आज २३ मार्च. ८० वर्षांपूर्वी तिघा क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशी दिली; का तर त्यांना कायमचे संपवून टाकण्यासाठी पण हेच तिघे भारताच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले. आजचा दिवस शहिद दिन म्हणून ओळखला जातो. शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव यांनी दिलेल्या बलिदानाचे हे जणू प्रतिकच आहे. पण खरच या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आपल्याला आधिकार आहे?
आज न्यूज चॅनल पाहात होतो, शहिद दिनाबद्दल बोलण्यासाठी काही मंत्री आतिशय हापापले होते. कोण म्हणत होता, "वो बहुत बडे वीर थे!" , "हम उनके बदौलत यहा है" वगैरे वगैरे! पण खरच त्यांची लायकीतरी आहे या वीरांबद्दल बोलण्याची? जो देश स्वतंत्र व्हावा म्हणून या लोकांनी हसत हसत बलिदान दिले, अशा या देशात एका खुर्चीसाठी हो्णारे वाद, सामान्यमाणसाला कळूही शकणार नाही इतक्या मोठ्या रकमेचे घोटाळे, भ्रष्टाचार, जातीभेद, नोंदी केल्या तर एखादा ग्रंथ तयार होईल असे प्रकार खरच त्यांच्या या बलिदानाची कुचेष्टा करत आहेत! या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत! मग त्यांच्या या कर्तुत्वाची आठवण व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे?
भगत सिंहांना फाशीला नेत असताना त्यांच्याकडे काही कविता होत्या. त्यातिल एक:
भला निभेगी तेरी हमसे क्यों कर ऍ वायज़
कि हम तो रस्में मोहब्बत को आम करते हैं
मैं उनकी महफ़िल-ए-इशरत से कांप जाता हूँ
जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।
काय फरक आहे आपल्यात आणि शहिद भगतसिंगांनी रचलेल्या या कवितेत? "जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।" . आपण नेमके हेच करतो आहोत असे वाटत नाही?
आज सर्वत्र त्यांच्या फोटोंचे पुजन होत होते, "इंकलाब झिंदाबाद"चे नारे लागत होते पण खरच हा सर्व दिखावेपणा नाही वाटत? भ्रष्ट सरकाराचे जुलुम सहन करून देखिल गप्प बसणारे आपण कोणत्या अधिकाराने या शहिदांच्या बलिदानाची आठवण व्यक्त करतो?
शहिद दिन आणि क्रांतिकारक दिन हे दोन दिवसच हवेत त्यांच्या क्रांतीच्या तेजाची आठवण ठेवण्यास? ज्यांना साधी भारताची प्रतिज्ञा सोडा राष्ट्रगीतही माहित नाही अशा मेट्रोसिटीतल्या तरुणांकडून जणू काही हे दोन दिवस "साजरे" केल्यासारखेच वाटतात! अरे लाज वाटली पाहिजे या अशा दिखावेपणाची!
गप्प आहे देश सारा
गप्प आहे आमचा स्वाभिमान!
नेतृत्वही लज्जास्पद आहे,
भ्रष्ट आहेत भावना!
एकमेकांस दोष देत
माणूसकीही ओशाळली आहे,
बुद्धीजिवी असू खरे पण
ही किड काही संपेना!
व्यर्थ गेले प्रयत्न आमचे
व्यर्थ गेले आमचे बलिदान,
ही भावना न राहो त्यांच्या मनी
हीच देवा चरणी प्रार्थना!
-अद्वैत
No comments:
Post a Comment