणि त्यात हॉटेलात सुटलेल्या खमंग वासाने तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं. मी पहिला घास खाणार तोच माझ लक्ष सगळ्यांकडं गेलं. सगळे लेकाचे मला एकटक पाहात होते.

"काय रे! काय बघताय?"
"काय नाय, तुजी गमजा बघायचिये"

मग लक्षात आलं, च्यामारी आपण तिखट ऑर्डर दिलिये. झालं! आता इज्जत का सवाल था! :) हळूच एक चमचा मिसळ उचलली आणि तोंडात टाकली. तोंडात आगीची पेटती काडी टाकल्यासारखा जळजळीत  चटकाच जणू बसल्यासारखं वाटलं जीभेला. कसतरी करून तोंडावर हसू ठेवून घास गिळला. 

"काय काय सायेब? कशी काय वाटली मिसळ?"
"एक ख्ख्ख!ख्ह!ख्हौओ........ पाणी...... द ह्ह्ह्ह्ह!"
जबरी ठसका लागला! सगळे लोळलोळ लोळले हसून. गटागट पाणी प्यालो आणि कसाबसा ठसका शांत केला. आता चॅलेंज स्वीकारलेलं, ते कसं मोडणार? त्यामुळं ती झणझणीत मिसळ एका दमात मटकावली. पहिलेच जीभ भाजल्याने पुन्हा त्रास नाही झाला!

"आयला. ह्यानं संपवली की रे"
"मग! बोललेलो! माझ्याशी पंगा नाय घ्यायचा!"
"बर बाबा! तु जिकलास!"

जवळ जवळ अर्धा-पाऊण तास निघून गेला. दंगा मस्तीत वेळ कधी निघून गेला कळालच नाही. सहज घड्याळाकडं लक्ष गेलं तेव्हा वेळेच भान आलं.

"अरे मुर्खांनो अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळ झालाय. चला आवरा लवकर. संपवा मिसळ आणि चला कॉलेजकडं"
"ए टेन्या! तुझं झालं म्हंजे सगळ्यांच झालं होय? थांब जरा. आणि धोंडे सराची जास्त काळजी नको करू. मी बरोबर सेटिंग करून ठेवलय. काय बोलनार नाही त्यो"
"ते कायपण असो! मी निघालो, यायच असेल तर या."
"ए थांब की मर्दा. आलो आम्हीपण. झालच थांब"
----------------------------------------------------------------------------------------

साधारण धोंडे सरांचा तास संपायला १५ मिनिट बाकी असताना आम्ही कॉलेजवर पोहोचलो. वर्ग शोधण्यापासून सुरवात. दोन-तीन व्यवस्थित सुरू असलेले वर्ग डिस्टर्ब करून फायनली आमचा वर्ग सापडला.

"मे आय कम ईन सर?"
"येस .प्लीज कम इन"
"बग. बोललेलो किनी? आपला मानूस हाय. काय त्रास देनार नाय. निवांत आत घेईल"
"ए! गप चला आत. ऐकले तर आत घेणार नाहीत."

पटकन मागच्या मोकळ्या बेंचवर जाऊन बसलो. बॅक बेंचरच आम्ही. नेहमीचे बेंच ठरलेले. 

"आत्ता आलेले सगळे जण उभारा!"
झालं! सगळ्यांची टरकली. काहीतरी लोचा झालाय! सगळे उभारलो.

"कोठे गेला होतात?"
पायात सुतळी बॉंब फोडावा तसा सरांचा हा प्रश्न थाडकनं आमच्यावर आपटला. आमच्या सगळ्यांच्या माना खाली.

"अरे बाळांनो मी तुम्हाला विचारतोय...... कुठे गेला होतात? टेल मी फ्रॅंकली"
परत सगळ्यांच्या माना खाली. काय बोलणार म्हणा!

"कुलकर्णी, कोठे गेला होतात इतका वेळ? मास्तर आपलाच आहे, कधीपण आत घेईल असा जर समज झाला असेल तर तो काढून टाका मनातून. काय कुलकर्णी बरोबर आहे ना? असच वाटलेलं ना?"

"नाही सर! तसं नाही."

"मग कसं? कुठे गेला होतात?टेल मी फ्रॅंकली"

"सर ते आम्ही.......! सर ते प्रोजेक्ट...."

"टेल मी द ट्रुथ. टेल मी फ्रॅंकली"

माझी मान खाली. काय सांगणार? खोट बोलणं सुचेना, खरं बोलण जमेना! आणि आमचे विद्वान मित्र लोक मागून प्रॉंप्टिंग करत होते.

"अद्व्या सांग पोरिंच्या मागं गेलेलो. ख्या ख्या ख्या"
"अरे नाही, ऑफिसात बोलवलेलं म्हणून सांग" 
"नायतर सरळ सांग काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला गेल्तो म्हनून"

"ए */?*# न्नो गप बसा. इकडे माझी वाट लागलिये आणि तुम्ही मागून मजा करताय??" 
(मी हळूच पुटपुटलो)

"हम्म! बोला कुलकर्णी."
"तो तुझ्यामागे कदम आहे काय? काय तरी बोलतोय तो. हानं कदम तुम्ही सांगा कुठे गेलेलात?"

"सर ते... आमी....."

"बोला पटकन. माझ्याकडं वेळ नाही. असं कोणतं काम तुम्हाला पडलेलं की माझं लेक्चर चुकवून ते पुर्ण करण्यात तुम्ही गुंतला होतात. चला लवकर लवकर बोला. कदम बोला पटकन टेल मी फ्रॅंकली"

"सर आमी सगळे  काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला मिसळपाव खायला गेल्तो"

कदमाच्या या "फ्रॅंकली" उत्तराने आता सरांच्या पायात सुतळी बॉंब फुटल्यासारखी सरांची अवस्था झाली. आपण खुपच सज्जन आहोत अशा इनोसंट चेहर्‍याने कदमाने झटकन उत्तर दिले. सगळा वर्ग खदादा हसायला लागला! मास्तरचं डोकं जाम भडकलं! त्यांनी सरळ डस्टर, पुस्तक घेतलं आणि वर्ग सोडून तावातावाने निघाले. दरवाज्यापाशी गेल्यावर आमच्याकडे बघून म्हणाले,

"पुन्हा जर तुम्ही लोक माझ्या लेक्चरला दिसलात तर मी लेक्चर घेणार नाही"
आणि सर निघून गेले. त्यानंतर जो काय आम्ही दंगा केलाय तो शब्दात सांगणं खरच कठीण आहे. "टेल मी फ्रॅंकली" चा इतका फ्रॅंकली कोणी अर्थ घेईल याची कदाचित सरांनाही अपेक्षा नव्हती.

ते काहीही असो, पण हा दिवस खरच आमच्या कॉलेज लाईफमधला काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर..... दिवस ठरला! :)

-अद्वैत कुलकर्णी
marathi corner team

Friday, September 2, 2011

मराठी संगीतविश्वातील आणखी एक तारा निखळला..

"श्रावणात घन निळा’ असो किंवा ‘निज माझ्या नंदलाला’ असो, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असो किंवा ‘सावळे सुंदर रुप मनोहर’ असो, आजही ही गीते चिरतरूण आहेत. य़ा व यांसारख्या कित्येक गीतांना स्वरबद्ध करणारे, मराठी संगीतविश्वातील हिरा, आपले सर्वांचे लाडके खळे काका अर्थात ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मराठी संगीतविश्वातील एक ताराच  जणू निखळला..


कालच बाप्पा घरी आले असताना, सर्वत्र चैतन्याचे वातावरण असताना ही बातमी खरच मनाला चटका लावून गेली. मराठी कॉर्नर परिवारातर्फे खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली..

-
marathi corner team

Monday, August 15, 2011

चर्चासत्राचे निमंत्रण!

नमस्कार,
सर्वप्रथम आपणांस व आपल्या समस्त परिवारास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा!!
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठी कॉर्नरने एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राचा विषय आहे:

"स्वातंत्र्य लढा आणि आज"



या विषयाबद्दल थोडक्यात:
१९४७ हे साल म्हणजे भारतिय इतिहासातले सर्वात महत्वाचे साल. असंख्य
देशबांधवांचे बलिदान, धाडस आणि कष्ट यामुळे भारत इंग्रजांच्या जुलमी
राजवटीपासून स्वतंत्र झाला. आज ६४ वर्षे उलटून गेली पण खरच आज आपण स्वतंत्र
आहोत?? भ्रष्टाचार, हिंसा, इत्यादी कित्येक रोगांनी ग्रासलेला हा देश खरच
स्वतंत्र आहे?

तुम्हाला काय वाटते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. लगेचच आपले विचार येथे
मांडा:

http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=44&t=594

या विषयाला प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वप्रथम "सदस्य प्रवेश" घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्वप्रथम आपण आपले Username आणि password वापरून मराठी कॉर्नरवर
Login व्हावे आणि मग वर दिलेल्या धाग्यावर जाऊन आपले मत मांडावे.

आपल्यासोबत इतरही सदस्य आपले विचार मांडतील आणि हळू हळू एकमेकांचे विचार वाचून
त्यांना उत्तर देऊन हे चर्चासत्र सफल होईल अशी आशा आम्ही करतो.

पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शु्भेच्छा आणि चर्चासत्राचे
आग्रहाचे निमंत्रण!
कळावे,

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...