Thursday, May 26, 2011

माझं पहिलं व्यंगचित्र: "मॅडम का ढाबा"

आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे!  २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं. इकडे रामदेवबाबा "काळा पैसा आणा, काळा पैसा आणा" म्हणून ओरडत आहेत पण ह्या घोटाळ्यातल्या पैश्याबद्दल कोणीच काही बोलत नाहिये! मान्य की लोक पकडले, कारवाई सुरू आहे, वगैरे वगैरे पण ते पैसे गेले कुठे???

असो, याच विषयावर मी आज पहिलं मोठे व्यंगचित्र काढले आहे. "मॅडम का ढाबा". साहजिकच यात कोणाला उद्देशुन काढले आहे ते समजले असेलच! :)

तर आपले स्वागत हे "मॅडम का ढाबा" मध्ये. आजचे मेन्यू: २जी घोटाळा, CWG घोटाळा, आदर्श आमटी, कलमाडी फ्राय, इत्यादी बरेच काही. आणि हो, सगळे विषय भट्टीत इतके खरपूस भाजले आहेत की चव नक्कीच आवडेल! :D

या आधी मी बरिच व्यंगचित्र काढली पण अगदी छोटी, टाईमपासवाली, पण हे माझं पहिलं मोठं व्यंगचित्र! तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा! :)

Wednesday, May 18, 2011

हे नातं! असं कसं?

इंजिनिअरिंग स्टुडंट आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांच्यात जे नातं असतं ते कधीच कोठेही बोललं गेलं नाही, कोठे सांगितलं गेलं नाही. कोणी विचारलच नाही म्हणा ना! पण तरिही आज मी सांगणारच आहे! :D  एक असं नातं जे बहुदा माझ्यासारख्या सर्व गुणी इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी त्यांच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये कधीतरी नक्कीच अनुभवलं असेल. जर तसे नसेल तर तुम्ही एक तर "पुस्तकी किडे" आहात किंवा अगदिच "गुणी बाळ" आहात!

तर मग अशाच एका गुणी शिक्षकाचा मला आलेला "सॉलिड" अनुभव मी आज शेअर करणार आहे. अगदी ताजा-ताजा आहे. परवाच external oral चा सोहळा पार पडला. :D अगदी उत्साहात आम्ही सर्वजण सहभागी झालो होतो. मान्यवर externals देखिल उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या चेहर्‍यावर सुडाचे स्मितहास्य किती सुरेख दिसत होते हे शब्दात मांडणे थोडे कठिणच! सोहळा भारतिय प्रमाण वेळेनुसार वेळेत सुरू झाला.  काहींना lot ऑफ marks मिळत होते तर काहिंना shot! सहाजिकच, या सोहळ्यास मी ही नचुकता सहभागी झालो होतो, तसे आग्रहाचे निमंत्रणच मिळाले होते त्यामुळे जावेच लागले. :D

तसं म्हणाल तर मी स्वभावाने एकदम साधा,सरळ आणि गुणी मुलगा. काय माहित बहुतेक देव अशाच सोज्वळ मुलांना छळत असेल! :D आधिच्या २ oral exams (तोंडी परिक्षा :D) व्यवस्थित पार पडल्या होत्या. अगदी गरम पावावर लोणी वितळावं तसा मी प्रत्येक प्रश्नाला वितळून जवळ जवळ संपलोच होतो! :D (लक्षपूर्वक वाचलत ना उदाहरण? लोणी म्हणालो मी स्वतःला! :D ) आता राहिलेली शेवटची oral देण्याचा अगदीच मुडच नव्हता! कारण ३ पैकी २ तर आधीच उडाल्या आहेत! आता ही पण अशिच असणार. आणि माझा अंदाजही बरोबर ठरला पण किंबहुना सगळ्यात मोठा shot! माझ्यानावे आधिच लिहून ठेवला होता. मला याची जराशी चाहूल लागली होती पण माझा "sixth sense" नेहमी दगा देतो (स्पेशली हिरवळीच्या बाबतीत :D) म्हणून यावेळीही मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले पण लेकाचा यावेळी मात्र खरा निघाला.

तर सादर आहे कहाणी माझी आणि माझ्या प्रिय मास्तरांच्या "सोज्वळ" नात्याची! :D
तसा मी गुणी बाळ असल्याने सदैव शिक्षकांच्या नजरेत असायचो. लेक्चर बंक करणे हा गुन्हा नसून एक कला आहे ह्यावर माझी नित्तांत श्रद्धा! . पण तरिही शिक्षकांबद्दल अनादर मात्र कधिही नाही. तरिपण जेव्हा ह्या नात्याला जर वेगळे वळण मिळाले तर ते किती महागात पडते याची प्रचिती जेव्हा एक्सटर्नल "You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!" असे खणखणीत म्हणतो तेव्हा येते! :D

तर झालेलं असं की; कॉलेजमध्ये सगळ्यात टारगट म्हणून आमचा ग्रुप ओळखला जातो (तितकाच स्कॉलर आहे हे मात्र कोणी सांगत नाही! चालायचच! जगाची रितच आहे ती! :p ;) ) आणि मी त्या ग्रुपचा सभासद. त्यामुळे HOD पासून शिपायापर्यंत सगळ्यांशी ओळख. (फरक एवढाच की शिक्षक लोक जरा टाप दाखवतात आणि तितकेच प्रेम, आदर शिपाई लोक देतात.) तर अशाच एका नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाचे माझ्याशी बिनसले. वास्तविक मी वर्गात शांत असतो (हे सिरियसली बोलतोय! :) ) पण तरिही बॅकबेंचर म्हणून की काय पण मला त्या गृहस्थाने किमान ४ ते ५ वेळा अपमानित केले. नुकतेच BE पास झालेले. म्हणजे माझ्याहून १-२ वर्षांनी मोठे पण शेवटी "शिक्षक" आहेत म्हणून सर्व सहन करत राहिलो. पण तरिही हे मास्तर काय सुधरेनात. एकदा सरळ मला धमकी दिली "एक्सटर्नलला बघ तुझी काय अवस्था करतो" मी देखिल म्हणालो "ठिक आहे! बघुन घेऊ! "

आणि तो दिवस आलाच. मी हा प्रकार कधिच विसरलो होतो पण हा बाबा काय विसरला नव्हता. फाईनल सबमिशन दिवशी फाईलवर सही केल्याशिवाय एक्सटर्नल देता येत नाही. आणि या माणसाला तेच हवे होते. प्रत्येकवेळी "मी जरा बिझी आहे. थोड्या वेळाने ये", "आत्ता नको उद्या ये" असे करत करत मला जवळ जवळ ७-८ दिवस झिंगवले. शेवटी वैतागुन मी म्हणालो "अहो सर माझी उद्या एक्सटर्नल आहे! आता तरी सही करा" तर म्हणाले "मला एका अर्जंट मिटिंगला जायचय HOD सोबत, तु उद्या लवकर ये आणि माझी सही घे."  मी ठिक आहे म्हणालो आणि दुसर्‍या दिवशी कॉलेज सुरू होण्या आगोदर अर्धा तास त्या गृहस्थाची वाट पाहात राहिलो. आता दिड एक तास झाला तरी हा माणूस काही येईना. इकडे माझा रोल नंबर जवळ येत होता तरी याचा पत्ता नाही. शेवटी एकदाचा आला. मी "हुश्य्य्य्य!" म्हणून उसासे टाकत त्यांच्याकडे गेलो आणि फाईल पुढे केली. मला म्हणाले "अरे! तु अजून गेला नाहिस ओरल द्यायला?" मी म्हणालो "अत्ता जाणारे! सर पटकन सही करा, माझा नंबर जवळ आलाय!". तेव्हा गडी म्हणाला "अरे जा तसाच. मी आहे. काही फरक पडत नाही सही नसली तर!". मी भोळा! मी लगेच विश्वास ठेवला त्याच्या बोलण्यावर आणि नंबर आला म्हणून आत गेलो. माझ्यासोबत माझे आणखी २ नंबर असे आम्ही ३ लोक एक्सटर्नल समोर बसलो.

एक्सटर्नलने एक एक करत माझी फाईल मागितली. मी दिली. त्याने आत पाहिलं आणि विचारलं "Where's the signature of your internal?" मी म्हणालो "He said don't waste your time and go to your oral. I will manage that." मग त्याने मला सरळ त्या सहिच्या जागेकडे बोट दाखवत खणखणीत विचारले "Do you know what's the meaning of this empty space ?" मी नकारार्थी मान हलवली आणि मग त्याचा तो खणखणीत "किल्लर" डायलॉग एखादी कानफाडित बसावी असा आला "You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!". याचा अर्थ "तुझी एक्सटर्नल होणार नाही. तु जाऊ शकतोस!"

हा आत्ता पर्यंतचा जबराट फालतूपणा होता! त्याक्षणी माझा राग इतका अनावर झाला, तडक एक्सटर्नलच्या हातातली फाईल हिसकाऊन घेतली आणि त्या इंटर्नल मास्तरकडे जाऊन म्हणालो "अहो सर, एक्सटर्नल ने मला बाहेर काढले" तेव्हा त्या मास्तरने माझ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला "हे तर होणारच होतं! आता कस वाटतय?". आई शप्पत! हे त्याने मुद्दामुन केले आहे हे कळल्यानंतर त्याक्षणी मी त्याला यथेच्छ बोललो. माझा आवाज इतका चढला होता की आजूबाजूची मुलं "एखादा थ्रीलर सिन" सुरू असल्यासारखे तोंड उघडून बसली होती.

हे माझ रूप मलाही माहित नव्हत! पण या कारणाने ते बाहेर आलं! मग तडक HOD कडे गेलो. घडला प्रकार सविस्तर सांगितला. HOD नी मास्तराला बोलावले, मला म्हणाले "बाळ तू जरा १० मिनिट बाहेर जा". मी केबीन मधून बाहेर आलो. एक दहा पंधरा मिनिटांनी मास्तर तोंड पाडून बाहेर आला. माझ्या फाईलवर सही केली. मला पुन्हा एक्सटरनल द्यायची सोय केली.

आज मी होतो म्हणून मी बोलू शकलो. उद्या एखाद्याचे करियर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी महावद्यालयातले विद्यार्थी आणि शिक्षकांची नोक झोक तर सुरूच असते आणि असाविच, त्याशीवाय कॉलेज लाईफला खरच मजा नाही.मी असेही म्हणत नाही की माझी काहीच चुक नव्हती पण शेवटी विद्यार्थी आम्ही. शेवटची ४ वर्ष आमच्या शिक्षणाची उरलेली असतात त्यामुळे जितकं मित्रांसोबत एंजॉयमेंट करायला मिळेल तितके आम्ही करतो पण एका लिमिट पर्यंत. जेव्हा त्या दोघांतील एखादाजरी एका लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा त्याचा खरच खुप मोठा परिणाम घडतो.आणि या अशा बाबतीत जेव्हा एखादा शिक्षक जाणून बूजून असला काही प्रकार स्वतःच्या विद्यार्थ्या बाबतीत करतो तेव्हा खरच त्या विद्यार्थी-शिक्षक नात्याला मैत्रीचे नव्हे तर दुष्मनीचे वळण लागते. त्यामुळ हे खरच एक इंटरेस्टिंग नातं आहे.

Saturday, May 14, 2011

नवा चेहरा!

आजवर आपण कित्येक सिनेमांत पाहिले आहे की व्हिलन प्लास्टिक सर्जरी करून हिरोचा चेहरा घेतो किंवा हिरो प्लास्टिक सर्जरी करून स्वतःची आयडेंटिटी बदलतो आणि काम झाले की पुन्हा आपला "वरिजनल" चेहरा परत मिळवतो! आयला! हे जरा अतिच दाखवतात आणि आम्ही मस्त पॉपकॉर्न खात ते बघत बसतो. कित्येकांच्या मनातपण येत असेल "आपण पण चेहरा बदलू आणि "त्या"ला तिच्यापासून लांब टाकू" किंवा "बदला घ्यायला मजा येईल" वगैरे, वगैरे बाळबोध कल्पना आपल्या डोक्यात फिरू लागतात. आणि हे सिनेमावालेही ह्या गोष्टी अशा दाखवतात जशा या प्लास्टिक सर्जरी नसून प्लास्टिक पिशव्या वापरून केले आहे! असो! आजच्या या लेखामागचा उद्देश म्हणा किंवा विषय पूर्ण वेगळा आहे. आज मी प्लास्टिक सर्जरी नव्हे तर  "Face Transplantation" बद्दल बोलणार आहे.

आजवर आपण "Heart Transplantation" बद्दल ऐकलेच असेल. नसेल ऐकले तरी साध्या सोप्या भाषेत "निकामी झालेले एखाद्याचे हृदय काढून त्याजागी नवे हृदय बसवणे" (कृपया प्रेमभंग झालेल्या लोकांनी याचा अर्थ त्यांच्या बुद्धीमतेनुसार घेऊ नये!). म्हणजेच पूर्णपणे नवे जिवनच! आज माणसाने वैद्यकिय क्षेत्रात निसर्गाला कितीतरी मोठी आव्हाने दिली आणि आज तो ती आव्हाने पूर्ण देखिल करित आहे. आपणच असे आहोत की आपल्याला यासारख्या कित्येक गोष्टींची साधी माहिती देखिल नाही. त्यात मीही आलोच. कारण मलाही यातले अगदी थोडेच ज्ञान आहे.

पण आज माणसाचे यश पाहता लवकरच "Human bodypart library" निघेल की काय अशी भिती मात्र मला वाटत आहे. म्हणजे राखी सावंत सारख्या सोज्वळ नटीला तिचे नाक (नकटे असले तरी काय झाले, दिसते ना!) बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून काहितरी भन्नाट चेहर्‍यात रूपांतर करायला लागणार नाही. फक्त libraryत जायचं, हवे ते नाक निवडायचं, बसवायचं, झालं! (नका! याच जास्त खोलवर विचार करू नका! मी एक कल्पना मांडतोय! लगेच तुमची कल्पना शक्ती नको तितकी वापरू नका! )

असो तर आजच्या लेखाचा मुळ विषय म्हणजे माणसाने निसर्गाला दिलेल्या आव्हानावर आणखी एक विजय! गेल्या काही दिवसांपुर्वीच आमेरिकेत पहिली यशस्वी "Full Face Transplantation" शस्त्रक्रिया पार पडली. ही यशस्वी शस्त्रक्रिया "डेल्लास विएन्स" नावाच्या व्यक्तीवर पार पडली. 2008 साली एका अती तीव्र इलेक्ट्रिक शॉकमुळे डेल्लास इतका भयानक जळाला की त्याच्या चेहर्‍यावरिल सर्व गोष्टीच नाहिशा झाल्या. म्हणजे नाक, गाल, डोळे, सर्व काही! उरला तो फक्त एक विद्रुप आणि काहिसा भयानक चेहरा.पण त्याने जिवनाशी हार मानली नाही. जिद्दीने गेली २-३ वर्ष तो तसाच चेहरा घेऊन जगत आला. आणि शेवटी तो जिंकलाच!


हा फोटो, त्याचा मुळ चेहरा, अपघातानंतरचा चेहरा आणि "Face Transplantation" नंतरचा चेहरा!

३० तज्ञ डॉक्टरांच्या १५ तासाहूनही अधिक चाललेल्या सर्वात कठीण अशा या शस्त्रक्रियेच्या यशाचे हे फळ. जेव्हा डेल्लासला याविषयी विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, "मला शॉक लागल्यानंतर कित्येक महिन्यांनी मी शुद्धीवर आलो पण जेव्हा मी माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवाला तेव्हा झालेल्या अपघाताची मला तीव्रता समजली. कित्येक दिवस मी खुप रडलो पण आज मला नाक आहे, पापण्या आहेत आणि मला ओठही आहेत. मला माझ्या लाडक्या मुलीला जवळ घेऊन आता तिचा पापाही घेता येईल". यावेळी त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या.

"Face Transplantation" साधारण असे असते:




चेहर्‍याचा जवळजवळ सर्व भाग बदलून पूर्णपणे नवा चेहरा लावला जातो.हे खरोखरच मनुष्याचे निसर्गाला दिलेले मोठे आव्हान आहे. पण डेल्लास सारख्या लोकांना ज्यांनी आपली ओळख, आपला चेहराच गमावला आहे अशा सर्वांना निश्चितच हा विजय आशेचा किरण आहे!

-अद्वैत

Monday, May 9, 2011

तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडलात का?

नमस्कार,

सर्वप्रथम मराठी कॉर्नरविषयी थोडक्यात माहिती:

नाव: Marathi Corner a marathi forum। मराठी कॉर्नर एक मराठी फोरम

पत्ता: http://www.marathicorner.com

उद्घाटन: 22/10/2010

उद्देश: एक चर्चामंच जो फक्त आणि फक्त चर्चेसाठीच बनवला आहे!

वेगळेपणा: एकदा मराठी कॉर्नर हाताळून पाहाच! आत्तापर्यंत असे हटके मराठी संकेतस्थळ क्वचितच आपण हाताळले असेल. सध्या सुरू असलेल्या चर्चामंचापेक्षा पूर्ण वेगळे असे हे चर्चामंच आहे.

आजवरचा लेखाजोखा: •  एकुण पोस्टस 645
                                      • एकुण मांडले गेलेले विषय 411
                                      • एकुण सभासद 231
                                      • फेसबुक फॉलोवर्स 228 

मराठी कॉर्नरच्या सभासदांचे मराठी कॉर्नरवरिल प्रेम:
इथे काही निवडक दुवे देत आहे ज्यांनी मराठी कॉर्नरच्या सुरवातिच्या काळात असा आधार देऊन आम्हाला उभे राहण्यात मदत केली! त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद ! :)
तसेच मराठी कॉर्नर बद्दल दैनिक सकाळमध्येही एक छोटासा अभिप्राय छापून आला होता! त्याचा दुवा:
http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


    ही झाली मराठी कॉर्नरबद्दलची थोडक्यात माहिती. आता सर्वात महत्वाची माहिती ज्यासाठी हा लेख प्रसिद्ध करित आहे. मराठी कॉर्नरची "ब्लॉग जोडा" सुविधा. आजवर नेटवर उपलब्ध असलेल्या ब्लॉग सुचींपेक्षा थोडी हटके अशी मराठी कॉर्नरची ब्लॉग सूची आहे. आम्ही मराठी कॉर्नर ब्लॉगसूचीची २ विभागात विभागणी केली आहे:
    १.मेंबर्स ब्लॉग
    २.जोडले गेलेले ब्लॉग.

    १.मेंबर्स ब्लॉग:
    पत्ता: http://www.marathicorner.com/memberblogs/
    "मेंबर्स ब्लॉग" ही अटोमॅटिक अपडेट होणारी ब्लॉगसूची आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडता तेव्हा तुम्ही अपडेट केलेले तुमच्या ब्लॉगवरिल लेख आपोआप अर्ध्यातासांच्या आत मराठी कॉर्नरवर तुमच्या नावानिशी पोस्ट होतात. तसेच तुमच्या मूळ लेखाचा दुवा देखिल तुमच्या पोस्टला जोडला जातो. म्हणजेच जेव्हा पाहूणा तुमचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी मराठी कॉर्नरवर प्रसिद्ध झालेल्या तुमच्या लेखावर क्लिक करताच मराठी कॉर्नर त्यांना तुमच्या मूळ लेखाकडे म्हणजेच तुमच्या ब्लॉगवर पाठवतो. अशा पद्धतीने तुमच्या ब्लॉगचा वाचक तुम्हाला पाठवला जातो जेणेकरून तुम्ही लिहिलेल्या लेखाचे १००% क्रेडिट तुम्हालाच मिळेल.

    ठळक वैशिष्टे:
    • तुमच्या ब्लॉगवर पोस्ट केलेला लेख अर्ध्या तासाच्या आत आपोआप मराठी कॉर्नरच्या ब्लॉगसूचीत अपडेट केला जातो.
    • तुमच्या लेखाचे संपूर्ण क्रेडिट देण्यासाठी तुमचा लेख तुमच्याच नावे प्रसिद्ध केला जातो आणि त्या लेखाला तुमच्या मूळ ब्लॉगपोस्टशी जोडले जाते.
    • तुमच्या ब्लॉगला "बॅकलिंक" मिळते. जे टेक्निकल दृष्ट्या खूप महत्वाचे आहे.
    • ब्लॉगवर प्रसिद्ध केलेली "चित्रे" देखिल येथे प्रसिद्ध होतात. त्यामुळे केवळ लेखन असलेलेच ब्लॉग जोडतो असे नाही. तुमचा ब्लॉग जर फोटोग्राफी,चित्रांचा असेल तर तो देखिल आम्ही जोडतो. आणि अशी सुविधा क्वचितच कोठे उपलब्ध आहे!
    • नवे लेख एका दृष्टीक्षेपात पाहण्यासाठी उजव्या बाजूस नव्याने अपडेट झालेले ब्लॉगचे दुवे दिले जातात.अशा पद्धतीने प्रत्येक लेखाला एकूण २ वेळा बॅकलिंक दिली जाते.
    २.जोडले गेलेले ब्लॉग:
    पत्ता:http://marathicorner.com/memberblogs/jodalegeleleblog/ 

    ही एक इंटरेस्टिंग ब्लॉगसूची आहे. या ब्लॉगसूचीचा वापर "ब्लॉग जोडणी पडताळणी" साठी केला जातो. येथे जर तुमचा ब्लॉग दिसत असेल तर ओळखावे की आपला ब्लॉग १००% व्यवस्थित जोडला गेला आहे. या इथे तुमच्या ब्लॉगचे, तुम्ही ज्याक्षणी जोडता त्यावेळी असलेले लेआऊटचा स्क्रिनशॉट तुमच्या ब्लॉगच्या पत्त्याशी जोडला जातो. ही अशी "डिजीटल" ब्लॉगसूची देखिल क्वचितच आपण पाहिली असेल.

    ठळक वैशिष्टे:

    • तुमचा ब्लॉग स्क्रिनशॉटच्या रूपात जोडला जातो जेणे करून पाहूण्यांना थोडक्यात तुमचा ब्लॉग कसा दिसतो याची कल्पना येते आणि नक्कीच तो प्रत्यक्षात पाहण्याची त्यांना उत्सुकता निर्माण होते.
    • येथे तुमचा ब्लॉग दिसला म्हणजे तुमचा ब्लॉग व्यवस्थित जोडला गेला आहे असे समजावे 
    मराठी कॉर्नरशी ब्लॉग जोडण्यासाठीचे नियम:
    हो! मराठी कॉर्नरशी ब्लॉग जोडण्याआधी काही नियम पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही पूर्ण नियम पाळले तर तुमचा ब्लॉग १०१% जोडला जाईल याची खात्री देतो! तर ते नियम खालील प्रमाणे आहेत!

    १.सर्वप्रथम आपण मराठी कॉर्नरचे सभासद असणे गरजेचे आहे. आपला ब्लॉग जोडण्याआधी आम्ही याची पुर्ण तपासणी करू. जर आपण सभासद नसाल तर आजच सभासद व्हा. यासाठी कोणतेही शुल्क नाही.
    हे महत्वाचे आहे कारण ब्लॉगसूची हे काही मराठी कॉर्नरचे महत्वाचे कार्य नाही. चर्चामंच हा मराठी कॉर्नचा मूळ उद्देश आहे आणि केवळ सभासदांना मराठी कॉर्नरकडून जास्तित जास्त लाभ व्हावा म्हणून आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि त्याचाच भाग म्हणजे ही ब्लॉगसूची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मराठी कॉर्नर म्हणजे ब्लॉगसूची नव्हे, ही एक "add on" सुविधा आहे जी फक्त मराठी कॉर्नरच्या सभासदांसाठीच उपलब्ध आहे.

    २.इथे आपला ब्लॉग जोडण्याआगोदर आपण आमच्या मराठी कॉर्नरचे विजेट आपल्या ब्लॉगवर लावणे गरजेचे आहे. आमचा विजेट कोड ब्लॉग जोडणी अर्जासोबत दिला आहे.विजेट सोबत एखादा अभिप्राय जर आपण आपल्या ब्लॉगवर लिहू शकलात तर खुपच चांगले होईल आणि त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. 
     अभिप्राय लिहिणे सक्तीचे नाही.मराठी कॉर्नर हे हॉशी संकेतस्थळ आहे. आणि आम्ही उपलब्ध करून देत असलेल्या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा हीच आमची ईच्छा आहे. त्यामुळे वर दिलेल्या दुव्यांप्रमाणे आपण जरी एखादा छोटासा अभिप्राय मराठी कॉर्नरबद्दल तुमच्या ब्लॉगवर लिहून मराठी कॉर्नरची माहिती तुमच्या ब्लॉग वाचकांना देऊ शकलात तर त्यांनाही या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

    ३.बेकायदेशिर, अश्लील, राजकीय,जाती-धर्म विरोधी,चोरलेले असे काहीही लिखाण दिसून आले तर आपला ब्लॉग अजिबातच स्विकारला जाणार नाही आणि त्याचे कारणही दिले जाणार नाही कारण जे असे ब्लॉग जोडायचा प्रयत्न करतिल त्यांना याचे कारण माहितच असेल! :D 
    हा नियम आम्ही कटाक्षाने पाळतो. बेकायदेशिर, अश्लील, राजकीय,जाती-धर्म विरोधी,चोरलेले असे काहीही लिखाण दिसून आले तर तो ब्लॉग विना कारण देता काढून टाकला जाईल.


    तुम्ही म्हणत असाल,
    भरपूर झाली माहिती आता ब्लॉग कसा जोडायचा ते सांगा? :D 
    सांगतो! तर ब्लॉग जोडणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमचा ब्लॉग दिलेल्या नियमांत बसतोय का ते पहा, सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करून घ्या आणि मगच हा अर्ज भरा:

    http://www.marathicorner.com/memberblogs/attach-your-blog

    झालं! एवढ सोप्प आहे! अर्जभरून झाल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्हाला मराठी कॉर्नरकडून मेल मिळेल ज्यात आपल्या ब्लॉग जोडण्यासंबंधीची सर्व माहिती असेल.या प्रक्रिये दरम्यान कोणताही problem आल्यास अथवा बरेच दिवस तुमच ब्लॉग जोडला गेला नाही तर आम्हाला लगेच marathicorner@gmail.com वर लिहून कळवा! हा ईमेल पत्ता खास मराठी कॉर्नरच्या सभासदांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेण्यासाठी बनवला आहे जिथे आम्ही मराठी कॉर्नर टिम मेंबर तुम्हाला आलेल्या अडचणी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो!

    आणि हो, जर तुम्हाला मराठी कॉर्नरबद्दल एखादा अभिप्राय तुमच्या ब्लॉगवर लिहिलाच तर लगेच त्या पोस्टची लिंक आम्हाला marathicorner@gmail.com वर मेल करा, नक्कीच त्याला आम्ही आमच्या संग्रही जपून ठेवू! :)

    आता वाचक म्हणून तुम्ही काय कराल?
    मी काही सक्ती करित नाहिये किंवा आज्ञाही सोडत नाहिये, फक्त एक आपेक्षा ठेवतोय ती म्हणजे एवढीच की ही जी आम्ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात जर तुम्ही काही मदत करू शकलात तर निश्चितच आम्ही आपले आभारी राहू. जास्त काही नाही फक्त ट्विटर,फेसबुक,बझ सारख्या सोशल निटवर्कवर तुमचे बरेच ब्लॉगर मित्र असतात, त्यांना ह्या पोस्टची लिंक दऊन किंवा ही पोस्ट सोबत असलेल्या "शेअरिंग" बटनाचा वापर करून तुमच्या मित्रपरिवारास कळवू शकलात तर त्यांनाही त्यांच्या ब्लॉगला आणखी प्रसिद्धी देण्यास मदत आम्ही करू शकू! आणि प्रत्येक बॅकलिंक सर्च इंजिनमध्ये चांगली जागा पटकावण्यात किती महत्वाची असते याची माहिती तुम्हाला सहज नेटवर मिळेल! :)

    या लेखाबद्दल काही शंका असतिल किंवा आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर निःसंकोचपणे या पोस्टला कमेंट टाका किवा कधीही  marathicorner@gmail.com या आमच्या इमेल पत्त्यावर मेल करा किंवा मराठी कॉर्नरवर उपलब्ध असलेला "संपर्क फॉर्म" भरून आम्हाला तुमच्या शंका, मत, सुचना कळवा!

    आशा आहे आम्ही ही सुंदर सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकू! आपला आधार व आपले आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

    आपला विश्वासू,
    अद्वैत
    मराठी कॉर्नर टिम

    Saturday, May 7, 2011

    हे जरा अतीच होतयं असं वाटत नाही?

    काल अक्षय तृतीयेच्या मराठी कॉर्नरच्या सभासदांना शुभेच्छा देताना एखादे सुंदर लक्ष्मी मातेचं चित्र पाठवता येते का म्हणून गुगलत होतो आणि अचानक हे सापडलं. वास्तविक पाहता कालच ही पोस्ट टाकणार होतो पण आधी याचा मूळ स्त्रोत शोधून, अभ्यास करून लिहायचं ठरवलं. हा जो मी फोटो इथे टाकतोय हा "प्रक्षोभक" आहे याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मी त्याला प्रसिद्धी देत नसून त्याचा कडाडून विरोध व्हावा या आपेक्षेने जोडत आहे. कृपया माझ्या लिखाणाचा गैरअर्थ न काढता या व अशा तत्सम गोष्टींचा समाजाच्या सर्व पातळीतून कडाडून विरोध व्हावा हीच आपेक्षा. हो, केवळ हिंदू आहे म्हणून नव्हे तर अशी लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्ट कोणत्याही धर्माबद्दल घडली असेल तर त्याचाही तितकाच विरोध केला पाहिजे हे मी माझे कर्तव्य मानतो.

    ज्यांना माझ्याप्रमाणाचे प्रथमदर्शी यात काय प्रॉब्लेम आहे
    हे कळाले नसेल तर कृपया त्यावर क्लिक करून?
    full size फोटो बघा.
    वर म्हटल्याप्रमाणे सहज एखादे सुंदर लक्ष्मी मातेचे चित्र शोधत होतो आणि अचानक हा फोटो सर्च रिसल्टमध्ये पहिल्या १० फोटोंत होता. आता पहिले मला तो छोटा दिसत होता म्हणून त्याबद्दल काही वाटले नाही पण मनात शंका होती की लक्ष्मी मातेच्या फोटोत हा फॅशन वाल्या बाईचा आणि त्यात असले कपडे परिधान केलेल्या बाईंचा कसा काय फोटो. मग वाटले कदाचित एखादी मराठमोळी मुलगी जिचे नाव किंवा टोपणनाव लक्ष्मी आहे अशी ही बया असावी पण तरिही मी त्या फोटोवर क्लिक करून नेमके तिचे नाव लक्ष्मी कसे याबद्दल काही माहिती मिळती का हे बघायला गेलो तर जे काही मी पाहिलं ते तळपायाची आग मस्तकात नेणारे आहे! आहो हा काय निर्लज्जपणा आहे? एखाद्या धर्माच्या भावनांशी खेळण्याची ही कोणती पद्धत आणि कोणी दिला हा अधिकार? आहो लिसा ब्ल्यु बाई तुम्ही असाल मस्त मोठे फॅशन गुरू पण ते तुमच्या देशात!  म्हणून जगातल्या इतर धर्मावर असला अपमानकारक हल्ला करणारे तुम्ही कोण? तुमचा संबंध काय? मला माहितिये कित्येक जणांना याबद्दल अजिबातच माहिती नाही. कारण तसे असते तर आजपर्यंत यावर बराच दंगा आपेक्षित होता पण दुर्दैवाने तसे झा्ले नाही पण काही हरकत नाही. आजूनही वेळ गेली नाही! आजूनही आपण याचा मोठा विरोध करू शकतो.
    हे पाहिल्यावर असले आणखी काय काय जगात चालू आहे याचा आढावा घ्यायला सुरवात केली.  माझा विश्वास करा, एखाद्या तापट मस्तकाच्या माणसाने जर आधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाच स्वतःचा PC क्षणात फोडेल हो! याची एक झलक:





    ही केवळ एक झलक आहे, म्हणा १०% आहे; इतका हलकटपणा जगात चालू आहे आणि आपण गप्प कसे हाच मला प्रश्न पडलाय! की सर्वजण माझ्यासारखेच याबद्दल अजून अज्ञानी आहेत? कदाचित तसेच आहे हे समजून हे सर्व आज मी तुम्हाला कळावे म्हणून प्रसिद्ध करत आहे. ह्या पापाला प्रसिद्धी देणे हे देखिल पाप आहे हे मला मान्य आहे पण हे पाप माझ्याकडून घडले तरी चालेल पण माझ्यासारख्या असंख्य हिंदू बांधवांच्या श्रद्धेशी खेळणार्‍या या कंटकांबद्दल शक्य तितक्या लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हे लिहिले.


    असे नाही की जगात फक्त हिंदूच हिंदू देवांना मानतात, तुम्हाला माहिती असेल कदाचित, मध्यंतरी हॉलिवूड स्टार जिम केरी ने गणपतीबाप्पांवर प्रक्षोभक विधान केल्यावर जितका हिंदूंकडून विरोध झाला तितकाच खुद्द हॉलिवूडमधूनही विरोध झाला! तेव्हा कळालं की गणपतीबाप्पाना गोल्डी हॉन सारख्या मोठ्या दिग्दर्शीका देखिल मानतात. म्हणजेच जगात इतर लोकांनाही इतर धर्माबद्दल माहिती आहे. याचा अर्थ असाच होतो की हा जो काही प्रकार घडलाय हा "घडवून" आणलाय. थोडक्यात आता आपण दंगा केला की आपोआपच त्यांचे मार्केटमध्ये नाव होते! थोडक्यात बॉलिवूडवाले जसा एखादा सिनेमा चालावा म्हणून कॉंट्रावर्सी तयार करतात मग आपोआप आपल्यासारखा सामन्य माणूस "है! तो असा म्हणाला त्याला "त्या" सिनेमाबद्दल" म्हणत नकळत त्या सिनेमाचे प्रमोशन करत बसतो! तसाच प्रकार बहुदा या नीच लोकांनी चालवला आहे. म्हणजे उद्या करोडो हिंदूंनी याचा विरोध केला की आपोआपच करोडो जनतेला या फॅशन डिझाइनरचे नाव कळणार आणि आपोआपच ती बया "जगप्रसिद्ध" हा स्टेटस लावून मिरवणार!

    म्हणजे थोडक्यात दोन्ही बाजूने आपलीच गोची! बोलावे तरी बोंब, न बोलावे तरी बोंब! पण काहीही असो हे जरा अतीच होतयं असं वाटत नाही?

    -अद्वैत
    http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=15&t=437

    Friday, May 6, 2011

    अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

    वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मराठी कॉर्नरच्या सर्व सभासदांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


    विकिपेडियावर दिलेली अक्षय तृतीयेची माहिती सोबत देत आहोत! (साभार विकिपेडिया)
    अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीएवढे मडके आणून,त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात.त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो.असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात.
    या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. (त्यामुळेच बहुदा बायका सोने खरेदीवर जास्त भर देतात! :D विनोद आहे! जास्त मनावर घेऊ नका!) या दिवशी बद्रिधामावर बद्रिनारायणाच्या मंदिरात प्रथम प्रवेश मिळतो.वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण उघडले जातात. ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणार्‍या परशुरामाची जन्मतिथी आहे.

    अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

    Monday, May 2, 2011

    लादेनचा मृत्यु: कितपत सत्य?

    आज जगातली सगळ्यात आनंदाची आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाची बातमी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांच्या देशवासियांना आणि संपूर्ण जगाला दिली! आतंकवादाचा अतिउच्च्य कळस ठरलेल्या ओसामा बिन लादेनच्या मृत्यु विषयी! हा व्हिडिओ पाहा. यात बराक ओबामांनी officially लादेनला ’मृत’ घोषित केले आहे! हा व्हिडिओ काळजी पूर्वक ऐका! सोबत मला जमेल अशा शब्दात मी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे. तो व्हिडिओच्या खाली देत आहे!

    अनुवाद:

    "नमस्कार, मी आज आमेरिकी नागरिकांना आणि संपूर्ण जगाला सांगू ईच्छितो की अमेरिकेने चालवलेल्या सैनिकी अभियानात "अल-कायदा"चा प्रमुख "ओसामा बिन लादेन" मारला गेला आहे. असा आतंकवादी जो हजारो निष्पाप नागरिक,महिला आणि लहान मुलांच्या खुनाचा जबाबदार आहे. आज जवळजवळ १० वर्ष झाली जेव्हा एक सुरेख सप्टेबरची सकाळ अमेरिकेच्या इतिहासातिल सर्वात वाईट अशी ठरली. (नंतरचे सगळे त्या ९/११ च्या घटनेची माहिती सांगितली आहे. विमान कसे हायजॅक केले, ट्विन टॉवर कसे पडले, त्यामुळे झालेले नुकसान, परिवारांतून कमी झालेले सदस्य, असे ३००० लोक मारले गेले वगैरे वगैरे! ते काही भाषांतरित करण्याची गरज वाटत नाही) नंतर २००१ च्या सप्टेबरला आपण सर्व लोक जाती धर्म विसरून  याची स्मृती ठेवायला आणि त्याचा विरोध करायला एकत्र आलो. आणि लवकरच आम्हाला समजले की अल कायदा नावाच्या संघटनेने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे आम्हीही लगेचच अमेरिकेच्या संरक्षणासाठी त्यांच्या विरोधात उभे राहिलो. जवळ जवळ १० वर्ष अमेरिकी सैन्य जे कार्य़ करित आहे त्यांना मनापासून धन्यवाद! त्यांच्यामुळेच आम्ही तालिबानचे अफगाणिस्तानवरिल राज्य उलथवून लावले जे अल्कायदाने त्यांना बहाल केले होते. आम्ही यशस्वीरित्या भरपूर अतिरेकी मारले ज्यात ९/११ च्या कटात सहभागी असलेले अतिरेकीही होते. पण त्यांचा मुख्य लादेन मात्र अजून सापडला नव्हता आणि अफगाणिस्तान सोडून सिमापार पाकिस्तानात जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथुन तो जगभर अलकायदाचे नियंत्रण करू लागला. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा लगेचच CIA च्या मुख्यांना आदेश दिले की "ओसामा"ला पकडणे/मारणे हेच आता अलकायदा विरोधातिल युद्धाचे मुख्य ध्येय असेल. त्यानंतर अपार कष्ट घेत आम्ही त्याच्या पाकिस्तानातिल ठावठिकाण्याचा पत्ता लावला. यासाठी मी सतत आमच्या गुप्तचर विभागाशी संपर्कात राहिलो. आणि गेल्या आठवड्यात मला समजले की आमच्याकडे त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. आज माझ्या आदेशाखाली आम्ही त्या आबादाबाद ठिकाणावर कृती केली. ही कृती एका छोट्या पण असामान्य धाडसी व असामान्य कर्तुत्ववान सैन्य तुकडीने पार पाडली. यात कोणिही सैनिक जखमी झाला नाही आणि कोणिही सामान्य नागरिक मारला जाणार नाही याची दक्षता घेतली गेली. त्यानंतर त्यांनी ओसामा बिन लादेनला ठार केले व त्याचे मृत शरिर ताब्यात घेतले. हे अलकायदा विरोधातिल सर्वात मोठे यश आहे. आम्हाला याची जाणिव आहे की हा शेवट नाही. यानंतरही अलकायदा त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरूच ठेवतील. त्यामुळे आम्ही आता सदैव सतर्क आहोत. यावरून आम्ही हे सांगू ईच्छितोकी ज्याप्रमाणे बुश म्हणाले आणि माझेही म्हणणे आहे की आम्ही "ईस्लाम" विरोधी नाही कारण लादेन "ईस्लाम"चा पुरस्करता नव्हता उलट सगळ्यात जास्त मुस्लिम बाधवांचा हत्यारा होता. त्यामुळे ह्या बातमिचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे जे शांततेवर प्रेम करतात. गेल्या वर्षांत ज्याप्रमाणे मी म्हणालो होतो की वेळप्रसंगी त्याच्या विरोधात आम्ही पाकिस्तानातुनही कारवाया करू आणि तेच आज आम्ही केले. (आता पकिस्तानचे कौतुक) हे सर्वांनी जाणायला पाहिजे की पाकिस्तानच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. मी आज झरदारिंशी बोललो आणि त्यांनी हे मान्य केले की आजचा दिवस आम्हा दोन्ही देशांसाठी आनंदाचा दिवस आहे कारण ज्याप्रमाणे लादेनने अमेरिकेशी युद्ध पुकारले होते तसेच ते पाकिस्तानशीही पुकारले होते. आणि आता हे महत्वपुर्ण आहे की पाकिस्तानने आम्हाला अलकायदाविरोधात अशिच मदत करावी. अमेरिकी जनतेला कधिच युद्ध मान्य नाही. एखाद्या सैनिकाची मृत्युची माहिती किंवा जखमी सैनिकाची किंमत आम्हाला या १० वर्षांत सर्वात जास्त कळली आहे. पण या देशाच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. त्यासर्व लोकांना ज्यांनी आपले कुटुंब सभासद अलकायदामुळे गमावले आहेत त्यांना आज आम्ही आभिमानाने सांगू ईच्छितो की आजच्यासारख्या रात्री घडलेल्या घटना "त्यांच्या मृत्यला" न्याय मिळवून देणार्‍या आहेत. आज मी त्या सर्व लोकांना धन्यवाद देऊ ईच्छितो ज्यांनी या कार्यात अहोरात्र मेहनत घेतली. सामान्य नागरिकांना त्यांची नावंही माहित नसतिल पण त्यांना स्वतःला त्यांच्या या कामाबद्दल धन्यता वाटत असेल. (यानंतर ९/११ च्या संबंधीत नागरिकांना सहानभुतीचे चार शब्द) हे आम्ही करून दाखवली की जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो. धन्यवाद!"

    हे झालं बराक ओबामांचे भाषण. आता मला व असंख्य लोकांना पडलेले काही प्रश्न!

    १. भाषणात असत "मी","माझ्यामुळे" वगैरे का?
    हेच ते पाकिस्तानातिल घर जेथे लादेन मारला गेला असा अमेरिकेचा दावा आहे.
    सध्या असं म्हणताहेत की ओबामा सरकार आजवरच अमेरिकेतल सर्वात फोल ठरलेलं सरकार आहे. त्यांनी जे जे वादे केले होते ते ते "वांद्या"त रूपांतरित झाले. असेही वारे सुरू होते की ३ वर्षांनी सरकार कोसळणार आणि पुन्हा निवडणूका होउन नवा राष्ट्रपती निवडून येणार. ओबामाच्या नाकरत्या सरकारामुळेच डोलर कोसळतो आहे आणि अमेरिकेचे जगावरिल प्रभुत्व कमी होतेय. सैन्यावर होणारा खर्च देखिल ७५% कर लावून सर्वसामान्यांकडून घेतला जातोय. मग यात सतत "मी", "माझ्यामुळे" वगैरे वापरून स्वतःचे स्थान वाचवायची धडपड तर ओबामा करत नाहियेत ना? आणि जर हे खरे असेल तर सामान्य अमेरिकी नागरिकांच्या भावनांशी खेळल्याचा निश्चितच ओबामांना पुढे खुप त्रास सहन करावा लागेल!

    २. अमेरिकेने/पाकने मिडियाला पुरवलेल्या लादेनच्या मृत्युच्या फोटोवरिल शंका:
    मी यावर जास्त टिपणी करणार नाही. कारण मलाही अजुन असा कोणताही पुरावा नेटवर मिळाला नाही जो ही सांगतोय की हे फोटो अमेरिकी सरकारने प्रसिद्ध केले आहेत. पण जगभर हाच फोटो दाखवला जातोय आणि टिका केली जातिये तरिही अमेरिका सरकार गप्प कसे? काही तरी शंकास्पद नक्कीच आहे.

    हा फोटो जो पाकिस्तानी मिडियाने प्रसिद्ध केला:
    आणि हे त्यावरचे पुरावे की हा फोटो मुळचा "महारूफ साईद" जो २०१० साली मारला गेला, त्याच्यावर फोटोशॉप करून बनवला आहे:
    आणि हा पुरावा खराही वाटतो कारण १० वर्षात त्याची दाढी तेवढीच पांढरी आणी जसिच्या तशी? पण ओवरऑलच यात कितपत सत्यता आहे हे माहित नसल्याने जास्त न बोलणेच योग्य.
    ३.डिएने टेस्ट:
    ओबामांनी म्हणे लादेनच्या मृतदेहाची तपासणी झाल्यावर ते कंफर्म करून मगच तो लादेनच आहे जो मारला गेलाय याची माहिती अमेरिकी नागरिकांना व जगाला दिली. पण माझा प्रश्न असा आहे की केवळ ३ तासांत त्यांनी DNA सारखी महत्वपूर्ण तपासणी केली. म्हणजे घटनाक्रम असा असावा. सैनिकांनी त्याला मारलं आणि लगेच त्याच रक्त अमेरिकेला पाठवल. कारण DNA टेस्ट करायला प्रयोगशाळा लागते. ती त्या भागात जेथे टेलिफोनचीही सोय नाही अशा गावात जिथे लादेनला मारलं तिथे उपलब्ध असण शक्यच नाही. आणि आमेरिकेला नाही तर मग इतर प्रयोगशाळेत पाठवल असेल तर त्या DNA शी मॅच करायला अमेरिकी सैन्य काकोटिला सॅंपल घेऊनच फिरत होते. ओबामा म्हणताहेत की एक छोटे पथकाने ही कारवाई केली, मग तिथे कोण उपलब्ध होतं जो हे सर्व तपासणी करेल? आणि एखादी DNA टेस्ट पुर्ण १००% result मिळायला कमितकमी ४-५ तास लागतातच! मग त्याहुनही कमी वेळेत त्याला पुरावा कसा मानला जातो? त्यामुळे हे संपूर्ण DNA दुजोरा शंकास्पद आहे!

    ४.दफन
    आज भारतिय प्रमाणवेळेनुसार अमेरिकेने लादेनचे शव अफगानिस्तानात हलवून समुद्रात खोलवर दफन केले. पण एवढी गडबड का? थोडिच तो मेलेला जागा होणारे? का त्याला का मारला म्हणून कोणी त्याला जाब विचारणार आहे? ज्याप्रमाणे सद्दाम हुसेनच्या मृत्युचे official छायाचित्र प्रसिद्ध केले तसेच याचे करायला काय हरकत होती? हुसेनपेक्षा याचा मृत्यु अमेरिकी नागरिकांना जास्त महत्वाचा आहे. आणि दफनच करायचे होते तर जिथे मारला तिथेच सडू द्यायचा किंवा तिथेच समुद्रात टाकायचा. पुन्हा अफगाणिस्तानात का न्यायचा? आणि इकडे म्हणायच की लादेन मुस्लिमांच्या विरोधात होता आणि इकडे त्याला मुस्लिमांच्या पद्धतिने सन्मानपूर्वक दफन करायचे. हा विरोधाभास का? यातही शंकाच निर्माण होते!

    ५.राजकिय डावपेच
    मध्येच पाकिस्तानचे कौतुक करून त्यांना पाठिशी घालायचे. म्हणजे उद्या कोणीतरी (थोडक्यात भारत) म्हटल की "पाकिस्तान हाच आतंकवादाला जबाबदार आहे" तर पाकिस्तान ठामपणॆ याला विरोध करू शकतो. आणि ओबामाचे बोल ढालिसाखे वापरू शकतो. थोडक्यात ओबामा+पाकिस्तान= राजकिय स्थिरता.

    मी जे काही लिहिले आहे ते सध्या न्युज चॅनलवर दाखवलेल्या माहितिच्या आधारे लिहिले आहे. यातिल काही मुद्दे बिनबुडाचे असतिल पण निदान काहिततरी तथ्य असेलच ना? मग खरच लादेनचा मृत्यु: कितपत सत्य?

    Sunday, May 1, 2011

    महाराष्ट्र "दीन" !!

     आज महाराष्ट्र दिन! पण खरच आज महाराष्ट्र "दीन" म्हणून साजरा तरी केला जात नाहिये ना? कोणे एकेकाळी सर्वात कर्तबगार पुढार्‍यांनी संपन्न असलेल्या आपल्या महाराष्ट्रावर आज क्वचितच स्वतःची मुल्य जपणारा पुढारी दिसेल! आपलं दुर्दैव आहे की आपल्याला असले फालतू राजकारणी लोक मिळाले! सध्याच्या क्रमवारित बिहारने महाराष्ट्राला विकासात मागे टाकले आहे. यापेक्षा अपमानकारक गोष्ट अजून काही असूच शकत नाही. याचा अर्थ असा नाही की बिहार खराब आहे, पण ज्या अवस्थेत ते होते आणि त्यात त्यांनी जी लक्षणिय प्रगती केली हे बघण्यासारखे आहे!

    महाराष्ट्र दिना विषयी म्हणाल तर ही दोन पानं बघा:

    http://72.78.249.107/Sakal/1May2011/Normal/Kolhapur/page5.htm

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8132647.cms

    आता यांना काय म्हणायच? "प्रेस" हे लोकजागृतीचे मोठे काम पार पाडतात पण फक्त पैसा मिळतो म्हणून स्वतःच्या राज्याबद्दलचा स्वाभिमान बाजूला ठेवून हे लोक असली कामं करतात! काय फरक पडला असता जर यांनी स्वतःहून एखादे पान शुभेच्छा देणारे काढले असते तर? वर्ल्डकप जिंकला तेव्हा ह्यांना कोणी पैसे दिले होते स्वतंत्र पान छापण्याचे? नाही ना? मग तसच महाराष्ट्र दिनासारख्या महत्वपुर्ण दिनी ह्यांना स्वतःचे डोके चालवता येते नाही? मला असही म्हणायच नाहिये की तुम्ही गुजरातसाठीचे पान छापू नका, छापा! आवश्य छापा पण स्वतःच्या कर्मभूमीबद्दल देखिल काही करू शकलात तर?

    आणि ते मटावाले! इथे मस्त चुका काढण्यात मजा मानताहेत. सरकार अक्कलशुन्य आहेच पण ह्यांना एवढही डोकं नाही की स्वतःहुन ती चुक दुरुस्त करून नीट छापावे? पण नाही!

    ही सिस्टिम कोठेतरी थांबायला/थांबवायलाच हवी. अण्णा हजारेसारखा वयस्कर माणूस स्वतःची पर्वा न करता उपोषणाला बसतो पण मधेच "कलमाडी"ची केस बाहेर काढून सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते आणि हे कोणाच्याही लक्षातही येत नाही!

    आपण सामान्यमाणूस, पडद्यामागे जे काही घडते ते आपल्याला १% देखिल माहित नसते तरी आपण इतके त्याचा विरोध करतो मग विचार करा राहिलेले ९९% सत्य जर बाहेर आलेच तर ते आपण सहन करू शकू?

    इतका राग मनात आहे की तो कसा लिहून काढावा हेच कळत नाहिये! तरिही एक प्रयत्न केलाय मला काय म्हणायचय हे सांगण्याचा!

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!!
    गर्व आहे मराठी असल्याचा! गर्जा महाराष्ट्र माझा!!




    Ratings and Recommendations by outbrain

    LinkWithin

    Related Posts Plugin for WordPress, Blogger...