Wednesday, June 29, 2011

बडबड गीत

"ये रे ये रे पावसा" किंवा "झुक झुक झुक आगिन गाडी" अशी कितीतरी दुर्मिळ बडबड गीतं ऐकून बराच काळ झाला. ते प्राथमिक शाळेतले दिवस! आहा! आजूनही ते क्षण डोळ्यासमोर आहेत.  बघता बघता १२-१५ वर्ष उलटून गेली पण तरिही सगळं अगदी काल घडल्यासारखे स्पष्ट आठवतय. ते शाळेतले गुरूजी, त्यांचा तो प्रेमळ स्वभाव, अगदी स्वतःची मुलं असल्यासारखे केलेले प्रेम आठवून खरच कंठ दाटून येतो! आजही  प्राथमिक शाळेतले शिक्षक दिसले की नकळतच चेहर्‍यावर स्मीतहास्य येते. खरच ते क्षण "लय भारी" होते. पण खरच ते दिवस आणि आज जे काही अनुभवायला मिळतय यात किती फरक पडलाय नाही?मी एका छोट्या गावात राहतो. "खेड्याकडे चला" चे उत्तम उदाहरण म्हणजे माझे गाव. काहिही सुविधा नसलेले माझे गाव आज एका "शहरा" इतके प्रगत झाले आहे पण त्यातली पोकळी आत्ता थोडी थोडी बाहेर यायला लागली आहे.

माझ्या गल्लीत जवळपास पाच ते दहा वयोगटातली जवळ जवळ ८-१० बारकी आहेत. त्यांना "वानरसेना" म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सध्या नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर त्यांचा चिवचिवाट सुरू असतो. एकदा शांत बसून त्यांची बडबड ऐकली तर खरच खुप मजा येते. त्यांचे ते बोबडे बोल ऐकून नकळत आपणही मनात बोबडे बोलायला लागतो :).

परवा असाच पुस्तक वाचत बसलो होतो. नेहमीप्रमाणे सगळी वानरसेना गल्लीभर चिवचिवाट करत सुटली होती. मी पुस्तक ठेवलं आणि हळूच खिडकीतुन त्यांची मजा पाहायला लागलो. साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी त्यांचा सेनाप्रमुख मोठ्याने ओरडला "ए पकला-पकली बास झाली आता. आता आपन शाला-शाला खेलू". म्हटलं चला आता फुल टू करमणूक होणार. त्यांचं ते "शाला-शाला" सुरू झालं. अ-ब-क-ड चा तास संपला आणि "बडबडगीतांचा" तास सुरू झाला.

पहिलं बडबडगीत ऐकताच मी हदरलो. आपेक्षेनुसार ते "झुक-झुक-झुक आगिनगाडी" किंवा "येरे येरे पावसा" किंवा फारफार तर "चांदोमामा चांदोमामा लपलास का" वगैरे एखादे असेल पण ही पोरं मोठमोठ्याने "शीला शीला की जवानी" म्हणायला लागली.दोन मिनिट मी सुन्नच झालो. त्यानंतरच त्यांच गाणं होतं "मुन्नी बदनाम हुई, दालिंग तेले लिये".  अरे हा काय प्रकार आहे? ही कसली बडबड गीतं??माझ्या मनाची चक्र वेगानं फिरू लागली....

ज्यांना साधा शेंबुड पुसता येत नाही अशी ही यंग जनरेशन खरोखरच कसले संकेत देत आहे? खरच यात त्यांचा काही दोष आहे? नाही. दोष आपला आहे. म्हणतात ना जे पेराल तेच उगवते! मग त्यांचा दोष तो कोणता? मध्यंतरी काही कामाकरिता माझ्या जुन्या शाळेत जाऊन आलो. अगदी मोजके जुने शिक्षक राहिलेले. बाकी सगळा स्टाफ नवा, २५-३० वयोगटातला. स्टाफरूममध्ये डोकावलं तर निम्मे अर्धे मोबाईलमध्ये गुंग, एकिकडे वर्ग चालू तर दुसरीकडे यांचे मोबाईल. आज सर्रास मोबाईल फोन वापरात आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सोबत मोबाईल ही देखिल मुलभुत गरज बनली आहे पण म्हणून काय तो या विद्येच्या मंदिरातही गरजेचा आहे? सहज माझ्या एका जुन्या शिक्षकांशी बोलत असताना "शीला,शीला की जवानी" गाणं सुरू झालं. बोलता बोलताच सरांच एकदम लक्ष विचलीत झालं आणि मला त्यांनी मान डोलावून डोकावायला सांगितल. मी सहज काचेतुन डोकावलं तर ती एका मास्तरांच्या मोबाईलची रिंगटोन होती.

आत्ता त्या घटनेची लिंक लागली . जर विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे गुरुजीच केंदाळात वावरत आहेत तर मग त्यात स्वच्छता, निर्मळता कशी राहिल? जणू एखाद्या वादळाच्या वेगाने ही नवी जनरेशन गोष्टी आत्मसात करत असताना त्यांना जर योग्य दिशा दाखवणारेच दिशाभूल होण्यास कारणीभूत असतिल तर खरच ही नींदनिय बाब आहे. केवळ गुरुजीच नव्हे, तर करिअरच्या मागे लागलेले पालकही याला तितकेच जबाबदार आहेत. हा बडबडगीतांचा प्रकार केवळ एक ट्रेलर म्हणाल तरी हरकत नाही.

"क्या हम गलफ्रेंड-बॉयफ्रेंड है" ही मॅकडोनलची जाहिरात कित्येकांना भावली. फेसबुक,ऑर्कुटवर जो-तो उठून "wow! so cute" किंवा "how nice!!" सारख्या उपमा देत ही जाहिरात शेअर करत होता पण जर खरच विचार केलात कधी? गलफ्रेंड, बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कधी कळाले ते आठवू शकाल? फार फार तर ५-७ वर्षापुर्वीपासून हे शब्द so called high सोसायटीतून आज खेड्या-खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. आणि आपण या अशा संस्कृतीची जाहिरात करून नेमकं आपल्या नव्या जनरेशनला काय शिकवू पाहतोय? यावरच एक किस्सा सांगतो. मध्यंतरी एका लग्नानिमित्त सर्व लोक एकत्र आलो होतो. बरेच पाहुणेमंडळी बर्‍याच दिवसांनी एकत्र भेटले होते त्यामुळे गप्पांना उत आला होता. बोलता बोलता बरेच विषय निघत गेले. त्यात हा विषय आला. एक बाई आगदी अभिमानाने म्हणाल्या,
"अहो ऐका हा किस्सा. आमच्या विकीचा (मुलाचे नाव महेश.पण तरिही विकी. का कोणास ठाऊक!) फक्त ८ वर्षाचा आहे. परवा काय म्हणाला माहितिये? त्याच्या बाबाला म्हणाला, ’ए बाबा. आपण आणखी एक घर आणि गाडी घेउयात की’, मग आम्ही आश्चर्याने विचारले, ’का रे? एकदम का तुला सुचलं?’ तर म्हणतो कसा , ’काही दिवसांनी माझी गर्लफ्रेंड येईल. मग आम्ही दुसरीकडे राहायला जाणार. मग आम्ही तुम्हाला हॉलिडेज मध्ये भेटायला यायला गाडी पाहिजेकी’. हा हा हा! ऐकलतं म्हणतो कसा! कित्ती गोड बाळ माझं"

???गोड???नेमकं यात यांना त्याचा अभिमान वाटण्यासारखे दिसले तरी काय?? आजून चड्डी घालता येत नसलेलं शेंबड मुल आत्तापासूनच; वयाच्या ८व्या वर्षा पासूनच "वेगळ राहणार, गर्लफ्रेंड फिरवणार, कधीतरी हॉलिडेजनाच भेटायला येणार" म्हणतोय आणि हे लोक ते अभिमानाने चारचौघांना सांगताहेत??आणि ते ही त्याच्या समोरच??

खरच यावर प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. मला अत्तापासूनच भिती वाटायला लागलिये की उद्या माझा मुलगा/मुलगी कोणालाही हाताला धरून घरी घेऊन येईल आणि म्हणेल "हे डॅड! लूक! ही इज माय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड. मी याच्याशी लग्न करणारे. तुमची परवानगी असेल तर नाईस, नसेल तर आम्ही पळून जायचं ठरवल आहे!" आत्ता हे मजेशीर वाटतयं पण प्रत्यक्षात कधी घराघरांत उतरेल काही सांगता येत नाही.

तेवढ्यात "ससा ले ससा,कापूस जसा" गाणं ऐकू आलं आणि भानावर आलो. कदाचित चुकल्या-चुकल्यासारखं काहीसं ऐकू आल्याने तंद्री भंग झाली असेल ! :) पण असो, काही का होईना आमच्यावेळच निदान हे तरी बडबडगीत या वानरसेनेच्या तोंडून ऐकायला मिळालं! पण तरिही जे काही या दरम्यान मनात येऊन गेलं ते बैचेन करण्यालायक नक्कीच होते.

-अद्वैत
माझा हा लेख या आधी येथे प्रकाशित:  http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=525

Monday, June 27, 2011

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियल

नमस्कार मंडळी,
कसे आहात? आज आम्ही बर्‍याच दिवसांनी तुमच्याशी संवाद साधतोय! या काळात मराठी
कॉर्नर खरच थंड पडले आहे. त्यामुळे मराठी कॉर्नरला पुन्हा सक्रिय करण्याच्या
दृष्टीने हा पत्रव्यवहार.
मध्यंतरी आम्ही आपल्या सर्व सभासदांकडून अभिप्राय मागवला होता आणि त्याला बराच
प्रतिसाद मिळाला. या मिळालेल्या प्रतिसादाची योग्य छाननी केल्यावर एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बहुतकरून सभासदांना मराठी कॉर्नर नेमके कसे
वापरायचे हेच अवघड जात आहे. त्यामुळे आम्ही "मराठी कॉर्नर व्हिडिओ
ट्युटोरियल्स" सभासदांना युट्युब द्वारे उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे.

सभासदांना मराठी कॉर्नरवरिल विविध सुविधा योग्य पद्धतीने हाताळता याव्यात या
उद्देशाने या ट्युटोरियल नक्कीच उपयोगी पडतील अशी आशा आम्हाला आहे. मराठी
कॉर्नरच्या या ट्युटोरियल बघण्यासाठी आजच मराठी कॉर्नरच्या युट्युब चॅनलला
सब्स्क्राइब करा.
मराठी कॉर्नरचे युट्युब चॅनेल: http://www.youtube.com/user/marathicorner


----------------------------------------------------------------------------------

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियलस आपल्यासमोर सादर करताना मनापासून आनंद
होतोय. हे व्हिडिओ नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. तरिही काही शंका असल्यास
त्या व्हिडिओजना तुम्ही कमेंट देऊ शकता किंवा आम्हाला मेल करू शकता. तर सादर
कर आहोत आमचा पहिला व्हिडिओ:

मराठी कॉर्नर व्हिडिओ ट्युटोरियल नंबर १ (माहिती व सदस्यप्रवेश कसा घ्यावा)

Marathicorner.com Video Tutorial #1 (basicinfo and how to Login)



हळुहळु मराठी कॉर्नर कसे वापरायचे याच्या ट्युटोरियल उपलब्ध केल्या जातिल.आमची
ही सुविधा आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि हो, आजच मराठी कॉर्नरवर
सक्रिय व्हा! आपले नवे लेख,विचार नक्की मांडा. आधी मांडलेल्या विषयांवर तुमची
प्रतिक्रिया नक्की द्या!

आपला विश्वासू,
अद्वैत
मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/index.php

Wednesday, June 1, 2011

काय सांगू गड्यांनो!

काय सांगू गड्यांनो आज मी धाडस केलं,
जे मनात होतं ते सगळं तिला सांगून टाकलं.

क्षणभर बिथरली, नंतर लाजली,
त्याक्षणी तिच्यावर सगळी "जान" कुर्बान करून टाकली.

काय सांगू गड्यांनो किती किती हलकस वाटलं,
तिच्या त्या  लाजण्यात मला माझं उत्तर मिळालं

 त्या पाणिदार डोळ्यांत मी स्वतःला पाहत होतो,
का कोणासठाऊक पण राजपूत्रासारखा दिसत होतो.

काय सांगू गड्यांनो जग जिंकल्यासारख वाटलं
जेव्हा तिनेही तिच्या मनातलं सगळ काही सांगून टाकलं.

स्वप्न म्हणता म्हणता सत्यात उतरलं आहे,
स्वप्नपूर्तीबरोबर आता जबाबदारीही वाढली आहे.


.

Thursday, May 26, 2011

माझं पहिलं व्यंगचित्र: "मॅडम का ढाबा"

आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे!  २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं. इकडे रामदेवबाबा "काळा पैसा आणा, काळा पैसा आणा" म्हणून ओरडत आहेत पण ह्या घोटाळ्यातल्या पैश्याबद्दल कोणीच काही बोलत नाहिये! मान्य की लोक पकडले, कारवाई सुरू आहे, वगैरे वगैरे पण ते पैसे गेले कुठे???

असो, याच विषयावर मी आज पहिलं मोठे व्यंगचित्र काढले आहे. "मॅडम का ढाबा". साहजिकच यात कोणाला उद्देशुन काढले आहे ते समजले असेलच! :)

तर आपले स्वागत हे "मॅडम का ढाबा" मध्ये. आजचे मेन्यू: २जी घोटाळा, CWG घोटाळा, आदर्श आमटी, कलमाडी फ्राय, इत्यादी बरेच काही. आणि हो, सगळे विषय भट्टीत इतके खरपूस भाजले आहेत की चव नक्कीच आवडेल! :D

या आधी मी बरिच व्यंगचित्र काढली पण अगदी छोटी, टाईमपासवाली, पण हे माझं पहिलं मोठं व्यंगचित्र! तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा! :)

Wednesday, May 18, 2011

हे नातं! असं कसं?

इंजिनिअरिंग स्टुडंट आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांच्यात जे नातं असतं ते कधीच कोठेही बोललं गेलं नाही, कोठे सांगितलं गेलं नाही. कोणी विचारलच नाही म्हणा ना! पण तरिही आज मी सांगणारच आहे! :D  एक असं नातं जे बहुदा माझ्यासारख्या सर्व गुणी इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी त्यांच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये कधीतरी नक्कीच अनुभवलं असेल. जर तसे नसेल तर तुम्ही एक तर "पुस्तकी किडे" आहात किंवा अगदिच "गुणी बाळ" आहात!

तर मग अशाच एका गुणी शिक्षकाचा मला आलेला "सॉलिड" अनुभव मी आज शेअर करणार आहे. अगदी ताजा-ताजा आहे. परवाच external oral चा सोहळा पार पडला. :D अगदी उत्साहात आम्ही सर्वजण सहभागी झालो होतो. मान्यवर externals देखिल उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या चेहर्‍यावर सुडाचे स्मितहास्य किती सुरेख दिसत होते हे शब्दात मांडणे थोडे कठिणच! सोहळा भारतिय प्रमाण वेळेनुसार वेळेत सुरू झाला.  काहींना lot ऑफ marks मिळत होते तर काहिंना shot! सहाजिकच, या सोहळ्यास मी ही नचुकता सहभागी झालो होतो, तसे आग्रहाचे निमंत्रणच मिळाले होते त्यामुळे जावेच लागले. :D

तसं म्हणाल तर मी स्वभावाने एकदम साधा,सरळ आणि गुणी मुलगा. काय माहित बहुतेक देव अशाच सोज्वळ मुलांना छळत असेल! :D आधिच्या २ oral exams (तोंडी परिक्षा :D) व्यवस्थित पार पडल्या होत्या. अगदी गरम पावावर लोणी वितळावं तसा मी प्रत्येक प्रश्नाला वितळून जवळ जवळ संपलोच होतो! :D (लक्षपूर्वक वाचलत ना उदाहरण? लोणी म्हणालो मी स्वतःला! :D ) आता राहिलेली शेवटची oral देण्याचा अगदीच मुडच नव्हता! कारण ३ पैकी २ तर आधीच उडाल्या आहेत! आता ही पण अशिच असणार. आणि माझा अंदाजही बरोबर ठरला पण किंबहुना सगळ्यात मोठा shot! माझ्यानावे आधिच लिहून ठेवला होता. मला याची जराशी चाहूल लागली होती पण माझा "sixth sense" नेहमी दगा देतो (स्पेशली हिरवळीच्या बाबतीत :D) म्हणून यावेळीही मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले पण लेकाचा यावेळी मात्र खरा निघाला.

तर सादर आहे कहाणी माझी आणि माझ्या प्रिय मास्तरांच्या "सोज्वळ" नात्याची! :D
तसा मी गुणी बाळ असल्याने सदैव शिक्षकांच्या नजरेत असायचो. लेक्चर बंक करणे हा गुन्हा नसून एक कला आहे ह्यावर माझी नित्तांत श्रद्धा! . पण तरिही शिक्षकांबद्दल अनादर मात्र कधिही नाही. तरिपण जेव्हा ह्या नात्याला जर वेगळे वळण मिळाले तर ते किती महागात पडते याची प्रचिती जेव्हा एक्सटर्नल "You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!" असे खणखणीत म्हणतो तेव्हा येते! :D

तर झालेलं असं की; कॉलेजमध्ये सगळ्यात टारगट म्हणून आमचा ग्रुप ओळखला जातो (तितकाच स्कॉलर आहे हे मात्र कोणी सांगत नाही! चालायचच! जगाची रितच आहे ती! :p ;) ) आणि मी त्या ग्रुपचा सभासद. त्यामुळे HOD पासून शिपायापर्यंत सगळ्यांशी ओळख. (फरक एवढाच की शिक्षक लोक जरा टाप दाखवतात आणि तितकेच प्रेम, आदर शिपाई लोक देतात.) तर अशाच एका नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाचे माझ्याशी बिनसले. वास्तविक मी वर्गात शांत असतो (हे सिरियसली बोलतोय! :) ) पण तरिही बॅकबेंचर म्हणून की काय पण मला त्या गृहस्थाने किमान ४ ते ५ वेळा अपमानित केले. नुकतेच BE पास झालेले. म्हणजे माझ्याहून १-२ वर्षांनी मोठे पण शेवटी "शिक्षक" आहेत म्हणून सर्व सहन करत राहिलो. पण तरिही हे मास्तर काय सुधरेनात. एकदा सरळ मला धमकी दिली "एक्सटर्नलला बघ तुझी काय अवस्था करतो" मी देखिल म्हणालो "ठिक आहे! बघुन घेऊ! "

आणि तो दिवस आलाच. मी हा प्रकार कधिच विसरलो होतो पण हा बाबा काय विसरला नव्हता. फाईनल सबमिशन दिवशी फाईलवर सही केल्याशिवाय एक्सटर्नल देता येत नाही. आणि या माणसाला तेच हवे होते. प्रत्येकवेळी "मी जरा बिझी आहे. थोड्या वेळाने ये", "आत्ता नको उद्या ये" असे करत करत मला जवळ जवळ ७-८ दिवस झिंगवले. शेवटी वैतागुन मी म्हणालो "अहो सर माझी उद्या एक्सटर्नल आहे! आता तरी सही करा" तर म्हणाले "मला एका अर्जंट मिटिंगला जायचय HOD सोबत, तु उद्या लवकर ये आणि माझी सही घे."  मी ठिक आहे म्हणालो आणि दुसर्‍या दिवशी कॉलेज सुरू होण्या आगोदर अर्धा तास त्या गृहस्थाची वाट पाहात राहिलो. आता दिड एक तास झाला तरी हा माणूस काही येईना. इकडे माझा रोल नंबर जवळ येत होता तरी याचा पत्ता नाही. शेवटी एकदाचा आला. मी "हुश्य्य्य्य!" म्हणून उसासे टाकत त्यांच्याकडे गेलो आणि फाईल पुढे केली. मला म्हणाले "अरे! तु अजून गेला नाहिस ओरल द्यायला?" मी म्हणालो "अत्ता जाणारे! सर पटकन सही करा, माझा नंबर जवळ आलाय!". तेव्हा गडी म्हणाला "अरे जा तसाच. मी आहे. काही फरक पडत नाही सही नसली तर!". मी भोळा! मी लगेच विश्वास ठेवला त्याच्या बोलण्यावर आणि नंबर आला म्हणून आत गेलो. माझ्यासोबत माझे आणखी २ नंबर असे आम्ही ३ लोक एक्सटर्नल समोर बसलो.

एक्सटर्नलने एक एक करत माझी फाईल मागितली. मी दिली. त्याने आत पाहिलं आणि विचारलं "Where's the signature of your internal?" मी म्हणालो "He said don't waste your time and go to your oral. I will manage that." मग त्याने मला सरळ त्या सहिच्या जागेकडे बोट दाखवत खणखणीत विचारले "Do you know what's the meaning of this empty space ?" मी नकारार्थी मान हलवली आणि मग त्याचा तो खणखणीत "किल्लर" डायलॉग एखादी कानफाडित बसावी असा आला "You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!". याचा अर्थ "तुझी एक्सटर्नल होणार नाही. तु जाऊ शकतोस!"

हा आत्ता पर्यंतचा जबराट फालतूपणा होता! त्याक्षणी माझा राग इतका अनावर झाला, तडक एक्सटर्नलच्या हातातली फाईल हिसकाऊन घेतली आणि त्या इंटर्नल मास्तरकडे जाऊन म्हणालो "अहो सर, एक्सटर्नल ने मला बाहेर काढले" तेव्हा त्या मास्तरने माझ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला "हे तर होणारच होतं! आता कस वाटतय?". आई शप्पत! हे त्याने मुद्दामुन केले आहे हे कळल्यानंतर त्याक्षणी मी त्याला यथेच्छ बोललो. माझा आवाज इतका चढला होता की आजूबाजूची मुलं "एखादा थ्रीलर सिन" सुरू असल्यासारखे तोंड उघडून बसली होती.

हे माझ रूप मलाही माहित नव्हत! पण या कारणाने ते बाहेर आलं! मग तडक HOD कडे गेलो. घडला प्रकार सविस्तर सांगितला. HOD नी मास्तराला बोलावले, मला म्हणाले "बाळ तू जरा १० मिनिट बाहेर जा". मी केबीन मधून बाहेर आलो. एक दहा पंधरा मिनिटांनी मास्तर तोंड पाडून बाहेर आला. माझ्या फाईलवर सही केली. मला पुन्हा एक्सटरनल द्यायची सोय केली.

आज मी होतो म्हणून मी बोलू शकलो. उद्या एखाद्याचे करियर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी महावद्यालयातले विद्यार्थी आणि शिक्षकांची नोक झोक तर सुरूच असते आणि असाविच, त्याशीवाय कॉलेज लाईफला खरच मजा नाही.मी असेही म्हणत नाही की माझी काहीच चुक नव्हती पण शेवटी विद्यार्थी आम्ही. शेवटची ४ वर्ष आमच्या शिक्षणाची उरलेली असतात त्यामुळे जितकं मित्रांसोबत एंजॉयमेंट करायला मिळेल तितके आम्ही करतो पण एका लिमिट पर्यंत. जेव्हा त्या दोघांतील एखादाजरी एका लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा त्याचा खरच खुप मोठा परिणाम घडतो.आणि या अशा बाबतीत जेव्हा एखादा शिक्षक जाणून बूजून असला काही प्रकार स्वतःच्या विद्यार्थ्या बाबतीत करतो तेव्हा खरच त्या विद्यार्थी-शिक्षक नात्याला मैत्रीचे नव्हे तर दुष्मनीचे वळण लागते. त्यामुळ हे खरच एक इंटरेस्टिंग नातं आहे.

Saturday, May 14, 2011

नवा चेहरा!

आजवर आपण कित्येक सिनेमांत पाहिले आहे की व्हिलन प्लास्टिक सर्जरी करून हिरोचा चेहरा घेतो किंवा हिरो प्लास्टिक सर्जरी करून स्वतःची आयडेंटिटी बदलतो आणि काम झाले की पुन्हा आपला "वरिजनल" चेहरा परत मिळवतो! आयला! हे जरा अतिच दाखवतात आणि आम्ही मस्त पॉपकॉर्न खात ते बघत बसतो. कित्येकांच्या मनातपण येत असेल "आपण पण चेहरा बदलू आणि "त्या"ला तिच्यापासून लांब टाकू" किंवा "बदला घ्यायला मजा येईल" वगैरे, वगैरे बाळबोध कल्पना आपल्या डोक्यात फिरू लागतात. आणि हे सिनेमावालेही ह्या गोष्टी अशा दाखवतात जशा या प्लास्टिक सर्जरी नसून प्लास्टिक पिशव्या वापरून केले आहे! असो! आजच्या या लेखामागचा उद्देश म्हणा किंवा विषय पूर्ण वेगळा आहे. आज मी प्लास्टिक सर्जरी नव्हे तर  "Face Transplantation" बद्दल बोलणार आहे.

आजवर आपण "Heart Transplantation" बद्दल ऐकलेच असेल. नसेल ऐकले तरी साध्या सोप्या भाषेत "निकामी झालेले एखाद्याचे हृदय काढून त्याजागी नवे हृदय बसवणे" (कृपया प्रेमभंग झालेल्या लोकांनी याचा अर्थ त्यांच्या बुद्धीमतेनुसार घेऊ नये!). म्हणजेच पूर्णपणे नवे जिवनच! आज माणसाने वैद्यकिय क्षेत्रात निसर्गाला कितीतरी मोठी आव्हाने दिली आणि आज तो ती आव्हाने पूर्ण देखिल करित आहे. आपणच असे आहोत की आपल्याला यासारख्या कित्येक गोष्टींची साधी माहिती देखिल नाही. त्यात मीही आलोच. कारण मलाही यातले अगदी थोडेच ज्ञान आहे.

पण आज माणसाचे यश पाहता लवकरच "Human bodypart library" निघेल की काय अशी भिती मात्र मला वाटत आहे. म्हणजे राखी सावंत सारख्या सोज्वळ नटीला तिचे नाक (नकटे असले तरी काय झाले, दिसते ना!) बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून काहितरी भन्नाट चेहर्‍यात रूपांतर करायला लागणार नाही. फक्त libraryत जायचं, हवे ते नाक निवडायचं, बसवायचं, झालं! (नका! याच जास्त खोलवर विचार करू नका! मी एक कल्पना मांडतोय! लगेच तुमची कल्पना शक्ती नको तितकी वापरू नका! )

असो तर आजच्या लेखाचा मुळ विषय म्हणजे माणसाने निसर्गाला दिलेल्या आव्हानावर आणखी एक विजय! गेल्या काही दिवसांपुर्वीच आमेरिकेत पहिली यशस्वी "Full Face Transplantation" शस्त्रक्रिया पार पडली. ही यशस्वी शस्त्रक्रिया "डेल्लास विएन्स" नावाच्या व्यक्तीवर पार पडली. 2008 साली एका अती तीव्र इलेक्ट्रिक शॉकमुळे डेल्लास इतका भयानक जळाला की त्याच्या चेहर्‍यावरिल सर्व गोष्टीच नाहिशा झाल्या. म्हणजे नाक, गाल, डोळे, सर्व काही! उरला तो फक्त एक विद्रुप आणि काहिसा भयानक चेहरा.पण त्याने जिवनाशी हार मानली नाही. जिद्दीने गेली २-३ वर्ष तो तसाच चेहरा घेऊन जगत आला. आणि शेवटी तो जिंकलाच!


हा फोटो, त्याचा मुळ चेहरा, अपघातानंतरचा चेहरा आणि "Face Transplantation" नंतरचा चेहरा!

३० तज्ञ डॉक्टरांच्या १५ तासाहूनही अधिक चाललेल्या सर्वात कठीण अशा या शस्त्रक्रियेच्या यशाचे हे फळ. जेव्हा डेल्लासला याविषयी विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, "मला शॉक लागल्यानंतर कित्येक महिन्यांनी मी शुद्धीवर आलो पण जेव्हा मी माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवाला तेव्हा झालेल्या अपघाताची मला तीव्रता समजली. कित्येक दिवस मी खुप रडलो पण आज मला नाक आहे, पापण्या आहेत आणि मला ओठही आहेत. मला माझ्या लाडक्या मुलीला जवळ घेऊन आता तिचा पापाही घेता येईल". यावेळी त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या.

"Face Transplantation" साधारण असे असते:




चेहर्‍याचा जवळजवळ सर्व भाग बदलून पूर्णपणे नवा चेहरा लावला जातो.हे खरोखरच मनुष्याचे निसर्गाला दिलेले मोठे आव्हान आहे. पण डेल्लास सारख्या लोकांना ज्यांनी आपली ओळख, आपला चेहराच गमावला आहे अशा सर्वांना निश्चितच हा विजय आशेचा किरण आहे!

-अद्वैत

Monday, May 9, 2011

तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडलात का?

नमस्कार,

सर्वप्रथम मराठी कॉर्नरविषयी थोडक्यात माहिती:

नाव: Marathi Corner a marathi forum। मराठी कॉर्नर एक मराठी फोरम

पत्ता: http://www.marathicorner.com

उद्घाटन: 22/10/2010

उद्देश: एक चर्चामंच जो फक्त आणि फक्त चर्चेसाठीच बनवला आहे!

वेगळेपणा: एकदा मराठी कॉर्नर हाताळून पाहाच! आत्तापर्यंत असे हटके मराठी संकेतस्थळ क्वचितच आपण हाताळले असेल. सध्या सुरू असलेल्या चर्चामंचापेक्षा पूर्ण वेगळे असे हे चर्चामंच आहे.

आजवरचा लेखाजोखा: •  एकुण पोस्टस 645
                                      • एकुण मांडले गेलेले विषय 411
                                      • एकुण सभासद 231
                                      • फेसबुक फॉलोवर्स 228 

मराठी कॉर्नरच्या सभासदांचे मराठी कॉर्नरवरिल प्रेम:
इथे काही निवडक दुवे देत आहे ज्यांनी मराठी कॉर्नरच्या सुरवातिच्या काळात असा आधार देऊन आम्हाला उभे राहण्यात मदत केली! त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद ! :)
तसेच मराठी कॉर्नर बद्दल दैनिक सकाळमध्येही एक छोटासा अभिप्राय छापून आला होता! त्याचा दुवा:
http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


    ही झाली मराठी कॉर्नरबद्दलची थोडक्यात माहिती. आता सर्वात महत्वाची माहिती ज्यासाठी हा लेख प्रसिद्ध करित आहे. मराठी कॉर्नरची "ब्लॉग जोडा" सुविधा. आजवर नेटवर उपलब्ध असलेल्या ब्लॉग सुचींपेक्षा थोडी हटके अशी मराठी कॉर्नरची ब्लॉग सूची आहे. आम्ही मराठी कॉर्नर ब्लॉगसूचीची २ विभागात विभागणी केली आहे:
    १.मेंबर्स ब्लॉग
    २.जोडले गेलेले ब्लॉग.

    १.मेंबर्स ब्लॉग:
    पत्ता: http://www.marathicorner.com/memberblogs/
    "मेंबर्स ब्लॉग" ही अटोमॅटिक अपडेट होणारी ब्लॉगसूची आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडता तेव्हा तुम्ही अपडेट केलेले तुमच्या ब्लॉगवरिल लेख आपोआप अर्ध्यातासांच्या आत मराठी कॉर्नरवर तुमच्या नावानिशी पोस्ट होतात. तसेच तुमच्या मूळ लेखाचा दुवा देखिल तुमच्या पोस्टला जोडला जातो. म्हणजेच जेव्हा पाहूणा तुमचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी मराठी कॉर्नरवर प्रसिद्ध झालेल्या तुमच्या लेखावर क्लिक करताच मराठी कॉर्नर त्यांना तुमच्या मूळ लेखाकडे म्हणजेच तुमच्या ब्लॉगवर पाठवतो. अशा पद्धतीने तुमच्या ब्लॉगचा वाचक तुम्हाला पाठवला जातो जेणेकरून तुम्ही लिहिलेल्या लेखाचे १००% क्रेडिट तुम्हालाच मिळेल.

    ठळक वैशिष्टे:
    • तुमच्या ब्लॉगवर पोस्ट केलेला लेख अर्ध्या तासाच्या आत आपोआप मराठी कॉर्नरच्या ब्लॉगसूचीत अपडेट केला जातो.
    • तुमच्या लेखाचे संपूर्ण क्रेडिट देण्यासाठी तुमचा लेख तुमच्याच नावे प्रसिद्ध केला जातो आणि त्या लेखाला तुमच्या मूळ ब्लॉगपोस्टशी जोडले जाते.
    • तुमच्या ब्लॉगला "बॅकलिंक" मिळते. जे टेक्निकल दृष्ट्या खूप महत्वाचे आहे.
    • ब्लॉगवर प्रसिद्ध केलेली "चित्रे" देखिल येथे प्रसिद्ध होतात. त्यामुळे केवळ लेखन असलेलेच ब्लॉग जोडतो असे नाही. तुमचा ब्लॉग जर फोटोग्राफी,चित्रांचा असेल तर तो देखिल आम्ही जोडतो. आणि अशी सुविधा क्वचितच कोठे उपलब्ध आहे!
    • नवे लेख एका दृष्टीक्षेपात पाहण्यासाठी उजव्या बाजूस नव्याने अपडेट झालेले ब्लॉगचे दुवे दिले जातात.अशा पद्धतीने प्रत्येक लेखाला एकूण २ वेळा बॅकलिंक दिली जाते.
    २.जोडले गेलेले ब्लॉग:
    पत्ता:http://marathicorner.com/memberblogs/jodalegeleleblog/ 

    ही एक इंटरेस्टिंग ब्लॉगसूची आहे. या ब्लॉगसूचीचा वापर "ब्लॉग जोडणी पडताळणी" साठी केला जातो. येथे जर तुमचा ब्लॉग दिसत असेल तर ओळखावे की आपला ब्लॉग १००% व्यवस्थित जोडला गेला आहे. या इथे तुमच्या ब्लॉगचे, तुम्ही ज्याक्षणी जोडता त्यावेळी असलेले लेआऊटचा स्क्रिनशॉट तुमच्या ब्लॉगच्या पत्त्याशी जोडला जातो. ही अशी "डिजीटल" ब्लॉगसूची देखिल क्वचितच आपण पाहिली असेल.

    ठळक वैशिष्टे:

    • तुमचा ब्लॉग स्क्रिनशॉटच्या रूपात जोडला जातो जेणे करून पाहूण्यांना थोडक्यात तुमचा ब्लॉग कसा दिसतो याची कल्पना येते आणि नक्कीच तो प्रत्यक्षात पाहण्याची त्यांना उत्सुकता निर्माण होते.
    • येथे तुमचा ब्लॉग दिसला म्हणजे तुमचा ब्लॉग व्यवस्थित जोडला गेला आहे असे समजावे 
    मराठी कॉर्नरशी ब्लॉग जोडण्यासाठीचे नियम:
    हो! मराठी कॉर्नरशी ब्लॉग जोडण्याआधी काही नियम पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही पूर्ण नियम पाळले तर तुमचा ब्लॉग १०१% जोडला जाईल याची खात्री देतो! तर ते नियम खालील प्रमाणे आहेत!

    १.सर्वप्रथम आपण मराठी कॉर्नरचे सभासद असणे गरजेचे आहे. आपला ब्लॉग जोडण्याआधी आम्ही याची पुर्ण तपासणी करू. जर आपण सभासद नसाल तर आजच सभासद व्हा. यासाठी कोणतेही शुल्क नाही.
    हे महत्वाचे आहे कारण ब्लॉगसूची हे काही मराठी कॉर्नरचे महत्वाचे कार्य नाही. चर्चामंच हा मराठी कॉर्नचा मूळ उद्देश आहे आणि केवळ सभासदांना मराठी कॉर्नरकडून जास्तित जास्त लाभ व्हावा म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि त्याचाच भाग म्हणजे ही ब्लॉगसूची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मराठी कॉर्नर म्हणजे ब्लॉगसूची नव्हे, ही एक "add on" सुविधा आहे जी फक्त मराठी कॉर्नरच्या सभासदांसाठीच उपलब्ध आहे.

    २.इथे आपला ब्लॉग जोडण्याआगोदर आपण आमच्या मराठी कॉर्नरचे विजेट आपल्या ब्लॉगवर लावणे गरजेचे आहे. आमचा विजेट कोड ब्लॉग जोडणी अर्जासोबत दिला आहे.विजेट सोबत एखादा अभिप्राय जर आपण आपल्या ब्लॉगवर लिहू शकलात तर खुपच चांगले होईल आणि त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. 
     अभिप्राय लिहिणे सक्तीचे नाही.मराठी कॉर्नर हे हॉशी संकेतस्थळ आहे. आणि आम्ही उपलब्ध करून देत असलेल्या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा हीच आमची ईच्छा आहे. त्यामुळे वर दिलेल्या दुव्यांप्रमाणे आपण जरी एखादा छोटासा अभिप्राय मराठी कॉर्नरबद्दल तुमच्या ब्लॉगवर लिहून मराठी कॉर्नरची माहिती तुमच्या ब्लॉग वाचकांना देऊ शकलात तर त्यांनाही या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

    ३.बेकायदेशिर, अश्लील, राजकीय,जाती-धर्म विरोधी,चोरलेले असे काहीही लिखाण दिसून आले तर आपला ब्लॉग अजिबातच स्विकारला जाणार नाही आणि त्याचे कारणही दिले जाणार नाही कारण जे असे ब्लॉग जोडायचा प्रयत्न करतिल त्यांना याचे कारण माहितच असेल! :D 
    हा नियम आम्ही कटाक्षाने पाळतो. बेकायदेशिर, अश्लील, राजकीय,जाती-धर्म विरोधी,चोरलेले असे काहीही लिखाण दिसून आले तर तो ब्लॉग विना कारण देता काढून टाकला जाईल.


    तुम्ही म्हणत असाल,
    भरपूर झाली माहिती आता ब्लॉग कसा जोडायचा ते सांगा? :D 
    सांगतो! तर ब्लॉग जोडणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमचा ब्लॉग दिलेल्या नियमांत बसतोय का ते पहा, सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करून घ्या आणि मगच हा अर्ज भरा:

    http://www.marathicorner.com/memberblogs/attach-your-blog

    झालं! एवढ सोप्प आहे! अर्जभरून झाल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्हाला मराठी कॉर्नरकडून मेल मिळेल ज्यात आपल्या ब्लॉग जोडण्यासंबंधीची सर्व माहिती असेल.या प्रक्रिये दरम्यान कोणताही problem आल्यास अथवा बरेच दिवस तुमच ब्लॉग जोडला गेला नाही तर आम्हाला लगेच marathicorner@gmail.com वर लिहून कळवा! हा ईमेल पत्ता खास मराठी कॉर्नरच्या सभासदांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेण्यासाठी बनवला आहे जिथे आम्ही मराठी कॉर्नर टिम मेंबर तुम्हाला आलेल्या अडचणी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो!

    आणि हो, जर तुम्हाला मराठी कॉर्नरबद्दल एखादा अभिप्राय तुमच्या ब्लॉगवर लिहिलाच तर लगेच त्या पोस्टची लिंक आम्हाला marathicorner@gmail.com वर मेल करा, नक्कीच त्याला आम्ही आमच्या संग्रही जपून ठेवू! :)

    आता वाचक म्हणून तुम्ही काय कराल?
    मी काही सक्ती करित नाहिये किंवा आज्ञाही सोडत नाहिये, फक्त एक आपेक्षा ठेवतोय ती म्हणजे एवढीच की ही जी आम्ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात जर तुम्ही काही मदत करू शकलात तर निश्चितच आम्ही आपले आभारी राहू. जास्त काही नाही फक्त ट्विटर,फेसबुक,बझ सारख्या सोशल निटवर्कवर तुमचे बरेच ब्लॉगर मित्र असतात, त्यांना ह्या पोस्टची लिंक दऊन किंवा ही पोस्ट सोबत असलेल्या "शेअरिंग" बटनाचा वापर करून तुमच्या मित्रपरिवारास कळवू शकलात तर त्यांनाही त्यांच्या ब्लॉगला आणखी प्रसिद्धी देण्यास मदत आम्ही करू शकू! आणि प्रत्येक बॅकलिंक सर्च इंजिनमध्ये चांगली जागा पटकावण्यात किती महत्वाची असते याची माहिती तुम्हाला सहज नेटवर मिळेल! :)

    या लेखाबद्दल काही शंका असतिल किंवा आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर निःसंकोचपणे या पोस्टला कमेंट टाका किवा कधीही  marathicorner@gmail.com या आमच्या इमेल पत्त्यावर मेल करा किंवा मराठी कॉर्नरवर उपलब्ध असलेला "संपर्क फॉर्म" भरून आम्हाला तुमच्या शंका, मत, सुचना कळवा!

    आशा आहे आम्ही ही सुंदर सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकू! आपला आधार व आपले आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

    आपला विश्वासू,
    अद्वैत
    मराठी कॉर्नर टिम

    Ratings and Recommendations by outbrain

    LinkWithin

    Related Posts Plugin for WordPress, Blogger...