Tuesday, March 8, 2011

डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?

   भारताच्या द.आफ्रिका दौर्‍यावेळी मी आणि माझा छोटा मामेभाऊ मॅच पाहात होतो. द.आफ्रिकेने बर्‍यापैकी स्कोअर केला होता पण पावसाचा व्यत्यय खुप येत होता. मॅच नॅशनलवर होती त्यामुळे स्वच्छ हिंदित कॉमेंट्री सुरू होती. चेतन शर्मा त्याच्या टिपिकल टोनमध्ये सारखा म्हणत होता ," अब भारत को विकेट निकालनेकी जरूरत है! वरना डकवर्थ ल्युईस लगा तो मुश्किले और बढ जायेंगी....." (ज्यांना त्याचा टिपिकल टोन माहित आहे त्यांना वाचताना मजा येइल). २-४ वेळा तेच तेच तो बडबडत होता, तेवढ्यात माझ्या भावाने विचारले "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" झालं! आमच्या दांड्या तिथेच उडाल्या ! मी आपलं त्याला "अरे तो एक नियम असतो रे. पाऊस पडला की लावतात. काही नाही रे, शुद्ध बावळटपणा आहे" असे काहिसे सांगुन गप्प केले. पण त्याचा "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?" हा प्रश्न मनात घोळत राहिला! आणि नेमका चेतन शर्मा जे काही २ तास ओरडत होता तेच झाले. डकवर्थ ल्युईस लागू झाला आणि भारताला मिळेल्या टारगेटमध्ये ४० रन्सची एकूण भर पडली! तेव्हा माझ्या भावाला कळाले की "डकवर्थ ल्युईस हा निव्वळ बावळटपणा आहे!" :D वाटल्याप्रमाणेच भारत ती मॅच हरला पण त्याने विचारलेला प्रश्न काही केल्या डोक्यातून जाईना. लगेचच नेट उघडले आणि त्या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेतले!

         खर म्हणायचं तर तेव्हा कळाले की "डकवर्थ ल्युईस " हा बावळटपणा नसून खरच छान पद्धती आहे. ही पद्धत इंग्लंडचे दोन अंकशास्त्रज्ञ फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी शोधली. म्हणून त्याला "डकवर्थ ल्युईस " म्हणतात. ही पद्धत एका गणिती सुत्रावर अवलंबुन आहे. हे सुत्र फ्रैंक डकवर्थ आणि टौनी लुईस यांनी २००२ साली विकसित केलेल्या एका Resource Table वर आधारित आहे. ती सारणी खालीलप्रमाणे आहे:


 

यावरून असे दिसून येते की ही पद्धत उरलेल्या विकेट आणि ओवर यांच्यावर अवलंबून आहे. ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली ज्यामुळे आपण हातातली मॅच हारलो. ही सारणी कळण्यासाठी मी एक उदाहरण देतो. ते उदाहरण समजून घेतल्यावर तुम्हाला याचा वापर कसा करायचा ते कळेल.

           सगळ्यात आधी डकवर्थ ल्युईस चे सुत्र काय आहे ते पाहू. हे सुत्र S*(R)/१०० असे आहे. यातिल S म्हणजे आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स; R म्हणजे सारणीवरून मिळणारी संख्या. आता समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सामना होत आहे. समजा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करून २४० रन बनवल्या (म्हणूनच म्हणालो समजा :D). मग भारत खेळायला उतरला. साधारण २० ओवर खेळल्यानंतर पाऊस पडू लागला. त्यावेळी भारताची स्थिती १०३ रनवर २ विकेट गेल्या अशी आहे. आता समजा अर्धा तास पाऊस पडला म्हणून डकवर्थ ल्युईस  लावणे भाग पडले. मग आता आपण भारताला राहिलेल्या ओवर मधे काढायच्या रन डकवर्थ ल्युईस  सुत्रवापरून काढू.
S=आधिच्या टिमने बनवलेल्या रन्स २४०
R= उरलेल्या ओवर म्हणजे ५०-२०=३०; आता ३० ओवरची रेषा; गेलेल्या २ विकेटच्या रेषेला जिथे मिळते ती संख्या. म्हणजेच ६७.३.
म्हणून भारतासमोर नवे लक्ष= २४०* (६७.३)/१०० =१६२ रन्स (८ विकेट शिल्लक)

हे एक उदाहरण झाले. आता ह्याचे घडलेले उदाहरण घेऊ. मघाशी सांगितल्याप्रमाणे ही पद्धत सर्वप्रथम भारत आणि पकिस्तान यांच्यात २००६ मध्ये झालेल्या मॅचमध्ये वापरली गेली. त्यावेळी भारताने ४९ ओवर मध्ये ३२८ रन्स केल्या. आणि नंतर पाकिस्तानने ७ विकेट वर ४७ व्या ओवर मध्ये ३११ रन्स केल्या होत्या आणि खराब वातावरणामुळे मॅच थांबली. वास्तविक पाहता पाकला ३ ओवर मध्ये १८ रन काढायच्या होत्या पण डकवर्थ ल्युईस वापरला गेला आणि नवे लक्ष ३०४ दिले. जे त्यांनी आधिच पार केले होते. त्यामुळे भारत ७ रन्सनी हारला.

ही सारणी नेहमी नव्याने बनवली जाते. यात काही नियमही लागू केले आहेत. जसे की हा नियम कमित कमी २० ओवरचा खेळ झाल्याशिवाय वापरला जात नाही वगैरे! पण क्रिकेट हा "अनिश्चिततेचा खेळ" आहे. यात काहिही होऊ शकते. हारता हारता एखादी टिम जिंकूही शकते किंवा जिंकता जिंकता एखादी टिम हारूही शकते! त्यामुळे क्रिकेटसारख्या मनमोहक खेळाला या अशा अंकांच्या जाळ्यात पडलेले पाहून बर्‍याच क्रिकेट प्रेमिंनी या पद्धतीवर जगभरातून टिका केली. एवढ्या टिका झाल्या आहेत की सध्या या पद्धतीला पर्यायी पद्धत शोधण्याचे काम सुरू झाले आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे एक पर्याय आलाही आहे जो एका भारतिय इंजिनिअरने अथक परिश्रमाने निर्माण केला आहे. ICC ने देखिल या नव्या पद्धतीची दखल घेतली आहे आणि त्यांनाही ही नवी पद्धत डकवर्थ ल्युईस पेक्षा मजबूत वाटते आहे. आशा आहे माझ्या पुढच्या लेखापर्यंत ती पद्धत रुजू देखिल होईल.

मग आता कळले ना "डकवर्थ ल्युईस म्हणजे काय ते?" :)

-अद्वैत
introduce yourself

3 comments:

 1. डकवर्थ-लुईस पद्धत समजावून सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे, पण ती पद्धत जरा किचकटच आहे. बरेचदा स्टीव बकनर परवडला पण डकवर्थ-लुईस नको असे वाटते. एखादे वेळीस प्रतिस्पर्ध्याकडून इमानदारीत १५०-२०० धावांनी किंवा १० गड्यानीं हरावे पण डकवर्थ-लुईसमुळे हरु नये. शेवटपर्यंत काय चुकले कळतच नाही.

  ReplyDelete
 2. लेख चांगला आहे..

  आयुष्यात हातात चेंडू/बॅट (व्यावसायिक पातळीवर) न् धरलेल्या दोन गणितज्ञांनी काहीतरी विचित्र गणिती नियम क्रिकेटसारख्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या आणि प्रचंड बिनभरवशाच्या खेळासाठी लावणं हे म्हणजे एखाद्या जातीच्या खवय्याने पंचपक्वान्न स्वतःला आवडतात म्हणून ती खाण्याचं सोडून स्वतःच ती बनवायला जाण्याएवढं मुर्खपणाचं आहे. मला डकवर्थ-लुईस नियमाबद्दल काडीचीही आपुलकी नाही. शुद्ध मुर्खपणा आहे तो. परखड मताबद्दल क्षमस्व.

  >> बरेचदा स्टीव बकनर परवडला पण डकवर्थ-लुईस नको असे वाटते.

  हाहा.. अगदी अगदी !!

  ReplyDelete
 3. माझेही मत तेच आहे! "अनिश्चितते"च्या खेळामध्ये गणित घालायचेच कशाला?

  @सिद्धार्थजी,हेरंबजी
  आपल्या मतांशी मी १००% सहमत आहे! कमेंटबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...