Friday, March 11, 2011

एक उनाड दिवस!

                आज नेहमीप्रमाणे कॉलेजला निघायची तयारी करत होतो. का कोणास ठाऊक मला आज उत्साहच वाटत नव्हता. तरिही गाडीवर टांग मारली आणि स्वारी कॉलेजच्या गेटवर येऊन धडकली. लांबूनच गेट समोर गर्दी दिसत होती, म्हटलं काही तरी लोचा झाला आहे. तेवढ्यात मयर्‍या (मयुर लाडाने मयर्‍या) कंपाऊंडवरून उडी मारून आत जाताना दिसला. त्याला थांबवून काय भानगड झालिये हे माहित करून घेतलं. मॅटर असा होता की आज पासून लेट येणार्‍या विद्यार्थ्याला दंड केला जाणार होता! मी तर नेहमीच लेट जाणारा! च्यायला म्हटलं काय शाळा आहे का इंजिनिअरिंगचे कॉलेज, मयर्‍या पटकन म्हणाला "शाळा" आणि आम्ही दोघे जोरात हसलो. काय मग, लगेच गाडी मित्राच्या रूमवर लावली आणि मी देखिल कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरलो. दंड भरणे कधी जमलेच नाही राव आपल्याला! ट्रॅफिक पोलिसला ५-७ किलोमिटर पळवून निसटणारे आम्ही कॉलेजचा दंड भरतोय होय? च्छ्या!!

                आधिच कॉलेज करायचा उत्साह नव्हता म्हणून कॉलेजचे तोंड न बघता सरळ कँटिनमध्ये कोण दिसतय का ते पाहायला स्वारी तिकडे वळाली आणि काय आश्चर्य? ज्याला कँटिन म्हणजे काय? हे तरी ठाऊक आहे का माहित नाही असा आमचा विनू दी टॉपर कँटिनमध्ये चक्क निवांत (कोणत्याही नोट्स हातात न घेता) बसलेला दिसला. म्हणून अतिक्युरियोसिटीने त्याला त्याच्या अशा अबनॉर्मल वर्तनाची चौकशी केली तर कळाले की आज पहिले ३ लेक्चर होणार नाहित कारण मेक. डिपार्टमेंटचे कसले तरी वर्कशॉप आहे. वाह! बेस्ट! तेवढ्यात हिरवळ (समझदारोंको इशारा काफी है) शोधत आमची गॅंगदेखिल कँटिनमध्ये आली.

                सगळीच फ्रेष दिसत होती. कारण हेवी लेक्चर्स कँसल झाली होती ना! मग काय चेष्टा मस्करी चालू झाली. लगेच विषय "आज कुठेतरी जाऊया" वर आला. हा विषय आला की एक पुस्तक लिहून होईल इतकी ठिकाणं सुचवली जातात! एक १५ -२० मिनिटांनी सगळ्यांच एकमत पडलं की सौर्‍याच्या (सौरभ लाडाने सौर्‍या) शेतातल्या विहिरीवर पोहायला जायचं! मी सुरूवातिला नाही म्हणत होतो पण माझ्या नकाराला होकारात कन्व्हर्ट करणे यांना मस्त जमतं. थोडापण वेळ न काढता कोण कोण येणार होते असे आम्ही सगळे कँटिनच्या बाहेर पडलो. आता प्रश्न होता कपड्यांचा.घरी जाणे शक्य नव्हते कारण विनाकारण पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार होता. कारण कॉलेज चुकवून उनाडक्या करणे आणि तेही ऑफिशिअली?इंपॉसिबल! शेवटी अंगावरच कपडे वाळवायचे ठरले! शेत होतं १० मैलावर. बारके-जाडे असे सॉर्टाऊट करून ६ गाड्यांवरून १७ लोक सौर्‍याच्या शेताकडे मार्गस्थ झालो.

                   भर दुपारी ११ वाजता एकामागोमाग एक ६ दुचाकी गच्च कोंबून जाताना पाहून सगळे रस्त्यावरचे का कोणास ठाऊक पण "मंगळावरून आले आहेत की काय" अशा नजरेने बघत होते. एक तर महाशय दुसर्‍या बाजूने जात होते, आम्हाला बघून त्यांनी गाडी वळवली आणि आम्हाला पुन्हा गाठून "काय झालं?" विचारण्यासाठी २-३ किलोमिटर उलटे आले होते! काय लोकं असतात राव!

                  आम्ही सौर्‍याच्या शेताकडे चाललोय हे खुद्द सौर्‍यालाही माहित नव्हतं! तेवढ्यात त्याची आठवण झाली.  :D लगेच त्याला फोन केला आणि बोलावून घेतले.डांबरी रस्ता, मुरमाड रस्ता करत करत कच्चा रस्ता लागला. मग काय, गाडीवरच्या प्रत्येक "एक्स्ट्रा पार्सल" उतरवून चालत यायला लावले, सौर्‍याच्या शेतात शेवटी एकदाचे पोहोचलो. अजून गाडी लावतोय तोच निम्मी मंडळी पाण्यात पोहोचली सुद्धा होती.

                  कसली स्वच्छ विहिर होती! काठापासून साधारण १५ फूटांवर पाणी होते. स्वच्छ हिरवेशार पाणी. दुपारचा सूर्य़ मध्यावर आला असल्याने  पाण्याखाली २०-२५ फुटांपर्यंतचे सगळे अगदी स्पष्ट दिसत होते! एकदम व्यवस्थित बांधिव,५०-६० फुट त्रिज्येची मस्त मोठी स्वच्छ विहीर, बाजूला तोडणीसाठी आलेला ऊस, मोहरलेल्या आंब्याची झाडे, कडत उन असूनही मंद गार वारा आणि आम्ही १८ लोक! जबरदस्त वातावरण.

                सुळक्या, गड्डा उडी, पैजेच्या उड्या, बापरे! किती व्हरायटीने विहिरीत उड्यामारत होतो. सौर्‍या आमच्यातला सगळ्यात धष्टपुष्ट माणूस. त्याने एक गड्डा उडी मारली. गड्डा उडी म्हणजे विहिरिच्या काठावरून विहिरित उडी मारल्यानंतर पाण्यात पडायच्या आधी पाय हातांनी गच्च धरून अंगाचा "C" आकार करून घेतलेली उडी. या उडीमुळे पाणी खुप उडते पण सौर्‍या उडी मारल्यानंतर विहिरित काही पाणी शिल्लक राहिलेय का नाही हे बघायला लागेले इतके पाणी उंच उसळले. आधिच पाण्यात आसलेल्या आम्हाला त्याच्या उडीमुळे तयार झालेल्या लाटा "त्सुनामी" आल्यासारख्या अंगावर आल्या! नाकातोंडात पाणी गेले एवढी भारी उडी होती त्याची!

                   पोहायला न येणारी २-३ लोकंही होते आमच्यात पण तारूण्याच रक्त ते! उतरले विहिरित पण पायर्‍यांवरून. मग त्यांना पोहायला शिकवणे, पाण्यात स्वतःच्या "सो कॉल्ड" स्किल्स दाखवणे, एकमेकांना बुडवणे असले सगळे प्रकार करत करत कधी ३ वाजून गेले कळालेच नाही!हळू हळू एकेकाचा स्टॅमिना संपू लागला. साधारण ३:३० पर्यंत सगळे विहिरितून बाहेर पडले.

                    मग आता कार्यक्रम होता "कपडे वाळवणे" ! मस्त उन पडलेलं त्यात वाहणारा मंद वारा, वाजणार्‍या थंडीने हळूच दात एकमेकांवर आपटायला लावत होता. पण त्यातही मजा होती. शेजारच्या शेतातले मस्त मोठे टुणटुणीत ऊस खात, एकमेकांच्या "सुद्रुढ" शरिरयष्टीची चेष्टा करत करत अर्धा एक तास गेला! पुन्हा व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन परतिच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात का कोणास ठाऊक एकदम "ऊसाचा रस" प्यायची हुक्की आली! लगेच गाड्या रसवंती गृहाकडे वळवल्या! "गृह" कुठले, कापड लावून बनवलेली कुटी. चांगला १२-१५ लिटर रस पिला असेल! ३-३ ग्लास प्रत्येकी! :D

                 त्या रस काढणार्‍या मशिनला लावलेले ते घुंगरू, त्यांचा तो नाद, कडक उनात बर्फ घालून ठसका येईल इतका गोड रस, वाह! कसला सॉलिड दिवस संपत होता! वाटत होते हा दिवस कधी संपूच नये! मनात थोडी भितीपण वाटत होती, कारण एकदा "इंजिनिअर" असा शिक्का लागून बाहेरच्या विश्वात स्वतःचे "स्वत्व" शोधण्यास बाहेर पडल्यानंतर असे मित्रांसोबत हूंदडणे जमेल?पहिली गोष्ट असे मित्र पुन्हा मिळतिल? हा असा दिवस परत आपल्या नशिबी कधी येईल? नकळत डोळे पाणावले. मला तंद्रितून जागं करत राहुल्या म्हणाला, "ए अद्व्या आवर लवकर! पुढच लेक्चर गाठायच आहे ! नाहितर सगळा रस जिरेल HOD पकडला तर!". राहुल्याच्या HOD ला उद्देशुन "अरे-तुरे"च्या बोलण्याने हसु आले. हसत हसत पण मनात कोठेतरी आज मित्रांसोबत घालवलेला एक उनाड दिवस आठवत गाड्या पुन्हा कॉलेजकडे वळाल्या!

यारो हम रहे या ना रहे कल ,  याद आयेंगे ये पल! 

-अद्वैत
मराठी ब्लॉग्स

2 comments:

  1. Replies
    1. गावाकडची लोकं आम्ही, गावाकडची विहीर! :)

      Delete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...